पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्रप्रदेश मधल्या पुट्टपर्थी इथे श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामधले पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 19 NOV 2025 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर 2025

 

साईं-राम !

एंदरो महानुभावुलु, अंदरिकि वंदनमुलु ।

मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू, केंद्रातले माझे सहकारी राममोहन नायडू, जी. किशन रेड्डी, भूपति राजू श्रीनिवास वर्मा, सचिन तेंडुलकर जी, उपमुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारमधले   मंत्री नारा लोकेश जी, श्री सत्य साईं सेंट्रल ट्रस्ट चे व्यवस्थापकीय विश्वस्त   आर. जे. रत्नाकर जी, कुलगरू के. चक्रवर्ती जी, ऐश्वर्या जी, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरुषहो, साईं राम!

मित्रहो,

पुट्टपर्थीच्या या पवित्र भूमीवर आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहणे हा माझ्यासाठी भावनात्मक आणि आध्यात्मिक अनुभव आहे.काही वेळापूर्वीच बाबांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्याची संधी मला मिळाली.  त्यांच्या चरणी नतमस्तक होणे,त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणे हा अनुभव नेहमीच मन उचंबळून टाकणारा असतो.

मित्रहो,  

सत्य साई बाबांचे हे  जन्म शताब्दी वर्ष आमच्या पिढीसाठी केवळ एक उत्सव नव्हे तर दैवी वरदान आहे. आज ते आपल्यामध्ये देह रूपाने नसले तरी  त्यांची शिकवण,त्यांचे प्रेम,त्यांची सेवा भावना आजही कोट्यावधी  लोकांना  मार्गदर्शन करत आहे.140 पेक्षा जास्त देशांमध्ये लाखो लोक , नवा प्रकाश,नवी दिशा आणि नव्या संकल्पासह आगेकूच करत आहेत.

मित्रहो,

श्री सत्य साई बाबा यांचे जीवन ‘वसुधैव कुटुम्बकम’ याचे मूर्तिमंत  उदाहरण होते.म्हणूनच त्यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आपल्यासाठी वैश्विक प्रेम, शांतता आणि सेवा यांचे महापर्व बनला आहे.या स्मृती प्रसंगी 100 रुपयांचे विशेष नाणे  आणि टपाल तिकीट जारी करण्याचे भाग्य आमच्या सरकारला लाभले.हे नाणे आणि टपाल तिकीट यामध्ये त्यांच्या सेवा कार्याचे प्रतिबिंब आहे. या शुभ प्रसंगी मी जगभरातले त्यांचे अनुयायी, सहकारी – सेवक आणि बाबांच्या भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

मित्रहो,

भारतीय संकृतीच्या  मध्यभागी सेवाभाव  हे मूल्य आहे.आपल्या सर्व आध्यात्मिक आणि तत्वज्ञान परंपरा अखेर या एकाच तत्वाकडे नेतात.भक्ती मार्ग,ज्ञान किंवा कर्म यापैकी कोणत्याही मार्गावर वाटचाल केली तरी हे मार्ग सेवाभावाशीच  जोडलेले आहेत. सर्व प्राणिमात्रांमध्ये वसत असलेल्या दिव्यत्वाच्या सेवेविना भक्ती कशी असेल ?इतरांविषयी करुणा जागविण्याविना ज्ञान कसे असेल ? समाजाविषयी सेवाभाव नसेल तर  ते कर्म कसले ? सेवा परमो धर्म: या तत्वाने भारताला शतकानुशतकांचे परिवर्तन आणि आव्हाने झेलूनही खंबीर राखले. या सेवाभावाने आपल्या संस्कृतीला आंतरिक बळ दिले.आपल्या अनेक संतानी आणि सुधारकांनी त्या-त्या वेळी योग्य ठरेल त्यानुसार हा कालातीत संदेश पुढे नेला.श्री सत्य साई बाबा यांनी सेवा भाव मानवी जीवनाचा गाभा मानला. ‘सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा’असे ते म्हणत असत.त्यांच्यासाठी सेवा हेच प्रेम होते.शिक्षण,आरोग्य,ग्रामविकास यासह विविध क्षेत्रातल्या त्यांच्या संस्था याच तत्वज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. अध्यात्म आणि सेवा वेगवेगळ्या संकल्पना नाहीत तर एकाच सत्याचा वेगवेगळा आविष्कार आहेत हे दर्शवत आहेत.देहरूपी असताना लोकांना प्रेरित करणे हे अनेकदा दिसून येते मात्र बाबा देहरूपाने आपल्यात नसतानाही त्यांनी उभारलेल्या संस्थांच्या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस विस्तारत असल्याचे आपण पाहत आहोत. थोर महात्म्यांचा प्रभाव काळानुसार ओसरत नाही खरेतर तो वाढतो हेच यातून दिसून येते.

मित्रहो,

श्री सत्य साई बाबा यांचा संदेश केवळ पुस्तके,प्रवचने आणि आश्रम यांच्यापर्यंत मर्यादित राहिला नाही.त्यांच्या शिकवणीचा प्रभाव लोकांमध्ये दिसून येतो.आज भारताच्या शहरांपासून ते लहान-लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते आदिवासी वस्त्यांपर्यंत, संस्कृती, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा यांचा विलक्षण ओघ आपल्याला जाणवतो.मानव सेवा हीच माधव सेवा आहे हा बाबांच्या अनुयायांचा सर्वात मोठा आदर्श आहे. करुणा, कर्तव्य, शिस्त आणि जीवनाचे सार सांगणारे  अनेक विचार त्यांनी रुजवले. प्रत्येकाला मदत करा, कोणालाही दुखवू नका, मितभाषी राहा, अधिक काम करा अशी त्यांची शिकवण होती.श्री सत्य साई बाबा यांचे  असे अनेक जीवन मंत्र आजही आपल्या मनात रुंजी घालत आहेत.

मित्रहो,

साई बाबांनी समाज आणि लोक कल्याणासाठी अध्यात्म कामी आणले. निष्काम सेवा, चारित्र्य घडविणे आणि मूल्याधारित शिक्षणाशी त्यांनी त्याची सांगड घातली. एखादे मत किंवा तत्वज्ञान त्यांनी लादले नाही.गरिबांना मदत आणि त्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी कार्य केले. गुजरात भूकंपानंतर पीडिताना मदत करण्यासाठी बाबांचे सेवादल आणि सेवाव्रती सर्वात पुढे होते याची मला आठवण आहे. अत्यंत निष्ठेने त्यांचे अनुयायी अनेक दिवस सेवाकार्यात मग्न होते. बाधितांना मदत, त्यांना मदत सामग्री पोहोचविणे आणि मानसिक-सामाजिक सहयोगातही त्यांनी मोलाचे योगदान दिले.

मित्रहो,

एखाद्याच भेटीत एखाद्याचे अंतःकरण द्रवले असेल,एखाद्याच्या जीवनाची दिशाच पालटली असेल तर त्यातून त्या व्यक्तीचे मोठेपण लक्षात येते. आज या कार्यक्रमातही असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर सत्य साई बाबांच्या संदेशाचा खोलवर प्रभाव झाला आणि त्यांचे जीवनच बदलून गेले.

मित्रहो,

श्री सत्य साई बाबा यांच्या प्रेरणेने साई सेन्ट्रल ट्रस्ट आणि त्याच्याशी निगडीत संस्था संघटितपणे, संस्थात्मक रूपाने आणि प्रदीर्घ व्यवस्था या रूपाने सेवा भाव पुढे नेत आहेत याचा मला आनंद आहे.एक उपयुक्त मॉडेल म्हणून आपल्यासमोर हे उभे आहे. पाणी, गृहबांधणी, आरोग्य, पोषण, आपत्तीग्रस्तांना सहाय्य आणि स्वच्छ उर्जा यासारख्या क्षेत्रात आपण विलक्षण कार्य करत आहात. मी काही सेवा कार्यांचा विशेष उल्लेख करू इच्छितो. रायलसीमा इथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होता, ट्रस्टने 3 हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची जलवाहिनी बसविली. 

ओदिशामध्ये महापुराचा फटका बसलेल्या कुटुंबांसाठी एक हजार घरकुले बनविण्यात आली. गरीब कुटुंबातील आजारी व्यक्ती ज्यावेळी पहिल्यांदा इथे रूग्णालयामध्ये येते, त्यावेळी ती व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय आश्चर्यचकीत होतात. कारण या रूग्णालयामध्ये कुठेही बिल केली जाणारी जागा - ज्याला बिलिंग काउंटर म्हणतात, असे स्थानच नाही. इथे सर्व उपचार हे पूर्णपणे मोफत होतात. परंतु या रूग्णालयामध्‍ये  येणाऱ्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधेला सामोरे जावे लागत नाही.

मित्रहो,

आजसुद्धा इथे 20,000 पेक्षा जास्त कन्यांच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाती उघडण्यात आली आहेत. त्यातून त्या कन्यांचे शिक्षण केले जाते आणि त्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे.

मित्रहो,

भारत सरकारने दहा वर्षांपूर्वी मुलींच्या शिक्षणाच्या प्रश्न लक्षात घेऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती.

देशामध्ये सुरू असलेल्या अशा काही  योजनांपैकी एक सुकन्या समृद्धी योजना आहे की, त्यामध्ये 8.2 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आपल्या मुलींच्या बँक खात्यासाठी दिले जाते.  आत्तापर्यंत देशातील 4 कोटींपेक्षा जास्त मुलींची बँक खाती ‘सुकन्या समृद्धी योजने‘अंतर्गत उघडण्यात आली आहेत. आणि तुम्हा मंडळींना आणखी काही माहिती जाणून  आनंद वाटेल की, या योजनेतून उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये आत्तापर्यंत सव्वा तीन लाख कोटी रूपयांपेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे. याविषयी खूप चांगले प्रयत्न श्री सत्य साई परिवाराने केले आहेत. त्यामध्ये इथे 20 हजार सुकन्या समृद्धी खाती उघडण्याचे खूप चांगले कार्य केले आहे. तसे पाहिले तर मी काशी लोकसभा मतदार संघाचा खासदार आहे, त्यामुळे तिथले एक उदाहरण इथे आपल्याला देऊ इच्छितो. आम्ही प्रत्येक मुलीच्या  बँक खात्यामध्ये 300 रूपयेही हस्तांतरित केले गेले आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी आणि उत्तम भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना खूप मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.

मित्रहो,

देशामध्ये पहिल्यांदाच 11 वर्षांमध्ये अशा अनेक योजनांचा प्रारंभ झाला आहे. त्या योजनांमुळे नागरिकांना सामाजिक सुरक्षा मिळाली, सामाजिक सुरक्षिततेचे कवच अधिक मजबूत केले गेले. आणि देशातील गरीब, वंचित कायम स्वरूपी सामाजिक सुरक्षेच्या कक्षेमध्ये येत आहेत. 2014 मध्ये देशातील फक्त 25 कोटी लोक सामाजिक सुरक्षेच्या कक्षेमध्ये होते. आज मला हे सांगताना खूप आनंद वाटतो;  आणि बाबांच्या चरणाशी बसून मी सांगतो की, आज ही संख्या जवळ-जवळ 100 कोटींपर्यंत पोहोचली आहे. भारतातील गरीब कल्याण योजनांची,  सामाजिक सुरक्षा देणाऱ्या योजनांची परदेशांमध्ये, तसेच सर्व आंतरराष्ट्रीय मंचांवरही चर्चा होत आहे.

मित्रहो,

आजच मला गोदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. साई बाबा न्यासाद्वारे 100 गाई गरीब शेतकरी कुटुंबांना दिल्या जात आहेत. आपल्या परंपरेमध्ये गोमातेला जीवन, समृद्धी आणि करूणेचे प्रतीक मानले गेले आहे. या गाईंचा या कुटुंबांना आर्थिक, पोषण -संबंधी आणि सामाजिक स्थैर्यासाठी उपयोग होईल.

मित्रहो,

गोमातेच्या संरक्षणामधून  समृद्धीचा संदेश, देश-परदेशातील कानाकोपऱ्यामध्ये जातो हेही दिसून येते. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत वाराणसी येथे 480 पेक्षा जास्त गीर गाईंचे वितरण करण्यात आले होते. आणि माझा एक नियम होता की, त्या गाईला ज्यावेळी पहिले वासरू - पाडस होते, ते मी परत घेत होतो आणि दुसऱ्या गरजवंत कुटुंबाला देत होतो. आज वाराणसीमध्ये गीर गाय आणि तिच्या पाडसांची संख्या जवळपास 1700 झाली आहे. आणि तिथे आम्ही एक परंपरा सुरू केली आहे. त्यानुसार एके ठिकाणी गाय वितरित केल्यानंतर, तिच्यापासून झालेले मादी वासरू दुसऱ्या क्षेत्रातील शेतकरी बांधवाला मोफत दिले जाते. त्यामुळे या गाईंची संख्याही वाढते आहे. मला चांगले आठवते की, 7-8 वर्षांपूर्वी मी आफ्रिकेतील रवांडाच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथल्या एका गावाला मी भेट दिली होती. आणि  त्यावेळी तिथे मी भारतातल्या 200 गीर गाई भेटीदाखल दिल्या होत्या. आणि विशेष म्हणजे, अशी गाय दान देण्याची परंपरा तिथेही आहे. त्याला ‘गिरिन्का‘ असे संबोधन रवांडामध्ये वापरतात. गिरीन्का या शब्दाचा अर्थ आहे ‘‘मे यू हॅव ए काऊ‘‘, या परंपरेनुसार गाय ज्यावेळी पहिल्यांदा मादी पाडसाला जन्म देते, त्यावेळी ते वासरू आपल्या शेजारच्या कुटुंबाला दान दिले जाते. या प्रथेमुळे तिथे पोषण, दूधाचे पदार्थ, उत्पन्न आणि सामाजिक एकतेची भावना वृद्धिंगत झाली आहे.

मित्रहो,

ब्राझीलनेही भारतातील गीर आणि कांकरेज जातीच्या गाईंचा स्वीकार केला आहे आणि त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान तसे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करून या जातीच्या गाईंचे प्रजनन वाढवले आहे. आणि आज त्यामुळे ब्राझीलमध्ये दुग्धजन्य पदार्थांचे उत्पन्न चांगले होत आहे. या सर्व उदाहरणांवरून लक्षात येते की, ज्यावेळी परंपरा, करूणा आणि विज्ञानाधिष्ठित विचार एकमेकांच्या सोबतीने वाटचाल करतात, त्यावेळी गाय ही श्रद्धेबरोबरच सशक्तीकरण, पोषण आणि आर्थिक प्रगती यांचे साधन बनते. आणि मला आनंद वाटतो की, आपण ही परंपरा अतिशय उत्तम रितीने, सद्विचारांचे अधिष्ठान ठेवून पुढे नेत आहात.

मित्रहो,

आज देश ‘कर्तव्य-काळा‘च्या भावनेबरोबर विकसित भारत बनण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करीत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी नागरिकांची सक्रिय भागीदारी आवश्यक आहे. आणि यामध्ये सत्य साई बाबा यांचे  जन्मशताब्दी वर्ष म्हणजे, आपल्या सर्वांसाठी खूप मोठा प्रेरणादायी काळ ठरणार आहे. माझा आग्रह असा आहे की, आपण सर्वांनी या विशेष काळामध्ये ‘व्होकल फॉर लोकल‘ या मंत्राला बळकटी आणण्याचा संकल्प करावा. विकसित भारत बनविण्यासाठी आपल्याला स्थानिक अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

आपल्याला एक गोष्ट कायम स्मरणामध्ये ठेवली पाहिजे की, ज्यावेळी आपण स्थानिक उत्पादनांची खरेदी करतो, त्यावेळी आपण एका कुटुंबाला, एका लहान उद्योजकाला आणि थेट स्थानिक पुरवठा श्रृंखलेला सशक्त बनवित असतो. अशा आपल्या कृतीतूनच आत्मनिर्भर भारताचा मार्गही तयार होत असतो.

मित्रहो,

आपण सर्वजण श्री सत्य साई बाबा यांच्या प्रेरणेने राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये निरंतर योगदान देत आले आहात. या पवित्र भूमीमध्ये खरोखरीच एक अद्भुत शक्ती आहे, अद्वितीय ऊर्जा आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वाणीमध्ये करूणा, विचारांमध्ये शांती आणि कर्मामध्ये सेवेचा भाव दिसून येतो. मला विश्वास आहे की, जिथे कुठेही अभाव आहे,  अथवा वेदना दिसून येते, त्या ठिकाणी तुम्ही अशाच पद्धतीने एक आशा, एक प्रकाश बनून ठाम उभे राहणार आहात. या भावनेबरोबरच सत्य साई परिवार, सर्व संस्था, सर्व सेवादलाचे सेवाव्रती आणि देश-विदेशातून जोडले गेलेल्या  सर्व श्रद्धावानांना प्रेम, शांती आणि सेवा यांचे यज्ञकर्म असेच पुढे सुरू ठेवण्यासाठी मी अगदी मनापासून,हृदयापासून शुभेच्छा देतो. 

खूप खूप धन्यवाद ! साईं-राम!!

 

* * *

शैलेश पाटील/निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2192031) Visitor Counter : 12