पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
6,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विमानतळ प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
आजच्या विकास उपक्रमांचा नागरिकांना, विशेषतः आपल्या युवाशक्तीला मोठा फायदा होईल: पंतप्रधान
गेल्या 10 वर्षांत आम्ही देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची एक मोठी मोहीम सुरू केली आहे: पंतप्रधान
काशी हे एक आदर्श शहर आहे, तिथे वारशाचे जतन करत विकास साधला जात आहे: पंतप्रधान
सरकारने महिला सक्षमीकरणावर नव्याने भर दिला आहे, समाजातील महिला आणि तरुण सक्षम होतात, तेव्हाच समाजाचा विकास होतो: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2024 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथे अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. आजच्या प्रकल्पांमध्ये 6,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विमानतळ प्रकल्पांचा आणि वाराणसीतल्या विविध विकास उपक्रमांचा समावेश आहे.
आज काशीसाठी अत्यंत शुभ दिवस आहे, कारण आज सकाळी आर. जे. शंकर नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन झाले आहे, असे पंतप्रधानांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. हे रुग्णालय वृद्ध आणि मुलांसाठी खूप उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. आजच्या विकास प्रकल्पांचा संदर्भ देताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधल्या नवीन विमानतळ टर्मिनल्सच्या उद्घाटनाचा उल्लेख केला, ज्यात बाबतपूर विमानतळ आणि आग्रा व सहारनपूर इथल्या सरसावा विमानतळाचा समावेश आहे. शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, आरोग्य आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित विकास प्रकल्प आज वाराणसीला सादर करण्यात आले आहेत, ज्यामुळे केवळ सेवांना चालना मिळणार नाही, तर तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे मोदी यावेळी म्हणाले. मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अभिधम्म दिवसात सहभागी झाल्याचे स्मरण केले आणि भगवान बुद्धांच्या उपदेशाची भूमी असलेल्या सारनाथच्या विकासाशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे आज उद्घाटन केल्याचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी सारनाथ आणि वाराणसीचा पाली आणि प्राकृत भाषांशी असलेला संबंध अधोरेखित केला आणि त्यांना अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा उल्लेख केला. धर्मग्रंथांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आजच्या विकास प्रकल्पांसाठी काशी आणि भारतीय जनतेचे अभिनंदन केले.
वाराणसीच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाल्यावर तिप्पट वेगाने काम करण्याच्या आपल्या वचनाचे स्मरण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, सरकार स्थापन झाल्यानंतर 125 दिवसांपेक्षा कमी कालावधीत, 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध योजना आणि प्रकल्पांवर काम आधीच सुरू झाले आहे. त्यांनी सांगितले की, यातील सर्वाधिक निधी गरीब, शेतकरी आणि तरुणांसाठी समर्पित केला होता. मोदी म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये घोटाळ्यांच्या बातम्या येत होत्या, त्याऐवजी आज प्रत्येक घरात 15 लाख कोटी रुपयांच्या कामांची चर्चा होत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, देशाने अपेक्षित केलेला बदल, म्हणजेच, लोकांचा पैसा लोकांवरच खर्च व्हावा आणि देशाची प्रगती पूर्ण प्रामाणिकपणे व्हावी, हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य होते.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, सरकारने गेल्या 10 वर्षांत देशात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे, त्याची दोन मुख्य उद्दिष्टे आहेत – लोकांसाठी असलेल्या सेवांमध्ये सुधारणा आणि गुंतवणुकीद्वारे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे. आधुनिक महामार्ग, नवीन मार्गांवर रेल्वे ट्रॅक टाकणे आणि नवीन विमानतळांची स्थापना यांसारख्या विकास कामांची उदाहरणे देताना, यामुळे लोकांची सोय वाढत आहे आणि त्याच वेळी रोजगार निर्मितीही होत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, बाबतपूर विमानतळासाठी महामार्गाच्या बांधकामामुळे केवळ प्रवाशांनाच फायदा झाला नाही, तर कृषी, उद्योग आणि पर्यटनालाही चालना मिळाली. बाबतपूर विमानतळाची उड्डाण हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी त्याच्या विस्तारीकरणाचे काम आधीच सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
भारतातली विमानतळे आणि त्यांच्या अद्भुत सुविधांनी युक्त भव्य इमारती हा जगभरात चर्चेचा विषय असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. 2014 मध्ये फक्त 70 विमानतळे होते, तर आज 150 हून अधिक विमानतळ आहेत आणि जुन्या विमानतळांच्या नूतनीकरणाचे कामही सुरू आहे, असे मोदी यांनी सांगितले. गेल्या वर्षी देशातल्या डझनाहून अधिक विमानतळांवर नवीन सुविधांचे बांधकाम पूर्ण झाले, त्यात अलीगढ, मुरादाबाद, श्रावस्ती आणि चित्रकूट विमानतळांचा समावेश आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मोदी म्हणाले की, अयोध्येतील भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ दररोज रामभक्तांचे स्वागत करत आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, पूर्वी खराब रस्त्यांवरून ज्याची खिल्ली उडवली जात होती ते उत्तर प्रदेश राज्य आज 'एक्स्प्रेसवेचे राज्य' म्हणून ओळखले जाते. त्यांनी पुढे सांगितले की, आज उत्तर प्रदेश सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेले राज्य म्हणूनही ओळखले जाते आणि लवकरच नोएडाच्या जेवरमध्ये एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जाणार आहे. मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या प्रगतीबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण चमूचे कौतुक केले.
वाराणसीचे खासदार म्हणून प्रगतीच्या गतीबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि काशीला जिथे प्रगती आणि वारसा एकत्र नांदतील असे शहरी विकासाचे एक आदर्श शहर बनवण्याच्या आपल्या स्वप्नाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, आज काशीची ओळख बाबा विश्वनाथांचे भव्य आणि दिव्य धाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर, रिंगरोड आणि गंजारी स्टेडियमसारखे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि रोपवेसारख्या आधुनिक सुविधांनी होते. "शहराचे रुंद रस्ते आणि गंगाजीचे सुंदर घाट आज सर्वांना आकर्षित करत आहेत," असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की, काशी आणि पूर्वांचलला व्यापार आणि व्यवसायाचे एक मोठे केंद्र बनवणे हा सरकारचा सततचा प्रयत्न आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी गंगा नदीवर नवीन रेल्वे-रस्ते पुलाच्या बांधकामाचा उल्लेख केला, त्यात 6-मार्गिका असलेले महामार्ग आणि अनेक गाड्यांसाठी रेल्वे लाईन असतील. ते म्हणाले की, याचा वाराणसी आणि चंदौलीच्या लोकांना मोठा फायदा होईल.
"आपली काशी आता खेळांचे एक मोठे केंद्र बनत आहे," असेही मोदी म्हणाले. त्यांनी सांगितले की, सुधारित सिग्रा स्टेडियम आता लोकांसमोर आहे आणि नवीन स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्पर्धांपासून ते ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आणि खेळांसाठी आधुनिक सुविधांसह व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी काशीच्या तरुण खेळाडूंच्या क्षमतेवर प्रकाश टाकला, ही क्षमता खासदार क्रीडा स्पर्धेदरम्यान दिसून आली आणि आता पूर्वांचलच्या तरुणांना मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
समाजातील महिला आणि तरुण सक्षम होतात तेव्हाच समाजाचा विकास होतो, हे अधोरेखित करताना, सरकारने महिलांना नवीन बळ दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी मुद्रा योजनेसारख्या योजनांचा उल्लेख केला, या द्वारे कोट्यवधी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. "आज, गावांमध्ये 'लखपती दीदी' निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि महिला ड्रोन पायलटही बनत आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काशीमध्ये अशी श्रद्धा आहे की, भगवान शंकरही देवी अन्नपूर्णेकडून भिक्षा मागतात, या श्रद्धेचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, याच श्रद्धेमुळे सरकारने विकसित भारताच्या ध्येयासाठी प्रत्येक उपक्रमाच्या केंद्रस्थानी नारीशक्तीला ठेवले आहे. त्यांनी भर दिला की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, वाराणसीच्या महिलांसह लाखो महिलांना स्वतःची घरे देण्यात आली आहेत. पंतप्रधानांनी हेही अधोरेखित केले की, सरकार आणखी तीन कोटी घरे बांधणार आहे आणि ज्या महिलांना अद्याप पीएम आवास योजनेअंतर्गत घरे मिळाली नाहीत, त्यांना लवकरच त्यांची घरे दिली जातील, असे आश्वासन दिले. नळाने पाणी, उज्ज्वला गॅस आणि वीज पुरवण्याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवीन पीएम सूर्यघर मोफत वीज योजना महिलांचे जीवन आणखी सुकर करेल, त्यामुळे त्यांना मोफत विजेचा लाभ मिळेल आणि त्यातून कमाईही करता येईल.
"आपली काशी एक बहुरंगी सांस्कृतिक शहर आहे, तिथे भगवान शंकराचे पवित्र ज्योतिर्लिंग, मणिकर्णिकेसारखे मोक्ष तीर्थ आणि सारनाथसारखे ज्ञानस्थळ आहे," असे मोदी म्हणाले. ते म्हणाले की, अनेक दशकांनंतर बनारसच्या विकासासाठी एकाच वेळी इतके काम झाले आहे. वाराणसीच्या खराब विकास आणि प्रगतीबद्दल मागील सरकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मोदी म्हणाले की, आपल्या सरकारने कोणत्याही योजनेत कोणताही भेदभाव न करता 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रानुसार काम केले. त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने आपले वचन पाळले आणि अयोध्येत वचन दिल्याप्रमाणे भव्य राम मंदिर बांधल्याचे उदाहरण दिले. त्यांनी विधानसभेत आणि लोकसभेत महिलांसाठी ऐतिहासिक आरक्षण पूर्ण केल्याचाही उल्लेख केला. मोदी यांनी तिहेरी तलाक रद्द करणे, मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणे आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना 10 टक्के आरक्षण देणे, यासारख्या इतर कामगिरीचाही उल्लेख केला.
आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे, धोरणे चांगल्या हेतूने लागू केली आहेत आणि देशातील प्रत्येक कुटुंबाचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाचे सततचे आशीर्वाद हे सरकारच्या प्रयत्नांचे फळ आहे, ते नुकतेच हरियाणात दिसून आले, जिथे सत्ताधारी पक्षाने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळालेल्या विक्रमी मतांचीही नोंद घेतली.
घराणेशाहीचे राजकारण हे देशासाठी, विशेषतः तरुणांसाठी एक मोठा धोका आहे, हे नमूद करताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, अशा राजकारणामुळे अनेकदा तरुणांना संधींपासून वंचित राहावे लागते. लाल किल्ल्यावरून केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चार करत, त्यांनी ज्यांच्या कुटुंबांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याचे आवाहन केले. हा उपक्रम भारतीय राजकारणाची दिशा बदलेल आणि भ्रष्टाचार आणि कुटुंब-केंद्रित मानसिकता नष्ट करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काशी आणि उत्तर प्रदेशच्या तरुणांना प्रोत्साहन देत पंतप्रधान म्हणाले, की मी तरुणांना या नवीन राजकीय चळवळीचा आधारस्तंभ बनण्याचे आवाहन करतो. काशीचा खासदार म्हणून, मी जास्तीत जास्त तरुणांना पुढे आणण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. काशी संपूर्ण देशासाठी विकासाचे नवीन मापदंड स्थापित करण्याचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले. त्यांनी आज सुरू झालेल्या नवीन विकास कार्यक्रमांबद्दल राज्ये आणि काशीच्या लोकांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
संपर्क वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार आणि नवीन टर्मिनल इमारत आणि संबंधित कामांसाठी सुमारे 2870 कोटी रुपयांच्या कामांची पायाभरणी केली. त्यांनी आग्रा विमानतळावर 570 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नवीन सिव्हिल एन्क्लेव्हची, दरभंगा विमानतळावर सुमारे 910 कोटी रुपयांची आणि बागडोगरा विमानतळावर सुमारे 1550 कोटी रुपयांची पायाभरणी केली.
पंतप्रधानांनी रेवा विमानतळ, माँ महामाया विमानतळ, अंबिकापूर आणि सरसावा विमानतळाच्या 220 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नवीन टर्मिनल इमारतींचे उद्घाटन केले. या विमानतळांची एकत्रित प्रवासी हाताळणी क्षमता वार्षिक 2.3 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांपर्यंत वाढली आहे. या विमानतळांची रचना त्या प्रदेशातल्या वारसा स्थळांच्या सामान्य घटकांपासून प्रभावित आणि प्रेरित आहे.
खेळांसाठी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या आपल्या दृष्टिकोनानुसार, पंतप्रधानांनी खेलो इंडिया योजना आणि स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 210 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या वाराणसी क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचा उद्देश एक अत्याधुनिक क्रीडा संकुल तयार करणे आहे. त्यात राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, खेळाडूंची वसतिगृहे, क्रीडा विज्ञान केंद्र, विविध खेळांसाठी सराव मैदाने, अंतर्गृह नेमबाजी रेंज आणि लढाऊ खेळांचा आखाडा इत्यादींचा समावेश आहे. त्यांनी लालपूर इथल्या डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियम इथे 100 खाटांची मुलींची आणि मुलांची वसतिगृहे आणि एका सार्वजनिक पॅव्हेलियनचेही उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी सारनाथमधील बौद्ध धर्माशी संबंधित क्षेत्रांमधल्या पर्यटन विकास कामांचे उद्घाटन केले. या सुधारणांमध्ये पादचारी-अनुकूल रस्ते, नवीन सांडपाणी वाहिन्या आणि सुधारित मलनिःसारण प्रणाली आणि स्थानिक हस्तकला विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक डिझाइनर वेंडिंग कार्टसह संघटित वेंडिंग झोन इत्यादींचा समावेश आहे. पंतप्रधानांनी बाणासूर मंदिर आणि गुरुधाम मंदिरातल्या पर्यटन विकास कामांसह उद्यानांचे सुशोभीकरण आणि पुनर्विकास यासारख्या इतर अनेक उपक्रमांचेही उद्घाटन केले.
* * *
आशिष सांगळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183065)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam