पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी धन्वंतरी जयंती आणि 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त आरोग्य क्षेत्राशी संबंधित 12,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
आयुष्मान भारत पीएम-जेएवाय (PM-JAY) अंतर्गत 70 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आरोग्य सेवेच्या विस्तार योजनेचा पंतप्रधान शुभारंभ करणार
आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान विविध आरोग्यसेवा संस्थांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार
भारतातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार
आरोग्यसेवा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा नवोन्मेशी वापर वाढवण्यासाठी, पंतप्रधान 11 तृतीय आरोग्यसेवा संस्थांमध्ये ड्रोन सेवा सुरू करणार
आरोग्य सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या उद्देशाने डिजिटल उपक्रमांना चालना देण्यासाठी, पंतप्रधान गर्भवती महिला आणि बालकांना लाभदायक ठरणाऱ्या लसीकरण प्रक्रियेचे डिजिटलीकरण करणाऱ्या यू-विन (U-WIN) पोर्टलचा शुभारंभ करणार
मेक इन इंडियाच्या दृष्टीकोनाला अनुसरून, वैद्यकीय उपकरणे आणि मोठ्या प्रमाणातील औषधांसाठी पीएलआय योजनेअंतर्गत पाच प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करणार
आरोग्य सेवा क्षेत्रातील संशोधन आणि विकास तसेच चाचणीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पंतप्रधान विविध उपक्रमांचा शुभारंभ करणार
Posted On:
28 OCT 2024 12:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता धन्वंतरी जयंती आणि 9 व्या आयुर्वेद दिनानिमित्त आरोग्य क्षेत्राशी संबंधित सुमारे 12,850 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम-जेएवाय) या महत्वाकांक्षी योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी, 70 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा सुविधांचा विस्तार करणाऱ्या योजनेचा पंतप्रधान शुभारंभ करतील. यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न कितीही असले तरी, आरोग्य सेवा संरक्षण प्रदान करता येईल.
पंतप्रधानांचा देशभरात दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याचा सातत्त्याने प्रयत्न राहिला आहे. आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी पंतप्रधान विविध आरोग्य सेवा संस्थांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधान भारतातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करतील. यामध्ये पंचकर्म रुग्णालय, औषध निर्मितीसाठी आयुर्वेदिक फार्मसी, स्पोर्ट्स मेडिसिन युनिट, सेंट्रल लायब्ररी, आयटी आणि स्टार्ट-अप इनक्युबेशन सेंटर आणि 500 आसनक्षमतेचे सभागृह यासह इतर उपक्रमांचा समावेश आहे. पंतप्रधान मध्य प्रदेशातील मंदसौर, नीमच आणि सिवनी येथे तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही करतील. याशिवाय, ते हिमाचल प्रदेशातील बिलासपूर, पश्चिम बंगालमधील कल्याणी, बिहारमधील पाटणा, उत्तर प्रदेशातील गोरखपूर, मध्य प्रदेशातील भोपाळ, आसाममधील गुवाहाटी आणि नवी दिल्लीतील विविध एम्समधील सुविधा आणि सेवा विस्तारांचे उद्घाटन करतील. यामध्ये जनऔषधी केंद्राचाही समावेश आहे. पंतप्रधान छत्तीसगडमधील बिलासपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉक आणि ओडिशातील बारगढ येथे क्रिटिकल केअर ब्लॉकचे उद्घाटन देखील करतील.
पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन (पीएम-एबीएचआयएम) अंतर्गत, मध्य प्रदेशातील शिवपुरी, रतलाम, खंडवा, राजगड आणि मंदसौर येथे पाच नर्सिंग महाविद्यालयांची, तसेच हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, तामिळनाडू आणि राजस्थान येथे 21 क्रिटिकल केअर ब्लॉकची आणि नवी दिल्लीतील एम्स आणि हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील अनेक आरोग्य सुविधा आणि सेवांच्या विस्तार प्रकल्पांची पायाभरणी करतील. पंतप्रधान मध्य प्रदेशातील इंदूर येथे ईएसआयसी रुग्णालयाचे उद्घाटन करतील आणि हरियाणातील फरिदाबाद, कर्नाटकातील बोम्मासंद्रा आणि नरसापूर, मध्य प्रदेशातील इंदूर, उत्तर प्रदेशातील मेरठ आणि आंध्र प्रदेशातील अचुतापुरम येथे ईएसआयसी रुग्णालयांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमुळे सुमारे 55 लाख ईएसआय लाभार्थ्यांना आरोग्य सेवांचा लाभ मिळेल.
सर्व क्षेत्रांमध्ये सेवा वितरणाचा विस्तार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला पंतप्रधानांनी नेहमीच समर्थन दिले आहे. आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, म्हणून सेवा वितरण वाढवण्याकरता ड्रोन तंत्रज्ञानाचा नवोन्मेशी वापर करत, पंतप्रधान 11 तृतीय आरोग्य सेवा संस्थांमध्ये ड्रोन सेवांचा शुभारंभ करतील. यामध्ये उत्तराखंडमधील एम्स ऋषिकेश, तेलंगणातील एम्स बीबीनगर, आसाममधील एम्स गुवाहाटी, मध्य प्रदेशातील एम्स भोपाळ, राजस्थानमधील एम्स जोधपूर, बिहारमधील एम्स पाटणा, हिमाचल प्रदेशातील एम्स बिलासपूर, उत्तर प्रदेशातील एम्स रायबरेली, छत्तीसगडमधील एम्स रायपूर, आंध्र प्रदेशातील एम्स मंगलगिरी आणि मणिपूरमधील आरआयएमएस इम्फाल, या संस्थांचा यात समावेश आहे. पंतप्रधान एम्स ऋषिकेश येथे हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा शुभारंभ करतील. यामुळे जलद गतीने वैद्यकीय सेवा मिळायला मदत होईल.
पंतप्रधान यु-विन (U-WIN) पोर्टलचा शुभारंभ करतील. लसीकरण प्रक्रियेचे पूर्णपणे डिजिटलीकरण झाल्यामुळे गर्भवती महिला आणि अर्भकांना याचा फायदा होईल. यामुळे गर्भवती महिला आणि मुलांना (जन्मापासून ते 16 वर्ष) लसींनी रोखता येणाऱ्या 12 आजारांविरोधात जीवनरक्षक लसी वेळेवर मिळण्याची खात्री होईल. याशिवाय, पंतप्रधान सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिक आणि संस्थांसाठी एक पोर्टल देखील सुरू करतील. हे सध्या कार्यरत असलेले आरोग्य सेवा व्यावसायिक आणि संस्थांचा केंद्रीकृत डेटाबेस म्हणून काम करेल.
पंतप्रधान देशातील आरोग्यसेवा परिसंस्था सुधारण्यासाठी संशोधन आणि विकास तसेच चाचणीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. पंतप्रधान ओडिशातील भुवनेश्वरमधील गोठापटना येथे केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन करतील.
ते ओडिशातील खोरधा आणि छत्तीसगडमधील रायपूर येथे योग आणि निसर्गोपचार क्षेत्रातील दोन केंद्रीय संशोधन संस्थांची पायाभरणी करतील. ते गुजरातमधील एनआयपीईआर अहमदाबाद येथे वैद्यकीय उपकरणांसाठी, तेलंगणातील एनआयपीईआर हैदराबाद येथे मोठ्या प्रमाणातील औषधांसाठी, आसाममधील एनआयपीईआर गुवाहाटी येथे फायटोफार्मास्युटिकल्ससाठी आणि पंजाबमधील एनआयपीईआर मोहाली येथे अँटी-बॅक्टेरियल अँटी-व्हायरल औषधांचा शोध आणि विकासासाठी, अशा एकूण चार उत्कृष्टता केंद्रांची पायाभरणी करतील.
पंतप्रधान चार आयुष उत्कृष्टता केंद्रांचा शुभारंभ करतील. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे मधुमेह आणि चयापचय विकारांसाठी उत्कृष्टता केंद्र, आयआयटी दिल्ली येथे रसौषधींसाठी प्रगत तांत्रिक उपाय, स्टार्ट-अप समर्थन आणि निव्वळ शून्य शाश्वत उपायांसाठी शाश्वत आयुष उत्कृष्टता केंद्र, लखनऊ येथील केंद्रीय औषध संशोधन संस्थेत आयुर्वेदातील मूलभूत आणि अनुवादात्मक संशोधनासाठी उत्कृष्टता केंद्र, आणि जेएनयू, नवी दिल्ली येथे आयुर्वेद आणि सिस्टीम मेडिसिनसाठी उत्कृष्टता केंद्र याचा समावेश आहे.
आरोग्यसेवा क्षेत्रातील मेक इन इंडिया उपक्रमाला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान गुजरातमधील वापी, तेलंगणातील हैदराबाद, कर्नाटकातील बंगळुरू, आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि हिमाचल प्रदेशातील नालागड येथे वैद्यकीय उपकरणे आणि बल्क (मोठ्या प्रमाणातील) औषधांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत पाच प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या युनिट्समध्ये महत्त्वाच्या बल्क औषधांसह बॉडी इम्प्लांट्स आणि क्रिटिकल केअर उपकरणे यासारख्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांची निर्मिती केली जाईल.
पंतप्रधान नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता वाढवण्यासाठी देश का प्रकृती परीक्षण अभियान" या देशव्यापी मोहिमेचा देखील शुभारंभ करतील. पंतप्रधान प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यविषयक राज्य-अनुरूप कृती आराखडा देखील सुरू करतील. याद्वारे हवामान-प्रतिरोधक आरोग्य सेवा विकसित करण्यासाठी अनुकूलन धोरणे आखली जातील.
* * *
आशिष सांगळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178982)
Visitor Counter : 7
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam