गृह मंत्रालय
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त बिहारमध्ये पाटणा येथे आयोजित सोहोळ्याला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले संबोधित
स्वातंत्र्य चळवळीतील वीरांनी पाहिलेले महान भारताचे स्वप्न मोदी सरकार पूर्ण करत आहे
देशभरातील जनतेने समाजमाध्यमांवर प्रत्येक भाषेत #VandeMataram150 हे अभियान चालवावे
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2025 3:17PM by PIB Mumbai
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त बिहारमध्ये पाटणा येथे आयोजित सोहोळ्याला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी संबोधित केले. स्वदेशीच्या शपथेच्या सामुहिक पठणाचे नेतृत्व देखील त्यांनी केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी केलेल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की आजचा दिवस भारतीय जाणीवेच्या जागृतीचा दिवस आहे कारण 150 वर्षांपूर्वी याच दिवशी महान स्वातंत्र्यसेनानी आणि सुप्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत लिहिले.ते म्हणाले की बंकिमचंद्र यांनी या गीताच्या माध्यमातून देशाला राष्ट्रीय जाणीवेचा महामंत्र दिला आणि हाच मंत्र पुढे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा उद्घोष आणि मार्गदर्शक तत्व बनला आणि स्वातंत्र्यानंतर देशाला एकत्र येण्यासाठीचे कारण झाला. केंद्रीय मंत्री शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या 11 वर्षांत देशाने केलेल्या सामुहिक प्रयत्नांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची महान भारताच्या उभारणीची स्वप्ने पूर्ण होण्याच्या दिशेने कार्य झाले आहे.
अमित शाह म्हणाले की, आज झालेल्या ‘वंदे मातरम्’च्या समूहगानासह पुढील वर्षभरात भारताची चेतना पुन्हा जागृत करण्यासाठी टप्प्याटप्याने प्रयत्न सुरु झाले आहेत. ‘वंदे मातरम्’चा मंत्र आणि भावनेला आपल्या आयुष्यांशी जुळवून घेण्यासाठी देशव्यापी अभियान सुरु करण्यात येईल हे सांगण्यावर त्यांनी अधिक भर दिला. हे अभियान प्रत्यक्ष आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरूपांत राबवण्यात येईल. राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करण्यासाठी सर्व प्रादेशिक भाषांमध्ये ‘वंदे मातरम्’ लिहिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत सर्व भाषांमध्ये ‘#VandeMataram150’ हे समाज माध्यम अभियान राबवण्यात येईल अशी घोषणा शाह यांनी यावेळी केली.
‘वंदे मातरम्’ गीताची 150 वी वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी दिली.
अमित शाह म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी सरदार पटेल यांच्या सुचनेनुसार, पंडीत ओंकारनाथ यांनी गायलेल्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीतामध्ये स्वतंत्र भारताच्या हृदयाचे पहिले स्पंदन प्रतिध्वनित झाले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या अंतिम सत्रादरम्यान डॉ.राजेन्द्रप्रसाद यांनी राष्ट्रीय गीत रुपात ‘वंदे मातरम्’चा स्वीकार करून वंदेमातरम् चा देशासाठी सन्मानाने स्वीकाराचा मार्ग मोकळा केला. तेव्हापासून ‘वंदे मातरम्’ हे आपणा सर्वांसाठी राष्ट्रीय जागृतीचे गीत झाले आणि आज या गीताची 150 वी वर्षपूर्ती साजरी होत आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की आमच्या पक्षाने नेहमीच सांस्कृतिक राष्ट्रवादावर अधिक भर दिला आहे आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेच्या या जाणीवेसाठी ‘वंदे मातरम्’ गीताकडून मिळालेली प्रेरणाच कारणीभूत असावी.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, वर्ष 2047 पर्यंत भारताला महान राष्ट्र बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्धार करून आपण सर्वांनी पुन्हा एकदा भारत मातेसाठी आपले जीवन समर्पित करण्याची शपथ घेऊया.
***
निलिमा चितळे/संजना चिटणीस/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2187489)
आगंतुक पटल : 27