पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी


संतांनी आपल्या समाजात मोठे योगदान दिले आहे, जेव्हा संपूर्ण समाज आणि देश एखाद्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी एकत्र येतो तेव्हा ते निश्चितच साध्य होते : पंतप्रधान

संपूर्ण देश एका निश्चित ध्येयाने पुढे जात आहे, हे ध्येय आहे विकसित भारताचे : पंतप्रधान

स्वातंत्र्य चळवळीदरम्यान असलेली तळमळ आणि जागृती विकसित भारतासाठी प्रत्येक क्षणी 140 कोटी देशवासीयांमध्ये असली पाहिजे : पंतप्रधान

विकसित भारत बनण्याची पहिली अट म्हणजे व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून "स्वावलंबी" बनणे : पंतप्रधान

भारतीय युवकांच्या क्षमतेने संपूर्ण जग आकर्षित झाले आहे, हे कुशल युवक केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यास तयार असतील : पंतप्रधान

कोणताही देश आपल्या वारशाचा अभिमान बाळगून आणि त्याचे जतन करूनच पुढे जाऊ शकतो, आपला मंत्र आहे विकास तसेच वारसा : पंतप्रधान

Posted On: 11 NOV 2024 1:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2024

 

गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाग घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, श्री स्वामीनारायणांच्या कृपेनेच 200 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. जगभरातील सर्व शिष्यांचे स्वागत करताना, मोदी यांनी सांगितले की, स्वामीनारायण मंदिराच्या परंपरेत सेवा ही सर्वात महत्त्वाची आहे आणि आज शिष्य सेवेत तल्लीन झाले आहेत. अलिकडेच माध्यमांमध्ये हा सोहळा पाहून आपल्याला आनंद झाला असे त्यांनी सांगितले. 

वडताल धाममधील 200 व्या वर्षाचा उत्सव हा केवळ इतिहास नव्हता हे लक्षात घेऊन,  वडताल धामवर पूर्ण श्रद्धा ठेवत वाढलेल्या त्यांच्यासह अनेक शिष्यांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे मोदी यांनी नमूद केले. हा प्रसंग भारतीय संस्कृतीच्या शाश्वत प्रवाहाची साक्ष देतो असे ते पुढे म्हणाले. श्री स्वामीनारायण यांनी वडताल धाम स्थापन केल्याला 200 वर्षे उलटूनही, इथली आध्यात्मिक चेतना जिवंत ठेवण्यात आली आहे आणि श्री स्वामीनारायणांची शिकवणी आणि उर्जेचा अनुभव आजही घेता येतो असे मोदींनी अधोरेखित केले. मंदिराच्या 200 व्या वर्षाच्या समारंभाबद्दल मोदींनी सर्व संत आणि शिष्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारत सरकारने दोनशे रुपयांचे चांदीचे नाणे आणि स्मारकाचे टपाल तिकीट जारी केल्याबद्दल पंतप्रधानांना आनंद झाला. आगामी पिढ्यांच्या मनात ही चिन्हे या महान प्रसंगाच्या आठवणी जिवंत ठेवतील असे ते पुढे म्हणाले. 

पंतप्रधानांनी अधोरेखित केले, की स्वामीनारायणांशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला या परंपरेशी असलेल्या त्यांच्या मजबूत वैयक्तिक, आध्यात्मिक आणि सामाजिक संबंधांची जाणीव आहे. आपल्याला भूतकाळात आणि आताही संतांचा दिव्य सहवास लाभला आहे आणि त्याचबरोबर राष्ट्राच्या विकासासाठी अर्थपूर्ण चिंतन करण्याची संधीही मिळाली आहे, असे ते पुढे म्हणाले. इतर कामांमुळे आपण या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, मात्र मनाने आपण वडताल धाममध्ये उपस्थित होतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पूजनीय संत परंपरा ही भारताची खासियत आहे आणि कठीण काळातच ऋषी, संत किंवा महात्मा प्रकट झाले आहेत असे मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भगवान स्वामीनारायण अशा वेळी अवतरले होते जेव्हा देश शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर कमकुवत झाला होता आणि स्वतःवरचा  विश्वास गमावला होता. मोदींनी अधोरेखित केले की भगवान स्वामीनारायण आणि त्या काळातील सर्व संतांनी केवळ एक नवीन आध्यात्मिक ऊर्जा दिली नाही तर आपला स्वाभिमान जागृत केला आणि आपली ओळख पुनरुज्जीवित केली. या अनुषंगाने शिक्षापत्री आणि वचनामृत यांचे योगदान मोठे आहे आणि त्यांच्या शिकवणी आत्मसात करणे आणि त्या पुढे नेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे यावर त्यांनी भर दिला. मानवतेच्या सेवेत आणि एका नवीन युगाच्या उभारणीत मोठे योगदान देऊन वडताल धाम एक महान प्रेरणास्थान बनले आहे याचा मला आनंद आहे. मोदी म्हणाले की, मानवतेच्या सेवेत आणि एका नवीन युगाच्या उभारणीत मोठे योगदान देऊन वडताल धाम एक महान प्रेरणास्थान बनले आहे याचा मला आनंद आहे. याच वडताल धामने वंचित समाजातील सागरमजींसारखे महान शिष्य दिले आहेत असे ते पुढे म्हणाले. वडताल धामकडून आज अत्यंत दुर्गम भागातील अनेक मुलांसाठी अन्न, निवारा, शिक्षणासह सेवा आणि प्रकल्प हाती घेतले जात आहेत हे मोदींनी अधोरेखित केले. आदिवासी भागात स्त्री शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या मोहिमा हाती घेतल्या जात आहेत असेही त्यांनी सांगितले. गरिबांची सेवा करणे, नवीन पिढी घडवणे, आधुनिकता आणि अध्यात्म यांची सांगड घालून भारतीय संस्कृतीचे जतन करणे यासारख्या वडताल धामच्या इतर काही सेवांवर मोदी यांनी प्रकाश टाकला. वडताल धामच्या संत आणि भक्तांनि आपल्याला कधीही निराश केले नाही आणि चांगल्या भविष्यासाठी स्वच्छतेपासून पर्यावरणापर्यंतच्या मोहिमा हाती घेतल्या याबद्दल मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. ही स्वतःची जबाबदारी म्हणून त्यांनी स्विकारली आणि  मन लावून ती पूर्ण करण्यात ते गुंतल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वामीनारायण परंपरेतल्या  शिष्यांनी एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत एक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत असेही मोदी यांनी  नमूद केले.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक उद्देश असतो जो त्याच्या जीवनाला आकार देखील देतो असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हा उद्देश आपल्या मनावर, कृतीवर आणि शब्दांवर प्रभाव पाडतो आणि जेव्हा एखाद्याला जीवनाचा उद्देश सापडतो तेव्हा संपूर्ण जीवनात परिवर्तन घडते. प्रत्येक युगात संत आणि ऋषीमुनींनी लोकांना त्यांच्या जीवनाच्या उद्देशाची जाणीव करून दिली आहे असे ते म्हणाले. मोदींनी आपल्या समाजातील संत आणि ऋषींच्या बहुमुल्य योगदानावर प्रकाश टाकला आणि जेव्हा संपूर्ण समाज आणि देश एखाद्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी एकत्र येतो तेव्हा ते निश्चितच साध्य होईल असे सांगितले. त्याची अनेक उदाहरणे असल्याचे ते पुढे म्हणाले. धार्मिक संस्थांनी आज तरुणांना एक मोठे ध्येय दिले आहे आणि संपूर्ण देश विकसित भारताच्या एका निश्चित ध्येयासह पुढे जात आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. मोदी यांनी वडतालच्या संत आणि ऋषींना तसेच संपूर्ण स्वामीनारायण परिवाराला विकसित भारताचा हा पवित्र उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्य चळवळीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याची इच्छा, स्वातंत्र्याची ठिणगी गेल्या शतकापासून समाजाच्या विविध कानाकोपऱ्यातील देशवासीयांना प्रेरणा देत राहिली आणि असा एकही दिवस किंवा क्षण गेला नाही जेव्हा लोकांनी स्वातंत्र्याचे त्यांचे हेतू, त्यांची स्वप्ने, त्यांचे संकल्प याची कास धरणे सोडले. त्यांनी पुढे म्हटले की, स्वातंत्र्य चळवळीत जी इच्छा होती, तीच इच्छा विकसित भारतासाठी प्रत्येक क्षणी 140 कोटी देशवासीयांच्या मनात असणे आवश्यक आहे. येत्या 25 वर्षांसाठी विकसित भारताचे ध्येय जगण्यासाठी आणि प्रत्येक क्षणी स्वतःला त्याच्याशी जोडलेले ठेवण्यासाठी लोकांना प्रेरित करावे असे आवाहन त्यांनी सर्व संत आणि शिष्यांना केले. प्रत्येकाने विकसित भारतासाठी आपले स्थान काहीही असो, योगदान दिले पाहिजे असे पंतप्रधान पुढे म्हणाले. विकसित भारतासाठी पहिली अट म्हणजे स्वावलंबी भारत बनवणे आणि हे साध्य करण्यासाठी भारतातील 140 कोटी नागरिकांशिवाय बाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीची आवश्यकता नाही. मोदी यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिष्यांना व्होकल फॉर लोकलचा प्रचार करून योगदान देण्याचे आवाहन केले. विकसित भारतासाठी देशाची एकता आणि अखंडतेचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी यांनी टिप्पणी केली की, अहितकारक बाबींमध्ये रस असणारे काही सामाजिक घटक समाजाचा नाश करण्याचा कट रचत आहेत. अशा प्रयत्नांना एकत्रितपणे पराभूत करण्यासाठी या प्रयत्नाचे गांभीर्य समजून घेणे अत्यावश्यक आहे.

कठोर तपश्चर्येद्वारे मोठी ध्येये कशी साध्य होतात, तरुण मन राष्ट्र उभारणीसाठी निर्णायक दिशा कशी घेते आणि तरुण राष्ट्र कसे उभारू शकते आणि कसे घडवू शकते याबद्दल भगवान श्री स्वामीनारायणांच्या शिकवणींवर मोदी यांनी भर दिला. यासाठी पात्र, कार्यक्षम आणि सुशिक्षित युवावर्ग निर्माण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. विकसित भारतासाठी सक्षम आणि कुशल युवक हे सर्वात मोठे बळ आहे हे मोदी यांनी अधोरेखित केले. जागतिक स्तरावर भारतीय युवकांची मागणी आणखी वाढेल असेही त्यांनी सांगितले. जगात भारतातील कुशल मनुष्यबळाची मागणी प्रचंड आहे आणि संपूर्ण जग भारताच्या बलवान युवाशक्तीने आकर्षित झाले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. हे युवक केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यास तयार असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यसनमुक्तीसाठी स्वामीनारायण पंथाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत, मोदी यांनी व्यसनापासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी तसेच त्यांना अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी संत आणि शिष्यांना योगदान देण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मोहिमा आणि प्रयत्न होणे नेहमीच आवश्यक आहे आणि ते सातत्याने होत राहिले पाहिजे.

कोणताही देश जेव्हा आपल्या वारशाचा अभिमान बाळगतो आणि त्याचे जतन करतो तेव्हाच तो प्रगती करू शकतो असे नमूद करून मोदी म्हणाले की, "विकास आणि वारसा हाच भारताचा मंत्र आहे". अयोध्येचे उदाहरण देऊन, हजारो वर्षे जुन्या भारतातील वारसा जे  एकेकाळी नष्ट झालेले मानले जात होते अशा वारसा केंद्रांच्या वैभवाचा पुनर्विकास केला जात आहे याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. काशी, केदारनाथ, पावगड, मोढेराचे सूर्य मंदिर, सोमनाथ यांच्या परिवर्तनाची उदाहरणे देखील त्यांनी दिली. सर्वत्र एक नवीन चेतना आणि एक नवीन क्रांती दिसून येत आहे असे ते पुढे म्हणाले. शेकडो वर्षे जुन्या चोरीला गेलेल्या देव-देवतांच्या मूर्ती भारतात परत आणल्या जात आहेत, असेही मोदींनी नमूद केले. लोथलच्या पुनर्विकास प्रकल्पाचा उल्लेख करून, पंतप्रधान म्हणाले की सांस्कृतिक चेतनेची मोहीम ही केवळ सरकारची जबाबदारी नव्हे तर या भूमीवर, या देशावर प्रेम करणाऱ्या, त्याच्या परंपरांवर प्रेम करणाऱ्या, त्याच्या संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या, आपल्या वारशाची प्रशंसा करणाऱ्या सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे. वडताल धाममधील भगवान स्वामीनारायणांच्या कलाकृतींचे संग्रहालय अक्षर भुवन देखील या मोहिमेचा एक भाग आहे याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. उपस्थित मंडळींचे अभिनंदन करताना, मोदी यांनी विश्वास व्यक्त केला की अक्षर भुवन हे भारताच्या अमर आध्यात्मिक वारशाचे एक भव्य मंदिर बनेल.

विकसित भारताचे उद्दिष्ट तेव्हाच साध्य होईल जेव्हा 140 कोटी भारतीय एक समान उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकत्र येतील असे मोदी यांनी म्हटले आहे. ही यात्रा पूर्ण करण्यासाठी आपल्या संतांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे होते असे ते पुढे म्हणाले. दर 12 वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या आणि भारताच्या वारशाचे दीपस्तंभ असलेल्या पूर्ण कुंभाची माहिती जगाला देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी जगभरातून आलेल्या सर्व संतांना केले. त्यांनी संतांना विनंती केली की त्यांनी जगभरातील लोकांना शिक्षित करावे आणि प्रयागराजमध्ये होणाऱ्या पूर्ण कुंभमेळ्याबद्दल बिगर -भारतीय वंशाच्या परदेशी लोकांना त्याबाबत परिपूर्ण माहिती द्यावी. त्यांच्या परदेशातील प्रत्येक शाखेतील किमान 100 परदेशी नागरिकांना येत्या कुंभमेळ्याला मोठ्या आदराने भेट देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पंतप्रधानांनी त्यांना केले. संपूर्ण जगात जागरूकता पसरवण्याचे हे काम संत सहजपणे करू शकतील असेही त्यांनी म्हटले आहे.

भाषणाचा समारोप करताना, मोदी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि द्विशताब्दी समारंभानिमित्त स्वामीनारायण मंदिराच्या सर्व संतांना आणि शिष्यांना शुभेच्छा दिल्या.

पार्श्वभूमी

गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 नोव्हेंबर 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा अनेक दशकांपासून लोकांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर प्रभाव पडत आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179883) Visitor Counter : 3