पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहोळ्याच्या उद्घाटन समारंभाची क्षणचित्रे केली सामायिक

Posted On: 07 NOV 2025 1:00PM by PIB Mumbai

 

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर आयोजित सोहोळ्याचे उद्घाटन आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीत तो एक मंत्र आहे, एक उर्जा, एक स्वप्न आणि एक दृढसंकल्प आहे असे गौरवोद्गार  मोदी यांनी काढले. वंदे मातरमचे समुहगान हा शब्दातीत, भारावून टाकणारा अनुभव आहे असे सांगून मोदी म्हणाले की इतक्या सगळ्या आवाजातूनही एकतेचा ताल, ऐक्याची धून, स्फुरण  आणि अखंड लय जाणवली. देश आज वंदे मातरम गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करत असून 7 नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे असे पंतप्रधान म्हणाले.

या उद्घाटन सोहोळ्याची क्षणचित्रे एक्स माध्यमावर सामायिक करताना मोदी म्हणतात.

आपण वंदे मातरम गीताचा 150 वर्षपूर्ती सोहोळा साजरा करत आहोत. या गीताने कित्येक पिढ्यांना देशासाठी आवाज उठवण्याची प्रेरणा दिली.

दिल्लीमध्ये वंदे मातरम् च्या 150 वर्षानिमित्त आयोजित ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन नवी उर्जा अनुभवत आहे’’.

वंदे मातरम गीताच्या 150 वर्षांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका विशेष टपाल तिकीटाचे आणि नाण्याचे प्रकाशन करताना मला अत्यंत अभिमान वाटतो आहे.

यावेळी वंदे मातरम गीताचा ऐतिहासिक प्रवास आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व अत्यंत प्रभावीरित्या उलगडून दाखवणाऱ्या प्रदर्शनालाही मी भेट दिली.”  

वंदे मातरम गीताच्या 150 वर्षांच्या इतिहासाशी निगडीत असलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन करुन मला खूप आनंद झाला. हे अजरामर गीत स्वतःच्या आवाजात गाताना आता प्रत्येक भारतीयाला या गीताशी जोडल्या गेलेल्या आंतरिक भावना जाणवतील.” ps://vandemataram150.in”

वंदे मातरमच्या समुह गायनामध्ये प्रत्येक स्वरातून देशभक्ती, एकता आणि समर्पणाची अद्भुत धून ऐकू येत होती. या सादरीकरणामुळे प्रत्येकाला पुन्हा एकदा हा अनुभव  आला की वंदे मातरम केवळ एक गीत नाही तर भारताच्या आत्म्याची अभिव्यक्ती आहे.” 

पारतंत्र्याच्या काळात, वंदे मातरम गीत भारत स्वतंत्र होणारच, भारतमातेच्या हातातील गुलामगिरीच्या बेड्या गळून पडतील आणि भारतमातेची लेकरे स्वतःच आपले भाग्य लिहीतील या संकल्पाचा आवाज बनले.

वंदे मातरम ही रचना म्हणजे बंकीमचंद्रांच्या एकेका शब्दाचा   आणि त्यातील भावनेचा गहन अन्वयार्थ आहे. म्हणूनच ते कालातीत आहे.

वंदे मातरमचा जयघोष करत देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व अज्ञात वीरांना आज आपण 140 कोटी देशवासिय एकत्रितपणे श्रद्धांजली अर्पण करत आहोत.

वंदे मातरमच्या प्रभावामुळेच आज आपण पुन्हा एकदा असा भारत देश घडवत आहोत जिथे नारीशक्ती राष्ट्रनिर्माणात अग्रेसर आहे.

मानवतेसाठी देवी कमला आणि विमला यांचे स्वरुप असलेला हा नवा भारत दहशतवादाच्या विनाशासाठी शस्त्रधारी दशभुजा दुर्गेचे रुपही घेऊ शकतो.”  

राष्ट्रनिर्माणाचा महामंत्र असलेल्या वंदे मातरम गीतातून महत्त्वाच्या ओळी का गाळल्या गेल्या; हे आजच्या पिढीने जाणून घेणे आवश्यक आहे. या ओळी गाळणे हा मोठा अन्याय होता.

विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आगेकूच करणारा आपला देश जेव्हा नवी यशोशिखरे प्राप्त करतो; तेव्हा अभिमानाने प्रत्येक भारतीयाच्या ओठावर हेच शब्द येतात वंदे मातरम!

***

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187414) Visitor Counter : 15