कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या अत्याधुनिक बियाणे प्रक्रिया संयंत्राचे उद्घाटन
Posted On:
27 OCT 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील पुसा संकुल येथे राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनएससी) च्या नव्याने स्थापन झालेल्या अत्याधुनिक भाजीपाला आणि फुलांच्या बियाणे प्रक्रिया संयंत्र आणि पॅकेजिंग युनिटचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बरेली, धारवाड, हसन, सुरतगड आणि रायचूर येथे असलेल्या पाच एनएससी बियाणे प्रक्रिया संयंत्रांचे देखील दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन केले.

नवी दिल्लीतील पुसा येथील बीज भवन येथील भाजीपाला बियाणे प्रक्रिया संयंत्राची क्षमता 1 टन प्रति तास आहे, तर इतर पाच एनएससी संयंत्राची क्षमता प्रत्येकी 4 टन प्रति तास आहे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आणि देशभरातील बियाणे उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी या सुविधा प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

कार्यक्रमादरम्यान, चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी 'बियाणे व्यवस्थापन 2.0' प्रणाली आणि ऑनलाइन बियाणे बुकिंग प्लॅटफॉर्मचा देखील प्रारंभ केला. या प्लॅटफॉर्मद्वारे, शेतकरी आता त्यांच्या बियाण्यांच्या गरजा ऑनलाइन बुक करू शकतील, ज्यामुळे अधिक पारदर्शकता आणि उपलब्धता सुनिश्चित होईल. दर्जेदार बियाणे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला.

चौहान म्हणाले की, नवीन सुविधांमुळे उच्च दर्जाचे बियाणे सहज उपलब्ध होतील आणि कृषी उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा होईल. "ही नवीन संयंत्र शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करतील, जे अत्यंत महत्त्वाचे आहे. अलिकडेच आयोजित केलेल्या 'विकसित कृषी संकल्प अभियाना' दरम्यान, सर्वाधिक तक्रारी बनावट आणि निकृष्ट बियाण्यांबद्दल प्राप्त झाल्या. म्हणूनच, दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि यामध्ये एनएससीची भूमिका महत्त्वाची आहे. सरकार या संदर्भात कठोर पावले उचलत आहे," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
एनएससीच्या चमूचे कौतुक करताना, केंद्रीय मंत्र्यांनी या उपक्रमाचे वर्णन आत्मनिर्भर कृषी व्यवस्थेच्या दिशेने एक मोठे पाऊल असे केले. एनएससीची भूमिका केवळ उपजीविका मिळवणे नाही तर देशाचे धान्य भांडार भरणे देखील आहे असे त्यांनी सांगितले.

चौहान यांनी महामंडळाला प्रादेशिक भाषांमध्ये नवोन्मेष हाती घेण्याचे आवाहन केले जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या सेवा अधिक सुलभपणे पोहचतील आणि खाजगी कंपन्यांच्या मनमानी पद्धतींना आळा बसेल. "खाजगी कंपन्या आपल्या जागी आहेत , परंतु सार्वजनिक कंपन्यांचेही स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. राज्य बियाणे विकास महामंडळांचे कामकाज देखील सुधारणे आवश्यक आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, एनएससीने स्पष्ट मार्गदर्शक आराखड्यासह काम करावे," असे ते म्हणाले.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183159)
Visitor Counter : 4