पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार


पंतप्रधान उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार तसेच लक्षकंठ गीता पारायणात सहभागी होणार

पंतप्रधान कृष्ण गर्भगृहासमोरील सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन करतील आणि पवित्र कनकाना किंदीसाठी तयार करण्यात आलेल्या कनक कवचाचे समर्पण करतील

पंतप्रधान गोव्यात श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होणार

पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या 77 फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे होणार अनावरण

Posted On: 27 NOV 2025 1:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार आहेत. त्यांनतर ते गोव्याला जाणार आहेत.  गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दुपारी सव्वा तीनच्या सुमारास येथे भेट देणार आहेत.    

पंतप्रधान उडुपीमध्ये

पंतप्रधान उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार असून लक्षकंठ गीता पारायणात सहभागी होणार आहेत. या आध्यात्मिक कार्यक्रमाला विद्यार्थी, साधू, विचारवंत आणि समाजातील विविध स्तरातील नागरिक मिळून सुमारे 100,000 जण उपस्थित राहणार असून ते एका स्वरात श्रीमद भगवद गीतेचे पठण करणार आहेत.  

याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते कृष्णा गर्भगृहासमोरील सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन होणार आहे आणि पवित्र  कनकाना किंदीसाठी तयार करण्यात आलेल्या कनक कवचाचे समर्पण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ही एक पवित्र खिडकी आहे त्यातून संत कनकदास यांना  भगवान कृष्णाचे दिव्य दर्शन झाले असे मानले जाते. उडुपी येथील श्रीकृष्ण मठाची स्थापना 800 वर्षांपूर्वी वेदांताच्या द्वैत तत्वज्ञानाचे संस्थापक श्री मध्वाचार्य यांनी केली होती.

पंतप्रधान गोवा येथे

गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दक्षिण गोव्यातील कानाकोना येथील मठाला भेट देणार आहेत.

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ परिसरात उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम यांच्या 77 फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार असून मठाने विकसित केलेल्या "रामायण थीम पार्क उद्यानाचे' देखील ते उदघाटन करतील.  यावेळी पंतप्रधान एका खास टपाल तिकिटाचे आणि स्मृती नाण्याचे अनावरण करतील, तसेच उपस्थितांना संबोधितदेखील करतील.

श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ आहे. येथे 13 व्या शतकात जगद्गुरु मध्वाचार्य यांनी स्थापित केलेल्या द्वैत व्यवस्थेचे पालन केले जाते. मठाचे मुख्यालय कुशावती नदीच्या काठावर दक्षिण गोव्यातील एका लहानशा शहरात पर्तगाळी येथे आहे.

 

* * *

सोनाली काकडे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2195267) Visitor Counter : 12