पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फॅक्ट शीटः 2024 क्वाड नेत्यांची शिखर परिषद

Posted On: 22 SEP 2024 8:58AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

21 सप्टेंबर 2024 रोजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन (ज्युनिअर) यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीज, जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विलमिंग्टन, डेलावेअर येथे चौथ्या क्वाड नेत्यांच्या परिषदेसाठी स्वागत केले. 

क्वाडची स्थापना ही जागतिक पातळीवर कल्याणासाठी काम करणारी शक्ती म्हणून झाली होती. या वर्षी, क्वाडने अभिमानाने अशा ठोस प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू केली आहे जे हिंद-प्रशांत प्रदेशातील प्रशांत, दक्षिण-आशिया आणि हिंद महासागर क्षेत्रासह भागीदार देशांना प्रत्यक्ष लाभ देत आहेत. क्वाड संघटना, भागीदार देशांच्या प्राधान्यक्रमांनुसार पूर्वी कधीही न झालेल्या प्रमाणात आणि व्याप्तीने एकत्र काम करत आहे.एकत्रितपणे, क्वाडचे देश महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहेत, जे साथीचे रोग आणि आजारांशी सामना करण्यात, नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यात, समुद्री क्षेत्राविषयीची जागरुकता आणि सुरक्षा मजबूत करण्यात, उच्च दर्जाचे भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांचे निर्माण करण्यात, अत्यावश्यक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक व लाभ मिळविण्यात, हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यात, सायबर सुरक्षेला बळकट करण्यात आणि पुढील पिढीतील तंत्रज्ञान नेत्यांचे प्रशिक्षण घेण्यात भागीदार देशांना मदत करत आहेत.

हिंद-प्रशांतसाठी चिरस्थायी भागीदार

गेल्या चार वर्षांत, क्वाड नेत्यांनी दोन वेळा आभासी बैठकांसह एकूण सहा वेळा भेट घेतली आहे. क्वाड देशांचे परराष्ट्र मंत्री आठ वेळा भेटले आहेत, ज्यात सर्वात अलीकडची भेट जुलैमध्ये टोकियो येथे झाली. क्वाड देशांचे प्रतिनिधी नियमितपणे, सर्व स्तरांवर, एकमेकांचा सल्ला घेण्यासाठी, सामायिक प्राधान्यक्रम पुढे नेण्यासाठी कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रातील भागीदारांसाठी लाभ मिळवून देण्यासाठी एकत्र येतात.सर्व क्वाड सरकारांनी क्वाडला सर्व स्तरांवर आणि विविध विभाग व संस्थांमध्ये संस्थात्मक स्वरूप दिले आहे. आज, क्वाड नेत्यांनी या सहकार्याच्या सवयी दृढ करण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने क्वाडला सज्ज करण्यासाठी नवीन उपक्रमांची घोषणा केली.

प्रत्येक क्वाड सरकारने चिरस्थायी परिणाम सुनिश्चित करण्यासाठी, हिंद-प्रशांत क्षेत्रातील क्वाडच्या प्राधान्यक्रमांसाठी भक्कम निधी सुरक्षित करण्याकरिता आपापल्या अर्थसंकल्पीय प्रक्रियेद्वारे काम करण्याची वचनबद्धता दर्शविली आहे.

क्वाड सरकारे आपापल्या विधिमंडळांसोबत आंतर-संसदीय  देवाणघेवाण वाढवण्यासाठी आणि इतर भागधारकांना  क्वाड समकक्षांसोबत आपला सहभाग अधिक दृढ करण्यास प्रोत्साहित करण्याचा देखील विचार करत आहेत. काल, काँग्रेसच्या  सदस्यांनी द्विपक्षीय, द्विसभागृही काँग्रेस क्वाड कॉकस स्थापन करण्याची घोषणा केली.

येत्या काही महिन्यांत, क्वाड देशांचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पहिल्यांदाच भेटतील.

क्वाड नेत्यांनी क्वाड विकास वित्त संस्था आणि एजन्सीच्या प्रमुखांच्या बैठकीचेही स्वागत केले आहे. या बैठकीत हिंद-प्रशांत क्षेत्रातील आरोग्य सुरक्षा, अन्न सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा आणि गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा यांसह चार देशांच्या भविष्यातील गुंतवणुकीचा शोध घेतला जाईल. हे पाऊल 2022 मध्ये एक्सपोर्ट फायनान्स ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग फॅसिलिटी फॉर द पॅसिफिक, इंडिया एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक, जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन आणि यू.एस. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन  यांच्या प्रमुखांच्या यापूर्वी झालेल्या बैठकीवर आधारित आहे. 

2025 मध्ये होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद अमेरिका भूषवेल, तर 2025 च्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन भारत करेल.

जागतिक आरोग्य आणि आरोग्य सुरक्षा

2023 मध्ये, हिंद-प्रशांत क्षेत्रातील आरोग्य सुरक्षेला बळ देण्यासाठी समन्वय आणि सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने क्वाडने क्वाड आरोग्य सुरक्षा भागीदारीची घोषणा केली होती. क्वाड आरोग्य सुरक्षा भागीदारी, साथरोग किंवा महामारी बनण्याची क्षमता असलेल्या रोगांचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी हिंद-प्रशांत क्षेत्राची क्षमता मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार कार्य करत आहे, ज्यात आज घोषित केलेल्या नवीन उपक्रमांचा समावेश आहे.

क्वाड कॅन्सर मूनशॉट

क्वाड ऐतिहासिक क्वाड कॅन्सर मूनशॉट  सुरू करत आहे. हा एक सामूहिक प्रयत्न आहे, ज्याद्वारे हिंद-प्रशांत क्षेत्रात कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संसाधनांचा वापर केला जाईल, ज्याचा प्राथमिक भर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगावर असेल. आज घोषित केलेला हा क्वाड कॅन्सर मूनशॉट, आगामी दशकांमध्ये लाखो जीव वाचवेल असा अंदाज आहे. अधिक माहिती येथे मिळू शकते.

महामारीसाठी सज्जता

क्वाड देश महामारी निधीला  सतत पाठिंबा देण्यासह, संपूर्ण क्षेत्रातील आरोग्य सुरक्षा आणि प्रतिरोधकता प्रयत्नांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहेत. 

क्वाड हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये आरोग्य सुरक्षा मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन्हा पुष्टी करते. 2024 मध्ये, क्वाड आरोग्य सुरक्षा भागीदारीने प्रादेशिक प्रतिरोधकता वाढवण्यासाठी दुसरा महामारी सज्जता टेबल टॉप सराव आयोजित करून पुढचा टप्पा गाठला. संभाव्य रोगांचा प्रसार होण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंध करणे, लवकर शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे यासाठी क्वाड लस भागीदारीच्या यशावर आधारित हे कार्य आहे. तसेच, महामारीवर उपाययोजनांसाठी आदर्श मानक कार्यप्रणाली  विकसित करण्यावर क्वाड विचार करत आहे. आरोग्य आणीबाणीसाठी प्रादेशिक क्षमता बळकट करण्यासाठी हिंद-प्रशांत मधील आरोग्य तज्ञांना प्रशिक्षण देण्याच्या क्वाडच्या सामूहिक प्रयत्नांचा यात समावेश होता.

भारत महामारीसंबंधित सज्जतेवर एक कार्यशाळा आयोजित करेल आणि सार्वजनिक आरोग्य आणीबाणी प्रतिसादाची रूपरेषा स्पष्ट करणारी एक श्वेतपत्रिका  जारी करेल. 

रोगाचा फैलाव झाल्यास  देशात किंवा प्रदेशात तैनात करण्यासाठी तयार असलेल्या सार्वजनिक आरोग्य तज्ञांची संख्या वाढवत आहे, ज्याचे पहिले प्रशिक्षण सत्र येत्या काही दिवसांत डार्विन, ऑस्ट्रेलिया येथे सुरू होईल.

क्वाड भागीदारांच्या समन्वयाने, संसर्गजन्य रोगांच्या धोक्यांना प्रतिबंध, शोध आणि प्रतिसाद देण्याची क्षमता बळकट करण्यासाठी अमेरिकेने हिंद-प्रशांत क्षेत्रातील चौदा भागीदार देशांना 84.5 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त अर्थसहाय्य करण्याचे वचन दिले आहे.

एमपॉक्स (Mpox)

सध्याचा क्लेड I एमपॉक्सचा प्रादुर्भाव आणि त्याबरोबरच चालू असलेल्या क्लेड II एमपॉक्स फैलावाला प्रतिसाद म्हणून, क्वाड सुरक्षित, प्रभावी, गुणवत्ता-खात्री असलेल्या एमपॉक्स लसींच्या समान उपलब्धतेला प्रोत्साहन देण्यासाठी आपले प्रयत्न समन्वयित करण्याची योजना आखत आहे, ज्यात योग्य असल्यास कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लस उत्पादनाचा विस्तार करणे समाविष्ट आहे.

मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR)

वीस वर्षांपूर्वी, 2004 च्या विनाशकारी हिंदी महासागर भूकंपाच्या आपत्तीला आणि त्सुनामीला तोंड देण्यासाठी, प्रभावित देशांना मानवतावादी मदत पुरवण्यासाठी क्वाड देश पहिल्यांदा एकत्र आले होते. 2022 मध्ये, क्वाड परराष्ट्र मंत्र्यांनी हिंद-प्रशांतमधील HADR साठी क्वाड भागीदारीच्या मार्गदर्शक तत्त्वांवर स्वाक्षरी केली. मे 2024 मध्ये, पापुआ न्यू गिनी येथे झालेल्या दुर्दैवी भूस्खलनानंतर, क्वाड देशांनी या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपल्याकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये समन्वय राखला. क्वाडने सामूहिकरित्या 5 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मानवतावादी मदत पुरवली. क्वाड भागीदार पापुआ न्यू गिनीला त्यांच्या दीर्घकालीन प्रतिरोधकतेच्या प्रयत्नांमध्ये सतत मदत करत आहेत. क्वाड HADR समन्वय अधिक मजबूत करत आहे आणि प्रदेशातील भागीदारांना त्यांच्या दीर्घकालीन प्रतिरोधकतेच्या प्रयत्नांमध्ये पाठबळ देत आहे. 

नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी क्वाड सरकारे आवश्यक मदत सामग्रीची पूर्व-तैनाती (pre-positioning) करण्यासह, तयारी सुनिश्चित करण्याचे काम करत आहेत; हा प्रयत्न हिंदी महासागर प्रदेशापासून, आग्नेय आशियापर्यंत आणि प्रशांत क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे.

येत्या काही महिन्यांत, क्वाड HADR तज्ञ प्रदेशातील भविष्यातील संभाव्य आपत्तींसाठी तयारी करण्यासाठी एक टेबलटॉप सराव आयोजित करतील.

टायफून यागी (Typhoon Yagi) च्या विनाशकारी परिणामांच्या पार्श्वभूमीवर व्हिएतनाममधील लोकांना पाठबळ देण्यासाठी क्वाड भागीदार 4 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मानवतावादी मदत पुरवण्याचे काम करत आहेत.

सागरी सुरक्षा

क्वाड भागीदार सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी, सागरी क्षेत्रातील जागरूकता सुधारण्यासाठी आणि मुक्त व खुल्या हिंद-प्रशांतचे समर्थन करण्यासाठी संपूर्ण प्रदेशातील भागीदारांसोबत एका बाजूने काम करत आहेत.

सागरी क्षेत्रातील जागरूकता आणि सागरी प्रशिक्षणासाठी हिंद-प्रशांत भागीदारी

2022 मध्ये टोकियो येथे झालेल्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत क्वाड नेत्यांनी सागरी क्षेत्रातील जागरूकतेसाठी (IPMDA) हिंद-प्रशांत भागीदारीचा प्रारंभ केला. ही योजना भागीदारांना जवळजवळ वास्तविक वेळेत (near-real-time), कमी खर्चाचा, अत्याधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा प्रदान करते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या जलक्षेत्रावर अधिक चांगले लक्ष ठेवता येते; अवैध, नोंदणी नसलेली आणि नियमन नसलेली मासेमारी (illegal, unreported, and unregulated fishing) थांबवता येते; हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींना प्रतिसाद देता येतो; आणि त्यांच्या जलक्षेत्रात त्यांचे कायदे लागू करता येतात.

घोषणा झाल्यापासून, भागीदारांशी सल्लामसलत करून, क्वाडने पॅसिफिक बेटे मत्स्यव्यवसाय एजन्सी (Pacific Islands Forum Fisheries Agency), आग्नेय आशियातील भागीदारांसह, ते गुरुग्राममधील इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर—इंडियन ओशन रिजन  पर्यंत हिंद-प्रशांत क्षेत्रावर या कार्यक्रमाचा यशस्वीपणे विस्तार केला आहे. असे केल्याने, क्वाडने दोन डझनांहून अधिक देशांना डार्क व्हेसल सागरी क्षेत्र जागरूकता डेटा मिळवण्यासाठी मदत केली आहे, जेणेकरून ते त्यांच्या विशेषत्वाच्या आर्थिक क्षेत्रातील अवैध व्यवहारांसह कृतींवर अधिक चांगले लक्ष ठेवू शकतील.

आज घोषित केलेल्या अंमलबजावणीच्या पुढील टप्प्यात, प्रदेशाला अत्याधुनिक क्षमता आणि माहिती देणे सुरू ठेवण्यासाठी, क्वाड येत्या वर्षात IPMDA मध्ये नवीन तंत्रज्ञान आणि डेटा समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. भागीदारांसाठी सागरी क्षेत्र जागरूकता अधिक स्पष्ट करण्यासाठी क्वाड इलेक्ट्रो-ऑप्टिकल डेटा आणि प्रगत विश्लेषणात्मक सॉफ्टवेअरचा  फायदा घेण्याचा विचार करत आहे.

आज क्वाडने सागरी प्रशिक्षणासाठी नवीन प्रादेशिक सागरी योजना (MAITRI) ची घोषणा केली आहे, ज्यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रातील आमच्या भागीदारांना IPMDA आणि अन्य क्वाड भागीदार योजनांद्वारे प्रदान केलेल्या साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करता येईल, त्यांच्या जलक्षेत्रावर लक्ष ठेवता येईल आणि ते सुरक्षित करता येईल, त्यांचे कायदे लागू करता येतील आणि बेकायदेशीर वर्तनास प्रतिबंध करता येईल. 2025 मध्ये भारत उद्घाटन MAITRI कार्यशाळेचे आयोजन करण्यास उत्सुक आहे.

क्वाड देश कायदेशीर, कार्यात्मक आणि तांत्रिक सागरी सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी  या ज्ञानाच्या संपूर्ण श्रेणीमध्ये व्यापक आणि पूरक प्रशिक्षणात समन्वय राखत आहेत. क्वाड भागीदारांनी प्रादेशिक सागरी कायद्याची अंमलबजावणी मंचांसोबत (सहभाग वाढवण्याची, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची आणि नागरी सागरी सहकार्य सुधारण्याचा निश्चय केला आहे.

हिंद-प्रशांत लॉजिस्टिक्स नेटवर्क

क्वाडने आज क्वाड हिंद-प्रशांत लॉजिस्टिक्स नेटवर्क पायलट प्रकल्प सुरू केला आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्तींना अधिक जलद आणि कार्यक्षमतेने नागरी प्रतिसाद देण्यासाठी, चार देशांमध्ये सामायिक हवाई वाहतूक क्षमता प्राप्त करणे आणि सामूहिक लॉजिस्टिक्स सामर्थ्याचा फायदा घेणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रयत्न हिंद-प्रशांत भागीदारांसोबतच्या सध्याच्या प्रयत्नांना पूरक ठरेल.

तटरक्षक दलाचे सहकार्य

अमेरिकेचे तटरक्षक दल, जपानचे  तटरक्षक दल, ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्स आणि भारतीय तटरक्षक 2025 मध्ये हिंद-प्रशांतमध्ये आंतर-परिचालनक्षमता सुधारण्यासाठी प्रथमच क्वाड-ॲट-सी शिप ऑब्झर्व्हर मिशन  सुरू करण्याची योजना आखत आहेत. या प्रयत्नाद्वारे, जपानचे तटरक्षक, ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्स आणि भारतीय तटरक्षक दलाचे सदस्य हिंद-प्रशांतमध्ये कार्यरत असलेल्या  अमेरिकी तटरक्षक जहाजावर काही काळ घालवतील. क्वाड हिंद-प्रशांतमध्ये पुढील मिशन्स सुरू ठेवण्याचा विचार करत आहे.

गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा

कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, प्रादेशिक क्षमता निर्माण करण्यासाठी आणि गंभीर गरजा पूर्ण करण्यासाठी क्वाड प्रदेशाला गुणवत्तापूर्ण, लवचिक पायाभूत सुविधा पुरवत आहे.

या वर्षी, क्वाड देशांच्या निर्यात कर्ज संस्थेने(ECAs) एका सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे आणि त्याची अंमलबजावणी करत आहेत, जो हिंद-प्रशांतमध्ये पुरवठा साखळीची लवचिकता, अतिशय महत्त्वाचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा  आणि इतर उच्च-गुणवत्तेच्या प्रकल्पांना पाठबळ देतो. क्वाड ECAs हिंद-प्रशांत प्रदेशातील प्रकल्पांसाठी पाइपलाइन माहिती आणि संबंधित वित्तपुरवठा तरतुदीवर समन्वय मजबूत करत आहेत आणि उद्योग तज्ञ, प्रकल्प विकासक आणि इतर प्रमुख उद्योगांचा समावेश असलेले संयुक्त व्यवसाय प्रोत्साहन प्रयत्न करतील.

क्वाडने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विकास आणि तैनातीसाठी संयुक्त तत्त्वे  जारी केली, ज्यामुळे सामायिक प्रगती साधण्यासाठी समावेशक, खुल्या, टिकाऊ, न्याय्य, सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी क्वाडची वचनबद्धता अधोरेखित होते.

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या युतीने ऊर्जा क्षेत्रातील लवचिकता मजबूत करण्याच्या उद्देशाने हिंद - प्रशांत क्षेत्रातील भागीदारांना सक्षम करण्यासाठी भारतात एक कार्यशाळा आयोजित केली होती.

भविष्यातील भागीदारीची क्वाड बंदरे

भविष्यातील भागीदारीतील क्वाड बंदरे प्रादेशिक भागीदारांच्या सहकार्याने हिंद - प्रशांत क्षेत्र ओलांडून शाश्वत आणि लवचिक बंदर पायाभूत सुविधांच्या विकासाला समर्थन देण्यासाठी क्वाडच्या कौशल्याचा उपयोग करेल.

2025 मध्ये, क्वाड भागीदारांची पहिली प्रादेशिक बंदरे आणि वाहतूक परिषद भारतातील मुंबई या शहरात आयोजित करण्याचा मानस आहे.

या नवीन भागीदारीद्वारे, क्वाड भागीदारांचा समन्वय, माहितीची देवाणघेवाण, प्रदेशातील भागीदारांसोबत सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याचा आणि हिंद - प्रशांत क्षेत्रातील दर्जेदार बंदर पायाभूत सुविधांमध्ये सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक एकत्रित करण्यासाठी संसाधनांचा लाभ घेण्याचा विचार आहे.

क्वाड पायाभूत सुविधा शिष्यवृत्ती

क्वाड नेत्यांची शिखर परिषद -2023 मध्ये, क्षमता सुधारण्यासाठी तसेच संपूर्ण क्षेत्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये परदेशी गुंतवणूक आरेखित, व्यवस्थापित आणि आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक जाळे अधिक दृढ  करण्यासाठी क्वाड पायाभूत सुविधा शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली.  गेल्या वर्षभरात ही शिष्यवृत्ती 2,200 पेक्षा जास्त तज्ञांपर्यंत पोहोचली आहे आणि क्वाड भागीदारांनी या आधीच 1,300 हून अधिक शिष्यवृत्ती प्रदान केल्या आहेत.

समुद्राखालील केबल्स आणि डिजिटल संपर्क सुविधा

क्वाड देश क्वाड भागीदारीद्वारे केबल संपर्क सुविधा आणि लवचिकतेसाठी, हिंद - प्रशांत क्षेत्रात  समुद्राखालील गुणवत्तापूर्ण केबल नेटवर्कला सहयोग करत आहेत आणि हे जाळे मजबूत बनवत आहेत. कारण केबल नेटवर्कची  क्षमता, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता या क्षेत्राच्या आणि जगाच्या सुरक्षितता तसेच समृद्धीशी अतूटपणे जोडलेली आहे. 

या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियाने जुलैमध्ये केबल संपर्क सुविधा आणि लवचिकता केंद्र सुरू केले, जे या क्षेत्रातील देशांना त्यांच्या विनंतीवरून कार्यशाळा आयोजित करुन धोरण आणि नियामक सहाय्य प्रदान करत आहे.

जपानने विशेष संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने हिंद - प्रशांत क्षेत्रात संपर्क सुविधा आणि लवचिकता वाढविण्यासाठी क्षमता निर्माण प्रशिक्षण आयोजित केले आहे. जपानमधील नौरू आणि किरिबाती शहरांमध्ये समुद्राखालील केबलसाठी सार्वजनिक माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान पायाभूत सुविधा व्यवस्थापन क्षमता सुधारण्यासाठी तांत्रिक सहकार्य वाढवण्याचा जपानचा मानस आहे.

अमेरिकेने भारत - प्रशांत क्षेत्रात 25 देशांतील दूरसंचार अधिकारी आणि प्रतिनिधींसाठी 1,300 हून अधिक क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले; आज अमेरिकेने या प्रशिक्षण कार्यक्रमाचा विस्तार आणि प्रचार करण्यासाठी अतिरिक्त 3.4 दशलक्ष डॉलर्स गुंतवून प्रतिनिधींसोबत काम करण्याचा आपला मनोदय जाहीर केला आहे.

क्वाड भागीदारांद्वारे केबल प्रकल्पांमधील गुंतवणुकीमुळे 2025 च्या अखेरपर्यंत प्रशांत क्षेत्रातील सर्व बेट देशांना प्राथमिक दूरसंचार केबल संपर्क सुविधा साध्य करण्यात मदत करेल. क्वाड नेत्यांच्या मागील शिखर परिषदेपासून क्वाड भागीदारांनी इतर समविचारी भागीदारांच्या योगदानातून प्रशांत महासागर क्षेत्रात समुद्राखाली केबल टाकण्यासाठी 140 दशलक्ष डॉलर्स पेक्षा अधिक निधी देण्यासाठी वचनबद्धता दर्शविली आहे.

समुद्राखालील या नव्या केबल्समधील गुंतवणुकीला पूरक म्हणून, भारताने हिंद - प्रशांत क्षेत्रात समुद्राखालील केबल देखभाल आणि दुरुस्ती क्षमतेच्या विस्ताराचे परीक्षण करण्यासाठी एक व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे.

महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान

तंत्रज्ञान नवोन्मेषात आघाडीवर राहण्यासाठी क्वाड विशिष्ट टप्प्यांमध्ये काम करत आहे, आणि हिंद - प्रशांत क्षेत्रातील लोकांच्या फायद्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तसेच आर्थिक समृद्धी, मोकळेपणा आणि संपर्क सुविधा सुलभ करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास वचनबद्ध आहे.

ओपन रेडिओ ऍक्सेस नेटवर्क (आरएएन) आणि 5G

2023 मध्ये, क्वाड भागीदारांनी सुरक्षित, लवचिक आणि परस्परसंबंधित दूरसंचार परिसंस्थेला समर्थन देण्यासाठी प्रशांत क्षेत्रातील पलाऊमध्ये प्रथम-ओपन आरएएन तैनातीची घोषणा केली.  तेव्हापासून, क्वाडने या प्रयत्नासाठी सुमारे 20 दशलक्ष डॉलर्स निधी देण्यासाठी वचनबद्धता दर्शविली आहे. या उपक्रमाच्या आधारे, क्वाडने विश्वसनीय तंत्रज्ञान पर्याय वितरित करण्यासाठी ओपन आरएएन सहकार्याचा विस्तार करण्याची घोषणा केली.

अमेरिका आणि जपानने दिलेल्या वचनानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या सुमारे 8 दशलक्ष डॉलर्सच्या निधीच्या आधारावर, फिलीपिन्समध्ये सुरू असलेल्या ओपन आरएएन फील्ड ट्रायल्स आणि आशिया ओपन आरएएन अकादमी (AORA) या संस्थांचा विस्तार वाढवण्याची क्वाडची योजना आहे.

याशिवाय, आशिया ओपन आरएएन अकादमीच्या (AORA) जागतिक विस्ताराला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेने 7 दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये दक्षिण आशियायी देशांमध्ये भारतीय संस्थांच्या भागीदारीत, मोठ्या प्रमाणावर ओपन आरएएन कामगार प्रशिक्षण उपक्रम हाती घेणे समाविष्ट आहे.

आग्नेय आशियात अतिरिक्त ओपन आरएएन प्रकल्प सुरू करण्याच्या संधीचेही क्वाड भागीदार देशांनी स्वागत केले आहे.

देशव्यापी 5G तैनातीसाठी देशाची तयारी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने क्वाड भागीदार तुवालु दूरसंचार कॉर्पोरेशन बरोबर सहयोगाची शक्यता पडताळून पाहत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

2023 मधील क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत घोषित केलेल्या नेक्स्टजेन ॲग्रिकल्चर (AI-ENGAGE) उपक्रमाच्या सशक्तीकरणासाठी ॲडव्हान्सिंग इनोव्हेशन्स या उपक्रमाद्वारे, क्वाड सरकारे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि सेन्सिंगचा उपयोग करण्यासाठी अत्याधुनिक सहयोगी संशोधन अधिक गहन करत आहेत, ज्यामुळे हिंद - प्रशांत क्षेत्रातील कृषी विषयक दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात मदत होईल. क्वाड देशांनी संयुक्त संशोधनासाठी सुरुवातीला 7.5 दशलक्ष डॉलर्स हून अधिक निधीची घोषणा केली आहे. तसेच संशोधन समुदायांना जोडण्यासाठी आणि सामायिक संशोधन तत्त्वे पुढे नेण्यासाठी चार देशांच्या विज्ञान संस्थांच्या सहकार्याच्या करारावर अलीकडेच स्वाक्षरी केल्याचे अधोरेखित केले आहे.

हिरोशिमा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्रिया, जीपीएआय नवी दिल्ली मंत्रिस्तरीय घोषणा 2023, आणि "शाश्वत विकासासाठी सुरक्षित, संरक्षित आणि विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली संधींचा फायदा घेण्यासंदर्भात” संयुक्त राष्ट्र आम सभेचा ठराव 78/625 यांच्या निष्कर्षासह, सुरक्षित, संरक्षित आणि विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना पुढे नेण्याचे महत्त्व क्वाड ने ओळखले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन आराखड्यामधील आंतरकार्यान्वयनावर  आंतरराष्ट्रीय सहकार्य आणखी वाढवण्याचा प्रयत्न क्वाडद्वारे केला जात आहे.

क्वाड देशांनी, मानक उप-गटाद्वारे, कृत्रिम बुद्धिमत्ता अनुरूप मूल्यांकनासाठी आराखड्यासह आंतरराष्ट्रीय मानकीकरण सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित दोन ट्रॅक 1.5 संवाद सुरू केला आहे.

जैवतंत्रज्ञान

क्वाडच्या चारही सदस्य देशांमधील जैविक परिसंस्थांचा अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रारंभिक 2 दशलक्ष डॉलर्स निधीद्वारे समर्थित संयुक्त प्रयत्न म्हणून क्वाड भागीदार देश जैवशोधक उपक्रमाचा प्रारंभ करण्यास उत्सुक आहेत. या उपक्रमामुळे सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविध क्षमतांचा शोध आणि वापर करण्याची आपली क्षमता विकसित करण्यात मदत होईल ज्यामुळे रोगांचे निदान आणि उपचार करण्याची क्षमता, रोग संक्रमण सहन करु शकणारी पिके विकसित करणे, स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे आणि इतर बरेच काही करण्याची क्षमता असलेली नवीन उत्पादने आणि नवोन्मेष प्राप्त होईल.  संपूर्ण क्वाड राष्ट्रांमध्ये तांत्रिक क्षमता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असेल.

हा प्रकल्प गहन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील  संशोधन आणि विकास सहयोगासाठी आगामी क्वाड तत्त्वांद्वारे देखील अधोरेखित केला जाईल, जे क्वाड आणि संपूर्ण क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञान आणि इतर गहन तंत्रज्ञानामध्ये शाश्वत, जबाबदार, सुरक्षित आणि संरक्षित सहयोग वाढवते.

सेमीकंडक्टर

सेमीकंडक्टर पुरवठा साखळीच्या आकस्मिक नेटवर्कसाठी सेमीकंडक्टर पुरवठा साखळी जोखमींना तोंड देण्याच्या उद्देशाने सहकार्य करण्यासाठी सहकार्याच्या करार दस्तऐवजाला अंतिम रूप देण्याच्या कृतीचे क्वाड नेत्यांनी स्वागत केले आहे.

क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क

क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क (QUIN) हा 2023 च्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत सुरू करण्यात आलेला ना-नफा ना-तोटा तत्वाधारित उपक्रम आहे. क्वाड देशांतील गुंतवणूकदार, उद्योजक, तंत्रज्ञ आणि सार्वजनिक संस्थांना एकत्र आणून, क्वाडच्या सामायिक मूल्यांशी संरेखित करणाऱ्या आणि आर्थिक वाढ, लवचिकतेला आणि प्रादेशिक स्थिरतेला चालना देणाऱ्या नवोन्मेषाला समर्थन देण्यासाठी संपूर्ण हिंद - प्रशांत क्षेत्रातील गहन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील गुंतवणुकीला गती देणे हे क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्कचे उद्दिष्ट आहे. या वर्षी, क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क ने क्वाड देशातील महत्त्वपूर्ण खनिजे, नवीकरणीय ऊर्जा, सायबरसुरक्षा आणि अंतराळ क्षेत्रातील दहा प्रमुख धोरणात्मक गुंतवणूक आणि भागीदारींना सहकार्य केले आहे.

क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क ने नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि उदयोन्मुख स्टार्टअप्ससाठी गुंतवणूक भागीदारी सुलभ करण्यासाठी अतिरिक्त आराखडा विकसित केले आहेत, ज्यात टोकियोमध्ये क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क आणि चिबा तंत्रज्ञान संस्था या मूलगामी परिवर्तन केंद्राद्वारे समर्थित स्टार्टअप संकुलाच्या निर्मितीसाठी सामंजस्य कराराला अंतिम रूप देण्याचा समावेश आहे.

टोकियो विद्यापीठ, नॉर्थईस्टर्न विद्यापीठ आणि क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क यांच्यातील सहकार्याद्वारे टोकियोमध्ये नवीन उपक्रम प्रवेगक स्थापन करण्यासाठी देखील क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क काम करत आहे.  हे सहकार्य केवळ तांत्रिक प्रगतीला चालना देणार नाही तर क्वाड राष्ट्रांमधील आर्थिक संबंध बळकट करेल, तसेच हिंद - प्रशांत क्षेत्राला अधिक एकात्मिक आणि लवचिक बनवण्यात योगदान देईल.

याशिवाय, क्वाड इन्व्हेस्टर्स नेटवर्क ने क्वांटम सेंटर ऑफ एक्सलन्स विकसित केले आहे. या केंद्राने या वर्षी एक अहवाल तयार केला आहे, ज्यात प्रत्येक क्वाड देशाची क्वांटम परिसंस्था भांडवल आणि कौशल्याचा लाभ घेण्यासाठी एकत्र काम करू शकते, असे नमूद केले आहे.

हवामान आणि स्वच्छ ऊर्जा

क्वाडने जगाला, हिंद-प्रशांत आणि विशेषत: प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर क्षेत्रातील बेट राष्ट्रांना हवामान बदलाचा अस्तित्वात असलेला धोका ओळखला आहे आणि हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी, स्वच्छ ऊर्जा नवोन्मेष आणि त्याचा अवलंब आणि शाश्वत विकासाचे समर्थन आणि  बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाकांक्षी पावले उचलत आहेत.

हवामान अनुकूलन

2023 मध्ये झालेल्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत घोषित करण्यात आलेल्या आगाऊ इशारा प्रणाली आणि हवामान माहिती सेवा (CIS) उपक्रमाचा विस्तार करण्याचा क्वाडचा मानस आहे. या उपक्रमामुळे प्रशांत महासागरातील बेट देशांना उच्च-गुणवत्तेचा हवामान डेटा आणि सेवांची उपलब्धता होण्यास मदत मिळेल तसेच हवामान बदल आणि त्याचे परिणाम याची तयारी आणि प्रतिसाद देण्याची भागीदारांची क्षमता वाढेल.

अमेरिकेने 2025 मध्ये प्रशांत क्षेत्राच्या स्थानिक हवामान आणि हवामान अंदाजांना समर्थन देण्यासाठी 3D-मुद्रित स्वयंचलित हवामान केंद्रे प्रदान करण्याची योजना आखली आहे, तसेच हे तंत्रज्ञान विकसित आणि तैनात करण्यासाठी प्रादेशिक केंद्र चालविण्याच्या उद्दिष्टासह फिजीमधील तज्ञांना प्रशिक्षित केले आहे.

ऑस्ट्रेलिया ‘वेदर रेडी पॅसिफिक’च्या माध्यमातून आगाऊ इशारा प्रणाली बळकट करत आहे. हा प्रशांत क्षेत्राच्या नेतृत्वातील उपक्रम असून याला 2021 मध्ये पॅसिफिक आयलँड्स फोरम च्या नेत्यांनी समर्थन दिले आहे. पॅसिफिक आयलँड्स फोरम प्रशांत क्षेत्रामध्ये EWS4ALL UN उपक्रम चालवतो आणि वितरित करतो.

जपान आपल्या "पॅसिफिक क्लायमेट रेझिलिन्स इनिशिएटिव्ह" अंतर्गत प्रशांत क्षेत्रातील बेट देशांसोबत, इतर गोष्टींबरोबरच, उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे आपत्ती जोखीम कमी करणे आणि सज्जता मजबूत करणे आणि क्षमता वाढवणे आणि नवीकरणीय ऊर्जा स्थापित करून स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे यातून सहकार्य वाढवत आहे.

किरिबाती, सामोआ, सॉलोमन बेटे, टोंगा आणि वनातु येथील तज्ञांना वेळेवर आणि अचूक इशारे देण्यासाठी, अचानक येणाऱ्या पुरामुळे होणारे मानवी आणि आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी, पुरांचे चांगल्या प्रकारे निरीक्षण आणि अंदाज देण्यासाठी प्रशिक्षण देण्याची देखील क्वाडची योजना आहे. 

स्वच्छ ऊर्जा

उच्च दर्जाची, वैविध्यपूर्ण स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी तयार करण्यासाठी धोरणे, प्रोत्साहने, मानके आणि गुंतवणुकीसाठी आमचे सहकार्य मजबूत करण्याचा आमच्या देशांचा हेतू आहे ज्यामुळे आमची सामूहिक ऊर्जा सुरक्षितता वाढेल, संपूर्ण प्रदेशात नवीन आर्थिक संधी निर्माण होतील आणि जगभरातील, विशेषतः हिंद- प्रशांत क्षेत्रातील स्थानिक कामगार आणि समुदायांना फायदा होईल. सहयोगी आणि भागीदार देशातील स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळींमध्ये पूरक आणि उच्च-मानक खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक उत्प्रेरित करण्याची आमची बांधिलकी कार्यान्वित करण्यासाठी आम्ही धोरण आणि सार्वजनिक वित्त यांद्वारे एकत्र काम करू. आम्ही बॅटरी पुरवठा साखळीमध्ये क्वाड भागीदारांनी सामायिक केलेल्या अद्वितीय पूरक क्षमता जाणून आमच्या संबंधित उद्योगांमध्ये खनिज उत्पादन, पुनर्वापर आणि बॅटरी उत्पादन बळकट करण्यासाठी नजीकच्या काळात प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रतिज्ञा करतो.

क्वाड नेत्यांनी गेल्या वर्षी क्वाड क्लीन एनर्जी सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन कार्यक्रमाची घोषणा केली होती. हिंद-प्रशांत प्रदेशात सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळींच्या विकासास समर्थन देणे हा त्याचा उद्देश आहे. ऑस्ट्रेलिया नोव्हेंबरमध्ये क्वाड स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी विविधीकरण कार्यक्रमासाठी प्रवेशिका खुल्या करेल. सौर पॅनेल, हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर आणि बॅटरी पुरवठा साखळी विकसित करणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी 50 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर प्रदान करेल. सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी हा हिंद-प्रशांत क्षेत्राची सामूहिक ऊर्जा सुरक्षा, उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट आणि निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या भविष्यात संक्रमणाचा अविभाज्य भाग आहे.

भारत फिजी, कोमोरोस, मादागास्कर आणि सेशेल्समध्ये नवीन सौर प्रकल्पांमध्ये 2 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहे.

जपानने हिंद-प्रशांत प्रदेशातील सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये 122 दशलक्ष डॉलर अनुदान आणि कर्जापोटी देण्याचे मान्य केले आहे.

डीएफसी मार्फत अमेरिकेने टाटा पॉवर सोलरला सौर सेल निर्मिती सुविधा उभारण्यासाठी 250 दशलक्ष डॉलर कर्ज आणि फर्स्ट सोलरला भारतात सौर मॉड्यूल निर्मिती सुविधा उभारण्यासाठी आणि तिच्या कार्यान्वयनासाठी 500 दशलक्ष डॉलर कर्ज दिले असून क्षमता वाढवण्यासाठी आणि पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्यासाठी सौर, तसेच पवन, शीतकरण, बॅटरी आणि दुर्मिळ खनिजे याकरिता खाजगी भांडवल प्रदान करण्यासाठी संधींचा सातत्याने धांडोळा घेत आहे.

क्वाडने ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी उपक्रमाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये परवडणाऱ्या, उच्च-कार्यक्षमतेच्या, शीतकरण प्रणालीची तैनाती आणि निर्मिती समाविष्ट आहे, ज्यामुळे हवामान-संवेदनशील समुदायांना वाढत्या तापमानाशी जुळवून घेता येईल आणि त्याच वेळी विद्युत ग्रीडवरील ताण कमी होईल. या प्रयत्नासाठी तांत्रिक सहाय्य वित्तपुरवठा म्हणून प्रारंभिक 1.25 दशलक्ष डॉलर गुंतवण्याचा अमेरिकेचा मानस आहे.

सायबर सुरक्षा

क्वाड देश आणि भागीदारांसाठी अधिक लवचिक, सुरक्षित आणि पूरक सायबर सुरक्षा वातावरण तयार करण्यासाठी क्वाड राष्ट्रसमूह एकत्र काम करत आहे.

क्वाड ने भविष्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी, जागतिक वाणिज्य आणि समृद्धीकरिता क्वाडच्या सामायिक दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी, वाणिज्यिक समुद्राखालील दूरसंचार केबल्सचे संरक्षण करण्यासाठी क्वाड कृती योजना [विकसित/जारी] केली आहे.

क्वाडच्या 2023 सुरक्षित सॉफ्टवेअर संयुक्त तत्त्वांमध्ये मान्यता दिल्याप्रमाणे, सुरक्षित सॉफ्टवेअर विकास मानके आणि प्रमाणीकरणाचा पाठपुरावा करण्यात क्वाडच्या वचनबद्धतेचा विस्तार करण्यासाठी क्वाड देश सॉफ्टवेअर उत्पादक, उद्योग व्यापार गट आणि संशोधन केंद्रांसह भागीदारी करत आहेत.

क्वाड भागीदार सरकारी नेटवर्कसाठी सॉफ्टवेअरचा विकास, खरेदी आणि अंतिम वापर अधिक सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठीच नव्हे तर आमच्या पुरवठा साखळी, डिजिटल अर्थव्यवस्था आणि समाजांची सायबर लवचिकता एकत्रितपणे सुधारली जाण्यात मानकांच्या सुसंगतीसाठी कार्य करतील.

या संपूर्ण प्रवाहा दरम्यान, प्रत्येक क्वाड देश जबाबदार सायबर परिसंस्था, सार्वजनिक संसाधने आणि सायबर सुरक्षा जागरूकता यांना प्रोत्साहन देणारे वार्षिक क्वाड सायबर आव्हान निदर्शक म्हणून कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखत आहे. या वर्षीच्या सायबर आव्हान मोहिमेमध्ये जागतिक सायबर सुरक्षा व्यावसायिकांची संख्या आणि विविधता वाढवण्यासाठी करिअर मार्ग कार्यक्रम स्थापन करण्यावर भर दिला जाईल, ज्यात या झपाट्याने विस्तारणाऱ्या क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग असेल. गेल्या वर्षीच्या क्वाड सायबर चॅलेंजमध्ये हिंद-प्रशांत प्रदेशातील 85,000 हून अधिक सहभागींचा समावेश होता.

क्वाड सायबर बूटकॅम्प आणि फिलीपिन्समधील सायबर क्षमता बांधणीवरील आंतरराष्ट्रीय परिषद यांसारखे क्षमता निर्माण प्रकल्प हे हिंद-प्रशांत प्रदेशात सायबर सुरक्षा आणि मनुष्यबळ विकासाला चालना देण्यात महत्त्वाचे उपक्रम आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा आणि महत्वाच्या पायाभूत सुविधा नेटवर्कच्या संरक्षणातील भिन्नता ओळखून ती कमी करण्यासाठी आणि सामायिक प्राधान्यक्रमांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण सायबर सुरक्षा घटनांवरील सायबर धोक्याची माहिती सामायिक करण्यासाठी धोरणात्मक प्रतिसादांसह अधिक लक्षपूर्वक समन्वय साधण्याचे संयुक्त प्रयत्न क्वाड करत आहे.

अपप्रचाराचे खंडन

क्वाड एक संवेदनक्षम माहिती वातावरण वाढवण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे, ज्यात अपप्रचाराचे खंडन करणाऱ्या कार्यगटाचा समावेश आहे. हा कार्यगट माध्यम स्वातंत्र्याचे समर्थन करतो तसेच विश्वासार्हता कमी करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायात मतभेद निर्माण करणाऱ्या अपप्रचारासह विदेशी माहितीच्या फेरफार आणि हस्तक्षेपाचे खंडन करतो.

नागरिकांमधील परस्पर संबंध

क्वाड देश त्यांच्या लोकांमध्ये चिरस्थायी संबंध निर्माण करत आहेत. सायबर सुरक्षा, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी मनुष्यबळ विकास, एसटीईएम मधील महिला, सरकारी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, अपप्रचाराचे खंडन आणि प्रादेशिक सागरी प्रशासन या विषयांवर क्वाड देशांतील हितधारक हे आंतरराष्ट्रीय अभ्यागत नेतृत्व कार्यक्रम (आयव्हीएलपी) आणि इतर चर्चासत्रात सहभागी झाले आहेत.

क्वाड फेलोशिप

क्वाड फेलोशिपच्या अंमलबजावणीत अग्रणी असलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेसोबत, क्वाड सरकार क्वाड फेलोच्या दुसऱ्या गटाचे आणि प्रथमच आसियान देशांमधील विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी कार्यक्रमाच्या विस्ताराचे स्वागत करते. क्वाड फेलोना जपानमध्ये अभ्यास करण्यास सक्षम करण्यासाठी जपान सरकार या कार्यक्रमास पाठबळ देत आहे. पुढील फेलो गटासाठी गुगल, प्रॅट फाउंडेशन आणि वेस्टर्न डिजिटल यासह खाजगी क्षेत्रातील भागीदारांच्या उदार समर्थनाचे क्वाड स्वागत करते.

आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेद्वारे ऑक्टोबरमध्ये वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित क्वाड फेलोशिप शिखर परिषदेसाठी क्वाड उत्सुक आहे.

नागरिकांमधील परस्पर अतिरिक्त पुढाकार

हिंद-प्रशांत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या अनुदानित तांत्रिक संस्थेमध्ये 4 वर्षांचा पदवीपूर्व अभियांत्रिकी कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी 500,000 डॉलर मूल्याच्या पन्नास क्वाड शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी भारताने एक नवीन उपक्रम जाहीर केला.

अंतराळ

क्वाड हिंद-प्रशांत मध्ये अंतराळाशी संबंधित अनुप्रयोग आणि तंत्रज्ञानाचे आवश्यक योगदान जाणते. चार देशांनी पृथ्वी निरीक्षण डेटा आणि इतर अंतराळ-संबंधित अनुप्रयोग जारी करणे सुरू ठेवण्याची योजना आखली आहे ज्यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांना हवामान पूर्वानुमान प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकूल हवामानाचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी मदत होईल.

भारताने मॉरिशससाठी अंतराळ-आधारित वेब पोर्टलची निर्मिती केल्याचे क्वाड स्वागत करते, ज्यामुळे प्रतिकूल हवामान परिस्थिती आणि हवामानाच्या प्रभावाच्या अंतराळ-आधारित निरीक्षणासाठी मुक्त विज्ञान संकल्पनेला समर्थन मिळेल.

अंतराळ परिस्थितीजन्य जागरूकता उपक्रम

अंतराळ वातावरणाच्या शाश्वततेसाठी क्वाड भागीदार देश हे अंतराळ परिस्थितीजन्य जागरूकता (एसएसए) उपक्रमात कौशल्य आणि अनुभव सामायिक करू इच्छितात. एसएसए आणि नागरी क्षेत्रामध्ये अंतराळ वाहतूक समन्वय क्षमतांचा लाभ घेण्याचा या सहकार्याचा उद्देश आहे. यात बाह्य अवकाशातील टक्कर टाळण्यात मदत करणे आणि अंतराळ कचऱ्याचा ढिगारा व्यवस्थापित करणे समाविष्ट आहे.

दहशतवादाचा मुकाबला

क्वाड ने 2023 मध्ये त्याच्या पहिल्या काउंटर टेररिझम वर्किंग ग्रुप (सिटीडब्ल्यूजी) अर्थात दहशतवाद प्रतिबंधक कार्यगटाचे आयोजन केले होते आणि सीटी धोके, क्वाड सीटी सद्वर्तन आणि माहितीची देवाणघेवाण, परिणाम व्यवस्थापन आणि धोरणात्मक संदेशाद्वारे दहशतवादी कृत्ये कमी करण्यासाठी एकत्रितपणे कसे कार्य करता येईल चर्चा करण्यासाठी क्वाड देश दरवर्षी भेटतील. क्वाड सिटीडब्ल्यूजी सध्या मानवरहित हवाई प्रणाली (सी-युएएस), रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर उपकरणे (सीबीआरएन) आणि दहशतवादी हेतूंसाठी इंटरनेटचा वापर रोखण्यावर लक्ष केंद्रित करते. क्वाड सिटीडब्ल्यूजी सहयोग करावयाच्या नवीन दहशतवाद प्रतिबंधक प्रयत्नांवर चर्चा करते, दहशतवाद प्रतिबंधक सद्वर्तन प्रस्थापित करण्यासाठी तांत्रिक कार्यशाळा आयोजित करते आणि क्वाड-स्थापित दहशतवाद प्रतिबंधक कौशल्यासह क्वाड सदस्य नसलेल्या देशांना संलग्न करण्याच्या मार्गांचा धांडोळा घेते.

 

* * *

शैलेश पाटील, Editor/शैलेश पाटील,translation/श्रद्धा मुखेडकर/वासंती जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179587) Visitor Counter : 5