पंतप्रधान कार्यालय
जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
Posted On:
22 NOV 2025 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. जी20 शिखर परिषदांमधील पंतप्रधानांचा हा बारावा सहभाग होता. पंतप्रधानांनी शिखर संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या दोन्ही सत्रांना संबोधित केले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचे अतिथ्य आणि शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन, यासाठी आभार मानले.
'समावेशक व शाश्वत आर्थिक विकास - कोणीही मागे राहू नये', या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली समूहाने कुशल मनुष्यबळ स्थलांतर, पर्यटन, अन्न सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोन्मेष व महिला सशक्तीकरण या क्षेत्रांत केलेल्या कार्याची स्तुती केली. काही ऐतिहासिक निर्णय जे नवी दिल्ली शिखर संमेलनात घेण्यात आले होते, ते पुढे नेण्यात आले आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले. जी20 शिखर संमेलन आफ्रिकेत प्रथमच आयोजित होत असताना विकासातील असंतुलन आणि नैसर्गिक साधनांच्या अतिवापर, यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या, विकासाच्या नव्या निकषांवर विचार करण्याची वेळ आली आहे, यावर त्यांनी भर दिला. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, भारताच्या सांस्कृतिक परंपरेवर आधारित "एकात्म मानववाद" या संकल्पनेवर अधिक विचार झाला पाहिजे. एकात्म मानववाद हा माणूस, समाज आणि निसर्ग याकडे समग्र दृष्टीने पाहतो आणि अशा प्रकारे प्रगती व निसर्ग यामधील समतोल साधता येतो.
भारताचा वृद्धी, विकास व सर्वांचे कल्याण, याबाबतचा दृष्टिकोन विषद करताना पंतप्रधानांनी जी20 समूहाकडे सहा कल्पना मांडल्या:
- जी 20 जागतिक पारंपारिक ज्ञान भांडाराची निर्मिती: यामुळे मानववंशाचे सामूहिक शहाणपण भावी पिढ्यांच्या फायद्यासाठी उपयोगाला येईल.
- जी 20 आफ्रिका कौशल्य बहुवर्धक योजना: यात आफ्रिकेतील युवांना कौशल्य शिकवण्यासाठी दहा लाख प्रमाणित प्रशिक्षकांचा जागतिक सेतू तयार करण्यात येईल. यामुळे स्थानिक क्षमता उभारणी होईल आणि खंडात दीर्घकालीन विकास साधता येईल.
- जी 20 जागतिक आरोग्य प्रतिसाद दल तयार करणे: यामध्ये जी 20 देशांचे आरोग्य तज्ज्ञ एकत्र येऊन जगाच्या कुठल्याही भागातील आरोग्य संकटांना तोंड देण्यासाठी प्रत्यक्ष काम करतील.
- जी20 खुली उपग्रह माहिती भागीदारी स्थापन करणे: या कार्यक्रमांतर्गत जी20 अंतराळ संस्थांकडील उपग्रह माहिती शेती, मत्स्यव्यवसाय, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर कार्यांसाठी विकसनशील देशांना उपलब्ध करून देण्यात येईल.
- जी20 महत्त्वपूर्ण खनिज पुनर्वापर उपक्रम विकसित करणे: या उपक्रमातून पुनर्वापर, अर्बन माइनिंग(शहरातल्या इ- कचऱ्यासारख्या कचऱ्यातून मौल्यवान घटक प्राप्त करण्याची प्रक्रिया), पुनर्नियोजित वापरातील बॅटरी प्रकल्प व नवोन्मेष यांना चालना दिली जाईल. तसेच पुरवठा साखळी सुरक्षितता बळकट होईल व स्वच्छ विकासाचे मार्ग मिळतील.
- अमली पदार्थ-दहशतवाद जाळेविरोधी जी20 उपक्रम सुरू करणे; या उपक्रमाद्वारे अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास मदत होईल आणि अमली पदार्थ-संबंधित दहशत अर्थतंत्राला आळा बसेल.
'एक लवचिक विश्व आपत्ती जोखीम न्यूनीकरणात जी20ची भूमिका, हवामान बदल, न्याय्य ऊर्जा संक्रमण आणि अन्न प्रणाली', या सत्रालाही पंतप्रधानांनी संबोधित केले. भारताने सुरू केलेल्या आपत्ती जोखीम न्यूनीकरण कार्यकारी गटाचे कार्य पुढे नेण्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. आपत्ती लवचिकता, प्रतिसाद केंद्रित असण्यापेक्षा विकासकेंद्रित असावी, असे त्यांनी सांगितले. भारताने स्थापित केलेल्या आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीच्या उपक्रमामुळे हा दृष्टिकोन प्रत्यक्षात दिसतो. अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी हवामानविषयक कार्यक्रमावर अधिक सामूहिक कृती करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.यासंदर्भात त्यांनी पौष्टिकतेसाठी आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी भरड धान्यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या अध्यक्षतेखाली स्वीकृत अन्न सुरक्षेवरील डेक्कन तत्त्वांचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की, असा दृष्टिकोन जी20 अन्न सुरक्षा रोडमॅप तयार करण्याचा पाया असावा. विकसित देशांनी, विकसनशील देशांना किफायतशीर वित्त आणि तंत्रज्ञान कालबद्धरित्या पुरवण्याच्या हवामानविषयक कृती वचनबद्धतेची पूर्तता करावी, असेही त्यांनी आवाहन केले.
पंतप्रधानांनी जागतिक नियामक संरचनांमध्ये ग्लोबल साउथच्या अधिकाधिक भागीदारीची मागणी केली. नवी दिल्ली शिखर संमेलनात आफ्रिकी संघाला जी20 चा स्थायी सदस्य म्हणून समाविष्ट करणे, हे एक मोठे पाऊल होते आणि ही समावेशकता जी20 पलीकडेही पोहोचली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांचे दोन्ही सत्रातील पूर्ण भाषण तुम्ही येथे पाहू शकता. [सत्र 1, सत्र 2]
* * *
सोनाली काकडे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193121)
Visitor Counter : 8
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam