पंतप्रधान कार्यालय
जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2
प्रविष्टि तिथि:
22 NOV 2025 10:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025
महोदय ,
नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते.
याच विचाराने भारताने जी20 अध्यक्षपदाच्या काळात आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी कार्यगटांची स्थापना केली होती. या महत्त्वाच्या विषयपत्रिकेला प्राधान्य दिल्याबद्दल मी दक्षिण आफ्रिकेचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आपत्ती प्रतिकारक्षमतेचा आपला दृष्टिकोन 'प्रतिसाद-केंद्रित' असण्यापलीकडे जाऊन 'विकास-केंद्रित' असायला हवा. आपत्ती प्रतिकारक्षम पायाभूत सुविधांसाठी आघाडी स्थापन करण्यामागे भारताचा हाच दृष्टिकोन होता. जी20 देश, सीडीआरआय सोबत मिळून वित्त, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाला चालना देऊ शकतात. यामुळे एका लवचिक भविष्याची हमी मिळू शकते.
मित्रांनो,
भारताला असाही विश्वास वाटतो की अवकाश तंत्रज्ञानाचा संपूर्ण मानवतेला फायदा झाला पाहिजे. म्हणूनच, भारत जी20 ओपन सॅटेलाइट डेटा पार्टनरशिपचा प्रस्ताव सादर करीत आहे. यामुळे जी 20 अंतराळ संस्थांकडून मिळणारा उपग्रह डेटा आणि विश्लेषण ग्लोबल साऊथमधील देशांसाठी अधिक सुलभ, परस्पर वापरण्यायोग्य आणि उपयुक्त होऊ शकेल.
मित्रांनो,
जागतिक विकासासाठी शाश्वतता आणि स्वच्छ ऊर्जा यांची आवश्यकता आहे. हे सुनिश्चित करण्यात अत्यावश्यक खनिजे महत्त्वाची भूमिका बजावतात. ही मानवतेची सामायिक संपत्ती आहे. म्हणूनच, भारताने जी20 अत्यावश्यक खनिजे चक्रीयता उपक्रमाचा ( क्रिटिकल मिनरल्स सर्कुलॅरिटी इनिशिएटिव्ह) प्रस्ताव मांडला आहे. हा उपक्रम पुनर्वापर, शहरी खाणकाम आणि सेकंड-लाइफ बॅटरीसारख्या नवकल्पनांना प्रोत्साहन देऊ शकतो.
चक्रीयतेमध्ये गुंतवणूक केल्याने प्राथमिक खाणकामावरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे पुरवठा साखळीवरील दबाव कमी होईल आणि हे निसर्गासाठीही चांगले ठरेल. हा उपक्रम संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान मानके आणि ग्लोबल साऊथमधील पथदर्शी पुनर्चक्रीकरण सुविधांना सहाय्य करू शकतो.
मित्रांनो,
नवी दिल्लीत झालेल्या जी 20 शिखर परिषदेत आम्ही 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जेचा वापर तिप्पट आणि उर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करण्याचा निर्धार केला होता. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी विकसित देशांनी वाजवी दरात हवामान बदल वित्त सहाय्य आणि तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्याबाबतच्या वचनाची कालबद्ध रितीने पूर्तता केली पाहिजे.
मित्रांनो,
हवामान बदल आणि इतर आव्हानांमुळे आपल्या कृषी क्षेत्राला तसेच अन्न सुरक्षेला असलेला धोका आणखी गंभीर बनत चालला आहे. कित्येक देशांमध्ये शेतकऱ्यांसाठी खते, तंत्रज्ञान, कर्ज, विमा आणि बाजारपेठेची उपलब्धता या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. भारत आपल्या परीने या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतात आम्ही जगातला सर्वात विशाल अन्न सुरक्षा आणि पोषण आहार उपक्रम राबवत आहोत. जगातला सर्वात मोठा आरोग्य विमा उपक्रम आणि सर्वात मोठी पीक विमा योजनाही भारतात सुरू आहे. पोषण आणि पर्यावरण दोन्ही दृष्टीने सुपर फूड असलेल्या श्री अन्न म्हणजेच भरड धान्यावर आम्ही भर देत आहोत.
दिल्लीतील जी 20 परिषदेदरम्यान या सर्व विषयांबाबत आपण वैचारिक पातळीवर सहमती घडवून आणली होती. आता या तत्त्वांनुसार आचरण करत एक जी 20 पथदर्शी आराखडा तयार करायला हवा.
मित्रांनो,
इतरांपेक्षा वेगळे राहून लवचिकता आणता येत नाही.
पोषण, सार्वजनिक आरोग्य, शाश्वत शेती आणि आपत्ती सज्जता यांच्या एकत्रित अशा सर्वसमावेशक धोरणाला जी 20 संघटनेने प्रोत्साहन दिले पाहिजे. हे धोरण मजबूत जागतिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणारे असावे.
खूप खूप धन्यवाद.
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2193065)
आगंतुक पटल : 6