स्थानिक आवाजांपासून ते जागतिक पडद्यांपर्यंत: इफ्फी ओटीटी ज्युरीने अधोरेखित केले स्वातंत्र्य, वैविध्य आणि कथाकथनाच्या प्रतिभेचे एक नवीन युग
ओटीटी लुप्त होत चाललेल्या कथांना पुनरुज्जीवित करत आहे आणि नवीन प्रतिभा प्रकाशात आणत आहे : ओटीटी ज्युरी अध्यक्ष भारतबाला
कलेद्वारे समाजाचे संघर्ष प्रतिबिंबित व्हायला हवा - ओटीटी ते शक्य करून दाखवते : शेखर दास
ओटीटी ने कथाकथनाचे खरोखरच लोकशाहीकरण केले आहे: मुंजाल श्रॉफ
चित्रपट पाहणे हे ओटीटीच्या युगात वैयक्तिक, वाहनक्षम आणि शक्तिशाली आहे: राजेश्वरी सचदेव
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2025
भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या आणि वाढत्या गतिमान कथाकथनाच्या परिदृश्याचे प्रतिबिंब म्हणून स्थापन केलेल्या इंडियन पॅनोरमातील वेब सिरीज -ओटीटी विभागाच्या ज्युरींनी आज गोव्यात 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) माध्यमांना संबोधित केले. ज्युरी अध्यक्ष भरतबाला यांनी प्रतिष्ठित ज्युरी सदस्य शेखर दास, मुंजाल श्रॉफ आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासमवेत, डिजिटल कथांचे विस्तारित विश्व आणि ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे भारताच्या सर्जनशील संस्कृतीला नव्याने आकार देण्याच्या घन पद्धतींवर आपले विचार मांडले. त्यांच्या विचारांनी केवळ समकालीन कथा सांगण्याच्या बदलत्या व्याकरणावरच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांमधील प्रामाणिक, वैविध्यपूर्ण आणि सीमारेषा ओलांडणाऱ्या आशयाप्रती वाढती रुची देखील अधोरेखित केली.

ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे झालेल्या मोठ्या बदलाबद्दल बोलताना, भारतबाला यांनी या माध्यमाचे वर्णन "एक असे माध्यम ज्याने कथांना सूत्र आणि परंपरांच्या बंधनातून मुक्त केले आहे" असे केले. त्यांनी नमूद केले की अनेक सामाजिक नाट्ये आणि प्रादेशिक कथा एकेकाळी सिनेमा हॉलमधून गायब झाल्या होत्या, परंतु ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी त्यांना नवीन उर्जेसह पुनरुज्जीवित केले आहे. "भारत एका खंडाइतकाच वैविध्यपूर्ण आहे. ओटीटी आपल्याला आपला शेजारी, आपले स्थानिक वातावरण, आपल्या तात्कालिक समाजाच्या कथा ऐकवण्याची अनुमती देतो - अशा कथा ज्या अन्यथा कधीही समोर येणार नाहीत. हे प्रारूप नवीन प्रतिभेला उमलण्याची आणि प्रयोग करण्यास मदत करते ज्यामुळे तळागाळातील सर्जनशीलतेतून मुख्य प्रवाहातील सिनेमात प्रवेश करण्याची संधी मिळते ," असे त्यांनी अधोरेखित केले.

त्यांनी स्ट्रीमिंग युगात भारतीय कथांच्या जागतिक प्रसारावरही भर दिला. ते म्हणाले, “एकदा तुम्ही तुमचे काम ॲमेझॉन किंवा नेटफ्लिक्सवर टाकले की, ते जागतिक स्तरावर जाते. आपण आपल्या कलावंतांना त्यांची कला अधिक धारदार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, त्यामुळे आपल्या कथा मुळांशी प्रामाणिक आणि अस्सल राहतील, तरीही त्यांचा प्रभाव सार्वत्रिक असेल.” अभियंत्यांपासून ते स्वयं-शिक्षित चित्रपटकर्त्यांपर्यंत, अपारंपरिक कलानिर्मात्यांच्या वाढत्या ओघावर विचार करताना, त्यांनी गोष्ट सांगताना भावनिक सूक्ष्मता आणि संवेदनशीलतेकडे परत येण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर दास यांनी डिजिटल कलानिर्मात्यांच्या कलात्मक जबाबदाऱ्यांबद्दल आपले मत मांडले. ओटीटीला सिनेमाचा एक रोमांचक विस्तार म्हणत, त्यांनी नमूद केले की, हे माध्यम जटिल सामाजिक वास्तवाचे सखोल अन्वेषण करण्याची मुभा देते. "कला समाजाच्या संघर्षांना प्रतिबिंबित करते," असे ते म्हणाले आणि त्यांनी वेब सीरिजच्या निवडींची, त्यांच्या सखोलता, विविधता आणि समकालीन भारताच्या प्रामाणिक चित्रणासाठी प्रशंसा केली. त्यांनी आठ भागांची वेब मालिका पाहणे म्हणजे "आठ स्वतंत्र चित्रपट अनुभवण्यासारखे आहे," असे सांगून, दीर्घ स्वरुपाच्या सिनेमॅटिक कथनामागचे प्रयत्न आणि त्यातली रग अधोरेखित केली.

निर्माता आणि दिग्दर्शक मुंजाल श्रॉफ यांनी ओटीटी क्रांतीचे वर्णन "वितरणाचे लोकशाहीकरण" असे केले. नियंत्रण कमी होत आहे आणि प्रेक्षकांच्या निवडीचा विस्तार होत आहे असे त्यांनी नमूद केले. प्रेक्षक आता स्टारडमपेक्षा प्रामाणिकपणाला अधिक महत्त्व देत आहेत. असेही ते म्हणाले "चित्रपटकर्ते धाडसाने विविध शैलींमध्ये प्रयोग करताना पाहून आनंद होत आहे. ओटीटी आणि यूट्यूबमुळे, चित्रपटकर्त्यांना बॉक्स ऑफिसच्या समीकरणांची किंवा टेलिव्हिजनच्या निर्बंधांची काळजी न करता अपारंपरिक कथा सांगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. आशय वापराचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला आहे, आणि प्रेक्षक आता जाणीवपूर्वक वैविध्यपूर्ण, कधीकधी आव्हानात्मक कथा निवडत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अभिनेत्री राजेश्वरी सचदेव यांनी प्रेक्षक आणि त्यांच्या पडद्यांवरील जिव्हाळ्याच्या संबंधांवर प्रकाश टाकला. चित्रपट आणि वेबमालिका थेट आपल्या हातात आल्या आहेत, त्यामुळे नवीन दृष्टिकोनांची भूक वाढली आहे," असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. तुरुंगातील जीवनावरील एका मालिकेचा उल्लेख करत, एकेकाळी वर्जित असलेले विषय आता प्रामाणिकपणे आणि माणुसकीने कसे शोधले जात आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. "या कथा पूर्वी मोठ्या पडद्यावर पोहोचल्या नसत्या, परंतु आज त्या उत्सुकतेने आणि सहानुभूतीने पाहिल्या जात आहेत," असे त्यांनी नमूद केले.
संपूर्ण पत्रकार परिषद इथे पाहता येईल:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2195527
| Visitor Counter:
7