iffi banner

चित्रपट समीक्षेच्या उत्क्रान्त होत जाणाऱ्या भूमिकेविषयी इफ्फी 56 मध्ये चित्रपट समीक्षकांनी केला उहापोह


चित्रपटांच्या प्रदर्शनासमवेत रंगली "बियॉन्ड द थम्ब- द रोल ऑफ अ फिल्म क्रिटिक : अ गेटकीपर, ऍन इन्फ्लुएन्सर ऑर समथिंग एल्स" ही राउंडटेबल चर्चा

#IFFIWood, 26 नोव्‍हेंबर 2025

 

चित्रपटांच्या जागतिक परिसंस्थेत चित्रसमीक्षक, पत्रकार आणि परीक्षणकर्ते पार पडत असलेल्या भूमिकेच्या महत्त्वाला बळकटी देत, 56 व्या इफ्फीमध्ये "बियॉन्ड द थम्ब- द रोल ऑफ अ फिल्म क्रिटिक-: अ गेटकीपर, ऍन इन्फ्लुएन्सर ऑर समथिंग एल्स"  या शीर्षकाची  राउंडटेबल चर्चा रंगली. या सत्रात जगभरचे विख्यात चित्रसमीक्षक एकत्र आले आणि त्यांनी- डिजिटल क्रांती,  समाजमाध्यमांचा प्रभाव आणि  आशयाचा जलद उपभोग घेतला जाण्याच्या युगात चित्रपट समीक्षणाचे बदलते परिदृश्य- या विषयाचा धांडोळा घेतला.

चर्चेची सूत्रे डेव्हिड अब्बातेसियानी यांनी सांभाळली. आणि या सत्रात बारबरा लोरी दे लाशारिए, दीपा गहलोत, सुधीर श्रीनिवासन, मेघाचंद्र कोंगबम, एलिज़ाबेथ केर आणि बारद्वाज रंगन या दिग्गज समीक्षकांनी भाग घेतला.

आजच्या काळात चित्रपट समीक्षणाची परिभाषा करताना झालेले नाट्यमय बदल अधोरेखित करत डेव्हिड अब्बातेसियानी यांनी संभाषणाची सुरुवात केली. मुख्य प्रवाहातील व्यावसायिक चित्रपट, समीक्षकांवर फारसे अवलंबून नसतात, मात्र स्वतंत्र विचाराचे आणि नवोदित चित्रनिर्माते/ दिग्दर्शक विचारपूर्वक केलेल्या आणि विश्वासू परीक्षणांवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात- असे त्यांनी नमूद केले. सध्याच्या काळात दीड लाखांहून अधिक प्रकाशने ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध  असतात. असे असताना संपादकीय नियंत्रणाचा आणि समीक्षणात्मक विवेचनाचा बराच अभाव दिसतो- याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने निर्मित आशय प्रकाशित करण्याचे प्रमाण वाढत चाललेले असताना, समीक्षणाचे भविष्य काहीसे निसरडे झाल्याचा इशाराही डेव्हिड यांनी दिला.

"कुतूहल वाढवणे हेच समीक्षकांचे/ टीकाकारांचे काम"- बारबरा लोरी दे लाशारिए

चित्रपट आणि प्रेक्षक यांच्या मध्यस्थाचे काम हीच समीक्षकाची प्राथमिक भूमिका असून, मुख्य प्रवाहापलिकडील चित्रपटांचा शोध घेण्यास प्रेक्षकाला त्यांनी मदत केली पाहिजे, असे मत बारबरा लोरी दे लाशारिए यांनी व्यक्त केले. युरोपीय मासिकांमध्ये भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि तुर्कीमधील नव्या लाटेतील चित्रपट यांसाठी बारबरा यांनी पुष्कळ लेखन केले आहे. तुलनेने कमी प्रसिद्ध झालेले चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांना विशेष आवड आहे, असे त्या म्हणाल्या. मुद्रित माध्यमांचे प्रमाण कमी होत जाऊन डिजिटल मंचांना अधिकाधिक पसंती मिळत चालली आहे, ही मोठी आह्वाने आहेत, असे त्या म्हणाल्या. फ्रान्समधील एका संशोधनानुसार, चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या 80% लोकांना उपजीविकेसाठी चित्रपट समीक्षणावर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही- अशी पुस्तीही त्यांनी जोडली. व्यक्तिगत प्रसिद्धीवर भर देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, असा शेरा मारत, या प्रकारामुळे समीक्षणे हेच एक 'उत्पादन' बनते- विशेषतः लहान वयाच्या तरुण प्रेक्षकांसाठी, असे त्या म्हणाल्या.

"लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेने चाहत्यांच्या वर्गांचा आणि चित्रपटाच्या वेडाचा उदय झाला, समीक्षणाचा नाही."-- दीपा गहलोत

'या क्षेत्रात सध्या सुरु असलेले लोकशाहीकरण हा शाप आहे की वरदान?', असा सवाल दीपा गहलोत यांनी उपस्थित केला. आज ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असलेल्या टीका,समीक्षणावर बव्हंशी चाहत्यावर्गाचा, चित्रपटाविषयीच्या वेडाचा, प्रभाव असतो. त्यामागे कोणताही खोलवरचा विचार नसतो. केवळ तेथपर्यंत पोहोचण्यास वाव मिळण्यामुळे  टीका करण्यात आली असते. तर काही वेळा, खरे विश्लेषण न करताच क्रमवारी (रेटिंग) देण्यासाठी परीक्षण लिहिणाऱ्या काही लोकांना पैसे / मानधन दिले जाते. प्रेक्षकांचे ओटीटी मंचावर चित्रपट बघण्याचे प्रमाण वाढत चालले असून, त्या पार्श्वभूमीवर सिनेमाच्या संपन्नतेचे आणि कलात्मकतेचे रसग्रहण करण्याची वृत्ती मंदावली आहे- असे दीपा गहलोत यांनी नमूद केले.

डिजिटल माध्यमांकडे वाढता कल हाच सर्वात मोठा नाट्यमय बदल होय- सुधीर श्रीनिवासन

मुद्रण माध्यमांऐवजी डिजिटल माध्यमांकडे वाढता कल, हाच सर्वात मोठा परिवर्तनकारी बदल असल्याचे सुधीर श्रीनिवासन यांनी अधोरेखित केले. त्यांनीही आता लेखन करण्याऐवजी छोटे व्हिडीओ करून त्यातून चित्रपट परीक्षण मांडण्यास सुरुवात केली आहे असे सांगत, प्रेक्षकांच्या गुंतण्याच्या सवयी बदलत चालल्या आहेत असे त्यांनी नमूद केले. तथापि त्यांचा स्वतःचा समीक्षणाचा दृष्टिकोन बदललेला नाही, असे त्यांनी नमूद केले. नैतिक घसरण झाल्याबद्दल चिंतेचा सूर आळवला जात असला तरी सुधीर यांनी त्याला विरोध केला. पूर्वी मोजक्या शक्तिशाली मीडिया हाउसेसचे (माध्यम कंपन्या) समीक्षणांवर वर्चस्व होते, तर आता परीक्षण करणारे हजारो छोटे-छोटे कंठ, लेखण्या या परिसंस्थेत लोकशाही आणत आहेत, असे त्यांनी सांगितले. खरेखुरे परीक्षण आणि पैसे घेऊन केलेले परीक्षण यांतील फरक प्रेक्षकांना कळतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्यात चित्रपट संस्कृतीविषयी अधिक जागरूक असण्याची गरज आहे- मेघचंद्र कोंगबाम

आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक महासंघाचे प्रतिनिधित्व करत मेघचंद्र कोंगबाम यांनी, चित्रपट संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची आणि या माध्यमाची लोकांमधील समज, आकलन वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. लोकशाहीकरण झाल्यामुळे काहीस संभ्रम उत्पन्न झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्याचवेळी, स्वतंत्र चित्रनिर्माते/ दिग्दर्शक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अद्यापि मोठ्या प्रमाणात समीक्षकांवर अवलंबून असतात, असे विधान त्यांनी केले. भारत सरकार आता सर्जनशील अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून चित्रपटांकडे पाहत आहे असे नमूद करत, चित्रपट समीक्षणाची औपचारिक संमेलने, परिषदा या बाबतीत मौल्यवान ठरतील, असे त्यांनी सुचवले.

"समीक्षकांना आपल्या स्वतःच्या  भूमिकेचा शोध घ्यावा लागेल": एलिज़ाबेथ केर

वेगवेगळ्या मंचाच्या संख्येत झालेली वाढ आणि त्यामुळे आशयाच्या मागणीत आलेले वैविध्य, एलिज़ाबेथ केर यांनी अधोरेखित केले. त्या स्वतः विभिन्न प्रकाशनासाठी लेखन करतात, त्यामुळे संपादकांच्या भिन्न-भिन्न प्राधान्यक्रमांची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी, समीक्षकांनी स्वतःचा आवाज, भूमिका, शैली आणि प्रेक्षक,वाचकवर्ग विकसित केला पाहिजे, यावर भर दिला. वितरक बऱ्याचदा KOL म्हणजेच जनमताचे नेतृत्व करणाऱ्या काही लोकांना पैसे देऊन चांगली परीक्षणे प्रसिद्ध करण्यास उद्युक्त करतात- याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. हे आजचे मोठे नैतिक आह्वान आहे, असे त्या म्हणाल्या. चित्रपटांचे मूल्यमापन स्वतःच्या तत्त्वे आणि विचारांनुसार करावे, आणि बहुतांशी चांगल्या असलेल्या कलाकृतीचा एखाद्या चुकीसाठी धिक्कार करणे, तिला मोडीत काढणे टाळावे- असे आवाहन त्यांनी समीक्षकांना केले.

डिजिटल माध्यमांच्या सहभागित्वाच्या संस्कृतीविषयी बरद्वाज रंगन यांनी केले प्रकट चिंतन

2000 च्या सुरुवातीच्या दशकापासून मुद्रणमाध्यमे, डिजिटल माध्यमे आणि ब्लॉगलेखन या क्षेत्रांत केलेल्या मुशाफिरीबद्दल बोलत बरद्वाज रंगन यांनी आपले विचार आणि अनुभव मांडले. डिजिटल माध्यमांमुळे त्वरित अभिप्राय देण्याची आणि सहभागित्वाची संस्कृती प्रचलित झाली आहे, परिणामी टीकाकारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आणि पारंपरिक लेखनकामाला चिकटून काम करणाऱ्यांचा प्रभाव आता ओसरला आहे. तथापि, स्पर्धा वाढल्याने, चित्रपट प्रसिद्ध झाल्याबरोबर ताबडतोब त्याचे परीक्षण प्रसिद्ध करण्याचे दडपण समीक्षकांवर येते, पूर्वी मात्र यासाठी रविवारच्या वृत्तपत्रात खास परीक्षण कोपरा असे- असे त्यांनी नमूद केले. पॉलीन केल आणि रॉजर एबर्ट यांचा दाखला देऊन त्यांनी सांगितले की- पूर्वी समीक्षकांना सांस्कृतिक संभाषणांना दिशा आणि आकार देण्यासाठी अधिक वेळ, स्वस्थता आणि अवकाश मिळत असे. आज मात्र, त्यांना जनतेच्या प्रतिक्रियेचा ठोकताळा बांधण्याची कसरत करावी लागते- विशेषतः तरुणाईची सनसनाटी आणि वेगवान आशयाची मागणी लक्षात घेत समीक्षकांना त्यातून वाट काढावी लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वाढत्या डिजिटल आणि लोकशाहीप्रचुर वातावरणात समीक्षणात क्रांती घडून येत असताना, या गटचर्चेत सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी- प्रामाणिकता, सखोल विचार समीक्षणात्मक स्वातंत्र्य आणि अनुकूलनक्षमता यांची गरज एकमुखाने व्यक्त केली. या राउंडटेबल चर्चासत्रात असे निष्पन्न झाले की-- प्रारूपे आणि प्रेक्षक बदलत गेले तरी, समीक्षणाचा गाभा- चित्रपटकलेकडे पाहण्याचा चिंतनात्मक दृष्टिकोन- हाच कायम राहणार असून, चित्रपटसृष्टीच्या एकंदर परिसंस्थेच्या सुदृढतेसाठी त्याचे महत्त्व मोठे आहे.

 

इफ्फीविषयी

वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच  कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.

For more information, click on:

IFFI Website: https://www.iffigoa.org/

PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/

PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F

X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | सोनाली काकडे/जाई वैशंपायन/दर्शना राणे | IFFI 56


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2195293   |   Visitor Counter: 16