पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तराखंडच्या स्थापनच्या रौप्य महोत्सवानिमित्त निमत्त डेहराडून इथल्या समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

Posted On: 09 NOV 2025 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 9 नोव्हेंबर 2025

देवभूमि उत्तराखंडचे माझे बंधू-भगिनी, दीदी-ताई, ज्येष्ठ-मान्यवर, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार, प्रणाम, विनम्र अभिवादन.

उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह जी, मुख्यमंत्री भाई पुष्कर सिंह जी, केंद्रातील माझे सहकारी, अजय टम्टा, विधानसभेच्या अध्यकषा भगिनी रितू जी, उत्तराखंड सरकारचे मंत्रीगण, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदारगण, मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले पूज्य संतगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तराखंडच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो.

मित्रहो,

9 नोव्हेंबरचा हा दिवस एका दीर्घ तपस्येचे फळ आहे. आजचा दिवस आपण सर्वांसाठी अभिमानाची अनुभूती देणारा आहे. उत्तराखंडच्या देवतुल्य जनतेने अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिले होते, ते अटलजींच्या सरकारच्या काळात, 25 वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, आणि आता गेल्या 25 वर्षांच्या प्रवासानंतर, आज उत्तराखंड ज्या उंचीवर पोहचले आहे, ते पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक आहे, ज्यांनी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला होता. ज्यांचे पर्वतांवर प्रेम आहे, ज्यांना उत्तराखंडची संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, देवभूमीच्या लोकांशी जिव्हाळा आहे, त्यांचे मन आज प्रफुल्लित आहे, ते आनंदित आहेत.

मित्रहो,

मला या गोष्टीचाही आनंद आहे की डबल इंजिनचे भाजप सरकार उत्तराखंडच्या सामर्थ्याला नवीन उंची गाठून देण्यासाठी काम करत आहे. मी आपणा सर्वांना उत्तराखंडच्या रोप्यमहोत्सवी वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा देतो। मी या निमित्ताने उत्तराखंडच्या त्या बलिदान देणाऱ्यांनाही श्रद्धांजली वाहतो, ज्यांनी आंदोलनादरम्यान आपले प्राण अर्पण केले होते. मी त्या वेळेच्या सर्व आंदोलनकर्त्यांनाही वंदन करतो, अभिनंदन करतो.

मित्रहो,

आपण सर्व जाणताच, उत्तराखंडशी माझा जिव्हाळा किती गहिरा आहे. जेव्हा मी आध्यात्मिक प्रवासासाठी इथे येत होतो, तेव्हा इथे डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या माझ्या बंधू-भगिनींचा संघर्ष, त्यांची मेहनत, कठीण प्रसंगांवर विजय मिळवण्याची त्यांची तीव्र इच्छा, मला सदैव प्रेरणा देत होती.

मित्रहो,

येथे वास्तव्य केलेल्या दिवसांनी, मला उत्तराखंडच्या अपार सामर्थ्याची प्रत्यक्ष जाणिव करून दिली आहे। म्हणूनच जेव्हा बाबा केदारांच्या दर्शनानंतर, मी म्हणालो, की हे दशक उत्तराखंडचे आहे, तर ते काही फक्त माझ्या तोंडातून निघालेले एक वाक्य नव्हते, मी जेव्हा हे म्हणालो, तेव्हा माझा संपूर्ण विश्वास तुम्हा लोकांवर होता। आज जेव्हा उत्तराखंड आपली 25 वर्षे पूर्ण करत आहे, त्यावेळी माझा हा विश्वास आणखी दृढ झाला आहे की हा उत्तराखंडच्या उत्कर्षाचा काळ आहे.

मित्रहो,

25 वर्षांपूर्वी जेव्हा उत्तराखंड नवीन नवीन बनले होते, तेव्हा आव्हाने कमी नव्हती. संसाधने मर्यादित होती, राज्याचा अर्थसंकल्प लहान होता, उत्पन्नाचे स्रोत खूप कमी होते, आणि बहुतेक गरजा केंद्राच्या मदतीने पूर्ण होत होत्या. आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. इथे येण्यापूर्वी मी रौप्य महोत्सवी समारंभात जबरदस्त प्रदर्शन पाहिले. आपल्यालाही माझा आग्रह आहे, ते प्रदर्शन उत्तराखंडच्या प्रत्येक नागरिकाने पाहिले पाहिजे. यात उत्तराखंडच्या गेल्या 25 वर्षांच्या प्रवासाची क्षणचित्रे आहेत. पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग, पर्यटन, आरोग्य, वीज आणि ग्रामीण विकास, अशा अनेक क्षेत्रांमधील यशोगाथा प्रेरणा देणाऱ्या आहेत. 25 वर्षांपूर्वी उत्तराखंडचा अर्थसंकल्प फक्त 4 हजार कोटी रुपये होता. आज जे 25 वर्षांच्या वयाचे आहेत, त्यांना त्या वेळेचे काहीही माहित नसेल. त्या वेळी 4 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. आज ते वाढून एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार झाला आहे. 25 वर्षांत उत्तराखंडमध्ये वीज उत्पादन 4 पट जास्त झाले आहे. 25 वर्षांमध्ये उत्तराखंडमध्ये रस्त्यांची लांबी वाढून दुप्पट झाली आहे आणि इथे 6 महिन्यात 4 हजार प्रवासी विमानाने येत होते, 6 महिन्यात 4 हजार. आज एका दिवसात 4 हजारपेक्षा जास्त प्रवासी विमानाने येतात.

मित्रहो,

या 25 वर्षांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या 10 पटीने जास्त वाढली आहे. पूर्वी इथे फक्त एक वैद्यकीय महाविद्यालय होते. आज इथे 10 वैद्यकीय महाविद्यालय आहेत। 25 वर्षांपूर्वी लसीकरणाच्या विस्ताराची व्याप्ती केवळ 25 टक्के देखील नव्हता. 75 टक्के पेक्षा जास्त लोक लसीकरणाशिवाय आयुष्याची सुरुवात करत होते.आज उत्तराखंडचे जवळपास प्रत्येक गाव लसीकरणाच्या विस्ताराच्या व्याप्तीअंतर्गत आले आहे। म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक पैलूत उत्तराखंडने खूप प्रगती केली आहे. विकासाचा हा प्रवास, अद्भुत राहिला आहे. हा बदल सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या धोरणाचा परिणाम आहे, प्रत्येक उत्तराखंड वासियाच्या संकल्पाचा परिणाम आहे. पूर्वी डोंगरांचे चढ, विकासाच्या वाटेला अडवत होती. आता त्याच ठिकाणी, नवीन वाट खुली होऊ लागली आहे.


मित्रहो,

मी थोड्या वेळापूर्वी उत्तराखंडच्या युवकांशी, उद्योजकांशी बोललो, ते सर्व उत्तराखंडच्या प्रकतीबद्दल खूप उत्साही आहेत। आज जे उत्तराखंड वासियांचे उद्गार आहेत, ते जर मी गडवालीमध्ये म्हणालो, तर कदाचित काही चूक तर करेन, पण 2047 मध्ये भारताला, विकसित देशांच्या रांगेत, आणण्यासाठी, माझे उत्तराखंड, माझी देवभूमि, पूर्णपणे सज्ज आहे।

 

मित्रहो,

उत्तराखंडच्या विकास यात्रेला गती देण्यासाठी, आजदेखील इथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली गेली आहे। शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि खेळ यांच्याशी संबंधित हे प्रकल्प, इथे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतील। जमरानी आणि सॉन्ग धरण प्रकल्प, डेहरादून आणि हल्द्वानी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील। या सर्व योजनांसाठी 8 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जाईल। मी उत्तराखंड वासियांना या प्रकल्पांसाठी शुभेच्छा देतो।

 

मित्रहो,

उत्तराखंडचे सरकार, आता सफरचंद आणि कीवीच्या शेतकऱ्यांना डिजिटल चलनात अनुदान द्यायला सुरुवात करत आहे। याअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा संपूर्ण माग घेणे शक्य होत आहे। यासाठी मी राज्य सरकार, भारतीय रिझर्व बँकेसह सर्व भागधारकांचे देखील कौतुक करतो।

 

मित्रहो,

देवभूमि उत्तराखंड भारताच्या आध्यात्मिक जीवनाचे स्पंदन आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, जागेश्वर आणि आदि कैलाश, अशी अगणित तीर्थे आपल्या आस्थेची प्रतीक आहेत. दरवर्षी लाखो भाविक या पवित्र तिर्थांच्या यात्रेवर असतात. त्यांची यात्रा भक्तीचा मार्ग खुला करते, त्यासोबतच, उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेलाही नवीन ऊर्जा देते.

मित्रहो,

उत्तम संपर्क व्यवस्थेचा उत्तराखंडच्या विकासाशी गहिरा संबंध आहे, म्हणूनच आज राज्यात दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या प्रकल्पांवर काम चालू आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहे. दिल्ली-डेहरादून द्रुतगती मार्ग आता जवळपास तयार आहे. गौरीकुंड-केदारनाथ आणि गोविंदघाट-हेमकुंट साहिब रोप-वेची पायाभरणी झाली आहे। हे प्रकल्प उत्तराखंडमध्ये विकासाला नवीन गती देत आहेत.

मित्रहो,

उत्तराखंडने 25 वर्षांमध्ये विकासाचा एक दीर्घ प्रवास केला आहे. आता प्रश्न हा आहे की पुढच्या 25 वर्षांत आपण उत्तराखंडला कोणत्या उंचीवर पाहू इच्छितो? तुम्ही ती म्हण नक्कीच ऐकली असेल, जिथे इच्छा, तिथे मार्ग। म्हणूनच जेव्हा आपल्याला हे माहित असेल की आपले लक्ष्य काय आहे, तेव्हा तिथे पोहोचण्याचा मार्ग-आराखडा देखील तेवढ्याच वेगाने तयार होईल। आणि आपल्या लक्ष्यांवर चर्चा करण्यासाठी 9 नोव्हेंबरपेक्षा उत्तम दिवस आणखी कोणता असेल?

मित्रहो,

उत्तराखंडची खरी ओळख त्याची आध्यात्मिक शक्ती आहे। उत्तराखंडने जर निर्धार केला, तर पुढच्या काही वर्षांत स्वतःच, जगाची अध्यात्मिक राजधानी म्हणून सितीव निर्माण करू शकते. इथली मंदिरे, आश्रम, ध्यान आणि योग केंद्रे, हे सगळे आपण जागतिक जाळ्याशी जोडू शकतो.

मित्रांनो,

देशभरातून तसेच परदेशातून लोक येथे उपचारांसाठी येतात. येथील औषधी वनस्पती आणि आयुर्वेदिक औषधांची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २५ वर्षांत उत्तराखंडने सुगंधी वनस्पती, आयुर्वेदिक औषधी वनस्पती, योग आणि वैद्यकीय उपचार पर्यटनात उत्तम प्रगती केली आहे. उत्तराखंडच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात योग केंद्र, आयुर्वेद केंद्र, निसर्गोपचार संस्था, होम स्टे अशा संपूर्ण पॅकेजच्या दिशेने विचार करण्याची वेळ आता आली आहे. हे आपल्या परदेशी पर्यटकांना खूप भावेल.

मित्रांनो,

भारत सरकार सीमेवरील व्हायब्रंट व्हिलेज योजनेवर किती भर देत आहे हे तुम्हाला माहितीच आहे. उत्तराखंडमधील प्रत्येक झळाळते गाव स्वतःच एक छोटे पर्यटन स्थळ बनले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तिथे होम स्टे स्थापन केले पाहिजेत आणि स्थानिक खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा प्रचार केला पाहिजे. बाहेरून येणारे पर्यटक जेव्हा घरगुती वातावरणात रमतील, चुडकणी, रोट-अरसा, रास-भात आणि झंगोरा खीर खातील तेव्हा त्यांना किती आनंद होईल याची कल्पना करा. या आनंदामुळे त्यांना दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा उत्तराखंडमध्ये परत येण्याची स्फूर्ती मिळेल.

मित्रांनो,

आता आपल्याला उत्तराखंडमधील छुप्या क्षमतेचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. येथील हरेला, फुलदेई, भिटोली सारख्या उत्सवांचा भाग झाल्यानंतर, पर्यटकांना ते अनुभव कायमच स्मरणात राहतात. येथील मेळेही तितकेच चैतन्यदायी आहेत. नंदा देवीचा मेळा, जौलजीवी मेळा, बागेश्वरमधील उत्तरायणी मेळा, देवीधुराचा मेळा, श्रावणी मेळा आणि बटर महोत्सव हे उत्तराखंडच्या चैतन्याचे प्रतीक आहेत. येथील स्थानिक मेळे आणि उत्सव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी, वन डिस्ट्रिक्ट वन फेस्टिवल , म्हणजेच एक जिल्हा एक मेळा, यासारखी एखादी मोहीम चालवता येऊ शकेल.

मित्रांनो,

उत्तराखंडमधील सर्व डोंगराळ जिल्ह्यांमध्ये फळ उत्पादनाची मोठी क्षमता आहे. आपण डोंगराळ जिल्ह्यांना फलोत्पादन केंद्रे बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ब्लूबेरी, किवी, वनौषधी आणि औषधी वनस्पती हे शेतीचे भविष्य आहे. उत्तराखंडला अन्न प्रक्रिया, हस्तकला आणि सेंद्रिय उत्पादनांसाठी एमएसएमईंना पुन्हा नव्याने चालना देण्याची आवश्यकता आहे

मित्रांनो,

उत्तराखंडमध्ये बाराही महिने पर्यटनाची क्षमता कायमच राहिली आहे. आता, इथली संपर्कव्यवस्था सुधारत आहे आणि म्हणूनच मी वर्षभर पर्यटनाकडे वाटचाल करण्याचा सल्ला दिला. उत्तराखंड हिवाळी पर्यटनाला नवीन उंचीवर नेत आहे याचा मला आनंद आहे. मला नुकतीच मिळालेली माहिती उत्साहवर्धक आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत या हिवाळ्यात मोठी वाढ झाली आहे. 14 हजार फूट पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या पिथोरागड येथे हाय अल्टिट्यूड मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. आदि कैलास परिक्रमा स्पर्धा देखील देशासाठी प्रेरणास्थान बनले आहे. तीन वर्षांपूर्वी, आदि कैलास यात्रेला दोन हजारांपेक्षा कमी यात्रेकरू भेट द्यायचे. आता ही संख्या तीस हजारांपेक्षा जास्त झाली आहे. आता काही दिवसांपूर्वीच केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद झाले आहेत. केदारनाथ इथं यावर्षी सुमारे 17 लाख भाविक देवदर्शनासाठी आले आहेत. तीर्थयात्रा आणि बारमाही पर्यटन ही उत्तराखंडची अशी ताकद आहे, जी त्याला सतत विकासाच्या नवीन उंचीवर नेईल. पर्यावरणपूरक पर्यटन आणि साहसी पर्यटनाची देखील येथे मोठी क्षमता आहे. हे देशभरातील तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र बनू शकते.

मित्रांनो,

उत्तराखंड आता चित्रपट स्थळ म्हणूनही उदयास येत आहे. राज्याच्या नवीन चित्रपट धोरणामुळे चित्रीकरण सोपे झाले आहे. उत्तराखंड लग्न सोहळ्याचे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय होत आहे आणि माझी तर एक मोहीम सुरु आहे "वेड इन इंडिया". वेड इन इंडियासाठी, उत्तराखंडने त्याच आलिशान दर्जाच्या सुविधा विकसित केल्या पाहिजेत. आणि हे साध्य करण्यासाठी, 5-7  प्रमुख ठिकाणे निवडून ती विकसित केली जाऊ शकतात.

 

मित्रांनो,

देशाने स्वावलंबी भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. व्होकल फॉर लोकलच्या  माध्यमातून याचा मार्ग सुकर होईल. उत्तराखंड नेहमीच या दृष्टिकोनाला साकार करत आला आहे. स्थानिक उत्पादनांबद्दलची आपुलकी, त्यांचा वापर आणि आपल्या जीवनाचा भाग म्हणून त्यांना स्विकारणे हे या प्रदेशाच्या परंपरेचा अविभाज्य हिस्सा आहे. उत्तराखंड सरकारने व्होकल फॉर लोकल मोहिम गतीमान केल्याचा मला आनंद आहे. या मोहिमेनंतर, उत्तराखंडमधील 15 कृषी उत्पादनांना जी आय टॅग मिळाले आहेत. इथल्या स्थानिक बेडू फळ आणि बद्री गायीच्या तूपासाठी अलिकडच्या काळात मिळालेले जी आय टॅग खरोखरच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. बद्री गायीचे तूप हे डोंगराळ भागातील प्रत्येक घरात एक प्रमुख उत्पादन आहे. आता, बेडू डोंगराळ गावांच्या पलीकडे विस्तारत आहे आणि बाहेरील बाजारपेठांमध्ये पोहोचत आहे. त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना आता जीआय टॅग असेल. ते उत्पादन कुठेही गेले तरी ते उत्तराखंडची ओळख सोबत घेऊन जाईल. आपल्याला देशातील प्रत्येक घरापर्यंत अशी जीआय-टॅग असलेली उत्पादने पोहोचवण्याची गरज आहे.

मित्रांनो,

मला आनंद आहे की हाऊस ऑफ हिमालयाज, उत्तराखंडचा असा एक ब्रँड बनत आहे, ज्यामुळे स्थानिक उत्पादनांची ओळख एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहे. या ब्रँड अंतर्गत, राज्यातील विविध उत्पादनांना एक सामायिक ओळख देण्यात आली आहे ज्यायोगे ते जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील. राज्यातील अनेक उत्पादने आता डिजिटल मंचावर उपलब्ध आहेत. यामुळे त्यांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोच मिळाली आहे आणि शेतकरी, कारागीर आणि लघु उद्योजकांसाठी एक नवीन बाजारपेठ खुली झाली आहे. तुम्हाला हाऊस ऑफ हिमालयाजच्या ब्रँडिंगसाठीही तुम्हला पुन्हा नवीन उर्जा एकवटण्याची गरज आहे. आपल्याला या ब्रँडच्या उत्पादनांसाठी वितरण यंत्रणेवरही काम करत राहावे लागेल असे मला वाटते.

मित्रांनो,

तुम्हाला माहिती आहे की उत्तराखंडच्या विकास प्रवासात आतापर्यंत अनेक अडथळे आले आहेत. परंतु भाजपच्या मजबूत सरकारने प्रत्येक वेळी या अडथळ्यांवर मात केली आहे, आणि विकासाची वेग अबाधित राहण्याची खात्री केली आहे. उत्तराखंडमधील धामी सरकारने ज्या गांभीर्याने समान नागरी कायदा लागू केला ते इतर राज्यांसाठी एक उदाहरण आहे. धर्मांतर विरोधी कायदा आणि दंगल नियंत्रण कायदा यासारख्या राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्द्यांवर राज्य सरकारने धाडसी धोरणे स्विकारली आहेत. जमीनी हडप करणे आणि बदलत्या लोकसंख्या शास्त्रासारख्या राज्यात वेगाने उदयास येत असलेल्या संवेदनशील मुद्द्यांवरही भाजप सरकार ठोस कारवाई करत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात, उत्तराखंड सरकारने वेगाने आणि संवेदनशीलतेने काम करत, जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रांनो,

आज, आपण राज्याच्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा करत असताना, मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात, आपले उत्तराखंड विकासाच्या नवीन उंची गाठेल आणि त्याच अभिमानाने आपली संस्कृती आणि ओळख पुढे नेईल. रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त मी पुन्हा एकदा उत्तराखंडमधील सर्व रहिवाशांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी तुमच्याकडून अशी अपेक्षा करतो की आजपासून 25 वर्षांनंतर, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा उत्तराखंड कोणत्या उंचीवर असेल, हे लक्ष्य आत्ताच निर्धारित करून  ठेवले पाहिजे, मार्ग निवडला पाहिजे आणि वाट न पाहता, पुढे जाण्यास सुरुवात केली पाहिजे. मी तुम्हाला हीदेखील खात्री देतो की भारत सरकार नेहमीच उत्तराखंड सरकारच्या पाठीशी उभे आहे. तुम्हाला प्रत्येक पावलावर पाठिंबा देण्यास आम्ही तत्पर आहोत.

उत्तराखंडमधील प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक नागरिकाला मी आनंद, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

वंदे मातरमचे 150 वे वर्ष आहे, माझ्यासोबत म्हणा -

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

खूप खूप धन्यवाद.


जयदेवी पुजारी-स्वामी/तुषार पवार/संदेश नाईक/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2188426) Visitor Counter : 12