पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले


स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी 550 हून अधिक संस्थानांना एकत्र आणण्याचे अशक्य वाटणारे काम पूर्ण केले. त्यांच्यासाठी 'एक भारत, श्रेष्ठ भारत' हा दृष्टीकोन सर्वोच्च स्थानी होता: पंतप्रधान

आपल्या देशाच्या एकात्मतेला दुर्बल करणारा प्रत्येक विचार किंवा कृती प्रत्येक नागरिकाने टाळली पाहिजे, हीच आजच्या काळात आपल्या देशाची गरज असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

हा लोहपुरुष सरदार पटेल यांचा भारत असून तो आपल्या सुरक्षेशी आणि स्वाभिमानाशी कदापि तडजोड करणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

2014 सालापासून आमच्या सरकारने नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादावर निर्णायक आणि शक्तिशाली प्रहार केला आहे: पंतप्रधान

राष्ट्रीय एकता दिनी भारतात राहणाऱ्या प्रत्येक घुसखोराला बाहेर काढण्याचा आमचा संकल्प आहे: पंतप्रधान

देश आज वसाहतवादी मानसिकतेची प्रत्येक खूण पुसून टाकत आहे: पंतप्रधान

देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा सन्मान करून आम्ही 'राष्ट्र प्रथम' ही भावना अधिक बळकट करत आहोत: पंतप्रधान

विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी, आपण देशाच्या एकात्मतेचा भंग करणारा प्रत्येक प्रयत्न उधळून लावायला हवा -पंतप्रधान

सांस्कृतिक एकता, भाषिक एकता, समावेशक विकास आणि संपर्काच्या माध्यमातून हृदयाशी नाते जोडणे हे भारताच्या एकतेचे चार आधारस्तंभ आहेत: पंतप्रधान

भारतमातेप्रति समर्पण ही प्रत्येक भारतीयासाठी सर्वोच्च उपासना आहे: पंतप्रधान

Posted On: 31 OCT 2025 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. सरदार पटेल यांची 150 वी जयंती हा ऐतिहासिक सोहळा असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. एकता नगरमधील सकाळ दिव्य असून इथले विहंगम दृश्य विस्मयकारक असल्याचे सांगून मोदी यांनी सरदार पटेल यांच्या चरणी सामूहिक उपस्थिती असल्याचा उल्लेख केला आणि देश आज एका महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होत असल्याचे सांगितले. त्यांनी देशव्यापी एकता दौड आणि कोट्यवधी भारतीयांच्या उत्साहपूर्ण सहभागाचा उल्लेख केला, आणि नव्या भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकारत असल्याचे अधोरेखित केले. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांचा आणि आदल्या संध्याकाळी झालेल्या उल्लेखनीय सादरीकरणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की यामधून भूतकाळातील परंपरा, वर्तमानातील श्रम आणि शौर्य तसेच भविष्यातील कामगिरीची झलक प्रतिबिंबित होत आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीच्या स्मृती प्रीत्यर्थ एक नाणे आणि विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशातील सर्व 140 कोटी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरदार पटेल यांचा असा विश्वास होता की इतिहास लिहिण्यात वेळ वाया घालवू नये, त्याऐवजी इतिहास घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरदार पटेल यांच्या जीवनकथेतून याची  खात्री पटते  यावर त्यांनी भर दिला. सरदार पटेल यांच्या जीवनगाथेत हा विश्वास प्रकर्षाने दिसून येत असल्याचे नमूद करून, सरदार पटेल यांनी आखलेली धोरणे आणि निर्णयांनी इतिहासात एक नवा अध्याय रचल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी 550 हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण करण्याचे अशक्य वाटणारे काम पूर्ण केले, असे नमूद करून, ते म्हणाले की, सरदार पटेल यांच्यासाठी 'एक भारत, श्रेष्ठ भारत' हा दृष्टीकोन सर्वोच्च स्थानी होता. त्यामुळेच स्वाभाविकपणे सरदार पटेल यांची जयंती हा राष्ट्रीय एकात्मतेचा एक भव्य उत्सव बनल्याचे मोदी यांनी नमूद केले. ज्याप्रमाणे 140 कोटी भारतीय 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतात, तेच महत्व आता एकता दिनाला प्राप्त झाले आहे. आज कोट्यवधी नागरिकांनी  एकतेची शपथ घेतली, आणि देशाची एकता बळकट करणाऱ्या कृतीला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, एकता नगरमध्येच, एकता मॉल आणि एकता गार्डन हे एकतेचा धागा मजबूत करणारे प्रतीक म्हणून उभे आहेत.

“देशाची एकता कमकुवत करणारी प्रत्येक कृती प्रत्येक नागरिकाने टाळली पाहिजे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ही काळाची गरज असून, प्रत्येक भारतीयासाठी एकता दिनाचा हाच मुख्य संदेश आहे, यावर त्यांनी भर दिला. सरदार पटेल यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला सर्वोच्च स्थान दिले, यावर त्यांनी भर दिला. तथापि, सरदार पटेल यांच्या निधनानंतरच्या काळात, लागोपाठ आलेल्या सरकारांनी राष्ट्रीय सार्वभौमत्वाबाबत तेवढे गांभीर्य दाखवले नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. काश्मीरमध्ये झालेल्या चुका, ईशान्येकडील आव्हाने आणि देशभरात नक्षलवादी-माओवादी दहशतवादाचा प्रसार, हा भारताच्या सार्वभौमत्वाला थेट धोका असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सरदार पटेल यांच्या धोरणांचे पालन करण्याऐवजी, त्या काळातील सरकारांनी कणाहीन दृष्टिकोन स्वीकारला, ज्याचे परिणाम हिंसाचार आणि रक्तपाताच्या स्वरूपात देशाला भोगावे लागले, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.

सरदार पटेल यांनी जशी इतर अनेक संस्थाने यशस्वीपणे भारतात सामावून घेतली तशाच पद्धतीने काश्मीरचे देखील भारतात संपूर्ण विलीनीकरण करण्याची पटेल यांची इच्छा होती हे आजच्या तरुण पिढीला कदाचित माहित नसेल याकडे लक्ष वेधत पंतप्रधान मोदी म्हणाले की असे असले तरीही तत्कालीन पंतप्रधानांनी सरदार पटेल यांची ही इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. एका स्वतंत्र संविधानासह आणि एका स्वतंत्र राजमुद्रेसह काश्मीरला वेगळे करण्यात आले याकडे मोदी यांनी निर्देश केला. ते म्हणाले की त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाने काश्मीरबाबत केलेल्या चुकीमुळे देशाला अनेक दशके अशांततेच्या गर्तेत ढकलले. त्यांच्या कमकुवत धोरणांमुळे, काश्मीरच्या एका भागावर पाकिस्तानने बेकायदेशीर कब्जा केला आणि याच पाकिस्तानने दहशतवादाला आणखीन प्रोत्साहन दिले. काश्मीरने आणि संपूर्ण देशाने या चुकीच्या पावलांची फार मोठी किंमत चुकवली आहे. ते पुढे म्हणाले की, तरीही तेव्हाच्या सरकारने दहशतवादासमोर गुडघे  टेकणे सुरूच ठेवले.

सध्याच्या विरोधी पक्षाला सरदार पटेल यांच्या विचारांचे विस्मरण झाले आहे अशी टीका करत पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या पक्षाने मात्र असे केलेले नाही. वर्ष 2014 नंतर, देशाने पुन्हा एकदा सरदार पटेलांकडून प्रेरित पोलादी निर्धार पाहिला यावर त्यांनी अधिक भर दिला. आजच्या घडीला काश्मीर कलम 370 च्या साखळदंडातून मुक्त झाले आहे आणि संपूर्णपणे देशाच्या मुख्य प्रवाहात सामावले आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पाकिस्तान आणि दहशतवादाच्या सूत्रधारांनाही आता भारताची खरी ताकद समजली आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, जर भारताला कोणी आव्हान देण्याचे धाडस केले तर आपला देश शत्रूच्या हद्दीत शिरुन हल्ले करत त्याला कसे चोख प्रत्युत्तर देतो हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. भारताचे प्रत्युत्तर हे नेहमीच मजबूत आणि निर्णायक असते याला त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की, हा, भारताच्या शत्रुंसाठीचा संदेश आहे – “हा सरदार पटेल या पोलादी पुरुषाचा भारत आहे, आणि तो कधीच स्वतःची सुरक्षा आणि सन्मानाशी तडजोड करत नाही.”

“राष्ट्रीय सुरक्षेच्या  क्षेत्रात, भारताने गेल्या अकरा वर्षांत मिळवलेल्या प्रचंड यशामुळे नक्षल-माओवादी दहशतवादाचा कणा मोडला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान उपस्थितांना आठवण करून देत म्हणाले. 2014 पूर्वी अशी परिस्थिती होती की, नक्षल-माओवादी गट देशाच्या मध्यभागातून स्वतःची सत्ता चालवत होते आणि त्या भागात पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा देखील काम करण्यात असमर्थ ठरल्या होत्या. नक्षल्यांनी उघडपणे हुकुम जारी केले, रस्त्यांचे बांधकाम बंद पाडले, शाळा-महाविद्यालये तसेच रुग्णालये बंद पाडली आणि अशा परिस्थितीत प्रशासन त्यांच्यासमोर हतबल झाले हे मोदी यांनी अधोरेखित केले.

शहरी भागात राहून नक्षल्यांना समर्थन देणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांना देखील अलगद बाजूला काढण्यात आले यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले, “2014 नंतर, आपल्या सरकारने नक्षल-माओवादी दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढा सुरु केला.” या बाबतीत वैचारिक लढाई जिंकली आणि नक्षल्यांच्या बालेकिल्यांवर थेट हल्ले सुरु झाले हे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की या सगळ्याचे परिणाम आता संपूर्ण देशाला दिसत आहेत. पंतप्रधान म्हणाले की 2014 पूर्वी देशातील तब्बल 125 जिल्हे माओवादी  दहशतवादाने ग्रस्त होते, आज ही संख्या कमी होऊन केवळ 11 उरली आहे आणि त्यापैकी फक्त 3 जिल्ह्यांमध्ये गंभीर दहशतवादी प्रभाव दिसून येत आहे. एकता नगरच्या भूमीवरून, सरदार पटेल यांच्या पुतळारुपी उपस्थितीत पंतप्रधानांनी देशाला अशी ग्वाही दिली की भारत नक्षल-माओवादी धोक्यांपासून संपूर्णपणे मुक्त होईपर्यंत सरकार शांत बसणार नाही.

आज देशाचे ऐक्य आणि अंतर्गत सुरक्षिततेला घुसखोरांपासून गंभीर धोका आहे हे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की गेल्या अनेक दशकांमध्ये परदेशी घुसखोरांनी देशात शिरुन, आपल्या नागरिकांच्या हक्काची असलेली साधनसंपत्ती हस्तगत केली, लोकसंख्याविषयक समतोल बिघडवला आणि राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणली. या गंभीर विषयाकडे डोळेझाक केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आधीच्या सरकारांवर ताशेरे ओढले आणि मतपेढीच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षिततेशी तडजोड केल्याचा आरोप त्यांच्यावर केला. देशाने प्रथमच या मोठ्या धोक्याशी निर्णायक पद्धतीने लढण्याचा निर्धार केला आहे याला त्यांनी दुजोरा दिला. या आव्हानाचा सामना करण्यासाठी लाल किल्ल्यावरून लोकसंख्या अभियानाची घोषणा केल्याची आठवण मोदी यांनी सर्वांना करून दिली. आजही जेव्हा हा मुद्दा गंभीरपणे मांडला जात आहे तेव्हा काही व्यक्ती देश कल्याणापेक्षा वैयक्तिक स्वारस्याला प्राधान्य देत आहेत याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की हे लोक घुसखोरांना अधिकार मिळवून देण्यासाठी राजकीय लढाई करत आहेत आणि राष्ट्रीय विघटनाच्या परिणामांबद्दल उदासीन आहेत. जर देशाची सुरक्षितता आणि ओळख धोक्यात आली तर प्रत्येक नागरिकाला धोका निर्माण होईल असा इशारा त्यांनी दिला. म्हणूनच राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त, भारतात राहणाऱ्या प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर हाकलून देण्याचा निर्धार पुन्हा एकदा नव्याने व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशाला केले.

लोकशाहीमध्ये राष्ट्रीय एकतेचा अर्थ विचारांच्या विविधतेचा आदर करणे हे देखील असल्याचे अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी यांनी यावर भर दिला की लोकशाहीमध्ये मतभेद स्वीकार्य असले तरी वैयक्तिक वैरभाव असू नये. स्वातंत्र्यानंतर, राष्ट्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती त्यांनीच 'आपण सर्वजण' या भावनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. भिन्न विचारसरणी असलेल्या व्यक्ती आणि संघटनांना बदनाम केले गेले आणि राजकीय अस्पृश्यतेला संस्थात्मक रूप देण्यात आले, असे त्यांनी नमूद केले. पूर्वीच्या सरकारांनी सरदार पटेल आणि त्यांच्या वारशाच्या बाबतीत जे अन्यायकारी वर्तन केले, तसेच वर्तन त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत केले आणि त्यांच्या निधनानंतरही त्यांना दुर्लक्षित केले याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. पूर्वीच्या सरकारांनी डॉ. राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांसारख्या नेत्यांबद्दलही असाच दृष्टिकोन स्वीकारला, असे पंतप्रधान म्हणाले. या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षे पूर्ण होत आहेत हे नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी संघाला तोंड द्यावे लागलेल्या विविध हल्ल्यांवर आणि कटकारस्थानांवर प्रकाश टाकला. एका पक्ष आणि एक कुटुंबाच्या बाहेर प्रत्येक व्यक्ती आणि विचारांना जाणीवपूर्वक वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात होता, असेही ते म्हणाले.

देशाचे विभाजन करणाऱ्या राजकीय अस्पृश्यतेचा अंत झाल्याबद्दल देशाला अभिमान आहे हे अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी सरदार पटेल यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित ‘पंचतीर्थ’च्या स्थापनेचा उल्लेख केला. पूर्वीच्या सरकारच्या काळात बाबासाहेबांचे दिल्लीतील निवासस्थान आणि महापरिनिर्वाण स्थळ दुर्लक्षित राहिले होते, परंतु आता त्याचे रूपांतर एका ऐतिहासिक स्मारकात झाले आहे, याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. पूर्वीच्या सरकारच्या काळात केवळ एकाच माजी पंतप्रधानांना समर्पित संग्रहालय होते. याउलट, आमच्या सरकारने सर्व माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ‘प्रधानमंत्री संग्रहालय’ उभारले आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात आला होता आणि सध्याच्या विरोधी पक्षात संपूर्ण आयुष्य घालवणारे प्रणव मुखर्जी यांनाही भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते, तसेच मुलायम सिंह यादव यांच्यासारख्या विरोधी विचारसरणीच्या नेत्यांनाही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, असे पंतप्रधानांनी सांगितले. या सर्व निर्णयांचा हेतू राजकीय मतभेदाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकतीची भावना दूर करणे, हा असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूर नंतर परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बहुपक्षीय शिष्टमंडळातही हा समावेशक दृष्टिकोन दिसून आला, असे त्यांनी सांगितले.

"राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय एकतेवर हल्ला करण्याची मानसिकता ही वसाहतवादी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे", असे नमूद करून पंतप्रधानांनी सांगितले की, सध्याच्या विरोधी पक्षाला केवळ ब्रिटिशांकडून सत्ता आणि पक्षरचनेचा वारसा मिळाला  नाही तर त्यांनी ब्रिटिशांची अधीनतेची मानसिकता देखील आत्मसात केली आहे. काही दिवसांनी राष्ट्र ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताची 150 वर्षे साजरी करेल, याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, 1905 मध्ये, जेव्हा ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली, तेव्हा वंदे मातरम प्रत्येक भारतीयासाठी प्रतिकाराचा सामूहिक आवाज आणि एकता आणि अखंडतेचे प्रतीक बनले. ब्रिटिशांनी वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो अयशस्वी झाला. परंतु, ब्रिटिश जे करू शकले नाहीत ते पूर्वीच्या सरकारने केले, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वीच्या सरकारने धार्मिक कारणावरून वंदे मातरम् चा एक भाग काढून टाकला, आणि समाजात फूट पाडत वसाहतवादी अजेंडा पुढे रेटला. ज्या दिवशी सध्याच्या विरोधी पक्षाने वंदे मातरम् चे तुकडे करण्याचा आणि काटछाट करण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी भारताच्या फाळणीचा पाया रचला गेला, असे वक्तव्य पंतप्रधानांनी पूर्ण  जबाबदारीने केले. जर पूर्वीच्या सरकारने ती गंभीर चूक केली नसती तर आज भारताची प्रतिमा खूप वेगळी असली असती, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

त्या वेळी सत्तेत असलेल्यांच्या मानसिकतेमुळे, देश अनेक दशके वसाहतवादी प्रतीके बाळगत राहिला, असे पंतप्रधान म्हणाले. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरच भारतीय नौदलाच्या ध्वजावरून वसाहतवादी राजवटीचे प्रतीक काढून टाकण्यात आले, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. या परिवर्तनाचा एक भाग म्हणून राजपथचे नाव कर्तव्य पथ असे ठेवण्यात आले. अंदमानमधील सेल्युलर जेल, ज्याने स्वातंत्र्यलढ्याच्या काळात असंख्य बलिदाने पाहिली, त्याला मोरारजी देसाई यांच्या सरकारच्या काळातच राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला होता, याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. अलिकडच्या काळापर्यंत अंदमानमधील अनेक बेटांना ब्रिटिश व्यक्तींची नावे होती, हे देखील पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.

या बेटांना आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ नवे नाव देण्यात आले आहे. तसेच काही बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली  असून, नवी दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे.

वसाहतवादी मानसिकतेमुळे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांना योग्य सन्मान न दिल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी सांगितले की, राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या स्थापनेमुळे हुतात्म्यांच्या स्मृती अजरामर झाल्या आहेत. पोलिस, सीमा सुरक्षा दल, आयटीबीपी, सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दलांसह सुमारे 36 हजार सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे, पण त्यांच्या शौर्याला दीर्घकाळ योग्य सन्मान मिळाला नव्हता असे त्यांनी सांगितले. या हुतात्म्यांचा सन्मान करण्यासाठीच शासनाने पोलिस स्मारक उभारले आहे, असे मोदी यांनी सांगितले. देश आता वसाहतवादी मानसिकतेतून आलेली सर्व प्रतीके दूर करत आहे आणि राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्यांचा सन्मान करून ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेला अधिक बळ देत आहे. राष्ट्राच्या व समाजाच्या अस्तित्वाचा पाया म्हणजे एकता असल्याचे प्रतिपादन करत पंतप्रधान म्हणाले की, समाजात जोपर्यंत एकता टिकून आहे, तोपर्यंत राष्ट्राची अखंडता सुरक्षित राहील. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय एकतेला तडा देणाऱ्या प्रत्येक कट-कारस्थानाचा पराभव करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. देश राष्ट्रीय एकतेच्या प्रत्येक टप्प्यावर सक्रियपणे कार्यरत आहे, असे त्यांनी नमूद केले.

भारतातील एकतेचे चार आधारस्तंभ सांगताना पंतप्रधानांनी पहिला स्तंभ म्हणून सांस्कृतिक एकतेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की भारतीय संस्कृतीने देशाला हजारो वर्षांपासून राजकीय परिस्थितीपासून स्वतंत्र , एकसंध ठेवले आहे. त्यांनी बारा ज्योतिर्लिंग, सात पवित्र नगरे, चार धाम, पन्नासपेक्षा अधिक शक्तिपीठे आणि तीर्थयात्रेची परंपरा या सर्वांचा उल्लेख करत सांगितले की, हेच ते शक्तिस्रोत आहेत, ज्यामुळे भारत चिरंतर आणि जागृत राष्ट्र आहे. सौराष्ट्र-तमिळ संगम आणि काशी-तमिळ संगम यांसारख्या उपक्रमांमधून ही परंपरा पुढे नेली जात आहे, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनाद्वारे भारताचे गूढ योगविज्ञान जगभर नवी ओळख मिळवत आहे आणि योग लोकांना जोडणारे माध्यम बनले आहे. भाषिक एकता या भारताच्या दुसऱ्या स्तंभाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, भारतातील शेकडो भाषा व बोली या राष्ट्राच्या मुक्त आणि सृजनशील विचारसरणीची प्रतीके आहेत. भारतात कधीही कोणत्याही समाजाने किंवा गटाने भाषेला हत्यार बनवले नाही किंवा इतरांवर एका भाषेचे वर्चस्व थोपवण्याचा प्रयत्न केला नाही, असे त्यांनी सांगितले. म्हणूनच भारत भाषिक वैविध्याच्या दृष्टीने सर्वात समृद्ध देश ठरला आहे. पंतप्रधानांनी भारतातील भाषांची तुलना संगीताच्या स्वरांशी केली आणि सांगितले की, प्रत्येक स्वर भारताच्या अस्मितेला  बळ देतो. प्रत्येक भारतीय भाषा राष्ट्रीय भाषाच मानली जाते, असे त्यांनी सांगितले. भारतात जगातील एक प्राचीन भाषा तमिळ आणि ज्ञानाचा खजिना असलेली संस्कृत यांचा वारसा आहे, याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त  केला. प्रत्येक भाषेतील अद्वितीय साहित्यिक आणि सांस्कृतिक संपदेचे  त्यांनी कौतुक केले आणि सरकार सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. भारतातील मुलांनी आपल्या मातृभाषेत शिक्षण घेऊन प्रगती करावी आणि इतर भारतीय भाषा शिकाव्यात, त्यांचा सन्मान करावा , अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. भाषांमधून एकतेची विण तयार व्हावी आणि हे कार्य एकदिवसीय नसून सामूहिक जबाबदारीची दीर्घकालीन प्रक्रिया आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

भारताच्या एकतेचा तिसरा स्तंभ म्हणजे भेदभावमुक्त विकास असल्याचे सांगून ते म्हणाले की, गरीबी आणि विषमता या समाजाच्या रचनेतील सर्वात मोठ्या दुबळ्या बाजू आहेत, ज्यांचा राष्ट्र विरोधकांनी वारंवार गैरफायदा घेतला आहे. सरदार पटेल यांनी गरीबीविरुद्ध लढण्यासाठी दीर्घकालीन योजना आखण्याचे स्वप्न पाहिले होते, याचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. भारताला जर 1947 च्या दहा वर्षे आधी स्वातंत्र्य मिळाले असते, तर अन्नटंचाईचे संकट आपण त्या काळातच दूर केले असते. त्यांनी जसे संस्थानांचे एकत्रीकरण करून गंभीर समस्या सोडवली, तसेच निर्धाराने त्यांनी अन्नसंकटालाही पराभूत केले असते, असे मोदी म्हणाले. तसाच निर्धार आजच्या मोठ्या आव्हानांसमोरही आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. गेल्या दशकात सरकारने सरदार पटेल यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी काम केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 25 कोटी नागरिकांना गरीबीतून  बाहेर काढल असून, लाखो गरीब कुटुंबांना घरे मिळाली आहेत, प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचत आहे, आणि मोफत आरोग्यसेवा पुरवली जात आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता यावे, हे राष्ट्राचे ध्येय आणि दृष्टिकोन आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भेदभाव आणि भ्रष्टाचारमुक्त धोरणांमुळे राष्ट्रीय एकता अधिक दृढ होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

देशभरात विक्रमी संख्येने महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग बांधले जात आहेत, असे सांगत मोदी यांनी अधोरेखित केले की राष्ट्रीय एकात्मकतेचा चौथा स्तंभ कनेक्टिव्हीटीद्वारे मने जोडण्याचे कार्य करतो. वंदे भारत आणि नमो भारत यासारख्या रेल्वे गाड्या भारतीय रेल्वेचे परीवर्तन घडवून आणत आहेत.आता लहान शहरांनाही विमानतळ सुविधा उपलब्ध होत आहेत,असे त्यांनी नमूद केले. या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे केवळ भारताबद्दल जगाचा दृष्टिकोन बदलला इतकेच नव्हे ; तर उत्तर आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम यांच्यातील अंतर देखील कमी झाले आहे,यावर पंतप्रधानांनी यावर भर दिला.लोक आता पर्यटन आणि व्यवसायासाठी सहजपणे विविध राज्यांमध्ये प्रवास करू शकत आहेत,त्यामुळे लोकांमधील संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे एक नवे युग सुरू झाले आहे, जे राष्ट्रीय अखंडतेला मजबूत करत आहे,असे त्यांनी सांगितले. डिजिटल कनेक्टिव्हिटी लोकांमधील संबंधांना आणखी मजबूत करत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

देशाची सेवा करण्यात सर्वात मोठा आनंद मिळतो, या सरदार पटेल यांच्या विधानाचे स्मरण करून पंतप्रधानांनी हीच भावना अधोरेखित केली आणि प्रत्येक नागरिकाला त्याच भावनेचा अवलंब  करण्याचे आवाहन केले. देशासाठी कार्य करण्याव्यतिरीक्त दुसरा मोठा आनंद  कोणताही नाही आणि भारतमातेची भक्ती ही प्रत्येक भारतीयाची सर्वोच्च उपासना आहे यावर त्यांनी भर दिला.

जेव्हा 140 कोटी भारतीय एकत्रितपणे उभे राहतात, तेव्हा पर्वतही बाजूला होऊन वाट देतात, जेव्हा ते एकमुखाने बोलतात तेव्हा त्यांचे शब्द भारताच्या यशाचा उद्घोष होतात,असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले. त्यांनी राष्ट्राला एकतेचा दृढ संकल्प स्वीकारत, अविभाज्य आणि अढळ राहण्याचे आवाहन केले. हीच सरदार पटेलांना खरी श्रद्धांजली आहे असे त्यांनी अधोरेखित केले.

देश  एकत्रित होऊन, 'एक भारत, श्रेष्ठ भारत' चा संकल्प बळकट करेल आणि विकसित आणि स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करेल, या भावनेने त्यांनी पुन्हा एकदा सरदार पटेल यांच्या चरणी आदरांजली वाहून आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय एकता दिवस समारंभात पंतप्रधानांनी सहभाग घेतला आणि उपस्थितांना संबोधित केले; तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण केली. त्यांनी सर्वांना एकता दिनाची  शपथ  दिली आणि एकता दिनाचा संचलन सोहळा  पाहिला.

यावेळी झालेल्या संचलनात बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबीच्या तुकड्यांसह विविध राज्य पोलिस दलांचा समावेश होता. या वर्षीच्या प्रमुख आकर्षणांमध्ये रामपूर हाउंड्स आणि मुधोल हाउंड्स सारख्या भारतीय जातीच्या कुत्र्यांचा समावेश असलेली  बीएसएफचा मार्चिंग तुकडी, गुजरात पोलिसांचे घोडदळ, आसाम पोलिसांचा मोटरसायकल डेअरडेव्हिल शो आणि बीएसएफचा उंटदळ  आणि उंटावरून वाजतगाजत जाणारा (कॅमल माउंटेड) बँड यांचा समावेश होता.

या संचलनादरम्यान सीआरपीएफच्या पाच शौर्य चक्र विजेत्यांचा आणि झारखंडमधील नक्षलविरोधी कारवायांमध्ये तसेच जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये असाधारण धैर्य दाखवणाऱ्या बीएसएफच्या सोळा शौर्य पदक विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर मधील बीएसएफच्या जवानांना त्यांच्या शौर्याबद्दल देखील गौरवण्यात आले.

या वर्षीच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या संचलनात 'विविधतेतून एकता' या  संकल्पनेवर आधारित एनएसजी, एनडीआरएफ, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार बेटे, मणिपूर, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी येथील दहा चित्ररथांचा समावेश होता. 900 कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय संस्कृतीची समृद्धता आणि विविधता दर्शविणारी भारतातील शास्त्रीय नृत्ये सादर करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती देशभरात साजरी होत असल्याने यावर्षी राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्याला विशेष महत्त्व आहे.

तसेच पंतप्रधानांनी आरंभ 7.0 च्या शंभराव्या मूलभूत  अभ्यासक्रमाच्या समारोपप्रसंगी अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. आरंभची सातवी आवृत्ती "प्रशासनाची पुनर्रचना" या संकल्पनेवर  आयोजित केली जात आहे. या शंभराव्या मूलभूत अभ्यासक्रमामध्ये भारताच्या 16 नागरी सेवा आणि भूतानच्या 3 नागरी सेवांमधील 660 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.

 

* * *

सुषमा काणे/राजश्री आगाशे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184645) Visitor Counter : 18