पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली

Posted On: 22 OCT 2024 10:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कझान येथे 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या वर्षातील ही त्यांची दुसरी भेट होती. दोन्ही नेते यापूर्वी जुलै 2024 मध्ये मॉस्को येथे 22 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी भेटले होते.

16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे आभार मानले. त्यांनी रशियाच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाबद्दल, तसेच  बहुपक्षीयता बळकट करण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि जागतिक प्रशासनिक सुधारणांना गती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी राजकीय, आर्थिक, संरक्षण, ऊर्जा आणि परस्परांच्या जनतेमधील संबंध, यासह विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या भारत-रशिया आंतर-सरकारी व्यापार, आर्थिक आणि सांस्कृतिक बाबींवरील आयोगाच्या आगामी बैठकीचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी बहुपक्षीय व्यासपीठांवर, विशेषत: ब्रिक्समधील भारत-रशिया सहभागाबाबत विचारांची देवाणघेवाण केली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षासह परस्पर हिताच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही त्यांनी मते मांडली. हा संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव उपाय असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी कार्यरत राहण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. ही भागीदारी भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय विकास नोंदवत असून लवचिकतेचे दर्शन घडवत आहे.

पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना पुढील वर्षी होणाऱ्या 23 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी भारत भेटीसाठी येण्याचे निमंत्रण दिले.

 

* * *

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184136) Visitor Counter : 4