पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतल्या पहिल्या बोडोलँड महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचे मराठी भाषांतर

प्रविष्टि तिथि: 15 NOV 2024 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 नोव्‍हेंबर 2024

 

खुलुम्बई! (नमस्कार)

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमच्यासोबत असलेले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व प्रतिष्ठित पाहुणे, बंधू आणि भगिनींनो!

आज कार्तिक पौर्णिमेचा शुभ प्रसंग आहे आणि देव दिवाळी साजरी केली जात आहे. मी या सणानिमित्त देशातील प्रत्येकाला हार्दिक शुभेच्छा देतो. आज गुरु नानक देवजी यांचे 555 वे प्रकाश पर्व देखील आहे. या महत्त्वपूर्ण दिवशी मी संपूर्ण राष्ट्राला, विशेषतः जगभरातील आमच्या शीख बंधू-भगिनींना शुभेच्छा देतो. यासोबतच, संपूर्ण देश जनजातीय गौरव दिवस साजरा करत आहे. आज सकाळी, मी बिहारच्या जमुई येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती सोहळ्याला उपस्थित होतो आणि आता, या संध्याकाळी, आपण इथे पहिल्या बोडो महोत्सवाचे उद्घाटन करत आहोत. पहिल्या बोडोलँड महोत्सवात सहभागी होण्यासाठी आसामसह विविध राज्यांतून बोडो समाजातील लोक जमले आहेत. शांतता, संस्कृती आणि समृद्धीच्या नव्या युगाचा उत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेल्या सर्व बोडो मित्रांना मी हार्दिक शुभेच्छा देतो.

माझ्या मित्रांनो,

हा प्रसंग माझ्यासाठी किती भावनापूर्ण आहे याची तुम्हाला कल्पना येणार नाही. हे क्षण माझ्या भावनांना स्पर्श करतात, कारण जे लोक दिल्लीत बसून सिद्धांत मांडतात आणि वातानुकूलित खोल्यांमधून देशाच्या कथा सांगतात, त्यांना या प्रसंगाचे महत्त्व कदाचित समजणार नाही. पन्नास वर्षांचा रक्तपात, पन्नास वर्षांची हिंसा—तरुणांच्या तीन ते चार पिढ्या या अशांततेत हरवून गेल्या. इतक्या दशकांनंतर, बोडो समाज आज एक उत्सव साजरा करत आहे आणि 'रणचंडी' नृत्य पाहणे हा बोडो लोकांच्या चैतन्याचा पुरावा आहे. दिल्लीतल्या लोकांना या घटनांची खोली खरोखरच समजते की नाही, याबद्दल मी साशंक आहे. हे यश एका रात्रीत मिळालेले नाही; संयमाने, संघर्षाची प्रत्येक गाठ काळजीपूर्वक सोडवून ती सरळ करण्यात आली आहे. आज, तुम्ही सर्वांनी इतिहासाचा एक नवीन अध्याय लिहिण्यात योगदान दिले आहे.

माझ्या बोडो बंधू आणि भगिनींनो,

2020 मध्ये, बोडो शांतता करारानंतर, मला कोक्राझारला भेट देण्याचा बहुमान मिळाला होता. तुम्ही माझ्यावर जो स्नेह आणि प्रेमाचा वर्षाव केला, त्यामुळे मला मी खरोखरच तुमच्यापैकीच एक आहे असे वाटले. तो क्षण मी नेहमी जपून ठेवेन. अनेकदा, प्रसंग किंवा एखाद्या ठिकाणचे वातावरण आपल्यावर कायमस्वरूपी प्रभाव टाकते, पण मला इथे जो अनुभव आला तो वेगळा होता. चार वर्षांनंतरही, तेच प्रेम, तोच उत्साह, तोच स्नेह कायम आहे आणि ते हृदयाला किती खोलवर स्पर्श करते हे शब्दांत सांगणे कठीण आहे. त्या दिवशी, मी माझ्या बोडो बंधू-भगिनींना सांगितले होते की बोडोलँडमध्ये शांतता आणि समृद्धीची पहाट झाली आहे. ते पोकळ शब्द नव्हते. मी जे वातावरण पाहिले, तुम्ही हिंसा सोडून आणि शस्त्रे खाली ठेवून शांततेसाठी जी बांधिलकी दाखवली, ती अत्यंत हृदयस्पर्शी होती. त्याने माझ्या अंतर्मनाला स्पर्श केला, बोडोलँडमध्ये समृद्धीची पहाट खरोखरच झाली आहे अशी हमी दिली. आज तुमचा उत्साह आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की बोडो लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मजबूत पाया घातला गेला आहे.

गेल्या चार वर्षांत बोडोलँडमध्ये झालेली प्रगती खरोखरच उल्लेखनीय आहे. शांतता करारानंतर, या प्रदेशात विकासाची एक नवी लाट आली आहे. आज, जेव्हा मी बोडो शांतता कराराचे सकारात्मक परिणाम पाहतो आणि त्याने तुमचे जीवन कसे बदलले आहे हे पाहतो, तेव्हा मला अपार समाधान आणि आनंद मिळतो, तो शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. मित्रांनो, माझ्या मनाला किती आनंद होतो आहे याची तुम्हाला कल्पना येणार नाही. एका क्षणासाठी कल्पना करा, एक आई आणि तिचा एकुलता एक मुलगा. तिने मोठ्या प्रेमाने आपल्या मुलाला वाढवले आहे, पण तो, आपल्या मित्रांसोबत, शस्त्रे घेऊन जंगलात भटकत आहे, हिंसेच्या आणि आईपासून विभक्त होण्याच्या मार्गावर चालत आहे. ती आई असहाय्य होऊन दिवस काढते, तोपर्यंत एके दिवशी तिला कळते की तिचा मुलगा शस्त्रे टाकून घरी परतला आहे. त्या दिवशी त्या आईला जो प्रचंड आनंद होईल, त्याची कल्पना करा. गेल्या चार वर्षांपासून, मी तोच आनंद अनुभवत आहे. माझ्याच लोकांनी, माझ्या तरुण मित्रांनी, माझे आवाहन ऐकले, आपली शस्त्रे खाली ठेवली आणि आता ते माझ्यासोबत भारताचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी काम करत आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे, एक अशी घटना जी मला खोल समाधानाने भरून टाकते आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. शिवाय, बोडो शांतता कराराचे फायदे केवळ या प्रदेशापुरते मर्यादित नाहीत. या कराराने इतर अनेक करारांसाठी मार्ग मोकळा केला आहे. जर तो केवळ एक दस्तऐवज राहिला असता, तर कदाचित इतरांचा शांततेच्या शक्यतेवर विश्वास बसला नसता. पण तुम्ही ते शब्द जिवंत केले, त्यांना जमिनीवर प्रत्यक्षात आणले आणि लोकांची मने जिंकली. तुमच्या प्रयत्नांमुळे, तुमच्या पुढाकारामुळे, शांततेचे नवीन मार्ग खुले झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण ईशान्य भारतात आशेची ज्योत प्रज्वलित झाली आहे. तुम्ही खरोखरच जगासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे, माझ्या मित्रांनो.

मित्रांनो,

या करारांमुळे, केवळ आसामध्येच, मी हा आकडा पुन्हा सांगतो, ज्याबद्दल दिल्लीतील तथाकथित तज्ज्ञांना कदाचित माहिती नसेल, 10,000 हून अधिक तरुणांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत, ते हिंसेपासून दूर होऊन विकासाच्या मार्गावर आले आहेत. कार्बी आंग्लोंग करार, ब्रू-रियांग करार किंवा एनएलएफटी-त्रिपुरा करार कधी प्रत्यक्षात येईल अशी कोणी कल्पना केली होती का? तरीही, हे सर्व तुमच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे, माझ्या मित्रांनो. म्हणूनच, आज जेव्हा संपूर्ण देश जनजातीय गौरव दिवस साजरा करत आहे, आणि आपण भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करत आहोत, तेव्हा मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यासाठी इथे आलो आहे. मी धन्यवाद म्हणायला आलो आहे. मी तुमच्या कुटुंबीयांविषयी आदर व्यक्त करायला आलो आहे. जेव्हा आपण आपली स्वप्ने आपल्या डोळ्यांसमोर साकार होताना पाहतो, तेव्हा हृदय भावनांनी ओथंबून जाते आणि मी तुमचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. मी देशातील तरुणांना, विशेषतः जे अजूनही नक्षलवादाच्या मार्गावर आहेत, त्यांना आवाहन करतो की माझ्या बोडो मित्रांकडून शिका. बंदूक सोडा; हिंसा आणि शस्त्रांचा मार्ग कधीही खऱ्या परिणामांपर्यंत नेत नाही. बोडो समाजाने दाखवलेला मार्गच चिरस्थायी परिणाम देतो.

मित्रांनो,

मी तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्ही माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान केला आणि माझ्या शब्दांचा आदर केला. तुम्ही माझ्या शब्दांना इतकी शक्ती दिली आहे की ती पिढ्यानपिढ्या दगडावर कोरलेली एक चिरस्थायी वचनबद्धता बनली आहे. आमचे सरकार, आसाम सरकारसोबत, तुमच्या विकासासाठी अथक परिश्रम करत आहे.

मित्रांनो,

केंद्र आणि आसाम दोन्ही सरकारे बोडो प्रादेशिक क्षेत्रातील बोडो समाजाच्या गरजा आणि आकांक्षांना प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकारने बोडोलँडच्या विकासासाठी 1,500 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज दिले आहे. आसाम सरकारनेही विशेष विकास पॅकेज दिले आहे. बोडोलँडमधील शिक्षण, आरोग्य आणि संस्कृतीशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 700 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. ज्यांनी हिंसा सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्याबद्दल आम्ही पूर्ण संवेदनशीलतेने निर्णय घेतले आहेत. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या 4,000 हून अधिक माजी सदस्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे आणि अनेक तरुणांना आसाम पोलिसांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, आसाम सरकारने बोडो संघर्षाने प्रभावित प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, आसाम सरकार दरवर्षी बोडोलँडच्या विकासावर 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करत आहे.

मित्रांनो,

कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी, तरुण आणि महिलांना कौशल्य विकासाची आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुरेशी संधी मिळणे महत्त्वाचे आहे. हिंसा थांबल्यानंतर, बोडोलँडमध्ये विकासाचे "वटवृक्ष" लावणे आवश्यक होते. या दृष्टीकोनातून 'सीड' (SEED) मिशनचा पाया घातला गेला. सीड (SEED) मिशन, म्हणजेच कौशल्य, उद्योजकता आणि रोजगार विकास, याचा बोडो तरुणांना लक्षणीय फायदा होत आहे.

मित्रांनो,

 मला हे पाहून अत्यंत आनंद होत आहे की, एकेकाळी हातात बंदूक घेतलेले तरुण आता क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. कोक्राझारमध्ये ड्युरंड कपच्या दोन आवृत्त्या आयोजित करण्यात आल्या, त्यात बांगलादेश, नेपाळ आणि भूतानच्या संघांनी भाग घेतला, या ऐतिहासिक घटना आहेत. शांतता करारानंतर, गेल्या तीन वर्षांपासून कोक्राझारमध्ये बोडोलँड साहित्य महोत्सव होत आहे आणि यासाठी मी साहित्य परिषदेचा विशेष आभारी आहे. बोडो साहित्यासाठी हे एक मोठे योगदान आहे. आज बोडो साहित्य सभेचा 73 वा स्थापना दिवस देखील आहे.  हा बोडो साहित्य आणि भाषा साजरा करण्याचा दिवस आहे. उद्या, 16 नोव्हेंबर रोजी, एक सांस्कृतिक रॅली नियोजित आहे असे मला समजले आहे. त्यासाठीही मी माझ्या शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, जेव्हा दिल्लीतील लोक हे पाहतील, तेव्हा संपूर्ण देशाला ते पाहण्याची संधी मिळेल. तुम्ही दिल्लीत येऊन शांततेच्या संदेशाचा प्रसार करण्याचा सूज्ञ निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

मी नुकतेच इथल्या प्रदर्शनाला भेट दिली. तिथे बोडो कला आणि हस्तकलेची समृद्धी पूर्णपणे दिसून येत होती. अरोनई, दोखोना, गमसा, कराई-दाखिनी, थोरखा, जाऊ गिशी आणि खाम यांसारख्या अनेक पारंपारिक वस्तू इथे प्रदर्शित केल्या आहेत. या उत्पादनांना जीआय टॅग मिळाले आहेत, याचा अर्थ ते जगात कुठेही गेले तरी त्यांची ओळख नेहमीच बोडोलँड आणि बोडो संस्कृतीशी जोडलेली राहील. रेशीम उद्योग नेहमीच बोडो परंपरेचा अविभाज्य भाग राहिला आहे आणि म्हणूनच आमचे सरकार बोडोलँड रेशीम मिशन चालवत आहे. विणकाम हा प्रत्येक बोडो घरातला एक प्रिय रिवाज आहे आणि बोडोलँड हातमाग मिशन या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी काम करत आहे.

मित्रांनो,

आसाम हा भारताच्या पर्यटन क्षेत्राचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे आणि बोडोलँड या शक्तीचा एक आवश्यक भाग आहे. जर आसामच्या पर्यटनाच्या आकर्षणाचा गाभा कुठे असेल, तर तो बोडोलँडमध्ये आहे. एक काळ होता जेव्हा मानस राष्ट्रीय उद्यान, रायमोना राष्ट्रीय उद्यान आणि सिखना ज्वह्वलाओ राष्ट्रीय उद्यानाची घनदाट जंगले अवांछित कामांची ठिकाणे बनली होती. एकेकाळी लपण्यासाठी वापरली जाणारी ही जंगले आता आपल्या तरुणांच्या उच्च महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे मार्ग बनत आहेत हे पाहून मला आनंद होत आहे. बोडोलँडमधील पर्यटनाच्या वाढीमुळे इथल्या तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नवीन संधीही निर्माण होतील.

मित्रांनो,

आज आपण हा उत्सव साजरा करत असताना, बोडोफा उपेंद्र नाथ ब्रह्मा आणि गुरुदेव कालीचरण ब्रह्मा यांची आठवण होणे स्वाभाविक आहे. बोडोफा यांनी नेहमीच भारताची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आणि बोडो लोकांचे घटनात्मक हक्क मिळवण्यासाठी लोकशाही मार्गांचा पुरस्कार केला. गुरुदेव कालीचरण ब्रह्मा यांनी अहिंसा आणि अध्यात्म याद्वारे समाजाला एकत्र केले. आज, मला हे पाहून खोल समाधान वाटत आहे की बोडो माता आणि भगिनींच्या डोळ्यांत आता अश्रू नाहीत, तर उज्ज्वल भविष्याची स्वप्ने आहेत. प्रत्येक बोडो कुटुंब आपल्या समाजातील यशस्वी सदस्यांकडून प्रेरणा घेऊन आपल्या मुलांना एक चांगले भविष्य देण्याची आकांक्षा बाळगते. बोडो समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी देशाची प्रमुख पदांवर सेवा केली आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त हरीशंकर ब्रह्मा आणि मेघालयाचे माजी राज्यपाल रणजीत शेखर मुशाहारी यांसारख्या उल्लेखनीय व्यक्तींनी बोडो लोकांचा सन्मान वाढवला आहे. मला आनंद आहे की बोडोलँडचे तरुण आता यशस्वी करिअरची स्वप्ने पाहत आहेत. या सर्वांमध्ये, आमचे सरकार—मग ते केंद्रात असो किंवा राज्यात—प्रत्येक बोडो कुटुंबासोबत एक साथीदार म्हणून उभे आहे.

मित्रांनो,

माझ्यासाठी, आसामसह संपूर्ण ईशान्य भारत ही भारताची अष्टलक्ष्मी आहे. आता, विकासाची पहाट पूर्वेकडून, पूर्व भारतातून उगवेल, ती आमच्या विकसित भारताच्या दृष्टीकोनाला नवी ऊर्जा देईल. म्हणूनच आम्ही ईशान्य भारतात चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक परिश्रम करत आहोत आणि आम्ही ईशान्येकडच्या राज्यांमधल्या सीमावादांवर सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्यासाठी सक्रीय प्रयत्न करत आहोत.

मित्रांनो,

गेल्या दशकात, आसाम आणि ईशान्येच्या विकासाच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे. भाजप-एनडीए सरकारच्या धोरणांमुळे गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यापैकी, आसाममधील असंख्य व्यक्तींनी गरिबीशी लढा दिला आणि त्यावर विजय मिळवला आहे. भाजप-एनडीए सरकारच्या काळात, आसाम विकासाचे नवे टप्पे गाठत आहे. आम्ही पायाभूत आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला आहे. गेल्या दीड वर्षात, आसामला चार मोठी रुग्णालये भेट म्हणून मिळाली आहेत. गुवाहाटी एम्स आणि कोक्राझार, नलबारी आणि नागाव येथील वैद्यकीय महाविद्यालयांसारख्या सुविधांमुळे अनेकांसाठी आरोग्यसेवा सोपी झाली आहे. आसाममध्ये कर्करोग रुग्णालय सुरू झाल्याने संपूर्ण ईशान्य भारतातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2014 पूर्वी आसाममध्ये फक्त सहा वैद्यकीय महाविद्यालये होती. आज, ती संख्या दुप्पट होऊन 12 झाली आहे आणि आणखी 12 वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची योजना आहे. आसाममधील या वाढत्या वैद्यकीय संस्था आता आपल्या तरुणांसाठी संधीचे नवीन दरवाजे उघडत आहेत.

मित्रांनो,

बोडो शांतता कराराने दाखवलेला मार्ग संपूर्ण ईशान्येच्या समृद्धीकडे जातो. मी बोडोलँडला शतकानुशतके जुन्या असलेल्या संस्कृतीचा खजिना मानतो. आपण या समृद्ध संस्कृती आणि बोडो परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा, मी तुम्हा सर्वांना आनंदी बोडोलँड महोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना इथे मोठ्या संख्येने जमलेले पाहून आणि दिल्लीत तुमचे स्वागत करण्याचा बहुमान मिळाल्यामुळे मला अपार आनंद होत आहे आणि मी तुम्हा सर्वांचे खुल्या दिलाने स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही मला जो स्नेह आणि प्रेम दाखवले आहे, जे प्रेम दिले आहे आणि तुमच्या डोळ्यांत जी स्वप्ने मी पाहतो—माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करेन.

मित्रांनो,

माझ्या समर्पणाचे सर्वात मोठे कारण हे आहे की, तुम्ही माझे मन जिंकले आहे. म्हणूनच मी नेहमी तुमचाच आहे, तुम्हाला समर्पित आहे आणि तुमच्याकडूनच प्रेरणा घेत आहे. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद!

आता, तुमच्या पूर्ण शक्तीने, माझ्यासोबत म्हणा— भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद!

 

* * *

आशिष सांगळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2185933) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam