गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस अंतर्गत महाकाय आंतरराष्ट्रीय  मेथॅम्फेटामाइन तस्करी जाळे उध्वस्त केल्याबद्दल एनसीबी आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले अभिनंदन

Posted On: 23 NOV 2025 5:34PM by PIB Mumbai

 

ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस अंतर्गत महाकाय आंतरराष्ट्रीय  मेथॅम्फेटामाइन तस्करी जाळे उध्वस्त केल्याबद्दल अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरो (एनसीबी) आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले आहे.

सामाजिक संपर्क माध्यम एक्स मंचावरील आपल्या संदेशामध्ये अमित शाह म्हणाले की, “आमचे सरकार अमली पदार्थ व्यवसायाचे जाळे अभूतपूर्व वेगाने नष्ट करत आहे. अमली पदार्थ तपासामध्ये वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत अशी भेदक तपास पद्धत राबवत एक मोठी कामगिरी साध्य करण्यात आली आहे. नवी दिल्लीमध्ये 328 किलो  मेथॅम्फेटामाइन,   ज्याची किंमत ₹262 कोटी आहे, ते जप्त करण्यात आले आणि दोन जणांना अटक करण्यात आली. पंतप्रधान मोदी जी यांच्या अमली पदार्थमुक्त भारताच्या दृष्टिकोनाची पूर्तता करण्यासाठी बहुसंस्था समन्वयाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. एनसीबी आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाचे हार्दिक अभिनंदन.”

एका मोठ्या यशात, अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने(ओपीसी विभाग) विशेष पथक (सीआय), दिल्ली पोलिस यांच्या सहकार्याने 20.11.2025 रोजी दिल्लीमधील छत्तरपूर येथील एका घरातून सुमारे 328 किलो प्रक्रीया करण्यात आलेली मेथॅम्फेटामाइन जप्त करून एक आंतरराष्ट्रीय मादक पदार्थाचा चोरटा व्यापार करणारे जाळे  उद्ध्वस्त केले.  ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस  ही मोठ्या प्रमाणात कृत्रिम अमली पदार्थ जाळ्यावर लक्ष केंद्रित केलेली संयुक्त बुद्धिमत्ता आधारित कारवाई आहे.

ही निर्णायक कारवाई मागील काही महिन्यांपासून उपलब्ध झालेल्या गुप्त माहिती, तांत्रिक साधनांमधून मिळालेले धागेदोरे आणि सततच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली. यामुळे पद्धतशीरपणे आयोजित तस्करी साखळी पूर्णपणे उघड झाली आणि हे मोठे यश मिळवता आले.

या प्रकरणात दोन जणांनात्यापैकी एक नागालॅंड येथील महिलेला, नागालॅंड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ज्या घरातून अमली पदार्थ जप्त झाले तेथील निवासाशी त्यांचा संबंध आहे. यातील इतर संबंधितांचीही ओळख पटविण्यात आली असून त्यात परदेशातून संचालन करणारा म्होरक्या समाविष्ट आहे. तो एनसीबीने दिल्लीमध्ये मागील वर्षी 82.5 किलो प्रक्रिया करण्यात आलेल्या कोकेन जप्ती प्रकरणातही हवा आहे. त्याला भारतात प्रत्यार्पित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंमलबजावणी संस्थांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत.

दिल्लीमधील  मेथॅम्फेटामाइनची ही आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या साठ्याच्या जप्तींपैकी एक आहे. प्राथमिक तपासात असे आढळले आहे की हे जाळे अनेक देश, सुरक्षित निवासस्थाने आणि विविध हाताळणारे यांच्या साखळीने कार्यरत होते आणि दिल्ली हे भारतातील तसेच परदेशातील बाजारपेठांसाठी एक मोठे वितरण केंद्र म्हणून वापरले जात होते.

ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस हे कृत्रिम अमली पदार्थ जाळे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याला उद्ध्वस्त करण्याच्या  एनसीबीच्या कटिबद्धतेवर शिक्कामोर्तब करते. अमली पदार्थ तस्करीविरुद्धच्या लढ्यासाठी एनसीबी नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन करते. कोणतीही व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्री-संबंधित माहिती एमएएनएएस – राष्ट्रीय अमली पदार्थ मदतवाहिनी खुला क्रमांक 1933 यावर दूरध्वनी करून देऊ शकते.

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2193301) Visitor Counter : 7