गृह मंत्रालय
छत्तीसगड आणि महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत एकूण 258 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असल्याची केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची माहिती
आज छत्तीसगडमध्ये 170 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, काल छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांनी आणि महाराष्ट्रात 61 नक्षलवादी शरण आले
नक्षलवादाविरोधातील लढाईत हा ऐतिहासिक दिवस असल्याचे गृहमंत्र्यांचे प्रतिपादन
नक्षलवादाच्या मार्गावर जे लोक अजूनही आहेत त्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत आणि मूळ प्रवाहात सहभागी व्हावे असे मी पुन्हा एकदा आवाहन करत आहे
Posted On:
16 OCT 2025 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2025
छत्तीसगड आणि महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत एकूण 258 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून नक्षलवादविरोधातील लढाईत हा एक ऐतिहासिक दिवस असल्याची माहिती केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज दिली.आज छत्तीसगडमध्ये 170 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, काल छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांनी आणि महाराष्ट्रात 61 नक्षलवादी शरण आले,असे त्यांनी सांगितले.
हिंसाचाराचा त्याग करून भारताच्या राज्यघटनेवर पुन्हा विश्वास दाखवण्याच्या त्यांच्या निर्णयाचे गृहमंत्र्यांनी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही समस्या संपवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच नक्षलवाद आता अखेरचा श्वास घेत असल्याच्या वस्तुस्थितीचे हे निदर्शक आहे, असे ते म्हणाले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “आज नक्षलवादाच्या विरोधातील आमच्या लढाईतील हा एक ऐतिहासिक दिवस आहे. आज छत्तीसगडमध्ये 170 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. काल या राज्यात 27 नक्षलवाद्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली. महाराष्ट्रात 61 नक्षलवादी काल मूळ प्रवाहात परतले. गेल्या दोन दिवसात एकूण 258 कट्टर डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा त्याग केला आहे. हिंसाचाराचा त्याग करून भारताच्या राज्यघटनेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्याच्या त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही समस्या संपवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच नक्षलवाद आता अखेरचा श्वास घेत असल्याच्या वस्तुस्थितीचे हे निदर्शक आहे. मोदी सरकारचे धोरण अगदी स्पष्ट आहे, जे लोक शरणागती पत्करतील त्यांचे स्वागत आहे आणि जे शस्त्र परजत राहतील त्यांना आमच्या दलांच्या कठोर कारवाईला तोंड द्यावे लागेल. जे अजूनही नक्षलवादाच्या मार्गावर आहेत त्या लोकांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी त्यांची शस्त्रे खाली ठेवावीत आणि मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे.31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
एक्सवरील आणखी एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, “छत्तीसगडमधील अबू झमाड आणि उत्तर बस्तर हे दहशतीचे तळ असलेले भाग आज नक्षली दहशतीतून मुक्त झाले असल्याचे जाहीर झाले आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. जानेवारी 2024 पासून छत्तीसगडमध्ये आमचे सरकार स्थापन झाल्यापासून 2100 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. 1785 जणांना अटक करण्यात आली आहे आणि 477 नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे. या आकडेवारीतून 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करण्याच्या आमच्या सरकारच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब दिसत आहे.”
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180159)
Visitor Counter : 21