आसामी सिनेमाने इफ्फी 2025 मध्ये निर्माण केले विशेष स्थान
दंतकथेपासून पडद्यापर्यंत: 'भाईमोन दा' मुनिन बरुआ यांच्या दुर्दम्य ऊर्जेचा गौरव
भूपेन हजारिका यांना सिनेमॅटिक जगाची आदरांजली : 'पत्रलेखा' मध्ये प्रेम, हानी आणि उत्कटतेची गुंफण
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
भाईमोन दा आणि पत्रलेखा या दोन उल्लेखनीय चित्रपटांच्या चमूंनी एका उत्सपूर्ण, भावनात्मकतेने भारलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थितांसमोर आपला सर्जनशील प्रवास उलगडला. आसामच्या सांस्कृतिक भावनेचा स्पर्श असलेले हे दोन्ही चित्रपट, आसामी सिनेमातील लोकप्रिय व्यक्तिमत्व भाईमोन दा म्हणून ओळखले जाणारे मुनिन बरुआ, आणि पिढ्यानपिढ्या ज्यांचा आवाज निनादत राहिला ते संगीत सम्राट डॉ. भूपेन हजारिका या दोन दिग्गद कलाकारांना वाहिलेली आंदरांजली ठरली. या कलाकारांचा वारसा मांडणाऱ्या कथांची स्पंदने, दृश्ये आणि भावनांमधून उमटत होती. यामुळे हा क्षण केवळ एका महोत्सवातील सहभाग नाही, तर आसामच्या चिरस्थायी सर्जनशील ऊर्जेचा उत्सव ठरला.

भाईमोन दा : मुनिन बरुआ आणि आसामी सिनेमाच्या 90 वर्षपूर्तीचा गौरव
दिग्दर्शक ससंका समीर यांनी भाईमोन दा या चित्रपटाबद्दल विस्ताराने सांगितले. निर्माता मुनिन बरुआ, ज्यांना प्रेमाने भाईमोन दा म्हटले जाते, यांच्यावरील हा पहिला आसामी व्यावसायिक चरित्रपट आहे, असे त्यांनी सांगितले. आसामी सिनेमातील एक महान व्यक्तिमत्त्व असलेल्या बरुआ यांच्या चित्रपटांनी या प्रदेशातील मुख्य प्रवाहातील कथाकथनाची परिभाषा नव्याने रचली होती, आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांवर आपली अमिट छाप सोडली होती, असे त्यांनी सांगितले.
अगदी सामान्य सुरुवात ते सिनेमॅटिक प्राविण्यापर्यंतचा बरुआ यांचा प्रवास हा चित्रपटाच्या कथानकातून उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बिजू फुकन, मृदुला बरुआ, जुबीन गर्ग आणि जतीन बोरा यांसारख्या प्रतिभावान व्यक्तींनी काम केलेल्या, त्यांच्या आवडत्या चित्रपटांमधील संघर्ष, सर्जनशील उत्क्रांती आणि पडद्यामागील क्षण या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या चित्रपटात दाखवले आहेत. चित्रपटात निर्माण केलेली भूतकाळाची मोहिनी आणि भावनात्मक गहीरेपणा यामुळे, या चित्रपटात भाईमोन दा या महान व्यक्तीचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या सुवर्णमयी वारशाचा गौरव केला गेला असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

समीर यांनी चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेबद्दलही सांगितले: मुनिन बरुआ यांनी आपले संपूर्ण आयुष्य आसामी सिनेमाला वाहिले होते. त्यांची उत्कटता, त्यांची स्वप्ने आणि त्यांचे त्यागातूनच, इथल्या चित्रपट संस्कृतीला आकार मिळाला आहे. त्यामुळे मला केवळ त्यांचा प्रवासच नाही तर, आसामी सिनेमाच्या 90 वर्षांच्या इतिहासाचा आत्मा कॅमेऱ्यात टिपायचा होता, असे त्यांनी सांगितले.
हा चित्रपट जवळपास पाच वर्षांच्या संशोधन आणि विकास कामाचे फलित असल्याचेही त्यांनी सांगितले. अभिलेखागारातील पुस्तके, मुलाखती आणि राज्यव्यापी प्रवास इतकी संशोधनाची व्याप्ती होती, अशी माहिती त्यांनी दिली. चित्रीकरणाची 120 पेक्षा जास्त ठिकाणे आणि 360 कलाकारांचा अंतर्भाव असलेला चित्रपट 'भाईमोन दा' हा आसामी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी कलाकृतीपैकी एक असल्याचेही ते म्हणाले. हा चित्रपट म्हणजे केवळ एक चरित्रपट नाही, तर हा आसामी सिनेमाला जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकाला वाहिलेली आदरांजली आहे, हा अशा प्रत्येकासाठीचा चित्रपट आहे, अशी भावना त्यांनी व्य्कत केली.
पत्रलेखा : भूपेन हजारिकांच्या भावपूर्ण गीताने प्रेरित एक गीतात्मक चिंतन
दिग्दर्शक आणि लेखिका नम्रता दत्ता यांनी पत्रलेखा या आपल्या भावपूर्ण लघुपटाबद्दल समग्रपणे सांगितले. ही कलाकृती डॉ. भूपेन हजारिका यांच्याबद्दलच्या, सातत्याने स्मरणाऱ्या एका अमूर्त गीताला सिनेमॅटिक जगण्याचे स्वरुप देते. या गीताची धून उत्कट इच्छा, अधूरे प्रेम आणि कधीही व्यक्त न झालेल्या शब्दांच्या वेदनेत बुडालेली आहे, असे त्यांनी सांगितले. या गाण्यातून आठवणींचा कल्लोळ आणि शांततेच्या दरम्यान स्थिर राहणाऱ्या प्रेमाची प्रचिती येते असे त्यांनी सांगितले. दत्ता यांनी या कथानकाला एक नाजूक आणि भावनात्मक पोत दिला आहे. ज्यांचे जगणे कधीकाळी परस्परांमध्ये गुंफलेले जगणे आता परिस्थितीमुळे वेगळे झालेल्या दोन व्यक्तींची कथा त्यांनी मांडली आहे.
दृश्यात्मक भाषा हीच या लघुपटाची कथाकार
दुपारच्या प्रखर उष्णतेच्या वातावरणात टिपलेल्या गावातील दृश्यांमधून एका जडत्वाचे दर्शन घडते. उष्णता, शांतता, आणि स्त्रीला तिच्या घरात अथवा आजारी आईशी बांधून ठेवणाऱ्या जबाबदाऱ्यांचे ओझे त्यातून दिसते. याच्या अगदी उलट, शहरातली दृश्ये आहेत, संध्याकाळच्या हळवार उदासपणा आणि रात्रीच्या शांत चिंतनशील वातावरणाचे चित्रण यात आहे. ही दृश्ये म्हणजे पुरुषाच्या एकांताचे प्रतिबिंब आहेत, यात ज्यात तो चित्रकला, गिटारचे सूर आणि कुजबुजलेल्या आठवणीत रमल्याचे आपल्याला दिसते.

प्रकाश आणि सावलीच्या या विरोधाभासी जगातून, दत्ता यांनी उत्कट इच्छा, वेळेचा प्रवास, यासोबतच जगण्याने दोघांना दूर केल्यानंतरही दोन व्यक्तींना बांधून ठेवणारे नाजूक धागे यावर एक तीव्र चिंतनमयी दृश्यात्मक गुंफण मांडली आहे.
या गाण्यात एक विचित्र अबोल वेदना साकार होते, एक रेंगाळलेले प्रेम दृष्यमान होते. या गीतांतून आपल्याला उमगलेला अर्थ, त्यातून दिसलेली कथा साकारण्याची तीव्र इच्छा आपल्याला झाली, असे दत्ता यांनी सांगितले.
छायाचित्रकार आणि सह-निर्माते उत्पल दत्ता यांनी चित्रपटाच्या विशिष्ट दृश्यांबद्दल चर्चा केली: त्यांचे जीवन संध्याकाळच्या वेळेतले आहे, ओझ्याखाली दबलेले तरीही आशावादी असे भाव त्यात आहेत असे ते म्हणाले. त्यादृष्टीनेच त्याच भावनात्मकतेचे प्रतिबिंब उमटेल अशी प्रकाशयोजना आपण केली असे त्यांनी नमूद केले.

चित्रपटाच्या छोट्या बजेटवरही त्यांनी भाष्य केले. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा लोकांनी चित्रपट निर्माण करू नये असे म्हणतात पण सिनेमावरील प्रेमामुळे आपण बिनधास्त होतो. आम्ही किती खर्च केला हे मोजले नाही. आम्ही फक्त ज्यावर विश्वास ठेवला तो चित्रपट बनवला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
https://drive.google.com/file/d/1JUEriNpdgKjdaVlqygNvGZH1aW5Ktgfa/view?usp=drive_link
Watch the full Press Conference here:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2195272
| Visitor Counter:
15