पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 16 OCT 2025 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर  2025

सोदरा सोदरी-मणुलकु नमस्कारमुलू।

आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे लोकप्रिय आणि कष्टाळू मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मसानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्य सरकारमधील मंत्री नारा लोकेश, इतर सर्व मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीव्हीएन माधव, सर्व खासदार, आमदार, आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो,

सर्वप्रथम मी अहोबिलमचे भगवान नरसिंह स्वामी आणि महानंदीचे महानन्दीश्वर स्वामी यांना प्रणाम करतो. मी आपल्या सर्वांसाठी मंत्रालयमचे गुरु राघवेंद्र स्वामी यांचे आशीर्वाद मागतो.

मित्रहो,

द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये म्हटले आहे, सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। म्हणजेच, बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले भगवान सोमनाथ आणि दुसरे भगवान मल्लिकार्जुन यांची नावे एकत्र येतात. दादा सोमनाथांची भूमी असलेल्या गुजरातमध्ये माझा जन्म झाला. बाबा विश्वनाथांची भूमी असलेल्या काशीची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि आज मला श्रीशैलमचे आशीर्वाद मिळत आहेत, हे माझे भाग्य आहे.

मित्रहो,

श्रीशैलम येथे दर्शन घेतल्यावर, मला शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देण्याची आणि त्यांना आदरांजली वाहण्याची संधी मिळाली. मी या मंचावरूनही छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो. अल्लामा प्रभू आणि अक्का महादेवी यांच्यासारख्या शिवभक्तांनाही मी नमन करतो. उय्याला-वडा नरसिंह रेड्डी गरू आणि हरी सर्वोत्तम राव यांच्यासारख्या महान स्वातंत्र्यसैनिकांना मी श्रद्धेने आदरांजली अर्पण करतो.

मित्रहो,

आपला आंध्र प्रदेश स्वाभिमान आणि संस्कृतीची भूमी आहे आणि विज्ञान आणि नवोन्मेषाचे केंद्र देखील आहे. येथे अमर्याद शक्यताही आहेत आणि तरुणांमधील अमर्याद क्षमताही आहेत. आंध्रला कोणत्या गोष्टीची गरज होती, तर ती म्हणजे योग्य दृष्टीकोण आणि योग्य नेतृत्व. आज आंध्र प्रदेशाकडे चंद्राबाबू नायडू गारू आणि पवन कल्याण गारू यांच्या रूपात दूरदर्शी नेतृत्वही आहे आणि त्याला केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबाही आहे.

मित्रहो,

गेल्या 16 महिन्यांत आंध्र प्रदेशात विकासाची गाडी वेगाने धावत आहे. डबल इंजिन सरकारच्या काळात अभूतपूर्व प्रगती होत आहे. आज दिल्ली आणि अमरावती एकत्र येऊन जलद विकासाच्या दिशेने पुढे जात आहेत. आणि चंद्राबाबूंनी म्हटल्याप्रमाणे, या वेगवान गतीकडे पाहता, मी असे म्हणू शकतो की 2047 मध्ये, जेव्हा आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करू, तेव्हा 'विकसित भारताचे’ उद्दिष्ट साध्य झाले असेल. अत्ताच बाबूंनी त्यांचे विचार व्यक्त केले आहेत, पण मी आत्मविश्वासाने सांगतो की 21 वे शतक हे भारताचे शतक असणार आहे, 140 कोटी भारतीयांचे शतक असेल.

मित्रहो,

आज देखील येथे रस्ते, वीज, रेल्वे, महामार्ग आणि व्यापाराशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी मजबूत होईल, उद्योगांना चालना मिळेल आणि लोकांचे जीवन सुकर होईल. या प्रकल्पांमुळे कुर्नूल आणि आसपासच्या भागाला मोठा फायदा होईल. या सर्व प्रकल्पांसाठी मी राज्यातील जनतेचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

एखाद्या देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी ऊर्जा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. आज या ठिकाणी वीज क्षेत्रामधील सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामुळे देशाची ऊर्जा क्षमता आणखी वाढेल.

मित्रहो,

वेगाने विकसित होताना आपल्याला पूर्वीच्या परिस्थितीचा विसर पडता कामा नाही. 11 वर्षांपूर्वी जेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा दरडोई विजेचा वापर सरासरी 1 हजार युनिटपेक्षाही कमी होता. त्यावेळी देशाला ब्लॅक आऊट सारख्या आव्हानांचाही सामना करावा लागत होता. आमच्या गावांमध्ये विजेचे खांबही नव्हते. आज भारत स्वच्छ ऊर्जेपासून ते देशाच्या एकूण ऊर्जा उत्पादनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. आज देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. दरडोई विजेचा वापर एक हजार चारशे युनिटपर्यंत वाढला आहे. उद्योगापासून ते घरांपर्यंत सर्वांना पुरेशी वीज मिळत आहे.

मित्रहो,

आंध्र प्रदेश हे देशातील या ऊर्जा क्रांतीचे एक प्रमुख केंद्र आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली, आज येथे श्रीकाकुलम ते अनुगुल दरम्यानच्या नैसर्गिक वायू पाइपलाइन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. या पाइपलाइनद्वारे अंदाजे पंधरा लाख घरांना गॅस पुरवठा केला जाईल. चित्तूरमध्ये आज एक एलपीजी बॉटलिंग प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्लांटमध्ये दररोज वीस हजार सिलिंडर भरण्याची क्षमता आहे. यामुळे स्थानिक वाहतूक आणि साठवणूक क्षेत्रात रोजगार वाढतील आणि तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील.

मित्रहो,

विकसित भारताच्या उद्दिष्टापर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी देशात मल्टीमोडल पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. आम्ही गावापासून, ते शहरापर्यंत आणि शहरापासून, ते बंदरापर्यंत कनेक्टिविटीवर खूप भर देतो. सब्बावरम-शीलानगर दरम्यान नवीन महामार्गाच्या बांधकामामुळे, कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. रेल्वे क्षेत्रातही एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. नवीन रेल्वे मार्गिका सुरु झाल्यामुळे आणि रेल्वे उड्डाणपूल बांधल्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल आणि या भागातील उद्योगांना नवी गती मिळेल.

मित्रहो,

आज, आपल्या सर्वांसमोर 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प आहे. आणि या संकल्पाला ‘स्वर्ण आंध्र’च्या उद्दिष्टाने नवी ऊर्जा दिली आहे.  

आपल्या सर्वांना माहीत आहे,तंत्रज्ञानाच्या बाबतीत आंध्र प्रदेश आणि इथले युवा खूप पुढे असतात. डबल इंजिन सरकारमध्ये आम्ही आंध्र प्रदेशची ही क्षमता अधिक वृद्धिंगत करत आहोत.  

मित्रहो,

आज भारताचा आणि आंध्र प्रदेशचा वेग आणि वाव संपूर्ण जग पाहत आहे. दोन दिवसांपूर्वीच गुगलने आंध्र प्रदेशात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. गुगल आंध्र प्रदेशात भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस हब बांधणार आहे. आणि काल, जेव्हा मी गुगलच्या सीईओंशी बोलत होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितले की अमेरिकेबाहेर, जगभरातील अनेक देशांमध्ये आमची गुंतवणूक आहे, पण  सर्वात मोठी गुंतवणूक आता आम्ही आंध्रमध्ये करणार आहोत. या नवीन एआय हबमध्ये शक्तिशाली एआय पायाभूत सुविधा, डेटा सेंटर क्षमता, मोठ्या प्रमाणात ऊर्जा स्रोत आणि विस्तारित फायबर-ऑप्टिक नेटवर्क समाविष्ट आहे.

मित्रहो,

गूगलच्या या एआय हब गुंतवणुकीमुळे एक नवा आंतरराष्ट्रीय सब-सी गेटवे बनवला जाईल. यात अनेक आंतरराष्ट्रीय सबसी केबल्स समाविष्ट असतील, ज्या भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणमपर्यंत पोहोचतील. 

मित्रहो,

या प्रकल्पामुळे विशाखापट्टणम हे एआय आणि कनेक्टिव्हिटी हब म्हणून स्थापित होईल. ते केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सेवा देईल. मी यासाठी आंध्र प्रदेशातील लोकांचे विशेष अभिनंदन करतो आणि चंद्राबाबू नायडू यांच्या दूरदृष्टीबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करतो.

मित्रहो,

भारताच्या विकासासाठी आंध्र प्रदेशचा विकास आवश्यक आहे. आणि मला असे वाटते की, आंध्रच्या विकासासाठी रायलसीमाचा विकासही आवश्यक आहे. आज करनूलच्या भूमीवर जी कामे सुरू झाली आहेत, त्यामुळे रायलसीमाच्या प्रत्येक जिल्ह्यात रोजगार आणि समृद्धीची नवी कवाडे खुली होतील. या प्रकल्पांमुळे येथे औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल.

मित्रहो,

आपल्याला आंध्र प्रदेशच्या जलद विकासासाठी नवे औद्योगिक कॉरिडॉर्स आणि केंद्र तयार करावी लागतील. यासाठी सरकार ओरवाकल आणि कोप्पर्तीला आंध्र प्रदेशची नवी औद्योगिक ओळख म्हणून विकसित करत आहे. ओरवाकल आणि कोप्पर्ती येथे गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगाराच्या नव्या संधीदेखील सातत्याने वाढत आहेत. 

मित्रहो,

आज जग भारताकडे 21 व्या शतकातले नवे निर्मिती केंद्र म्हणून पाहत आहे. या यशाचा सर्वात मोठा पाया म्हणजे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न. आपला आंध्र प्रदेश आत्मनिर्भर भारताच्या यशाचे एक प्रमुख केंद्र बनत आहे.

मित्रहो,

काँग्रेस सरकारांनी आंध्र प्रदेशच्या क्षमतांकडे दुर्लक्ष करून संपूर्ण देशाचे नुकसान केले होते. जे राज्य संपूर्ण देशाला पुढे नेऊ शकले असते, त्या राज्यावर स्वतःच्या विकासासाठी संघर्ष करण्याची वेळ आली.  एनडीए सरकारच्या काळात आंध्र प्रदेशचे चित्र बदलत आहे याचा मला आनंद आहे.  आंध्र प्रदेश चंद्राबाबूंच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारतासाठी एक नवीन शक्ती बनत आहे. आंध्रमध्ये उत्पादननिर्मिती  वेगाने वाढत आहे. निम्मलुरुमध्ये अॅडव्हान्स्ड नाईट व्हिजन फॅक्टरीचा प्रारंभ  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या  दिशेने आणखी एक पाऊल आहे. या कारखान्यामुळे नाईट व्हिजन उपकरणे, क्षेपणास्त्रांसाठी सेन्सर्स आणि ड्रोन गार्ड प्रणाली तयार करण्याचे  भारताचे सामर्थ्य वाढेल. येथे निर्माण उपकरणे भारताच्या संरक्षण निर्यातीला नवीन उंचीवर नेतील. आणि अलीकडेच ऑपरेशन सिंदूरमध्ये, आपण भारतात  निर्मित उत्पादनांची शक्ती पाहिली आहे.

मित्रहो,

आंध्र सरकारने करनूलला भारताचे ड्रोन हब बनवण्याचा संकल्प केला आहे. ड्रोन उद्योगाच्या माध्यमातून करनूल आणि आंध्रमध्ये भविष्यकालीन तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक नव्या क्षेत्रांचा विकास होईल. आणि आत्ता मी सांगितले तसे,ऑपरेशन सिंदूरमधील ड्रोनच्या पराक्रमाने जगाला आश्चर्यचकित केले आहे. येणाऱ्या काळात करनूल ड्रोन क्षेत्रात देशाची ताकद बनणार आहे. 

मित्रहो,

आमच्या सरकारचे ध्येय आहे- नागरिक केंद्रित विकास! यासाठी आम्ही सातत्याने नव्या सुधारणांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुकर करत आहोत. देशात 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त झाले आहे.  किफायतशीर औषधे, किफायतशीर उपचार आणि वृद्धांसाठी आयुष्मान कार्डसारख्या असंख्य इतर सुविधांमुळे जीवनमान सुलभतेत  एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.

मित्रहो,

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. नारा लोकेश गारूंच्या नेतृत्वाखाली येथे लोक जीएसटी बचत उत्सव साजरा करत आहेत, हे पाहून मला खूप आनंद झाला. तुम्ही अत्यंत यशस्वीपणे 'सुपर जीएसटी - सुपर सेव्हिंग्ज' अभियान चालवत आहात. मला सांगण्यात आले आहे की नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांमुळे आंध्र प्रदेशातील लोकांची  8 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत होईल. ही बचत यावेळी सणांचा आनंद आणखी वाढवत आहे. पण मी एक आवाहनदेखील करतो. आपल्याला जीएसटी बचत उत्सव वोकल फॉर लोकल संकल्पासह साजरा करायचा आहे. 

मित्रहो,

विकसित आंध्रातूनच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. मी पुन्हा एकदा नव्या प्रकल्पांसाठी आंध्र प्रदेशच्या सर्व लोकांचे खूप खूप अभिनंदन करतो. माझ्यासोबत म्हणा - भारतमाता की जय. इथे दोन मुले बराच वेळ  चित्रे घेऊन उभी आहेत, जरा आपल्या एसपीजीच्या लोकांनी ती घ्यावीत, तिथून त्यांच्याकडून घ्या. माझ्यासोबत म्हणा- भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय।

खूप खूप धन्यवाद!


जयदेवी पुजारी-स्वामी/राजश्री आगाशे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2180318) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam