पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 30-31ऑक्टोबर रोजी गुजरातचा दौरा करणार


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी

एकता दिवस संचलनात 'विविधतेत एकता' या संकल्पनेवरील चित्ररथ

संचलनाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये रामपूर हाउंड्स आणि मुधोळ हाउंड्स यासारख्या भारतीय जातीच्या श्वानांचा समावेश असलेले सीमा सुरक्षा दलाचे संचलन पथक

पंतप्रधान एकता नगरमध्ये 1,140 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी

प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट : पर्यटकांचा अनुभव समृद्ध करणे, सुगम्यतेत वाढ आणि शाश्वतता उपक्रमांना पाठबळ

आरंभ 7.0 च्या समारोपप्रसंगी पंतप्रधान 100 व्या फाउंडेशन कोर्सच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार

Posted On: 29 OCT 2025 10:58AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30-31 ऑक्टोबर रोजी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.  पंतप्रधान, 30 ऑक्टोबर रोजी,  केवडिया येथील एकता नगर येथे जाणार असून सायंकाळी 5:15 च्या सुमाराला ते  ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते एकता नगर येथे सायंकाळी 6:30 च्या सुमाराला 1,140 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान 31 ऑक्टोबर रोजी, सकाळी  8 च्या सुमारास, स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पांजली अर्पण करतील.  त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा केला जाईल. त्यानंतर, सकाळी 10:45 च्या सुमारास, ते आरंभ 7.0 मधील  100 व्या सामायिक फाउंडेशन कोर्सच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

दौऱ्याचा पहिला दिवस- 30 ऑक्टोबर

पंतप्रधान एकता नगरमध्ये विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांचे उद्दिष्ट पर्यटकांचा अनुभव समृद्ध करणे, सुगम्यतेत वाढ करणे आणि परिसरातील शाश्वत उपक्रमांना पाठबळ पुरवणे, हे आहे. एकूण 1,140 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह, हे प्रकल्प जगातील सर्वात उंच पुतळ्याभोवतीच्या क्षेत्रात निसर्ग-पर्यटन, पर्यावरणपूरक गमनशीलता, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि आदिवासी विकासाला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात.

उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये राजपीपला येथील बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ, गरुडेश्वर येथील अतिथ्यशीलता जिल्हा (टप्पा -1), वामन वृक्ष वाटिका, सातपुडा संरक्षक भिंत,  ई-बस चार्जिंग डेपो आणि 25 इलेक्ट्रिक बस,  नर्मदा घाट विस्तार, कौशल्य पथ, एकता द्वार ते श्रेष्ठ भारत भवन (टप्पा-2)पादचारी मार्ग, स्मार्ट बस थांबे (टप्पा -2), धरण प्रतिकृती कारंजे, जीएसईसी निवासस्थान, इत्यादींचा समावेश आहे.

त्यानंतर, पंतप्रधानांच्या हस्ते भारतातील रॉयल किंगडम्सचे वस्तुसंग्रहालय; वीर बालक उद्यान; क्रीडा संकुल; वर्षावन प्रकल्प; शूलपाणेश्वर घाटाजवळील जेटीचा विकास; स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळील प्रवासी सुविधा यांसह विविध प्रकल्पांचा कोनशिला समारंभ होईल.

या कार्यक्रमात पंतप्रधान सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त दीडशे रुपयांचे विशेष नाणे तसेच स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण करतील.

दुसरा दिवस – 31 ऑक्टोबर

या दिवशी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय एकता दिवसाच्या सोहोळ्यात सहभागी होतील आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली वाहतील. ते उपस्थितांना एकता दिवस शपथ देतील आणि एकता दिवस संचलनाला उपस्थित राहतील.

या संचालनात विविध राज्य पोलीस दलांसह सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस(आयटीबीपी) तसेच सशस्त्र सीमा दल (एसएसबी) यांची पथके सहभागी होतील. या वर्षीच्या संचलनात, रामपूर हाऊंड्स आणि मुधोळ हाऊंड्स या संपूर्णपणे भारतीय जातीच्या श्वानांचा समावेश असलेले सीमा सुरक्षा दलाचे पथक, गुजरात पोलिसांचे घोडदळ, आसाम पोलिसांचा मोटारसायकलींसह केलेले धाडसी सादरीकरण ही महत्त्वाची आकर्षणे असणार आहेत.

झारखंडमधील नक्षलवाद-विरोधी मोहिमांमध्ये तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवाद-विरोधी मोहिमांमध्ये अतुलनीय धैर्याचे प्रदर्शन करणारे सीआरपीएफमधील पाच शौर्य चक्र विजेते जवान आणि बीएसएफमधील सोळा शौर्यपदक विजेते जवान यांचा या कवायतीदरम्यान गौरव करण्यात येईल. ऑपरेशन सिंदूरदरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल बीएसएफ जवानांचा सत्कार देखील करण्यात येईल.

यावर्षीच्या राष्ट्रीय एकता दिवस संचलनात, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), महाराष्ट्र, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार बेटे, मणिपूर, छत्तीसगड, उत्तराखंड आणि पुदुचेरी यांचे ‘विविधतेतील एकता’ या संकल्पनेवर आधारित दहा चित्ररथ सहभागी होणार आहेत.सुमारे 900 कलाकारांचा समावेश असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय संस्कृतीची समृद्धी आणि वैविध्य यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण होईल. यावर्षी देश सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती साजरी करत असल्यामुळे यावर्षीच्या एकता दिवस सोहोळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आरंभ 7.0 कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान 100 व्या फाउंडेशन कोर्स मधील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधतील. आरंभ कार्यक्रमाचा सातवा भाग “प्रशासनाची पुनर्परिकल्पना” या संकल्पनेवर आधारित आहे. या 100 व्या फाउंडेशन कोर्समध्ये भारतातील 16 नागरी सेवा आणि भूतानच्या 3 नागरी सेवांतील 660 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.

***

ShaileshPatil/SonaliKakde/SanjanaChitnis/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183706) Visitor Counter : 15