iffi banner

'भारत चालतो, तेव्हा जग पाहते' — भव्य ऐतिहासिक परेडने होणार इफ्फी 2025 चा शुभारंभ

#IFFIWood, 19 नोव्‍हेंबर 2025

 

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) सुरुवात एका भव्य आणि चित्तथरारक 'उद्घाटन परेड'ने होणार आहे. ही परेड महोत्सवांच्या शुभारंभाची परिभाषाच बदलून टाकणारी असेल. इफ्फी प्रथमच प्रेक्षकांचे एका अशा चालत्या-बोलत्या सोहळ्याच्या माध्यमातून स्वागत करेल, जिथे कथांचा प्रवास उलगडेल, संगीताचे सूर निनादतील, पडद्यावरील पात्रे प्रत्यक्षात अवतरतील आणि भारत लय, रंग, अभिमान आणि कल्पकतेद्वारे स्वतःला व्यक्त करेल. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 03.30 वाजता 'एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा'च्या कार्यालयापासून 'कला अकादमी'पर्यंत ही परेड आयोजित करण्यात आली आहे. ही अद्वितीय परेड गोव्याच्या रस्त्यांना भारताच्या सिनेमॅटिक आणि सांस्कृतिक वैभवाच्या जिवंत कॅनव्हासमध्ये रूपांतरित करेल.

या परेडचे नेतृत्व आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गोवा या राज्यांचे भव्य चित्ररथ करतील, जे आपली ओळख आणि कल्पकता प्रभावीपणे मांडतील. आंध्र प्रदेशचा चित्ररथ विशाखापट्टणमच्या सोनेरी समुद्रकिनाऱ्यांची मोहिनी, अराकूच्या गूढ दऱ्या आणि टॉलिवूडचा उत्साह घेऊन येईल. हरियाणा लोककथा, रंगभूमी, संस्कृती आणि सिनेमॅटिक अभिमानाचा रंगीबेरंगी संगम सादर करेल. महोत्सवाचे यजमानपद भूषवणारे गोवा हे या मिरवणुकीचे 'भावनिक हृदय' असेल, जे आपल्या बहुभाषक संस्कृतीचे आणि जागतिक सिनेमाशी असलेल्या अतूट नात्याचे दर्शन घडवेल.

राज्यांच्या चित्ररथांसोबतच, भारतातील आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसेसचे भव्य सिनेमॅटिक चित्ररथही यात सहभागी होतील. 'अखंडा 2'ची पौराणिक शक्ती, राम चरणच्या 'पेड्डी'ची भावनिक खोली, 'मैत्री मूव्ही मेकर्स'ची सर्जनशीलता, 'झी स्टुडिओ'चा प्रतिष्ठित वारसा, 'होम्बाळे फिल्म्स'चा जागतिक दृष्टिकोन, 'बिंदुसागर'चा ओडिया वारसा, गुरु दत्त यांना 'अल्ट्रा मीडिया'ने वाहिलेली शताब्दी श्रद्धांजली आणि वेव्ह्ज ओटीटीचे कथाविश्व — हे सर्व भारतीय सिनेमाची अमर्याद विविधता दर्शवण्यासाठी एकत्र येतील. या परेडमध्ये एक ऐतिहासिक आयाम जोडणारा घटक म्हणजे 'एनएफडीसी ची 50 वर्षे' हा चित्ररथ. हा चित्ररथ चित्रपटकर्ते घडवण्याच्या आणि देशभरात सिनेमॅटिक नवनिर्मितीला चालना देण्याच्या पाच दशकांच्या प्रवासाचा सन्मान करेल.

केंद्रीय संचार ब्युरोच्या "भारत एक सूर" या लोक गीताच्या तालावर परेडची सुरुवात होईल. यात सोळा राज्यांमधील शंभरहून अधिक कलाकारांचा समावेश असेल. भांगडा आणि गरबा, लावणी आणि घुमर, बिहू, छाऊ आणि नाटी, या लोक नृत्यांचे सादरीकरण होईल, आणि  भारताच्या एकसंध संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भव्य तिरंगा ध्वजाच्या आकारात या परेडची सांगता होईल.  

सोहळ्याच्या आनंदात भर घालण्यासाठी, आकर्षण, आठवणी आणि आनंद वाढवणाऱ्या भारतातील आवडत्या अ‍ॅनिमेशन पटांमधली, छोटा भीम आणि चुटकी, आणि मोटू पट्टू आणि बिट्टू बहानेबाज ही पात्र चित्रपटाच्या पडद्याबाहेर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधतील आणि खेळकर वातावरणात त्यांचा हशा आणि प्रेम मिळवतील.   

इफ्फी 2025 च्या उद्घाटन सोहळ्याची परेड, त्याहून अधिक आहे, ती सिनेमातून मिळणारी  प्रेरणा आणि सांस्कृतिक आश्वासन आहे. ही विलक्षण सफर घडवण्यासाठी गोवा सज्ज होत असताना, इफ्फी, जगाला भारताकडे केवळ कथांचा देश म्हणून नव्हे, तर एका अविस्मरणीय लयीत पुढे जात असलेले एक राष्ट्र म्हणून पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे.

कारण, भारत पुढे जात आहे, हे जग पाहत आहे!

इफ्फी IFFI

1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), गोवा राज्य सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव ‘जागतिक सिनेमॅटिक पॉवरहाऊस’ म्हणून प्रस्थापित झाला आहे, जिथे पुनर्संचयित क्लासिक्स धाडसी प्रयोगांना सामोरे जातात, आणि सिनेमातील दिग्गज आणि निर्भय, नवागत चित्रकर्मी एकाच व्यासपीठावर एकत्र येतात. इफ्फी ला खऱ्या अर्थाने झळाळी देणारी गोष्ट म्हणजे, विविध कार्यक्रमांचे अद्भुत मिश्रण- इथल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक प्रदर्शने, मास्टरक्लासेस, सन्मान आणि ऊर्जामय वेव्हज फिल्म बझार, जिथे कल्पना, सौदे आणि सहयोग एकत्रितपणे भरारी घेतात.

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सागरी किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या 56 व्या इफ्फी महोत्सवात, भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाज, याचा  चमकदार मेळ पाहायला मिळेल, आणि जागतिक मंचावर भारताच्या सर्जनशील प्रतिभेचा हा अविस्मरणीय सोहळा असेल.

अधिक माहितीसाठी, पुढील लिंकवर क्लिक करा: https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2190381

इफ्फीचे संकेतस्थळ:  https://www.iffigoa.org/

पत्र सूचना कार्यालयाची इफ्फी मायक्रोसाइट: https://www.pib.gov.in/iffi/56new/

पीआयबी IFFIWood ब्रॉडकास्ट चॅनल: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F

X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/निखिलेश चित्रे/राजश्री आगाशे/दर्शना राणे | IFFI 56


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Release ID: 2191808   |   Visitor Counter: 23