पंतप्रधान कार्यालय
भूतानचे राजे (चौथे) यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी मजकूर
Posted On:
11 NOV 2025 1:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2025
भूतानचे महामहीम महाराज
भूतानचे महामहीम महाराज चौथे राजे,
राजघराण्यातील सन्माननीय सदस्य,
भूतानचे पंतप्रधानजी
उपस्थित मान्यवर
आणि भूतान मधील माझ्या बंधू आणि भगिनींनो!
कुजुझांगपो ला!
आजचा दिवस भूतानसाठी, भूतानच्या राजघराण्यासाठी आणि विश्वशांतीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
भारत आणि भूतान यांच्यात शतकानुशतकांपासून भावनिक आणि सांस्कृतिक बंध रुजलेले आहेत. म्हणूनच, या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी भारत आणि मी स्वतः देखील वचनबद्ध आहोत.
पण आज मी व्यथित अंतःकरणाने इथे आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयानक घटनांनी सर्वांना खूप दुःख दिले आहे. मी पीडित कुटुंबांचे दुःख समजतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.
काल रात्रभर मी तपासात सहभागी असलेल्या सर्व एजन्सींसह, सर्व प्रमुख लोकांच्या संपर्कात होतो. विचार विनिमय चालला होता. माहिती एकत्रित केली जात होती,जुळलेली जात होती.
आमच्या एजन्सीज या कटकारस्थानाच्या मुळाशी जातील. हे षडयंत्र आखणाऱ्या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही
जबाबदार असलेल्या सर्वांना न्यायालयासमोर उभे केले जाईल.
मित्रांनो,
आज, एकीकडे, गुरु पद्मसंभव यांच्या आशीर्वादाने येथे विश्व शांती प्रार्थना महोत्सव आयोजित केला जात आहे, तर दुसरीकडे, भगवान बुद्धांचे पिप्रहवा येथील अवशेषांचे दर्शन होत येत आहे. आणि यासह, आपण सर्वजण महामहिम चौथ्या राजाच्या सत्तराव्या जन्मदिन सोहळ्याचे साक्षीदार होत आहोत.
या समारंभाचे आयोजन आणि इतक्या मोठ्या संख्येत सन्माननीय लोकांची उपस्थिती, भारत आणि भूतानमधील संबंधांचे सामर्थ्य अधोरेखित करत आहे .
मित्रांनो,
वसुधैव कुटुंबकम, म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे,ही भारतातील आपल्या पूर्वजांनी दिलेली प्रेरणा आहे -
आपण म्हणतो - सर्वे भवन्तु सुखिन: याचा अर्थ या पृथ्वीवरील प्रत्येकाने सुखी असले पाहिजे...
आपण म्हणतो-
द्युः शांतिः
अन्त्रिक्षम् शांतिः
पृथ्वी शांति:
तुम्ही: शांति:
औषध: शांति:
अर्थात संपूर्ण ब्रह्मांड, अवकाश, पृथ्वी ,जर, औषधे वनस्पती आणि सर्व सजीवांना शांती लाभो. या भावनेने प्रेरित होऊन, भारताने आज भूतानमध्ये होणाऱ्या या विश्वशांती प्रार्थना महोत्सवातही भाग घेतला आहे.
आज, जगभरातील संत विश्वशांतीसाठी एकत्र प्रार्थना करत आहेत. आणि यामध्ये 140 कोटी भारतीयांच्या प्रार्थनांचाही समावेश आहे.
येथील अनेक लोकांना कदाचित माहित नसेल, की माझा जन्म जिथे झाला ते वडनगर; ही बौद्ध परंपरेशी संबंधित असलेली एक पवित्र भूमी आहे, आणि माझे कार्यस्थळ असलेले वाराणसी हे बौद्ध भक्तीचे अत्युच्च भक्तिस्थळ देखील आहे. म्हणून, या समारंभात मी उपस्थित असणे हे विशेष आहे. शांतीचा हा दीप भूतान आणि जगातील प्रत्येक घराला उजळून टाको;अशी मी प्रार्थना करतो.
भूतानचे महामहीम चौथे राजे यांचे जीवन म्हणजे ज्ञान, साधेपणा, धैर्य आणि राष्ट्राची निःस्वार्थ सेवा यांचा संगम आहे.
त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षांपासूनच मोठी जबाबदारी स्वीकारली. त्यांनी आपल्या देशाला पित्यासारखे प्रेम दिले आणि एका दूरदृष्टीने ते पुढे नेले. त्यांच्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भूतानचा वारसा आणि विकास या दोन्हींना पुढे नेले.
भूतानमध्ये लोकशाही व्यवस्था स्थापन करण्यात आणि सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्यात महामहिमांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. "सकल राष्ट्रीय आनंद" ही आपण पुढे आणलेली संकल्पना आज जगभरातील विकासाची व्याख्या करण्यासाठी एक महत्त्वाचा निकष बनली आहे. राष्ट्रनिर्माण केवळ जीडीपीवर आधारित नाही तर मानवतेच्या कल्याणावर देखील आधारित आहे,हे तुम्ही दाखवून दिले आहे.
मित्रांनो,
भारत आणि भूतानमधील मैत्री मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आपण घालून दिलेल्या पायावर आपल्या दोन्ही देशांमधील मैत्री आजही बहरत आहे.
सर्व भारतीयांच्या वतीने, मी महाराजांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.
मित्रांनो,
भारत आणि भूतान केवळ सीमांनीच नव्हे तर संस्कृतींनी देखील जोडलेले आहेत.आपले नाते नीतीमूल्यांचे आहे, विवेकाचे आहे ,शांती आणि प्रगतीचे आहे.
2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर, मला माझ्या पहिल्या परदेश दौऱ्याद्वारे भूतानला भेट देण्याची संधी मिळाली. आजही जेव्हा मी तो दौरा आठवतो तेव्हा माझे हृदय भावनेने भरून येते. भारत आणि भूतानमधील संबंध खूप मजबूत आणि समृद्ध आहेत. आम्ही अडचणीच्या काळात एकत्र उभे राहिलो, आव्हानांना एकत्र तोंड दिले आणि आज, प्रगती आणि समृद्धीकडे वाटचाल करत असताना, आमचे बंध अधिकच मजबूत होत आहेत.
महाराज, राजा भूतानचे महामहीम राजे भूतानला नव्या शिखरावर घेऊन जात आहेत. भारत आणि भूतान यांच्यादरम्यान विश्वासार्हता आणि विकास यांची भागीदारी आहे, तो या संपूर्ण क्षेत्रासाठी खूप मोठा आदर्श आराखडा आहे.
मित्रांनो,
उभय देश आज वेगाने प्रगती करत आहेत, त्या विकासाला आपल्यातील ऊर्जा भागीदारी अधिक गतिमान करते आहे. भारत -भूतान जलविद्युत भागीदारीचा पायादेखील चौथ्या महाराजांच्या नेतृत्वाखाली रचला गेला होता. चौथे महाराज आणि पाचवे महाराज यांनी भूतानच्या शाश्वत विकास आणि पर्यावरण प्रथम या दृष्टीकोनाला अग्रेसर ठेवले होते. आपल्या याच दृष्टीकोनाच्या बळावर, आज भूतान जगातला पहिला कार्बन निगेटीव्ह - (निर्मितीपेक्षा वातावरणातील अधिक कार्बन शोषून घेणारा) देश झाला आहे. हे यश विलक्षण आहे. दरडोई नवीकरणीय ऊर्जा निर्मितीमध्येही आज, भूतान जगातल्या सर्वोच्च देशांपैकी एक आहे.
मित्रांनो,
भूतान शंभर टक्के नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमधून देशांतर्गत ऊर्जा निर्मिती करतो. याच क्षमतेच्या विस्ताराच्या दृष्टीने आज एक मोठे पाऊल उचलण्यात येते आहे. भूतानमध्ये आज एक हजार मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या एक नवा जलविद्युत प्रकल्पाची सुरुवात होत आहे. त्यामुळे भूतानच्या जलविद्युत क्षमतेमध्ये चाळीस टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. इतकेच नव्हे तर दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या आणखी एका जलविद्युत प्रकल्पाचे कामालाही पुन्हा सुरुवात होणार आहे.
आणि आमची ही भागीदारी केवळ जलविद्युत ऊर्जेपर्यंत मर्यादित नाही.
आता आम्ही सौर ऊर्जा क्षेत्रातही मोठे एकत्रितपणे पाऊल टाकत आहोत, त्याच्याशी निगडीत महत्त्वाचे करार आज करण्यात आले.
मित्रांनो,
ऊर्जा सहकार्याबरोबरच, भारत आणि भूतान दरम्यानचे संपर्क क्षमता विस्तारण्यावरही आम्ही लक्ष केंद्रित करतो आहोत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की,
संपर्कामुळे संधी निर्माण होतात,
आणि संधीं समृद्धी आणतात.
या उद्देशाने, येत्या काळात गेलेफु आणि साम्त्से शहरांना भारताच्या विस्तृत रेल्वे जाळ्याशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर इथल्या उद्योगांना, भूतानच्या शेतकऱ्यांना भारताच्या विस्तृत बाजारात प्रवेश करणे अधिक सुलभ होणार आहे.
मित्रांनो,
रेल्वे आणि रस्ते संपर्कजाळ्याबरोबरच, सीमा पायाभूत संरचनेसंदर्भातही आम्ही वेगाने प्रगती करत आहोत. आदरणीय महाराजांनी, माईंडफूलनेस सिटी (सजगता असलेले शहर) या दृष्टीकोनातून काम सुरू केले आहे, त्यासाठीही भारत शक्य तितके सहकार्य करतो आहे. मी, आज या मंचावरून आणखी एक महत्त्वाची घोषणा करतो आहे. नजीकच्या काळात, भारत इथे येणाऱ्या पर्यटकांना आणि गुंतवणूकदारांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी गेलेफूजवळ तपासणी केंद्र उभारणार आहे.
मित्रांनो,
भारत आणि भूतान प्रगती आणि समृद्धी यासाठी एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि याच भावनेतून, गेल्या वर्षी भारत सरकारने भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी, दहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक सहयोगाची घोषणा केली होती. हा निधी रस्त्यांपासून कृषी क्षेत्रापर्यंत, वित्तपुरवठ्यापासून ते आरोग्यापर्यंत, अशा हरेक क्षेत्रामध्ये वापरला जात आहे, ज्यामुळे भूतानच्या नागरिकांचे जीवनमान सुलभ झाले आहे.
गेल्या काही काळात, भूतानच्या लोकांना गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित व्हावा यासाठी भारताने अनेक उपाययोजना केल्या आहेत.
आता तर इथे युपीआय (एकात्मिक भरणा प्रणाली) पेमेंटस् च्या सुविधेचा विस्तारही केला जातो आहे. भूतानच्या नागरिकांना भारतात आल्यानंतर युपीआयची सुविधा मिळेल यासाठीही प्रयत्नशील आहोत.
भारत आणि भूतान यांच्या दरम्यान असलेल्या बळकट भागीदारीचा सर्वाधिक फायदा आपल्या तरूणांना होत आहे. राष्ट्रीय सेवा, स्वयंसेवी सेवा आणि नवोन्मेष या क्षेत्रात आदरणीय महाराजांचे उत्तम काम सुरू आहे. आणि महाराजांची तरूणांना सक्षम करण्याचा जो दृष्टीकोन आहे, त्यांना तंत्र कुशल बनवण्याचा त्याचा विचार भूतानच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात प्रेरीत करत आहेत.
शिक्षण, नवोन्मेष, कौशल्य विकास, क्रीडा, अवकाश, संस्कृती अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि भूतानच्या तरुणांदरम्यान सहकार्य वृद्धिंगत होत आहे. आज आपले तरूण एकत्र येत उपग्रह निर्मितीही करत आहेत. भारत आणि भूतान या दोन्ही देशांसाठी ही महत्त्वाची कामगिरी आहे.
मित्रांनो,
भारत आणि भूतान यांच्यातील संबंधातील मोठी ताकद म्हणजे आपल्या नागरिकांमधील आत्मिक बंध. दोन महिन्यांपुर्वी भारताच्या राजगीरमध्ये रॉयल भूतानी मंदिराचे उद्घाटन झालं आहे. या पुढाकाराचा भारताच्या अन्य भागातही विस्तार होत आहे.
वाराणसीत भूतानी मंदिर आणि अतिथीगृह असावे अशी भूतानच्या लोकांची इच्छा होती. त्यासाठी आवश्यक जमीन भारत सरकार उपलब्ध करून देत आहे. या मंदिरांच्या माध्यमातून आम्ही आपल्यातले बहमोल आणि ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करत आहोत.
मित्रांनो,
भारत आणि भूतान, शांतता, समृद्धी आणि सामाईक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत राहो, अशी माझी इच्छा आहे. भगवान बुद्ध आणि गुरू रिनपोछे यांचा आशीर्वाद आपल्या दोन्ही देशांवर कायम राहो.
आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.
धन्यवाद !!!
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/संपदा पाटगांवकर/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189613)
Visitor Counter : 8
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam