फ्रेम्समधून झालेला प्रवास : दृश्यात्मक कथनात्मक मांडणीकौशल्याचा वेध
प्रत्येक फ्रेममध्ये भावना शोधण्यावर छायाचित्रणकार रवी वर्मन यांचा भर
रवी वर्मन यांच्यासह झालेल्या संवादात्मक सत्रात प्रत्येक फ्रेममागील दृष्टिकोनाचा वेध
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात Through the Lens: Crafting Emotion in Every Frame अर्थात, लेन्समधून उलगडूया : फ्रेममधून भावनांची निर्मिती हे संवादात्मक सत्र आयोजित केले गेले. यात सुप्रसिद्ध छायाचित्रणकार रवी वर्मन यांनी वक्ते म्हणून भाग घेतला. चित्रपट दिग्दर्शक संजीव सिवन यांनी संवादक म्हणून जबाबदारी सांभाळली. या दोघांच्या संवादातून तंत्रासोबतच, वर्मन यांच्या दृश्यात्मक जगाला आकार देणाऱ्या कल्पना, त्याबद्दलच्या आठवणी आणि अव्यक्त संघर्षांचा प्रवास उलगडला गेला.

वर्मन यांनी अत्यंत मोकळा संवाद साधला. आपल्या सुरुवातीच्या संघर्षांपासून ते आज आपल्या फ्रेममधून कलेला परिभाषित करण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. प्रत्येक प्रतिमा केवळ तंत्रज्ञान नाही, तर त्यामागे एक जीवनपट असतो असे त्यांनी सांगितले.
रवी वर्मन यांनी आपल्या ओळखीशी संबंधित काही खुलासे केले. त्यांनी आपले दीर्घ नाव लहान करून केवळ वर्मन हे लढवय्यांशी जोडले जाणारे नाव स्वीकारल्याचे सांगितले. लहानपणी, एका महान चित्रकारासोबत आपले नाव जुळत असल्याने, लोक चिडवत असत, पण कालांतराने एका मुलाने त्यांची एक फ्रेम, रवी वर्मा यांच्या चित्रासारखीच असल्याचे त्यांना सांगितले. अनपेक्षितपणे घेतली गेलेली ही दखल आपल्याला आजही जवळची वाटत असल्याचे ते म्हणाले. आपल्याला टीकेमुळे कधीही दु:ख झाले नाही, उलट टीकेतूनच अधिक चांगले काम करण्याची जिद्द वाढली असे ते म्हणाले.
सुरुवातीच्या काळात आपल्याला अनेक अडचणी आल्या. सातवी नापास असलेले वर्मन जेव्हा चेन्नईला आले, तेव्हा अनिश्चितता हाच आपला एकमेव साथीदार होता असे त्यांनी सांगितले. कलात्मक महत्त्वाकांक्षेपायी नाही, तर केवळ जगण्यासाठी म्हणून, त्यांनी 130 रुपयांमध्ये आपला पहिला कॅमेरा खरेदी केला होता. त्यानंतर हळूहळू परिस्थितीनुसार छायाचित्रण करण्याचे स्वप्नही विस्तारत गेल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्स मध्ये सामील होण्याची आपली आकांक्षा नंतर नैसर्गिकपणे आकार घेऊ लागली होती, आणि तसतसा आपला कलेबद्दलचा अनुभवही वाढत गेल्याचे ते म्हणाले. 2022 मध्ये जेव्हा हे यश मिळवले, तो टप्पा म्हणजे आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे, शिस्त आणि कामाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिक होता अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चित्रपटसृष्टीतील आपली वाटचालही अगदी अनिश्चित होती. जेव्हा ते चेन्नईला आले, तेव्हा चित्रपट निर्मिती नाही, तर दिवस कसे जगावेत एवढेच आपले स्वप्न उरले होते. अनेकदा रेल्वे स्थानकाजवळ झोपायला लागले, त्याच गरजेतून आसपासच्या जगाचे निरीक्षण करता आले असे त्यांनी सांगितले. शाळेसाठी दूरवर लांबचे चालणे व्हायचे, पहाटेच्या वेळी ट्रेनमधून येणारा प्रकाश दिसायचा, दररोजच्या कामात व्यस्त असलेले लोक, हे सर्व अनुभवच आपल्या दृश्यात्मक संवेदनशीलतेची पहिली बीजे असल्याचे त्यांनी सांगितले. टॉलस्टॉयच्या वॉर अँड पीस या कलाकृतीने आपल्या कल्पनाशक्तीला प्रेरणा दिल्याचा आणि त्यातूनच पोन्नियिन सेल्वन मतील युद्धपटाची कल्पना आपल्याला सुचल्याचा अनुभव त्यांनी सामायिक केला. मदुराईतील होळीच्या उत्सवातील रंगांनी, रामलीला मधील होळीच्या दृश्यांना आकार दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सकाळचा सौम्य प्रकाश आवडतो, आणि त्याच प्रकाशातून बर्फी मधील दृश्यांमध्ये हळवार नाजुकपणा मिळाला असल्याचे ते म्हणाले.
प्रकाश हे आपल्यासाठी एखादे साधन नाही, तर ते भावनिक दिशादर्शक आहे ही बाब त्यांनी नमूद केली. वाईट प्रकाश असे काही अजिबात नसते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. आपण केवळ कल्पना करून निर्णय घेतो. प्रकाशातील सुसंगती नियंत्रणामुळे नाही, तर पटकथा वारंवार वाचल्याने, तिचा अंतरंग उलगडल्यावर ती सुसंगती साधली जाते असे आपले मत असल्याचे ते म्हणाले. छाया म्हणजे काही कमतरता नाही, तर ती मनःस्थिती आहे, त्यामुळेच आपल्या अर्ध्या फ्रेम्समध्ये छाया असते ही बाबही त्यांनी नमूद केली. तंत्राची निवड आपल्याला आपसूक जमते, त्यासाठी फार विचार करावा लागत नाही असे ते म्हणाले. जास्तीचा ताण असतो अशा चित्रीकरणावेळीही, आपण आपल्या ताणाचा प्रभाव फ्रेमवर पडू देत नाही असे ते म्हणाले.

सहकार्याच्या पैलूवरही त्यांनी भाष्य केले. ही संघर्षाची नाही तर, प्रामाणिकपणाची जागा आहे. दिग्दर्शक आणि कला विभाग यांच्यासोबत होणारा आपला संवाद, हा कायमच फ्रेमचे सातत्य जपण्यावर केंद्रित असतो. या प्रक्रियेत कोणताही तणाव निर्माण झाला तरी, त्याची खूण त्या फ्रेमवर उमटू नये असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी मी एक दिवस जाईन, पण माझ्या फ्रेम्स कायम राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रकाशनियोजनाबद्दलही त्यांनी चर्चा केली. प्रकाशयोजना म्हणजे आपल्यासाठी एक अंतर्ज्ञानी संवाद आहे. आपण अनेकदा नैसर्गिक प्रकाशाला पहिले प्राधान्य देतो, कारण त्या प्रकाशाच्या प्रामाणिकपणावर आणि अनिश्चिततेवर आपला विश्वास असतो असे ते म्हणाले. मोठ्या निर्मितींच्यावेळीही काहीही अतिरिक्त जोड देण्यापूर्वी सूर्य, सकाळ किंवा साध्या खिडकीतून येणारा प्रकाश वापरण्यावरच आपले प्राधान्य असते असे ते म्हणाले. दिवसाचा प्रकाश, मेणबत्तीचा प्रकाश किंवा अगदी कौशल्याने तयार केलेल्या पहाटेची प्रकाशयोजना आपण वापरतो, मात्र तरी देखील प्रत्येक निवड ही ते तंत्र किती जमते याचे प्रदर्शन करण्याऐवजी, एका ठराविक उद्देशानेच त्याचा वापर केला जातो असे ते म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलही त्यांनी मोकळेपणाने मते व्यक्त केली. मानवी मन हेच कोणत्याही साधनाला मार्गदर्शन करत असते, कोणतेही साधन मानवी मनाला मार्गदर्शन करत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करणारी व्यवस्था तयार करू शकते, पण ती सर्जनशीलतेवर राज्य करू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. विचार आणि सहज वृत्ती प्रथम येते, आणि शेवटी प्रत्येक दृश्याला छायाचित्रणकाराची स्वतःची कल्पनाशक्ती आणि पाहण्याची पद्धतच खरा आकार मिळवून देत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
ते महिलांविषयी, विशेषत: आपल्या आईविषयी देखील बोलले. त्यावेळी हे सत्रच भावनात्मक झाले होते. आपल्या आईचा साधेपणा आणि सामर्थ्य आजही आपल्याला, पडद्यावर महिलांना कसे चित्रित करायचे, यासाठी मार्गदर्शन करत असतात असे त्यांनी सांगितले. आपल्या यशस्वी वाटचालीचे श्रेय हे आपल्या आईचे आणि पत्नीचे असल्याचे ते म्हणाले. या दोघींनी आपल्या प्रवासाला कसे पाठबळ दिले याच्या आठवणी त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. प्रत्येक दृश्यामागे प्रेम आणि सहनशीलतेने आकार दिलेले जीवन असते, असे त्यांनी सांगितले.
या सत्राचा समारोप झाला त्यावेळी ही केवळ चर्चा राहिली नव्हती, तर लवचिकता, स्मरणशक्ती आणि आव्हानात्मक प्रकाशाच्या परिस्थितही सौंदर्य पाहण्याच्या धाडसामुळे कशा रितीने कलेचा विस्तार होत जातो याचे चिंतन बैठक बनली होती.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2195258
| Visitor Counter:
26