अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन ; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल; आणि केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज नवी दिल्ली येथे जीएसटी बचत उत्सवाबाबत संयुक्त पत्रकार परिषद
Posted On:
18 OCT 2025 5:35PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन ; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल; आणि केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली येथे जीएसटी बचत उत्सवाबाबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

आपल्या प्रारंभिक निवेदनात निर्मला सीतारामन म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की दिवाळीपूर्वी पुढील टप्प्यातील जीएसटी सुधारणा लागू केल्या जातील. “त्यानुसार, दर कपात, प्रक्रिया सुलभ करणे,करांचे स्तर चारवरून दोनवर आणणे आणि वर्गीकरणाशी संबंधित समस्या सोडवणे हे सर्व वेळेपूर्वीच पूर्ण झाले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून पुढील टप्प्यातील जीएसटी सुधारणा लागू झाल्या आणि मला वाटते की भारतातील लोकांनी त्याचे उत्साहाने स्वागत केले आहे,” असे सीतारामन म्हणाल्या.

आपल्या निवेदनात पियुष गोयल यांनी, 22 सप्टेंबर रोजी पुढील टप्प्यातील जीएसटीची अंमलबजावणी करून या वर्षीची नवरात्र खास बनवल्याबद्दल पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की या सुधारणांमुळे देशभरात - सामान्य लोकांमध्ये, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आणि कुटुंबांमध्ये एक नवीन उत्साह आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी सुधारणा असल्याचे सांगून गोयल म्हणाले की अप्रत्यक्ष कर प्रणालीचा प्रभाव 140 कोटी भारतीयांवर पडतो आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर उपाययोजनांद्वारे 2.5 लाख कोटी रुपयांची सवलत देण्याचा हा निर्णय अभूतपूर्व आणि कल्पनेपलिकडचा आहे.

आपल्या निवेदनात अश्विनी वैष्णव यांनी भारतातील इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्थेतील उल्लेखनीय वाढ आणि खप, गुंतवणूक आणि उत्पादनावर जीएसटी सुधारणांचे सकारात्मक परिणाम अधोरेखित केले. वैष्णव म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्था विक्रमी ग्राहक मागणी, धोरण स्थिरता आणि वेगाने विस्तारणाऱ्या उत्पादनामुळे मजबूत मूलभूत तत्त्वे प्रदर्शित करत आहे.

व्यापक आर्थिक आकडेवारीचा संदर्भ देत वैष्णव म्हणाले की गेल्या वर्षी भारताच्या 335 लाख कोटीच्या जीडीपीपैकी 202 लाख कोटी रुपये खपाद्वारे आणि 98 लाख कोटी रुपये गुंतवणुकीतून आले. जीएसटी सुधारणांचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे कारण या वर्षी खप जवळपास 10% ने वाढला आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या खर्चात अतिरिक्त 20 लाख कोटी रुपये वाढ झाली आहे. या वाढीमुळे गुंतवणुकीत त्याच प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे विकासाची गती वाढेल, आणि जीएसटी सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत खप आणि गुंतवणूक यांच्यातील संबंध कसे मजबूत झाले हे दिसून येईल.
***
माधुरी पांगे / सुषमा काणे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2180799)
Visitor Counter : 11