संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान


लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

Posted On: 22 OCT 2025 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2025

 

22 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे झालेल्या  समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल या मानद पदकाचे तेजस्वी चिन्ह औपचारिकरित्या प्रदान केले. लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना, संरक्षण मंत्री यांनी चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याच्या भारतीय भावनेचे प्रतीक म्हणून चोप्रा यांचे वर्णन केले.

"क्रीडा क्षेत्रातील आणि सशस्त्र दलातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे शिस्त, समर्पण आणि राष्ट्रीय अभिमानाचे सर्वोच्च आदर्श मूर्त स्वरूप आहेत" असे राजनाथ सिंह म्हणाले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि भारतीय लष्कर आणि प्रादेशिक लष्कराचे इतर वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

2016 मध्ये भारतीय सैन्यात भरती झालेले लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा यांनी भारतीय सैन्याच्या राजपुताना रायफल्स मध्ये सेवा बजावली आहे. 24 डिसेंबर 1997  रोजी हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील खंद्रा गावात जन्मलेल्या चोप्रा यांनी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी करून देशाला आणि सशस्त्र दलांना  अभिमान मिळवून दिला आहे.

2020 मध्ये टोकियो ऑलिंपिकमध्ये ट्रॅक अँड फिल्डमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या चोप्रा यांनी पहिला भारतीय सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू बनून इतिहास रचला. 2024  मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक आणि 2023  मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्यांनी  आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली. त्यांनी  आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीग स्पर्धांमध्येही अनेक सुवर्णपदके मिळवली आहेत. 90.23 मीटर (2025) हा त्यांचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो भारतीय क्रीडा इतिहासात एक मैलाचा दगड ठरला आहे.

त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि राष्ट्राप्रती असलेल्या अनुकरणीय सेवेबद्दल, लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा यांना 16 एप्रिल 2025  रोजी राष्ट्रपती   द्रौपदी मुर्मू यांनी प्रादेशिक सैन्यात मानद कमिशन प्रदान केले. यापूर्वी, त्यांना पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, परम विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2181561) Visitor Counter : 19