माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपट प्रमाणन सुव्यवस्थित करण्यासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळातर्फे 'ई-सिनेप्रमाण' पोर्टलवर 'बहुभाषिक मॉड्यूल' सादर
Posted On:
14 NOV 2025 4:51PM by PIB Mumbai
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने 'ई-सिनेप्रमाण' पोर्टलवर 'बहुभाषिक कार्यप्रणाली' सुरू केली आहे. ही कार्यप्रणाली आता पूर्णपणे कार्यान्वित झाली असून सार्वजनिक वापरासाठी थेट उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय चित्रपट उद्योगासाठी चित्रपट प्रमाणन प्रक्रिया डिजिटायझ करण्याच्या आणि सोपी करण्याच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या योजनेचा हा एक भाग आहे.
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी सांगितले की , ही ऐच्छिक सुविधा विद्यमान प्रक्रियेव्यतिरिक्त सुरू करण्यात आली आहे. ती अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी प्रमाणन प्रक्रिया सुव्यवस्थित आणि सोपी करण्यासाठी तयार केली गेली आहे. या सुविधेमुळे, अर्जदार आता एकाच, एकत्रित अर्जाद्वारे विविध भाषांमधील चित्रपट प्रमाणपत्रासाठी सादर करू शकतील, त्यामुळे प्रक्रियेतील पुनरावृत्ती लक्षणीयरीत्या कमी होईल.
या प्रणाली अंतर्गत, बहुभाषक प्रदर्शनासाठी प्रमाणित प्रत्येक चित्रपटाला 'बहुभाषक प्रमाणपत्र' मिळेल, त्यात चित्रपटाला मान्यता दिलेल्या सर्व भाषांची यादी स्पष्टपणे दिली असेल. 'पॅन-इंडिया सिनेमा'च्या वाढत्या प्रवाहाची दखल घेत देशभरातील विविध भाषक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना एक सुलभ यंत्रणा उपलब्ध करून देणे हे बहुभाषिक चित्रपट प्रमाणन' या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
'बहुभाषक चित्रपट प्रमाणना'ची प्रमुख वैशिष्ट्ये:
एकल अर्ज: अर्जदार 'ई-सिनेप्रमाण' पोर्टलद्वारे एकाच वेळी सर्व भाषांमधील आवृत्त्या अपलोड आणि सादर करू शकतील.
एकत्रित प्रमाणपत्र: एकच प्रमाणपत्र जारी केले जाईल. ते बहुभाषिक दर्जा देईल आणि सर्व प्रमाणित भाषांचा तपशील देईल.
सुव्यवस्थित प्रक्रिया: संपूर्ण अर्जावर एकाच प्रादेशिक कार्यालयाद्वारे प्रक्रिया केली जाईल, ज्यामुळे कार्यक्षमता आणि एकसमानता सुनिश्चित होईल.
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ भारतीय चित्रपट उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार, चित्रपट प्रमाणन प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुलभता वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे.
***
सोनाली काकडे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190067)
Visitor Counter : 23