'द न्यू एआय सिनेमा' विषयावरील मास्टरक्लासमध्ये ‘जनरेटिव्ह एआय’ आणि ‘एलएलएम’सह चित्रपट निर्मितीबाबत भविष्याचा केला उहापोह
शेखर कपूर यांनी सिनेमाच्या भविष्यावर दूरदर्शी संवादाचे केले नेतृत्व
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2025 च्या सहाव्या दिवशी "द न्यू एआय सिनेमा: अ डिस्कोर्स ऑन जनरेटिव्ह एआय अँड लार्ज लँग्वेज मॉडेल्स" या शीर्षकाअंतर्गत झालेला मास्टरक्लास विचार करायला लावणारा होता. यामध्ये एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञाचालित चित्रपट निर्मिती प्रक्रियेची वेगाने विकसित होणाऱ्या लँडस्केपवर चर्चा करण्यासाठी तंत्रज्ञान आणि चित्रपट क्षेत्रातील नामांकित मंडळींना एकत्र आणण्यात आले.

या मास्टरक्लासच्या गटामध्ये प्रख्यात तंत्रज्ञ शंकर रामकृष्णन, कृत्रिम प्रज्ञा तज्ज्ञ व्ही. मुरलीधरन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द असलेले चित्रपट निर्माते शेखर कपूर यांचा समावेश होता.

शेखर कपूर यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाचा सन्मान करून रवी कोट्टारकर यांनी सत्राची सुरुवात केली. त्यांनी कपूर यांच्या कथाकथन आणि चित्रपट निर्मितीच्या दूरदर्शी दृष्टिकोनावर प्रकाश टाकला, ज्यामध्ये तांत्रिक नवोपक्रम आणि कायमस्वरूपी सांस्कृतिक प्रभावासाठी आजही साजरा केला जाणाऱ्या "मिस्टर इंडिया" चित्रपटाचा विशेष उल्लेख केला गेला.
एआय – कृत्रिम प्रज्ञा : चित्रपट निर्मितीतील सर्वात अधिक लोकशाही माध्यम
आपल्या भाषणाची सुरुवात करताना शेखर कपूर यांनी नमूद केले की, कृत्रिम प्रज्ञेच्या उदयामुळे जगात मोठा बदल झाला आहे. त्यांनी एआय हे "चित्रपट निर्मितीसाठी सर्वात लोकशाही माध्यम" असे वर्णन केले, आणि उद्योगातील पारंपरिक अडथळे आणि चौकीदारी दूर केली जात आहे, यावर भर दिला.
याविषयी एक रंजक किस्सा सांगताना, त्यांनी त्यांच्या घरी भोजन बनविणा-याने चॅटजीपीटी वापरून मिस्टर इंडिया -2 साठी पटकथा कशी तयार केली हे सांगितले, ‘एआय टूल्स’ ने सामान्य व्यक्तींसाठी कशी सुलभता आणली आहे आणि हे नवे तंत्रज्ञान सर्वांना सक्षम करणारे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.

दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सांगितले की, कृत्रिम प्रज्ञेमुळे जागतिक चित्रपटाची पुनर्व्याख्या केली जाण्यासाठी सज्ज आहे. हे तंत्रज्ञान अभूतपूर्व सर्जनशील स्वातंत्र्य प्रदान करते. जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणून भारताचे स्थान लक्षात घेऊन, त्यांनी विश्वास व्यक्त केला की, ही लोकसंख्याशास्त्रीय ताकत चित्रपट तंत्रज्ञानाच्या भविष्यात भारताच्या नेतृत्वाला गती देईल.
या सत्रादरम्यान, कपूर यांनी व्हीएफएक्स आणि एआयमधील फरक देखील स्पष्ट केला. ते म्हणाले, व्हीएफएक्समध्ये डिजिटल पद्धतीने व्हिज्युअल तयार करणे किंवा हाताळणे समाविष्ट आहे तर एआय चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे घटक स्वयंचलित करण्यासाठी, वाढविण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी मशीन-लर्निंग मॉडेल्स वापरते.
तंत्रज्ञानशास्त्रज्ञ चित्रपट निर्मितीमध्ये एआयचे व्यावहारिक उपयोग दर्शवतात
तंत्रज्ञ शंकर रामकृष्णन आणि व्ही. मुरलीधरन यांनी एआय टूल्सच्या विस्तृत श्रेणीवर माहिती दिली. यामध्ये चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी याविषयी त्यांनी सविस्तर सांगितले. या साधनांची चित्रपट निर्मात्यांना स्क्रिप्टिंग, स्टोरीबोर्डिंग आणि शॉट वर्णन डिझाइन करण्यात मदत होते. तसेच यामध्ये प्रकाशयोजना आणि कॅमेरा आवश्यकतांचाही समावेश असतो.
तंत्रज्ञांच्या या जोडीने राजा राव यांनी लिहिलेला त्यांचा एआय-सहाय्यित चित्रपट "द टर्बन अँड द रॉक" प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये विविध एआय प्लॅटफॉर्म आणि मॉडेल्स कसे एकत्रित केले गेले, हे त्यांनी स्पष्ट केले.
प्रेक्षकांबरोबर संवाद आणि एआय-निर्मित चित्रपटांचे प्रात्यक्षिक
परस्परसंवादी प्रश्नोत्तर सत्रादरम्यान, पॅनेलच्या सदस्यांनी माहितीपट तयार करणे, संग्रहातील चित्रपटांचे पुनर्संचयन करणे आणि चित्रपट शिक्षणाला एआय कसे महत्त्वपूर्णपणे समर्थन देऊ शकते, यावर प्रकाश टाकला. त्यांनी "द लॉस्ट लेजेंड्स" नावाचा एआय-निर्मित लघु माहितीपट देखील दाखवला. यामुळे प्रेक्षकांना उदयोन्मुख सर्जनशील तंत्रज्ञानाच्या क्षमतांची झलक पहायला मिळाली.

सिनेमाचे सार आहे मानवी भावना
कृत्रिम प्रज्ञेची जलद प्रगति होत असली तरीही सिनेमाचे सार मानवी भावनांमध्ये आहे, ही गोष्ट शेखर कपूर यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की, एआय प्रक्रियांना मदत करू शकते आणि गती देऊ शकते, परंतु पडद्यावर खऱ्या भावना आणि खोली व्यक्त करण्यासाठी खऱ्या कलाकारांची आवश्यकता असते.
धर्मेंद्र यांना श्रद्धांजली
भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मास्टरक्लासचा समारोप झाला.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2191742
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2190381
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2194391
| Visitor Counter:
8