पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पणाच्या प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 13 NOV 2024 1:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 नोव्‍हेंबर 2024

 

भारत माता की जय।

भारत माता की जय।

राजा जनक, सीतामाई, कविराज विद्यापती यांच्या पदस्पर्शाने पावन या मिथिला भूमीला मी नमन करतो. ज्ञान, धान, पान, मखान यासाठी प्रसिद्ध या समृद्ध गौरवशाली धरतीवर मी आपण सर्वांचे अभिनंदन  करत आहे.

बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी जी, दरभंगाचे खासदार भाई गोपाळजी ठाकूर, इतर सर्व खासदार व आमदार, इतर मान्यवर, मिथीलानिवासी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण सर्वांना माझा नमस्कार. 

मित्रांनो, 

आज शेजारी राज्य झारखंड मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. विकसित झारखंडचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झारखंडची  जनता मतदान करत आहे. त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन मी झारखंडच्या जनतेला करत आहे. 

मित्रांनो,

मिथिलेची लेक आणि स्वरकोकिळा शारदा सिन्हाजी यांनाही मी श्रद्धांजली अर्पित करतो आहे. शारदा सिन्हा यांनी भोजपुरी आणि मैथिली संगीताची केलेली सेवा अतुलनीय आहे. विशेषतः महापर्व छठपूजेच्या पर्वाचे महत्व त्यांनी आपल्या गीतांच्या द्वारे जगभर पोचवले, हे अद्भुत आहे. 

मित्रांनो, 

आज बिहारच्या बरोबरीने संपूर्ण देश विकासाची  मोठमोठी उद्दिष्टे पूर्ण होताना पाहत आहे. ज्या सोयीसुविधांची, प्रकल्पांची याआधी फक्त चर्चाच होत होती, आज ते सर्व प्रत्यक्षात उतरत आहेत. आपण विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. आपली पिढी याची साक्षीदार तर आहेच शिवाय  त्यांना पूर्ण करण्यासाठी आपण आपले योगदानही देत आहोत, हे आपले भाग्य आहे.  

मित्रांनो, 

आमचे सरकार देशसेवेसाठी, लोककल्याणासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. याच सेवाभावामुळे  इथे विकास घडवून आणणाऱ्या 12 हजार कोटी रुपयांच्या विविध  योजनाचे  एकाच कार्यक्रमात भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे.  यात रस्ते, रेल्वे आणि गॅस पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे दरभंगा मध्ये एम्स उभारणीचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे. दरभंगामध्ये एम्स सुरु झाल्यावर बिहारच्या आरोग्यसेवा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येईल. यामुळे मिथिला, कोसी, आणि तिरहूत भागासहित पश्चिम बंगाल आणि आसपासच्या मोठ्या भागात राहणाऱ्या लोकांची सोय होईल. नेपाळहून येणाऱ्या रुग्णांनाही या एम्स रुग्णालयात उपचार घेता येतील. एम्स मुळे या भागात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. मी दरभंगा, मिथिला, आणि संपूर्ण बिहारचे या विकासकामांसाठी खूप खूप अभिनंदन करतो आहे. 

मित्रांनो, 

आपल्या देशात सर्वात जास्त लोकसंख्या गरीब आणि मध्यमवर्गीयांची आहे. आणि याच वर्गातील जनता रोगांना सर्वात जास्त बळी पडते. यामुळे उपचारांवर त्यांचा खर्च देखील खूप जास्त असतो. आपण सर्वजण याच वर्गातून, गरीब किंवा सर्वसामान्य कुटुंबात मोठे झालो आहोत. त्यामुळे जर घरात कोणी गंभीररीत्या आजारी पडले तर पूर्ण घरावर संकटाची छाया कशी पडते हे आपल्याला चांगलेच माहिती आहे. पूर्वी याबाबतीत फारच वाईट परिस्थिती असे. रुग्णालयांची संख्या कमी होती, डॉक्टरांची संख्या कमी होती. औषधे महाग होती, रोगांसाठीच्या चाचण्या अनेक ठिकाणी उपलब्ध नव्हत्या. सर्वच सरकारे फक्त आश्वासने आणि आरोपांच्या जाळ्यात अडकलेली होती. इथे बिहारमध्ये नितीश कुमार सरकार येण्यापूर्वी गरिबांच्या या समस्येवर कोणीच गंभीरतेने विचार केला नव्हता. गप्प राहून आजारपण सहन करणे याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत आपला देश प्रगती कशी करेल? यासाठी जुनेपुराणे विचार आणि दृष्टिकोन दोन्हीमध्ये बदल घडवून आणला. 

मित्रांनो, 

आमचे सरकार देशातल्या आरोग्यसेवेसाठी  सर्वसमावेशक दृष्टिकोन घेऊन काम करत आहे. आमचे पहिले पाऊल, पहिला  भर- आजारी पडण्यापासून वाचणे याच्यावर आहे. दुसरा भर- रोगाचे योग्य निदान होण्यावर, तिसरा भर- जनतेला मोफत व स्वस्त उपचार मिळावा, स्वस्त औषधे मिळावी, चौथा भर- छोट्या शहरांमधूनही उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, देशातील डॉक्टरांची कमतरता भरून काढावी, आणि आमचा पाचवा भर- आरोग्यसेवांमध्ये तंत्रज्ञानाचा दर्जा सुधारणे.  

बंधुभगिनिंनो,

आपल्या घरात कोणीच आजारी पडू नये असेच सर्वांना वाटत असते. शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी लोक आता आयुर्वेद, पोषक आहार यांचे महत्व जाणू लागले आहेत. आम्ही ‘फिट इंडिया’ चळवळ सुरु केली आहे. बरेचदा रोगांच्या मुळाशी अस्वच्छता , दूषित अन्न, वाईट जीवनशैली असते. यासाठी स्वच्छ भारत अभियान, हर घर शौचालय, नल से जल , इत्यादी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमुळे शहरात स्वच्छता तर राखली जातेच शिवाय रोगराईचा फैलावही कमी होतो. मला आत्ताच कळले आहे, कि दरभंगामध्ये हा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या मुख्य सचिवांनी गेले तीन चार दिवस सफाई मोहिमेचे स्वतः नेतृत्व केले. मी त्यांचे, बिहार सरकारच्या सर्व कर्मचारी बंधूंचे आणि दरभंगाच्या नागरिकांचे या स्वच्छता मोहिमेला बळ दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो, आणि येत्या 5-7-10 दिवस हा  कार्यक्रम वेगाने राबवला जावा अशी इच्छा व्यक्त करतो. 

मित्रांनो, 

बहुतेक रोगांचा उपचार वेळेवर सुरु झाला तर ते विकोपाला जात नाहीत. परंतु रोगनिदानासाठीच्या चाचण्या महाग असल्याने लोक त्या करत नाहीत आणि त्यामुळे निदान होत नाही. यासाठी आम्ही देशभरात दीड लाखाहून जास्त आयुष्मान आरोग्य मंदिरे उभारली आहेत. यांच्या माध्यमातून कँसर डायबिटीस सारख्या अनेक रोगांची निदाने सुरुवातीलाच होऊ शकतात.   

मित्रांनो, 

आयुष्मान भारत योजनेत आतापर्यंत देशातल्या ४ कोटींहून अधिक गरीब रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. जर आयुष्मान भारत योजना नसती तर यातील अनेक जण  रुग्णालयांपर्यंत पोचूच शकले नसते. एनडीए सरकारमुळे यांच्या आयुष्यातील मोठी चिंता दूर झाल्याचा मला आनंद वाटतो. आणि या गरीब रुग्णांवर सरकारी रुग्णालयातच नव्हे तर खाजगी रुग्णालयातही उपचार झाले आहेत. आयुष्मान योजनेमुळे कोट्यवधी कुटुंबांची  अंदाजे सव्वा लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. हे सव्वा लाख कोटी रुपये सरकारने जर देण्याची घोषणा केली असती तर महिनाभर मोठ्या हेडलाईन झळकल्या असत्या कि एका योजनेत नागरिकांची सव्वा लाख कोटींची बचत झाली. 

बंधुभगिनिंनो,

निवडणुकीच्या वेळी मी आपणाला गॅरंटी दिली होती कि  70 वर्षे पेक्षा मोठ्या वयाच्या वृद्धांना आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. मी ही गॅरंटी पूर्ण केली आहे. बिहारमधील 70 वर्षांहून जास्त वयाचे जेवढे वृद्ध आहेत, त्यांचे कौटुंबिक उत्पन्न कितीही असो, त्यांना मोफत उपचार सुविधा सुरु झाली आहे. लवकरच सर्व वृद्धांकडे आयुष्मान वय वंदना कार्ड असेल. आयुष्मान बरोबरच जन औषधी केंद्रांमध्ये खूप कमी किमतीत औषधे दिली जात आहेत. 

मित्रांनो, 

अधिक चांगल्या आरोग्यासाठी आमचे चौथे पाऊल आहे - छोट्या शहरांमधूनही उत्तम प्रतीच्या आरोग्यसेवा पुरवणे, डॉक्टरांची कमतरता दूर करणे. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षांमध्ये देशभरात केवळ एकच एम्स होते व तेही दिल्लीत. कोणत्याही गंभीर आजारासाठी लोक एम्स कडे धाव घेत असत. काँग्रेसच्या सरकारच्या काळात ज्या चार पाच एम्स बनवण्याची घोषणा झाली, त्यांच्याकडे संपूर्ण उपचारांची सुविधा नव्हती. आमच्या सरकारने रुग्णालयाच्या या आजारालाही बरे केले व देशाच्या कानाकोपऱ्यात नवीन एम्स उभे केले. गेल्या 10 वर्षांमध्ये देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. यामुळे उपचार तर सुलभ झालेच आहेत, शिवाय आपले तरुण मोठ्या संख्येने डॉक्टर झाले आहेत. 

दरभंगा एम्स मधूनही दरवर्षी बिहारचे अनेक तरुण डॉकटर बनून सेवा करण्यासाठी बाहेर पडतील. आणखी एक महत्वाचे काम झाले आहे. याआधी डॉक्टर बनण्यासाठी इंग्रजी भाषा येण्याची गरज होती. मध्यमवर्गीय कुटुंबांकडे इंग्रजी शाळेत मुलांना शिक्षण देण्यासाठी इतके पैसे कुठे असतात? म्हणून आमच्या सरकारने ठरवले, कि डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण दिले जाईल. माझे हे कार्य म्हणजे कर्पुरी ठाकूर यांना सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल. हे त्यांचे स्वप्न होते आणि आम्ही ते पूर्ण केले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही मेडिकलच्या  1 लाख जागा वाढवल्या होत्या आणि येत्या 5 वर्षांत आम्ही त्यात 75 हजारांची भर टाकणार आहोत. आमच्या सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा बिहारच्या युवकांना मोठा फायदा होणार आहे. आम्ही मेडिकलचे शिक्षण  हिंदी सहित इतर अनेक भारतीय भाषांमधून  घेण्याचा पर्याय देणार आहोत. उद्दिष्ट एकच- गरीब, दलित, मागास, आदिवासी कुटुंबातील मुलेही डॉकटर बनू शकतील.

आमच्या सरकारने कॅन्सरच्या विरोधात एक मोठी मोहीम सुरु केली आहे. मुजफ्फरपूरमध्ये जे कँसर रुग्णालय बनत आहे त्यामुळे बिहारच्या कँसर रुग्णांना मोठा फायदा होईल. या रुग्णालयात एकाच छताखाली कँसर उपचारांच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. आतापर्यंत ज्या रुग्णांना उपचारासाठी दिल्ली, मुंबईत जावे लागत होते, त्यांना इथेच चांगले उपचार मिळतील. आणि बिहारला लवकरच डोळ्यांचे एक मोठे रुग्णालय मिळणार आहे. आताच आपले मंगलजी म्हणत होते, काही दिवसांपूर्वी मी काशीला होतो, तिथे कांची कामकोटी शंकराचार्यांच्या आशीर्वादाने खूप मोठे डोळ्यांचे हॉस्पिटल सुरु झाले आहे. काशीत ते आता एक उत्तम रुग्णालय बनले आहे. 

जेव्हा मी गुजरातमध्ये होतो, तेव्हा आमच्या गुजरातमध्ये ते सुरु झाले होते, मी काशीचा खासदार झालो तेव्हा तिथेही असे रुग्णालय सुरु झाले , त्याच्या सोयीसुविधाहि  उत्तम आहेत, तेव्हा मी प्रार्थना केली कि असेच एक रुग्णालय मला माझ्या बिहारसाठीही पाहिजे . आणि त्यांनी माझा प्रस्ताव स्वीकारला, आणि आताच मला मुख्यमंत्रीजी सांगत होते कि त्याची प्रक्रिया वेगाने पुढे जात आहे. तर आता डोळ्यांचे एक चांगले रुग्णालयदेखील मिळेल. डोळ्यांचे हे नवे रुग्णालय या प्रदेशातल्या जनतेसाठी खूप उपयोगी होईल. 

मित्रांनो, 

नितीशबाबूंच्या नेतृत्वात बिहारच्या सुशासनाचे जे मॉडेल विकसित करून दाखवलं आहे, ते अद्भुत आहे. बिहारमधले जंगलराज उध्वस्त करण्यात त्यांनी जी भूमिका निभावली त्याची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. एनडीए चे डबल इंजिन सरकार बिहारला वेगवान विकास देण्यासाठी वचनबद्ध आहे. उत्तम पायाभूत सुविधा आणि इथल्या छोट्या शेतकऱ्यांना, छोट्या उद्योगांना प्रोत्साहन दिल्यानेच बिहारचा गतिमान विकास शक्य होईल.

एनडीए सरकार याच रोडमॅपवर कार्यवाही करतंय . बिहारमध्ये तयार होणाऱ्या पायाभूत सुविधा, विमानतळ, एक्सप्रेसवे यांच्यामुळे बिहारची नवी ओळख तयार होत आहे. दरभंगामध्ये उडान योजनेच्या अंतर्गत विमानतळ सुरु झाला आहे, त्यामुळे इथून दिल्ली मुंबईसारख्या शहरांकडे थेट विमानसेवा मिळू शकेल. लवकरच इथून रांची साठीही विमानसेवा सुरु होईल.साडे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या आमस दरभंगा एक्सप्रेस वे चे काम सुरु आहे. आज 3,400 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या सिटी गैस डिस्ट्रीब्यूशन च्या कामाचेही भूमिपूजन झाले आहे. जसे तुमच्या घरात नळातून पाणी येते तसाच नळातून गैस यायला सुरुवात होईल. आणि तो स्वस्त देखील असेल.विकासाच्या  या  महायज्ञामुळे बिहारच्या पायाभूत सुविधा मोठ्या वेगाने वाढतील, त्यामुळे इथला रोजगार देखील वाढेल.  

मित्रांनो,

पग-पग पोखरी माच मखान, मधुर बोल मुस्की मुख पान। असे दरभंगाचे वर्णन करताना बोलले जाते. इथल्या शेतकऱ्यांचे, मखाना उत्पादकांचे व मच्छीमार बांधवांचे हितरक्षण करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत बिहारच्या शेतकऱ्यांना 25 हजार कोटी रुपयांहून जास्त मिळाले आहेत. मिथिलाच्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळाला आहे.एक जिल्हा एक उत्पादन योजनेच्या अंतर्गत इथल्या मखाना उत्पादकांना जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रवेश दिला जात आहे.मखाना उत्पादकांचे हित लक्षात घेऊन मखाना संशोधन केंद्राला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. मखाण्याला जी आय टैग देखील मिळाला आहे. याच धर्तीवर मत्स्य संपदा योजना अंतर्गत आमच्या मत्स्यपालक बांधवांना आम्ही सर्वोपरी मदत करत आहोत. मत्स्योत्पादकांना किसान क्रेडिट कार्ड चा फायदा मिळू लागला आहे. इथल्या गोड्या पाण्यातील माशांचीही मोठी बाजारपेठ आहे, पीएम मत्स्यसंपदा योजनेतून त्यांनाही मोठी मदत मिळत आहे. जगातील आघाडीचा मत्स्य निर्यातदार म्हणून आम्ही भारताला विकसित करत आहोत त्याचा फायदा दरभंगाच्या मत्स्यपालकांनाही नक्कीच होईल. 

मित्रांनो,

कोसी व मिथिलाला पुरामुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही बिहारमधल्या पुराच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक मोठी योजना घोषित केली आहे. याच्याशीच संबंधित एका 11 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पावरदेखील आमचे सरकार काम करत आहे. 

मित्रांनो,

आपला बिहार हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. या वारशाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी एनडीए सरकारने ‘विकास भी और विरासत भी’ हा मंत्र स्वीकारला आहे. आज नालंदा विश्वविद्यालय आपले पूर्वीचा सन्मान पुन्हा एकदा मिळवण्याच्या प्रयत्नात पुढे जात आहे. 

मित्रांनो,

विविधतेने नटलेल्या आपल्या देशातल्या अनेक भाषा देखील आपल्या समृद्ध वारशाचा अविभाज्य भाग आहेत. त्या बोलल्या गेल्या पाहिजेत, त्यांना जपले पाहिजे. नुकतेच आम्ही पाली भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा दिला आहे. या भाषेत भगवान बुद्धाची शिकवण आणि बिहारच्या प्राचीन गौरवशाली संस्कृतीचा विस्तृत इतिहास लिहिला गेला आहे. आजच्या तरुण पिढीकडे हा वारसा पोहचला पाहिजे. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, की आमच्या एनडीए सरकारच्या काळातच मैथिली भाषेला संविधानाच्या आठव्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. झारखंड राज्यात देखील मैथिलीला द्वितीय राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

मित्रांनो,

इथे दरभंगामध्ये, मिथिलांचलमध्ये आपल्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन पावलापावलावर होत असते. माता सीतेचे संस्कार या धरतीला समृद्ध करतात. एनडीए सरकारने देशभरातल्या डझनाहून अधिक शहरांना रामायण सर्किट मध्ये जोडले आहे, त्यातील एक आपले दरभंगा आहे. यामुळे या ठिकाणच्या पर्यटनव्यवसायाला चालना मिळेल. दरभंगा, सीतामढ़ी, अयोध्या या  मार्गावर अमृत भारत ट्रेन धावणार असून त्यामुळेही लोकांना दिलासा मिळणार आहे. 

मित्रांनो,

तुमच्याशी बोलताना आज मला दरभंगा संस्थानचे महाराज कामेश्वरसिंहजी यांचे योगदान आठवत आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही भारताच्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. माझा मतदार संघ काशी इथेही त्यांच्या कार्याबद्दल चर्चा होत असते. महाराज कामेश्वर सिंह यांचे समाजकार्य हे दरभंगाचा एक गौरवशाली वारसा आहे, आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 

मित्रांनो,

दिल्लीत केंद्रात माझे सरकार आणि इथे बिहारमध्ये नितीशजींचे सरकार, दोघे मिळून बिहारची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. आमच्या विकास आणि कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ बिहारच्या जनतेपर्यंत पोहोचावा हाच आमचा प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा इथल्या एम्स साठी आणि इतर सर्व योजनांसाठी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो. आगामी काळातल्या निर्माण पर्वासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा . माझ्या सोबत म्हणा-

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

खूप खूप धन्यवाद!

 

* * *

नेहा कुलकर्णी/उमा रायकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184141) Visitor Counter : 11