पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा
पंतप्रधान कोइम्बतूर येथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचे करणार उद्घाटन
पंतप्रधान 9 कोटी शेतकऱ्यांसाठी 18,000 कोटी रुपयांचा 21 वा पीएम-किसान हप्ता जारी करणार
पंतप्रधान पुट्टपार्थी येथे भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या शताब्दी महोत्सवात सहभागी होणार
पंतप्रधान भगवान श्री सत्यसाई बाबा यांचे जीवन, शिकवण आणि चिरंतन वारसा यांचा सन्मान करणारे एक स्मारक नाणे आणि टपाल तिकिटांचा संच प्रकाशित करणार
Posted On:
18 NOV 2025 1:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत.
सकाळी 10 वाजता पंतप्रधान आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथील भगवान श्री सत्यसाई बाबा यांचे पवित्र मंदिर आणि महासमाधीला भेट देतील आणि त्यांना आदरांजली अर्पण करतील. पंतप्रधान सकाळी 10:30 वाजता भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या शताब्दी समारंभात सहभागी होतील. यावेळी ते भगवान श्री सत्यसाई बाबा यांचे जीवन, शिकवण आणि चिरंतन वारसा यांचा सन्मान करणारे एक स्मारक नाणे आणि तिकिटांचा संच प्रकाशित करतील. कार्यक्रमादरम्यान ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.
त्यानंतर पंतप्रधान तमिळनाडूतील कोइम्बतूरला जातील जिथे ते दुपारी 1:30 वाजता दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पीएम-किसान योजनेचा 21 वा हप्ता जारी करतील. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील.
19 ते 21 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणारी दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद, तामिळनाडू नैसर्गिक शेती भागीदार मंच आयोजित करत आहे. या शिखर परिषदेचे उद्दिष्ट शाश्वत, पर्यावरणपूरक आणि रसायनमुक्त कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे तसेच भारताच्या कृषी भविष्यासाठी एक व्यवहार्य, हवामान-स्मार्ट आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत प्रारूप म्हणून नैसर्गिक आणि पुनरुत्पादक शेतीकडे वळण्याची गती वाढविणे हे आहे.
या शिखर परिषदेत शेतकरी-उत्पादक संघटना आणि ग्रामीण उद्योजकांसाठी बाजारपेठेतील दुवे निर्माण करण्यावरही भर दिला जाईल, त्याचबरोबर सेंद्रिय पद्धती, कृषी प्रक्रिया, पर्यावरणपूरक पॅकेजिंग आणि स्वदेशी तंत्रज्ञानातील नवकल्पना प्रदर्शित केल्या जातील. या कार्यक्रमात तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील 50,000 हून अधिक शेतकरी, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, शास्त्रज्ञ, सेंद्रिय सामग्री पुरवठादार, विक्रेते आणि हितधारक सहभागी होतील.
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191152)
Visitor Counter : 8