माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 2025 मध्ये शांतता आणि अहिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या उत्कृष्ट चित्रपट सर्जनशीलतेचा आयसीएफटी - युनेस्को गांधी पदक देऊन सन्मान होणार
Posted On:
09 NOV 2025 8:14PM by PIB Mumbai
मुंबई, 9 नोव्हेंबर 2025
46 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( इफ्फी ) सुरु करण्यात आलेले आयसीएफटी- युनेस्को गांधी पदक हे युनेस्कोच्या अधिपत्याखाली आयसीएफटी पॅरिस यांच्या सहकार्याने दिले जाणारे एक आंतरराष्ट्रीय सन्मानचिन्ह आहे. हा सन्मान अशा उत्कृष्ट चित्रपटाला दिला जातो जो शांतता, परस्परसंवाद आणि अहिंसेचा गांधीवादी दृष्टिकोन प्रसारित करतो.
या वर्षीच्या 10 उल्लेखनीय चित्रपटांचे मूल्यमापन एक प्रतिष्ठित परीक्षक मंडळ करणार आहे. या मंडळात डॉ. अहमद बेदजाओई, चित्रपट व दूरदर्शन दिग्दर्शक-निर्माते तसेच अल्जिअर्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक (अध्यक्ष); झुएयान हुन – इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अँड ऑडिओव्हिज्युअल कम्युनिकेशनचे (सीआयसीटी- आयसीएफटी) उपाध्यक्ष आणि प्लॅटफॉर्म फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशनचे (पीसीआय) संचालक; सर्ज मिशेल – युनियन इंटरनॅशनल दु सिनेमाचे (यूएनआयसीए) उपाध्यक्ष; टोबियास बियानकोन – आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थेचे (ITI) माजी महासंचालक; आणि जॉर्ज ड्यूपॉन – इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अँड ऑडिओव्हिज्युअल कम्युनिकेशनचे (सीआयसीटी-आयसीएफटी) महासंचालक व युनेस्कोचे माजी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय नागरी सेवक यांचा समावेश आहे.
ब्राईडस्
नाट्यलेखिका आणि चित्रपट निर्माती नादिया फॉल्स यांच्या ब्राईडस् या पहिल्या नाट्यमय चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन संनडान्स फिल्म फेस्टीव्हल 2025 मध्ये झाले. हा चित्रपट जागतिक चित्रपट (नाट्यपूर्ण) या श्रेणीतील ग्रॅंड ज्यूरी प्राईझसाठी नामांकित झाला होता.
चित्रपट दोन ब्रिटिश-मुस्लिम किशोरवयीन मुलींच्या प्रवासावर आधारित आहे, ज्या त्यांच्या तुटलेल्या आयुष्यापासून आणि घरांपासून दूर स्वतःचे अस्तित्व शोधण्यासाठी पळ काढतात. परंतु त्या त्यांच्या भूतकाळाशी सामोरे गेल्याशिवाय त्यांच्या नव्या प्रवासाचा अर्थ समजू शकत नाहीत.
हा चित्रपट अतिरंजितपणापासून दूर राहून कट्टरतेचा प्रश्न, युवकांची ओळख, श्रद्धा, आपलेपणा आणि निवडीच्या संघर्षाला मानवी दृष्टिकोनातून दाखवतो.
सेफ हाऊस (मूळ शीर्षक – फाॅर मोर्केट)
नॉर्वेचे लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक एरिक स्वेन्सन यांनी दिग्दर्शित केलेला सेफ हाऊस हा नव्या पिढीतील नॉर्वेजियन चित्रपट दिग्दर्शकांचा युद्धनाट्य प्रकारातील एक प्रभावी चित्रपट आहे. या चित्रपटाचे जागतिक प्रथम प्रदर्शन 48व्या गोटबर्ग फिल्म फेस्टीव्हल 2025 मध्ये उद्घाटनाचा चित्रपट म्हणून झाले. या ठिकाणी या चित्रपटाने आॅडीयन्स ड्रेगन अॅवार्ड ( बेस्ट नाॅर्डिक फिल्म) जिंकला.
खऱ्या घटनांवर आधारित हा चित्रपट मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकातील 2013 च्या यादवी युद्धाच्या काळात बांगुई येथे डाॅक्टर विदाऊट बाॅर्डर रुग्णालयात 15 तास चाललेल्या तणावपूर्ण प्रसंगांवर आधारित आहे. सेफ हाऊस हे थरारक आणि वास्तववादी नाट्य असूनही माणुसकी, धैर्य आणि काळजी या मूल्यांवर आधारलेले आहे.
हना
पुरस्कारप्राप्त कोसोव्होचे चित्रपट निर्माते उजकान ह्यसाज यांचा पहिला चित्रपट हना याचे जागतिक प्रथम प्रदर्शन 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भारत 2025 मध्ये होणार आहे.
या चित्रपटात कोसोव्होतील महिलांच्या पुनर्वसन केंद्रातील कला-चिकित्सा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या एका अभिनेत्रीची कथा आहे. ती युद्धग्रस्त महिलांना त्यांचा दु:खाचा अनुभव कलामधून व्यक्त करण्यास मदत करते. परंतु या कथा ऐकताना तिच्याच दडपलेल्या जखमा आणि ओळख पुन्हा जागृत होतात.
हना हा स्मृती, उपचार आणि कलेच्या शक्तीबद्दल अत्यंत भावनिक व विचारप्रवर्तक चित्रपट आहे, जो इतिहास दडवू पाहणाऱ्या जखमांना समोर आणतो.
के पाॅपर
इराणी अभिनेते आणि पटकथालेखक इब्राहिम अमिनी यांनी के पाॅपर या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट टॅलीन ब्लॅक नाईट फिल्म फेस्टीव्हल 2025 मध्ये प्रदर्शित झाला.
चित्रपटात एका के -पाॅप आयडलबद्दल अतोनात आकर्षण असलेल्या एका इराणी किशोरीची कथा आहे. ती त्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी तसेच एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी सियोलला जाण्याचा निर्धार करते. तिच्या आईच्या कठोर विरोधामुळे त्यांच्या नात्यात स्वप्न, भीती आणि पिढीगत मूल्यांचा संघर्ष उभा राहतो.
आत्मीय आणि संयत मांडणीत सांगितलेला के पाॅपर हा तरुणाईची आकांक्षा, एकतर्फी नाती, पालकांची चिंता आणि आपल्याला हवे आहे आणि आपल्याला परवानगी आहे यातील वाढत्या दरीचा सखोल अभ्यास करणारा चित्रपट आहे.
कार्ला
जर्मन चित्रपट निर्माती क्रिस्टिना टॉर्नाट्झेस यांचा पहिला चित्रपट कार्लाचे प्रथम प्रदर्शन म्युनिक चित्रपट महोत्सवात झाले. तिथे या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथालेखक ही दोन पारितोषिके जिंकली.
1962 मध्ये म्युनिक येथे घडलेल्या वास्तव घटनेवर आधारित हा चित्रपट 12 वर्षांच्या कार्लाची कथा सांगतो, जी आपल्या वडिलांविरुद्ध अनेक वर्षांच्या अत्याचारानंतर न्याय आणि संरक्षणासाठी तक्रार दाखल करते.
अत्यंत संवेदनशील चित्रण आणि वातावरणनिर्मितीने सजलेला हा चित्रपट एका बाल जीविताच्या संघर्षकथेचा आत्मविश्वासपूर्ण आविष्कार आहे. कार्लामध्ये टॉर्नाट्झेस यांनी ममता, पारदर्शकता आणि जिद्द यांनी घडवलेली एक अशी चित्रपटीय भाषा निर्माण केली आहे, जी अव्यक्त वेदनांपर्यंत पोहोचू शकते.
माय डाॅटर्स हेअर (मूळ शीर्षक – राहा)
इराणी दिग्दर्शक हेसम फरहमंद यांनी आपल्या प्रशंसनीय लघुपट आणि माहितीपट निर्मितीनंतर राहा या सामाजिक चित्रपटाद्वारे पुन्हा लक्ष वेधले आहे.
हा चित्रपट जुना वापरलेला लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आपल्या लहान मुलीचे केस विकणाऱ्या तोहीद या पात्राभोवती फिरतो. ही कुटुंबासाठी आनंद देणारी छोटी कृती असते परंतु जेव्हा त्या लॅपटॉपच्या मालकीवर एका श्रीमंत घराण्याचा दावा होतो, तेव्हा वर्गभेदांचे तीव्र वास्तव समोर येते.
खऱ्या जीवनातील वास्तवावर आधारित राहा चित्रपटामध्ये फरहमंद यांनी एक असे जग उभे केले आहे, जिथे नैतिकतेच्या सीमारेषा धूसर होतात आणि न्याय तकलादू असतो. तीव्र निरीक्षणातून घडलेला हा चित्रपट सन्मान, संघर्ष आणि जगण्यासाठी दिल्या जाणाऱ्या नि:शब्द किंमतीची सार्वत्रिक कहाणी ठरतो.
द डेव्हील स्मोक्स (अॅंड सेव्हज् द बर्न्ट मॅचेस इन द सेम बाॅक्स)
(मूळ शीर्षक – एल डीआबलो फुमा (वाय गुआर्डा लास साबेझेस डे लोस सिरीलोस क्यूएमाडोस एन ला मिस्मा साजा))
मेक्सिकन चित्रपट निर्माते एर्नेस्टो मार्टिनेज बुशियो यांचा हा पहिला वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट बर्लीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल 2025 मधील पर्स्पेक्टीव्ह काॅंपीटीशन या नवीन विभागातील विजेता ठरला.
या कथेत पाच भावंडांची कहाणी आहे, ज्यांना त्यांच्या पालकांनी सोडून दिल्यानंतर स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते. एकाकीपणाच्या प्रवासात ते त्यांच्या भीती आणि चिंता आपल्या विभ्रमग्रस्त आजीच्या अस्थिर मनातून अनुभवतात, ज्यामुळे कल्पना आणि वास्तव यातील सीमारेषा धूसर होतात.
गुंफलेल्या आणि अप्रत्यक्ष कथनशैलीत सांगितलेला हा चित्रपट बालपणातील भय, कल्पना आणि अस्तित्वसंघर्ष यांचे सूक्ष्म आणि प्रभावी चित्रण करतो. द डेव्हील स्मोक्स हा परिचित होम अलोन संकल्पनेला मानसिक व भावनिक सखोलतेने नव्याने परिभाषित करणारा चित्रपट ठरतो.
शेप आॅफ मोमो
भारतीय चित्रपट निर्माती त्रिबेणी राय यांच्या पहिल्या चित्रपट शेप आॅफ मोमोने आपल्या प्रभावी महोत्सवी प्रवासानंतर पदार्पण स्पर्धेत स्थान मिळवले आहे. हा चित्रपट हाफ गोज टू कॅनस् या कॅनस् 2025 मधील पाच आशियाई निर्मीतींपैकी एक म्हणून निवडला गेला होता. त्याचे प्रथम प्रदर्शन बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये झाले आणि नंतर सॅन सेबास्टीअन येथे हा चित्रपट प्रदर्शित झाला, जिथे तो न्यू डायरेक्ट अॅवार्डसाठी नामांकित झाला.
सिक्कीममध्ये आधारित आणि नेपाळी भाषेत चित्रित केलेली ही कथा बिष्णूभोवती फिरते, जी बहु - पिढ्यांच्या स्त्रियांनी भरलेल्या आपल्या घरात परत येते, जे आता निष्क्रियतेत अडकले आहे. ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी स्वायत्ततेचा हक्क परत मिळवण्यासाठी पितृसत्ताकतेने घडवलेल्या दिनचर्यांना आव्हान देते आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या मर्यादा स्वीकारायच्या की नाकारायच्या याचा विचार करायला भाग पाडते.
शेप आॅफ मोमो हा परंपरा, स्वातंत्र्य आणि कुटुंबांतून जन्म घेणाऱ्या शांत क्रांतींवर चिंतन करणारा लयबद्ध व अंतर्मुख चित्रपट आहे.
आता थांबायचे नाय ! (इंग्रजी शिर्षक – नाऊ, देअरज् नो स्टाॅपींग !)
अभिनेता शिवराज वायचळ दिग्दर्शित हा मराठी चित्रपट मुंबई महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणीतील काही सफाई कामगारांच्या सत्यकथेवर आधारलेला आहे. एका प्रेरणादायी अधिकाऱ्याच्या प्रोत्साहनामुळे हे कामगार पुन्हा शाळेत जाऊन आपले 10वीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करतात.
विनोद आणि भावना यांचा समतोल राखणारा हा चित्रपट लवचिकता, श्रमाची प्रतिष्ठा , शिक्षणाची परिवर्तनकारी शक्ती यांचा उत्सव आहे. शिकण्यासाठी, स्वप्न पाहण्यासाठी किंवा नव्याने सुरुवात करण्यासाठी वयाचे बंधन नसते हे हा चित्रपट सिद्ध करतो.
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2188149)
Visitor Counter : 7