भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इराण आणि इराक एकत्र; दिग्दर्शकांनी मांडल्या तणावाखाली जगण्याच्या चित्तथरारक सिनेमॅटिक कथा
'माय डॉटर्स हेअर' ने इराणचे सामाजिक वास्तव भेदत थेट हृदयाचा घेतला ठाव
'द प्रेसिडेंट्स केक' च्या मांडणीतून हुकूमशाहीअंतर्गतच्या जगण्याचा छोटासा पैलू आणला समोर
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
आज भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी मध्ये इराण आणि इराकच्या चित्रपटांच्या चमूंने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. आपल्या संवादातून त्यांनी असामान्य परिस्थितीत जगण्यासाठी धडपडणाऱ्या सामान्य लोकांच्या कहाण्या सांगितल्या. प्रक्षुब्ध इतिहास असलेले हे दोन देश, राजकीय दबावातून जन्मलेले दोन चित्रपट आणि एका सामूहिक दृढ विश्वासाने एकत्र आलेले दोन चमू, आपापपल्या देशांचे भावनात्मक चित्र रेखाटण्यासाठी आणि वैयक्तिक आठवणींना सामूहिक वेदनांशी जोडण्यासाठी एकत्र आले होते.
यंदाच्या इफ्फीमधील सर्वोत्तम पदार्पणीय चित्रपट विभागात स्पर्धा करत असलेला इराणचा माय डॉटर्स हेअर (राहा) चे दिग्दर्शक सईद हेसाम फराहमांद जू आणि निर्माते सईद खानिनामाघी यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला. तर आयसीएफटी युनेस्को गांधी पदकासाठी स्पर्धा करत असलेल्या इराकच्या ‘द प्रेसिडेंट्स केक’ चे संपादक अलेक्झांड्रू-राडू राडू यांनी या चित्रपटाची वैशिष्टपूर्ण जातकुळी आणि हुकूमशाहीअंतर्गतच्या जगण्याचे चित्रण याबद्दल सांगितले.

संकटात असलेले मध्यमवर्गीय कुटुंब, आत्मपरीक्षण करणारे राष्ट्र
‘माय डॉटर्स हेअर’ हा चित्रपट आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांतून साकारला असल्याचे हेसाम यांनी सांगितले. मला माझ्या देशातील महिलांची परिस्थिती चित्रित करायची होती, असे ते म्हणाले. राहा ही लॅपटॉपसाठी आपले केस विकते याची कथा या चित्रपटातून सांगितली आहे. राहा ही आर्थिक अनिश्चिततेतून जात असलेल्या असंख्य महिलांनी केलेल्या अव्यक्त त्यागाचे प्रतिबिंब आहे, असेही त्यांनी नमूद केले.
निर्माते खानिनामाघी यांनी या संदर्भ अधिक विस्तृतपणे मांडला. अलीकडील आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणमधील जीवनमान कसे झपाट्याने बिघडले आहे, त्याचे वर्णन या चित्रपटातून पहायला मिळते असे ते म्हणाले.
"लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे. मध्यमवर्ग गरीब होत आहे, या वास्तवाची जाणिव त्यांनी उपस्थितांना करून दिली. आमच्या चित्रपटातील एका कुटुंबाची संपूर्ण अर्थव्यवस्था , एका लॅपटॉपमुळे कोलमडून जाते. अगदी असेच आपल्या समाजातही घडत असल्याची जाणिव त्यांनी उपस्थितांना करून दिली.

चित्रपटाच्या दृश्यात्मक मांडणीबद्दलही हेसाम यांनी भाष्य केले. श्रमिक वर्गाच्या कथांवर अनेकदा लादल्या जाणारे रुक्ष दारिद्र्य आणि त्याच्या सौंदर्यशास्त्राच्या वाट्याला आपल्याला जायचे नव्हते. आपल्या चित्रपटातील फ्रेम्स खऱ्या खुऱ्या जगण्यातल्याच वाटायला हव्यात अशीच आपली इच्छा होती आणि तसेच चित्रण आपण केले आहे, असे ते म्हणाले. गरीब कुटुंबांमध्येही रंगतदार, आनंददायी क्षण असतात. ते हसतात, ते उत्सव साजरा करतात, त्यांना त्यांच्या जगण्यातही रंग गवसतात आणि मला माझ्या फ्रेम्सच्या सौंदर्यशास्त्रातून हेच सत्य मांडायचे होते, असे ते म्हणाले.
अशा प्रकारची सामाजिक मूळांशी जोडलेल्या कथानकांना व्यावसायिक सिनेमात स्थान मिळवून देणे ही आपली इच्छाही हेसाम यांनी व्यक्त केली. पूर्वी, अशा चित्रपटांना व्यावसायिक मानले जात नव्हते. पण ही धारणा आपल्याला बदलायची आहे असे त्यांनी सांगितले. आपल्या पुढच्या कामांमध्येही हे तत्व दिसेल असे त्यांनी सांगितले.
खानिनामाघी यांनी इराणी सिनेमातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले, चित्रपट दिग्दर्शक रुढ चौकटी ओलांडण्याचा प्रयत्न करत असले तरी, त्यांच्या चित्रपट उद्योगाला सेन्सॉरशिपसोबत मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. चित्रपटांचे काही भाग कापले जातात आणि त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण कथा समजून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो या समस्यांची जाणिव त्यांनी उपस्थितांना करून दिली.
भीतीतून जन्मलेली परीकथा
अलेक्झांड्रू-राडू राडू यांनी यांनी या संवादात 1990 च्या दशकातील इराक बद्दल सांगितले. ‘द प्रेसिडेंट्स केक’ हा चित्रपट खरे तर स्ट्रीट कास्ट म्हणजेच, बिगर व्यावसायिक कलाकारांना घेऊन केला आहे, सर्व अभिनेते बिगर व्यावसायिक आहेत, त्यांची निवड रोजच्या जीवनातील व्यक्तींमधून केली गेली आहे, यामुळे चित्रपटाला अधिक तरलतेचा स्पर्ष लाभला असल्याचे त्यांनी सांगितले.
हा चित्रपट निर्बंध आणि निरंकुश राजवट कशा प्रकारे निम्न वर्गाची पिळवणूक करत आहेत, याची गोष्ट सांगतो, असे राडू यांनी सांगितले. जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा हुकूमशहांना नाही, तर लोकांना त्रास होतो ही बाबीही त्यांनी अधोरेखित केली. या चित्रपटाचे कथानक एका हुकूमशहाने नागरिकांना आपला वाढदिवस साजरा करण्यास जबरदस्ती करण्याच्या घटनेवरून प्रेरित आहे. सद्दाम हुसेन यांच्यासाठी केक बनवण्याचे काम सोपवलेल्या लामिया नावाच्या एका तरुण मुलीची ही कथा मार्मिक विनोद आणि प्रत्यक्ष जगलेले वास्तव यांच्या मधली कथा आहे असे ते म्हणाले.

दिग्दर्शक हसन हादी यांनी या कथेकडे एक परीकथा म्हणून पाहीले होते, असेही राडू यांनी सांगितले.
लामिया इराकचे प्रतीक असावी, अशी हसनची इच्छा होती, तिच्यासोबत जे काही घडत आहे, ते देशासोबत घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचेच प्रतिबिंब आहे, ही बाब त्यांनी नमूद केली. यावेळी राडू यांनी इराकच्या उदयोन्मुख चित्रपट उद्योगावरही भाष्य केली. इराणसारखी समृद्ध चित्रपट परंपरा इराकला नाही. ‘द प्रेसिडेंट्स केक’ हा इराकचा पहिला आर्ट-हाऊस चित्रपट आहे. हसनसारखे दिग्दर्शक आता, हे उद्योगक्षेत्र उभे करण्याचे काम करत आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.
वेगवेगळ्या देशांतून आणि सिनेमॅटिक परंपरांतून आलेले असूनही दोन्ही चित्रपट जवळपास एकसमान वास्तवाभोवती फिरणारे होते. त्यात निर्बंधांचे ओझे, सामान्य लोकांची लवचिकता, आणि राजकीय दबावाखालील सन्मानाने दैनंदिन जगण्यात करावी लागणारी तडजोड असे सारे पैलू या दोन्ही चित्रपटांमध्ये होते. या सत्राच्या निमित्ताने झालेला हा संवाद तेहरान आणि बगदादला जोडण्याऱ्या राजकीय नाही तर कथात्मक मांडणीच्या दुव्यासारखा अनुभव देऊन गेला होता.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2194911
| Visitor Counter:
8