राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाच्या प्रारंभिक सत्राचे उद्घाटन


सौर ऊर्जा म्हणजे केवळ वीज निर्मिती नाही तर सक्षमीकरण आणि समावेशक विकास देखील आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 28 OCT 2025 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2025

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (28 ऑक्टोबर 2025) नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाच्या प्रारंभिक सत्राचे उद्घाटन केले.

या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी  समावेशकता, सन्मान  आणि सामूहिक समृद्धीचा स्रोत म्हणून सौर ऊर्जेचा वापर करणे या मानवतेच्या सामाईक आकांक्षेचे प्रतीक आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी तातडीने आणि ठोस पावले उचलण्याची गरज आहे. भारत हवामान बदलाशी लढण्यासाठी वचनबद्ध आहे आणि निर्धारपूर्वक  पावले उचलत आहे. सौर ऊर्जेचा अवलंब आणि वापर करण्यास प्रोत्साहन देऊन या जागतिक आव्हानाला तोंड देण्याच्या दिशेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी  हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की समावेशनाची कल्पना भारताचा  विकास प्रवास परिभाषित करते. दुर्गम भागातील घरे प्रकाशमय करण्याचा आमचा अनुभव, ऊर्जा समता हा सामाजिक समतेचा पाया आहे या आमच्या विश्वासाला दुजोरा देतो.  परवडणाऱ्या आणि स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता समुदायांना सक्षम करते, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देते आणि वीज पुरवठ्यापलीकडील  संधी खुल्या करते. त्या म्हणाल्या की सौर ऊर्जा म्हणजे केवळ वीज निर्मिती नाही तर सक्षमीकरण आणि समावेशक विकास देखील आहे.

राष्ट्रपतींनी सर्व सदस्य देशांना पायाभूत सुविधांपलिकडे जाऊन विचार करण्याचे आणि लोकांच्या जीवनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, या सभेने सौरऊर्जेला रोजगार निर्मिती, महिला नेतृत्व, ग्रामीण उपजीविका आणि डिजिटल समावेशनाशी जोडणारा सामूहिक कृती आराखडा विकसित करावा. आपली प्रगती केवळ मेगावॅट्सद्वारे मोजली जाऊ नये तर प्रकाशमान झालेल्या जीवनांची संख्या,  मजबूत झालेल्या कुटुंबांची संख्या आणि बदललेल्या समुदायांच्या संख्येद्वारे मोजली पाहिजे. जास्तीत जास्त फायद्यासाठी तंत्रज्ञान विकास आणि  सर्वांसोबत अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञान सामायिक करण्यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार करताना, आपण या प्रदेशाचे पर्यावरणीय संतुलन राखले जाईल याची काळजी घेतली  पाहिजे कारण पर्यावरण संवर्धन हे हरित ऊर्जेकडे वळण्याचे मुख्य कारण आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की आपण केवळ आपल्या स्वतःच्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आणि केवळ वर्तमान पिढीसाठीच नव्हे तर भावी पिढ्यांसाठी अधिक समर्पणाने काम केले पाहिजे. या सभेतील चर्चा आणि  निर्णय सौरऊर्जेच्या निर्मितीत  एक मैलाचा दगड म्हणून काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जे समावेशक आणि समतापूर्ण जग निर्माण करण्यात हातभार लावतील.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183338) Visitor Counter : 21