आयुष मंत्रालय
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन 2025
आयुष मंत्रालयाद्वारे संशोधन, उत्कृष्टता केंद्रे आणि सामुदायिक पोहोच यांच्या माध्यमातून एकात्मिक कर्करोग सेवेत वाढ
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी कर्करोग जागरूकता आणि एकात्मिक सेवेसाठी सक्रिय, लोककेंद्रित दृष्टिकोन केला अधोरेखित
Posted On:
07 NOV 2025 12:14PM by PIB Mumbai
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त, आयुष मंत्रालयाने जनजागृती आणि लवकर निदान करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्याची गरज अधोरेखित केली आहे कारण कर्करोग हा जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण ठरत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये तोंडाच्या, गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर नोंद झाली आहे. या आव्हानाला अधिक प्रभावीपणे तोंड देण्यासाठी शिक्षण, तपासणी आणि समग्र आरोग्य पद्धतींवर भारत अधिक भर देत आहे.
कर्करोगाच्या वाढता धोका तंबाखूचा वापर, अनारोग्यकारक आहार, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, मद्यपान, पर्यावरणीय प्रदूषण आणि एचपीव्ही संसर्ग यासारख्या टाळता येण्याजोग्या घटकांमुळे उद्भवतो, ज्यामुळे अधिक जागरूकता आणि वेळेवर कृती करण्याची आवश्यकता अधोरेखित होते. लवकर निदान झाल्यास जगण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारते, विशेषतः स्तनाच्या, गर्भाशयाच्या आणि तोंडाच्या कर्करोगांसाठी जे नियमित तपासणीद्वारे अधिक उपचार करण्यायोग्य टप्प्यांवर ओळखले जाऊ शकतात. अनेक कर्करोगापासून बचाव शक्य आहे. जेव्हा बऱ्याच जणांचे लवकर निदान होते तेव्हा उपचार शक्य असतात, म्हणून निरोगी जीवनशैलीची निवड करणे महत्त्वपूर्ण आहे. तंबाखू टाळणे, वनस्पती-आधारित आहार घेणे, वजन आटोक्यात ठेवणे, सक्रिय राहणे आणि धूम्रपान आणि प्रदूषकांच्या संपर्कात येणे टाळल्यास एकत्रितपणे जोखीम कमी करण्यास आणि दीर्घकालीन आरोग्यास समर्थन देण्यास मदत होते.
सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कर्करोग जागरूकता आणि प्रतिबंधासाठी सक्रिय आणि लोककेंद्रित दृष्टीकोन आवश्यक असल्याचे आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नमूद केले. एकात्मिक कर्करोग सुश्रुषा केंद्रे, सहयोगी संशोधन प्रयत्न आणि समुदाय-केंद्रित कार्यक्रमांसह मंत्रालयाच्या विस्तारित उपक्रमांचे उद्दीष्ट - प्रत्येक नागरिकाला परवडणारी, योग्य आणि सहाय्यक सेवा मिळण्याची सुनिश्चिती करणे हे आहे . एकात्मिक मॉडेल्समुळे आधुनिक ऑन्कॉलॉजी आणि आयुष प्रणालींची सांगड घातली तर ते विशेषतः समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकतात असेही त्यांनी निदर्शनास आणले.
आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, देशातील एकात्मिक कर्करोग उपचार उपक्रमांचे वाढते जाळे पुरावा-आधारित, रुग्ण-केंद्रित उपाय मजबूत करण्यासाठी मंत्रालयाची वचनबद्धता दर्शवते.
आयुष मंत्रालय एकात्मिक सेवा आणि आयुष औषध संशोधनासाठी मुंबईतील टीएमसी-एक्टरेक सह प्रमुख उत्कृष्टता केंद्रांद्वारे एकात्मिक कर्करोग देखभाल सेवेचा विस्तार करत आहे.
कर्करोगाच्या वाढत्या धोक्यावर मात करण्यासाठी प्रतिबंध, लवकर निदान आणि एकात्मिक सहाय्यक सेवा देशाच्या केंद्रस्थानी असायला हवी, यावर आयुष मंत्रालयाने भर दिला आहे. जागरूकता वाढविणे, स्क्रीनिंगपर्यंत पोहोच सुधारणे आणि जोखीम कमी करण्यासाठी आणि परिणाम सुधारण्यासाठी निरोगी जीवनशैली निवडींना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. हे प्रयत्न आयुष प्रणालीच्या प्रतिबंधात्मक आणि सहाय्यक सामर्थ्यासह आधुनिक वैद्यकीय पद्धतींची सांगड घालण्याच्या दृष्टीकोनाला पूरक आहेत. यामुळे राष्ट्रीय भार कमी करण्यासाठी आणि रुग्ण आणि समुदायाचे कल्याण वाढवण्यासाठी एक चांगला मार्ग प्रदान होईल.
कर्करोग जागरूकतेवरील सीसीआरएएस आयईसी प्रकाशन https://ccras.nic.in/wp-content/uploads/2023/06/Cancer.pdf या लिंकद्वारे पाहता येईल.
***
निलिमा चितळे/वासंती जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2187363)
Visitor Counter : 16