श्रम आणि रोजगार मंत्रालय
आयएलओने आयोजित केलेल्या सामाजिक न्यायासाठी वैश्विक एकजूट या लक्षवेधी सत्रात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी सामाजिक न्यायाला चालना देण्यात भारताने साधलेली प्रगती केली अधोरेखित
श्रम, कौशल्य आणि सामाजिक संरक्षणातील सहकार्य मजबूत करण्यासाठी रोमानिया, रशिया, कतार, ईयू आणि आयएलओच्या नेत्यांसोबत डॉ. मांडवीय यांच्या द्विपक्षीय बैठका
Posted On:
06 NOV 2025 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2025
सामाजिक विकासासाठीच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेसाठी केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय कतार मधील दोहा भेटीवर असून त्यांनी उच्चस्तरीय गोलमेज बैठकीत आणि पूर्ण सत्रात दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक संरक्षणातील भारताचा परिवर्तनकारी प्रवास अधोरेखित केला.
"दारिद्र्यनिर्मूलनाचे मार्ग: तळागाळातल्यांच्या सक्षमीकरणातील भारताचा अनुभव" या विषयावर काल नीती आयोगाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात डॉ. मांडवीय यांनी सुमारे 25 कोटी लोकांना बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर काढण्यात आणि सामाजिक सुरक्षा व्याप्ती 64% पेक्षा जास्त लोकसंख्येपर्यंत वाढविण्यात भारताने केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला.


डॉ. मांडवीय यांनी प्रमुख जागतिक समकक्षांशी द्विपक्षीय बैठका देखील घेतल्या:
- कतारच्या सामाजिक विकास आणि कुटुंब मंत्री बुथैना बिंत अली अल जबर अल नुआमी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, उभय देशाच्या नेत्यांनी सामाजिक संरक्षण, कुटुंब कल्याण आणि डिजिटल नवोपक्रमात सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली.
- डॉ. मांडवीय यांनी रोमानियाचे श्रम आणि सामाजिक एकता मंत्री पेत्रे-फ्लोरिन मनोले यांची भेट घेतली आणि भारत आणि रोमानियामधील 77 वर्षांच्या दीर्घकालीन भागीदारीबद्दल चर्चा केली. कौशल्य विकास, भाषा आणि सांस्कृतिक प्रशिक्षण आणि श्रम गतिशीलता मजबूत करण्यासाठी शिक्षण-ते-रोजगार (E2E) उपक्रमावर दोन्ही बाजूंनी विचारमंथन केले.
- आयएलओचे महासंचालक गिल्बर्ट एफ. होंगबो यांच्याशी झालेल्या भेटीत, दोन्ही बाजूंनी सामाजिक संरक्षण, कौशल्ये आणि श्रम गतिशीलतेमध्ये सखोल सहकार्यावर चर्चा केली आणि व्यवसायांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणासाठी व्यवहार्यता अभ्यासावरील अलीकडील सामंजस्य कराराचे स्वागत केले.
- रशियाचे श्रम आणि सामाजिक संरक्षण मंत्री अँटोन ओलेगोविच कोट्याकोव्ह यांच्याशी झालेल्या भेटीत, डॉ. मांडवीय यांनी भारत आणि रशियामधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीची पुष्टी केली आणि संयुक्त राष्ट्र, जी 20 आणि ब्रिक्स सारख्या बहुपक्षीय मंचांमध्ये त्यांच्या घनिष्ट सहकार्याची प्रशंसा केली. 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात रशियासोबत काम करण्याचा भारताचा हेतू त्यांनी व्यक्त केला.
- डॉ. मांडवीय यांनी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक हक्क आणि कौशल्य विभागाच्या ईयू कार्यकारी उपाध्यक्ष रोक्साना मिंझाटू यांचीही भेट घेतली. त्यांनी औपचारिक रोजगार निर्मिती, महिलांच्या कार्यबल सहभाग आणि सामाजिक सुरक्षा व्याप्तीच्या विस्तारात भारताच्या प्रगतीची रूपरेषा मांडली.
- डॉ. मांडवीय यांनी कतारमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला आणि भारत-कतार भागीदारीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून 8 लाखांहून अधिक संख्येने असलेल्या भारतीय समुदायाच्या प्रामाणिकपणा, कौशल्य आणि योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला.
* * *
सुषमा काणे/वासंती जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2187086)
Visitor Counter : 7