दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाने माजी सैनिक योगदान आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरपोच औषध सेवा केली सुरू
Posted On:
17 OCT 2025 1:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
टपाल विभागाने (डीओपी) माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेअंतर्गत (ईसीएचएस) लाभार्थ्यांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेत ईसीएचएस पॉलीक्लिनिकमध्ये जी औषधे उपलब्ध नाहीत ती लाभार्थ्यांच्या घरी थेट पोहोचवण्यासाठी एक समर्पित सेवा सुरू केली आहे.
या उपक्रमांतर्गत, थेट घरी पोहोचवली जाणारी औषधे ईसीएचएस पॉलीक्लिनिकमध्ये असलेल्या ग्रामस्तरावरील उद्योजक (व्हीएलई) कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) द्वारे खरेदी आणि पॅकेज केली जातील, तर औषधांची वाहतूक आणि वितरण भारतीय टपाल सेवेच्या विश्वसनीय जाळ्यामार्फत केले जाईल, यामुळे औषधे देशाच्या कोणत्याही भागात वेळेवर, सुरक्षितपणे आणि विश्वासार्हतेने पोहोचतील.
ही सेवा प्रथम 31 जुलै 2025 रोजी दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर हरियाणा आणि उत्तर प्रदेशासह एनसीआर भागातही ही सेवा सुरू करण्यात आली. या प्रायोगिक टप्प्यात 1700 हून अधिक औषधांच्या पाकिटांचे यशस्वी वितरण करण्यात आले. या यशाच्या आधारावर, देशभरातील 458 ईसीएचएस ठिकाणांचे व्यापक मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे आणि आता ही सेवा आजपासून म्हणजे 17 ऑक्टोबर 2025 पासून देशभरात लागू करण्यात येत आहे.
हा उपक्रम टपाल विभागाच्या व्यापक नेटवर्कचा वापर करून सामाजिक कल्याण आणि नागरी सेवा यामध्ये त्यांचा सहभाग अधोरेखित करतो. ही सेवा ईसीएचएस लाभार्थ्यांना वेळेवर आणि विश्वासार्हपणे औषधे पोहोचवण्याची खात्री करेल, ज्यामुळे राष्ट्र उभारणी आणि नागरिक कल्याणात भारतीय टपाल विभागाची विश्वासार्ह भागीदार म्हणून भूमिका पुन्हा स्पष्ट होईल.
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180340)
Visitor Counter : 11