माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडियाजॉय बी2बी 2025 द्वारे भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला बळकटी - हा उपक्रम वेव्हज बाजार आणि अहा द्वारे समर्थित, तर प्रोड्यूसरबाजार आणि इंडियाजॉय द्वारे आयोजित
इंडियाजॉय बी2बी 2025 ने एव्हीजीसी-एक्सआर आणि चित्रपट उद्योगांसाठी एक अग्रगण्य केंद्र म्हणून हैदराबादचे स्थान केले आणखी मजबूत
Posted On:
11 NOV 2025 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2025
इंडियाजॉय बी 2 बी 2025 उपक्रमांतर्गत इंडियन फिल्म मार्केट आणि वेव्हज अॅनिमेशन बाजार यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वेव्हज बाजार, प्रोड्यूसरबाजार आणि अहा यांच्या सहकार्याने करण्यात आले. या आयोजनामुळे हैदराबादने एव्हीजीसी-एक्सआर (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी) आणि चित्रपट उद्योगासाठी एक अग्रगण्य केंद्र म्हणून आपली ओळख आणखी बळकट केली.
या वर्षीच्या आवृत्तीत देशभरातील 120 विक्रेते आणि 35 खरेदीदारांचा सहभाग दिसून आला, यामुळे सह-निर्मिती, आशय परवाना आणि धोरणात्मक सहकार्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार झाले. या कार्यक्रमादरम्यान, स्प्राउट्स स्टुडिओने 6 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. हा निधी वेव्हज अॅनिमेशन बाजार आणि प्रोड्यूसर बाजार द्वारे आयोजित इंडियन फिल्म मार्केटशी संबंधित बौद्धिक संपत्ती (आयपी) ला पाठबळ देण्यासाठी वापरला जाईल.
वेव्हजचा अॅनिमेशन बाजार
या विभागात 18 उदयोन्मुख निर्माते आणि आयपी धारकांनी आपले प्रकल्प सादर केले, ज्यातून भारताच्या अॅनिमेशन आणि नवीन माध्यमांमधील वाढत्या कौशल्य समूहाचे आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडले. या बाजारपेठेने कथाकार, निर्माते आणि वितरकांना यशस्वीरित्या एकत्र आणले, तसेच अर्थपूर्ण चर्चा आणि भागीदारींना चालना दिली ज्यामुळे भारताच्या मनोरंजन परिसंस्थेच्या विकासाला गती मिळेल.
या वर्षीच्या आवृत्तीतील प्रमुख खरेदीदारांमध्ये अहा, झी, स्पिरिट मीडिया, जिओ हॉटस्टार, सुरेश प्रॉडक्शन्स, ईटीव्ही विन, वॉचो, नॉर्थस्टार एंटरटेनमेंट आणि अल्फा पिक्चर्स यांचा समावेश होता. उपक्रमाचा भाग म्हणून 24 कोटी रुपयांच्या आशय हक्कांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आणि त्या संबंधात संभाव्य भागीदारांसोबत चर्चा करण्यात आली.
उद्घाटन सत्रादरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले:
“या कार्यक्रमामुळे मनोरंजन उद्योगातील सर्व घटकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. विक्रेते आणि खरेदीदारांना एकाच व्यासपीठावर आणल्याने भारताच्या मनोरंजन व्यापाराला आणखी ऊर्जा मिळेल. ज्याप्रमाणे आयपीएलने भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली, त्याचप्रमाणे सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणारा वेव्हज उपक्रम मनोरंजन क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल.”
इंडियाजॉय मधील वेव्हज बाजार या उपक्रमामुळे नवोदित स्टुडिओ यांना प्रोत्साहन मिळाले आणि जागतिक प्रेक्षकांसाठी “क्रिएट इन इंडिया” या संकल्पनेखाली तयार होणाऱ्या स्थानिक आशयाच्या प्रसाराला चालना मिळाली.
उत्साही सहभाग आणि प्रभावी व्यावसायिक परिणामामुळे, इंडियाजॉय बी2बी 2025 येथील वेव्हज बाजारने पुन्हा एकदा भारताच्या सर्जनशील उद्योगांमध्ये सहकार्य, नवोन्मेष आणि विकासाला चालना देणारे प्रमुख व्यासपीठ म्हणून आपली भूमिका बळकट केली आहे.
इंडियाजॉय 2025 येथे क्रिएट इन इंडिया चॅलेंज विजेत्यांचे प्रदर्शन
इंडियाजॉय 2025 येथील वेव्हज बाजार पॅव्हेलियनने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पाठिंब्याने क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) विजेत्यांचे प्रदर्शन देखील आयोजित केले होते. एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील 20 हून अधिक विजेत्यांनी त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले, ज्यात VR हेडसेट, शैक्षणिक तंत्रज्ञान उपकरणे, गेमिंग प्रोटोटाइप, ॲनिमेशन चित्रपट आणि सिनेमॅटिक आयपी यांचा समावेश होता. हे प्रकल्प ॲनिमेशन चित्रपट स्पर्धा, इनोव्हेट2एज्युकेट हँडहेल्ड डिव्हाइस चॅलेंज, वेव्हज अवॉर्ड्स ऑफ एक्सलन्स, XR क्रिएटर हॅकेथॉन आणि अनरिअल सिनेमॅटिक चॅलेंज यासारख्या आव्हानांमधून विकसित झाले होते.
तरुण नवोन्मेषकांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्याशी संवाद साधला, तसेच वेव्हज उपक्रमांतर्गत त्यांचे सर्जनशील प्रवास आणि इनक्युबेशन अनुभव सामायिक केले.
क्रिएट इन इंडिया चॅलेंज विजेत्यांचा सहभाग आणि इंडियाजॉय बी2बी 2025 चा यशस्वी समारोप हे दोन्ही, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या तरुण सर्जकांना सक्षम करण्याच्या, भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या तसेच प्रसारमाध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला जागतिक नवोन्मेषाचे केंद्र बनवण्याच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहेत.
* * *
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189013)
Visitor Counter : 5