पंतप्रधान कार्यालय
रायपूर येथे 29-30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 60 व्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी
परिषदेची संकल्पना : ‘विकसित भारत: सुरक्षा परिमाणे’
परिषदेत आतापर्यंत प्रमुख पोलीस आव्हानांना सामोरे जाताना केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार तसेच ‘सुरक्षित भारत’ उभारण्यासाठी भविष्यकालीन मार्गदर्शक आराखड्याची रूपरेषा तयार केली जाणार
डावा अतिरेकीवाद, दहशतवादाला प्रतिबंध , आपत्ती व्यवस्थापन, महिला सुरक्षा आणि पोलिस यंत्रणांमध्ये न्यायवैद्यक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आदी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाणार
पंतप्रधानांच्या हस्ते विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके देखील प्रदान करण्यात येणार
Posted On:
27 NOV 2025 1:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान 29-30 नोव्हेंबर 2025 रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) येथे होणाऱ्या 60 व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत.
28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेचा उद्देश आतापर्यंतच्या प्रमुख पोलिस कार्य आव्हानांना सामोरे जाताना केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि 'विकसित भारत'च्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत 'सुरक्षित भारत' उभारण्यासाठी भविष्यकालीन मार्गदर्शक आराखड्याची रूपरेषा तयार करणे हा आहे.
'विकसित भारत: सुरक्षा परिमाणे' या प्रमुख संकल्पनेअंतर्गत आयोजित या परिषदेत डावा अतिरेकीवाद, दहशतवादाला प्रतिबंध, आपत्ती व्यवस्थापन, महिला सुरक्षा आणि पोलिस कार्यामध्ये न्यायवैद्यक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यासारख्या प्रमुख सुरक्षा मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. पंतप्रधान विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके देखील प्रदान करतील.
देशभरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सुरक्षा प्रशासकांना राष्ट्रीय सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर खुल्या आणि अर्थपूर्ण चर्चेत सहभागी होण्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचे परस्परसंवादी व्यासपीठ प्रदान करते. यामुळे पोलिस दलांसमोरील परिचालन, पायाभूत सुविधा आणि कल्याण संबंधित आव्हानांवर चर्चा करणे, तसेच गुन्हेगारीशी लढण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षेच्या धोक्यांना प्रतिसाद देण्यासाठी व्यावसायिक पद्धतींची मांडणी आणि सामायिकरण सुलभ होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वार्षिक परिषदेत सातत्याने रस घेतला आहे, खुल्या चर्चांना प्रोत्साहन दिले आहे आणि पोलिस कार्याबद्दल नवीन कल्पना उदयास येतील असे वातावरण निर्माण केले आहे. कामकाज सत्रे, ब्रेक-आउट संवाद आणि जेवणाच्या टेबलावरील विषयगत चर्चा सहभागींना महत्वपूर्ण अंतर्गत सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींवर पंतप्रधानांसोबत थेट त्यांचे दृष्टिकोन सामायिक करण्याची संधी देतात.
2014 पासून, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे स्वरूप सातत्याने सुधारले जात असून देशभरातील विविध ठिकाणी याचे आयोजन केले जात आहे. ही परिषद गुवाहाटी (आसाम), कच्छचे रण (गुजरात), हैदराबाद (तेलंगणा), टेकनपूर (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश), स्टॅच्यू ऑफ युनिटी (केवडिया, गुजरात), पुणे (महाराष्ट्र), लखनऊ (उत्तर प्रदेश), नवी दिल्ली आणि जयपूर (राजस्थान) आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवत, यावर्षी रायपूर, छत्तीसगड येथे 60 वी पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद आयोजित करण्यात येत आहे.
या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, राज्यमंत्री (गृह), राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे महासंचालक आणि केंद्रीय पोलिस संघटनांचे प्रमुख उपस्थित राहतील. नवीन आणि अभिनव कल्पना मांडण्यासाठी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या गृह विभागाचे प्रमुख आणि डीआयजी आणि एसपी या श्रेणीतील काही निवडक पोलिस अधिकारी देखील यावर्षी परिषदेत प्रत्यक्ष सहभागी होतील.
* * *
गोपाळ चिप्पलकट्टी/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195241)
Visitor Counter : 6