नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने 9 वा ‘उडान’वर्धापन दिन केला साजरा
‘उडान’ योजनेअंतर्गत 3.23 लाख उड्डाणांद्वारे 1.56 कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा प्रदान
सेवा न मिळालेल्या आणि कमी सेवा मिळालेल्या 93 विमानतळांना जोडणारे 649 मार्ग कार्यान्वित
Posted On:
21 OCT 2025 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक संपर्क योजना - उडान (उडे देश का आम नागरिक) चा 9 वा वर्धापन दिन साजरा केला. मुख्य समारंभ नवी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय), अध्यक्ष, सदस्य तसेच मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
21 ऑक्टोबर 2016 रोजी राष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक धोरणांतर्गत सुरू करण्यात आलेला उडान हा एक परिवर्तनकारी उपक्रम असल्याचे नागरी हवाई वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांसाठी हवाई प्रवास अधिक परवडणारा आणि सुलभ बनवणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 एप्रिल 2017 रोजी शिमला आणि दिल्ली या मार्गावर सुरू झालेल्या पहिल्या उडान विमान सेवेने प्रादेशिक हवाई वाहतुकीच्या जोडणीत एक नवीन युग सुरू केले.
या योजनेअंतर्गत,649 मार्ग कार्यान्वित करण्यात आले असून, सेवा न मिळालेल्या आणि कमी सेवा मिळालेल्या 93 विमानतळांना (यात 15 हेलिपोर्ट आणि 2 जल विमानतळ) जोडले आहे. या माध्यमातून 3.23 लाख ‘उडान’ उड्डाणांद्वारे 1.56 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. एअरलाइन ऑपरेटर्स आणि प्रादेशिक पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्यासाठी, सरकारने व्यवहार्य अंतर भरपाई निधी (VGF) म्हणून 4,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला आहे आणि RCS अंतर्गत विमानतळ विकासात 4,638 कोटी रुपये गुंतवले आहेत.
अलिकडच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये ऑगस्ट 2024 मध्ये सादर केलेल्या ‘सीप्लेन ऑपरेशन्स’साठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांचा तसेच सीप्लेन आणि हेलिकॉप्टरसाठी विशेष निविदा फेरी ‘उडान 5.5’ यांचा समावेश आहे. या फेरीअंतर्गत, 150 मार्गांसाठी उद्देशपत्रे जारी करण्यात आली आहेत, ज्याद्वारे 30 जल विमानतळांना विविध किनारी आणि द्वीपीय प्रदेशांशी जोडले जाणार आहे.
डोंगराळ, ईशान्येकडील राज्ये आणि आकांक्षी जिल्ह्यांशी संपर्क वाढवण्यावर तसेच सुमारे 120 नवीन स्थळांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून ‘विस्तारित उडान फ्रेमवर्क’द्वारे ही योजना एप्रिल 2027 नंतर सुरू ठेवण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेला सचिवांनी दुजोरा दिला.
उडान ही केवळ एक योजना नसून ती परिवर्तनाची उत्प्रेरक आहे आणि हवाई प्रवास सर्वसमावेशक, शाश्वत आणि भारताच्या विकास प्रवासाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181379)
Visitor Counter : 7