इफ्फी 2025: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी महोत्सवाची जागतिक पोहोच आणि सांस्कृतिक प्रभाव यावर टाकला प्रकाश
: #इफ्फीवुड, 15 नोव्हेंबर 2025
56 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू होण्यासाठी केवळ काही दिवसांची प्रतीक्षा असताना, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच केंद्रीय माहिती, प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज पणजी येथे या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाबाबत पत्रकार परिषद घेतली.
महोत्सवाचा एक भाग म्हणून आयनॉक्स पणजी, आयनॉक्स पोरवोरिम, मॅक्विनेझ पॅलेस पणजी, रवींद्र भवन मडगाव, मॅजिक मूव्हीज फोंडा, अशोका आणि सम्राट स्क्रीन्स पणजी येथे चित्रपट दाखवले जातील, असे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. "यावर्षी, महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त एक भव्य संचलन आयोजित करण्यात आले आहे. हे संचलन 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा कार्यालयापासून कला अकादमीपर्यंत होईल, अशी माहिती त्यांनी दिली. माध्यम प्रतिनिधींच्या सोयीसाठी, आम्ही सर्व ठिकाणी मोफत वाहतुकीची व्यवस्था देखील केली आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, मिरामार बीच, रवींद्र भवन मडगाव येथील खुली जागा आणि वागातोर बीच येथे खुल्या जागी चित्रपट प्रदर्शन आयोजित केले जाईल," असेही ते म्हणाले.
20 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यात होणाऱ्या 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) अनेक नवीन उपक्रम सादर केले जातील, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले. या परिवर्तनकारी उपक्रमांमुळे महोत्सवाची वाढती जागतिक प्रतिष्ठा, भारतीय चित्रपट सृष्टीचा प्रसार आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण मजबूत होणार आहे, असे डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले. ते आज (15 नोव्हेंबर 2025) पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत या चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
इफ्फी 2025 मध्ये 127 देशांमधून अभूतपूर्व 3,400 चित्रपटांची नोंदणी झाली असून यामुळे आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक म्हणून इफ्फीचे स्थान मजबूत झाले आहे, असे डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले. "84 देशांमधून 270 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून यात 26 जागतिक प्रीमियर, 48 आशिया प्रीमियर आणि भारतातील 99 प्रीमियरचा समावेश आहे. हा वाढता सहभाग केवळ महोत्सवाची प्रतिष्ठाच नाही तर जागतिक चित्रपटसृष्टीत भारताचे वाढते स्थान देखील दर्शवितो," असे ते म्हणाले.
यावर्षी इफ्फी मध्ये "कंट्री फोकस" म्हणून जपान हा देश निवडण्यात आला आहे, तर स्पेन आणि ऑस्ट्रेलिया येथील विशेष अशा निवडलेल्या चित्रपटकृतीही सादर केल्या जातील. महोत्सवात गुरू दत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, पी. भानुमती, भूपेन हजारिका आणि सलील चौधरी अशा भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या शताब्दी वर्षानिमित्त आदरांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
डॉ. मुरुगन यांनी सांगितले की अभिनेता रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल समारोप सोहळ्यात सन्मानित करण्यात येईल. त्यांचा ‘लाल सलाम’ हा चित्रपट देखील महोत्सवात प्रदर्शित होणार आहे. तसेच गोव्याचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ यांचाही महोत्सवात गौरव केला जाणार आहे.
"क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो" या उपक्रमाबद्दल बोलताना मंत्र्यांनी सांगितले की या वर्षी आलेल्या 799 प्रवेशिकांमधून 124 तरुण निर्मात्यांची कठोर निवड प्रक्रियेद्वारे निवड झाली आहे.
डॉ. मुरुगन यांनी पुढे सांगितले की 19 व्या ‘वेव्हज् फिल्म बाजार’ च्या माध्यमातून भारत आणि विदेशातील शेकडो प्रकल्पांना सहनिर्मिती आणि विपणनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ए. आय., व्हीएफएक्स आणि सीजीआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी एक स्वतंत्र तंत्रज्ञान दालन असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नारीशक्ती केंद्रस्थानी असलेल्या विकासदृष्टीचा उल्लेख करत केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की इफ्फी 2025 मध्ये महिला दिग्दर्शकांच्या 50 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन होईल.
महोत्सवात ऑस्करला प्रवेश मिळवलेल्या 21 तसेच 50 हून अधिक प्रथम चित्रपट असलेल्या दिग्दर्शकांची कामे प्रदर्शित केली जातील. जगभरातील नामांकित चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त केलेले अनेक चित्रपट 56 व्या इफ्फी मध्ये दाखवले जाणार आहेत.
चित्रपट क्षेत्रात सर्जनशीलता आणि नवोन्मेष वाढवण्याबाबत सरकारची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करत मंत्र्यांनी सांगितले,
“सिनेम एआय हॅकाथॉन आणि चित्रपटगृहांमध्ये वापरसुलभता वाढवणारे उपक्रम हे चित्रपट अधिक समावेशक, तंत्रज्ञानाधारित आणि जागतिक सहकार्याच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीचे प्रतीक आहेत.”
या वर्षी इफ्फीची सुरुवात जुन्या जीएमसी इमारतीसमोरील मार्गावर भव्य संचलनाने होणार आहे. या संचलनात विविध राज्यांची सांस्कृतिक पथके, चित्रपट निर्मिती संस्थांचे चित्ररथ भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविधतेचे दर्शन घडवतील.
एकूण 34 चित्ररथांपैकी 12 चित्ररथ गोवा सरकारतर्फे सादर केले जाणार आहेत.

***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
2190418
| Visitor Counter:
11