आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
समुदाय प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतभरात सीपीआर जागरुकता सप्ताहाचे आयोजन
Posted On:
22 OCT 2025 4:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2025
कम्प्रेशन ओन्ली कार्डिओपल्मोनरी रिससुसिटेशन(सीपीआर)मध्ये समुदाय समज आणि व्यावहारिक क्षमता वृद्धीसाठी 13 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशभरात सीपीआर जागरुकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका आणि इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्रयस्थ व्यक्तीच्या हस्तक्षेपाचे महत्त्व याविषयी सामान्य नागरिकांमध्ये जागरुकता आणणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
जीवनरक्षक उपाय म्हणून सीपीआरचे महत्त्व याविषयी जनजागृती वाढवणे,विविध भागधारकांकडून व्यावहारिक प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके देणे, स्वयंसेवा आणि सामुदायिक तयारीमध्ये तरुणाईच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि सार्वजनिक पातळीवर व्यापक पोहोच आणि सहभाग साध्य करण्यासाठी डिजीटल मंचांचा वापर करणे ही सीपीआर जागरुकता सप्ताहाची उद्दिष्टे आहेत.
देशभरात अनेक भागधारकांच्या समन्वित प्रयत्नांद्वारे हा उपक्रम राबवण्यात आला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रशिक्षण आणि जागरुकता उपक्रम राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय रेड क्रॉस सोसायटीने त्यांच्या राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्हा उपकेंद्रांचा वापर समुदाय आधारित सीपीआर प्रशिक्षणासाठी केला. व्यावसायिक संस्थांनी त्यांच्या राज्य शाखांद्वारे प्रशिक्षण आणि जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन केले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या MyGov मंच आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या MyBharatमंच यांच्या माध्यमातून डिजीटल स्वरूपात पोहोच आणि युवकांचा सहभाग अधिक भक्कम झाला.
व्यापक सहभाग आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण सप्ताहात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 14,701 सहभागींनी एको (ECHO)मंच आणि यू ट्यूब लाईव्हद्वारे उद्घाटनात सहभागी होत लाईव्ह प्रतिज्ञा आणि सीपीआर प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला. नागरिकांना MyGov मंचाद्वारे डिजीटल प्रतिज्ञा घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले. त्यामध्ये 79,870 व्यक्तींनी सीपीआर जागरुकतेसाठी वचनबद्धता दर्शवली.
एकंदर, या बहुआयामी उपक्रमांद्वारे, सीपीआर जागरुकता सप्ताहादरम्यान 7,47,000हून अधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आणि देशभरातील 6.06,374 हून अधिक सहभागींना शारीरिक प्रशिक्षण देण्यात आले.


* * *
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवे-साने/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2181568)
Visitor Counter : 12