पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
अमेरिकेशी पहिल्यावहिल्या मोठ्या एलपीजी आयात कराराची प्रक्रिया भारताने केली पूर्ण
Posted On:
17 NOV 2025 10:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2025
करार वर्ष 2026 साठी अमेरिकेच्या गल्फ कोस्टकडून 2.2 MTPA (दशलक्ष टन प्रति वर्ष) इतका एलपीजी (द्रवीभूत पेट्रोलियम वायू) आयात करण्यासाठी एक वर्षाचा रचनात्मक करार भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील तेलकंपन्यांनी केल्याची घोषणा, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज केली. ही एक ऐतिहासिक घडामोड ठरते आहे. हा भारताच्या दरवर्षीच्या एलपीजी आयातीच्या जवळपास दहा टक्के हिस्सा असून, भारताच्या बाजारपेठेसाठी अमेरिकेकडून झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच रचनात्मक करार आहे. हा निर्णय म्हणजे एक ऐतिहासिक घडामोड असल्याचे सांगत मंत्रीमहोदय म्हणाले की- जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या एलपीजी बाजारपेठांपैकी एक असणारी भारताची बाजारपेठ, आता अमेरिकेसाठी खुली झाली आहे.
एलपीजी मिळवण्याच्या पर्यायी स्रोतांमध्ये वैविध्य आणून, परवडण्याजोग्या भावाने आणि विश्वासार्ह पद्धतीने एलपीजीचा पुरवठा व्हावा, यासाठी भारत सातत्याने प्रयत्न करत आला आहे- असे त्यांनी सांगितले. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.(BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.(HPCL) या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने 21 ते 24 जुलै 2025 या काळात अमेरिकेला भेट दिली आणि मोठ्या उत्पादकांशी चर्चा केल्या. एलपीजी खरेदीसाठीच्या माउंट बेल्व्ह्यू मापदंडांच्या आधारे झालेल्या या चर्चा सफल झाल्या असून, त्यांतून कराराला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे.
देशभरच्या कुटुंबांना जगात सर्वात कमी किमतीत एलपीजी पुरवठा व्हावा याची काळजी सार्वजनिक क्षेत्रातील तेलकंपन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घेत आहेत, असे पुरी यांनी अधोरेखित केले. गेल्या वर्षी जागतिक पातळीवर एलपीजी किंमतीत 60 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होऊन- खरी किंमत ₹1100 पुढे जाऊनही, उज्ज्वला लाभार्थ्यांना ₹500–550 इतक्या अनुदानित किंमतीत एलपीजी टाक्या (सिलिंडर) मिळतच राहिल्या. किंमतीतील फरकाचा भार भारत सरकारने सोसला आणि गेल्या वर्षी ₹40,000 कोटींपेक्षा अधिक खर्च करून गरजू कुटुंबांना- विशेषतः माताभगिनींना आंतरराष्ट्रीय एलपीजी महागाईची झळ लागू दिली नाही.
* * *
शैलेश पाटील/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191064)
Visitor Counter : 6