पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील अमरेली येथे विकासकामांच्या पायाभरणी आणि उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2024 10:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2024
भारत माता की - जय!
भारत माता की - जय!
व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत जी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी सी. आर. पाटील जी, गुजरातचे माझे बंधू आणि भगिनी आणि विशेषतः अमरेलीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,
दिवाळी आणि धनत्रयोदशी जवळ आले आहेत. हा शुभ प्रसंगांचा काळ आहे. एकीकडे आपल्याकडे 'संस्कृती' चा उत्सव आहे; तर दुसरीकडे 'विकासा' चा उत्सव आहे - हे भारताचे नवीन चिन्ह आहे. 'विरासत' (वारसा जतन करणे) आणि 'विकास' (विकासाला चालना देणे) यांचे काम हातात हात घालून चालते. आज मला गुजरातशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाली. येथे येण्यापूर्वी मी वडोदरा येथे होतो, जिथे आम्ही भारताच्या अशा प्रकारच्या पहिल्या कारखान्याचे उद्घाटन केले, जे गुजरातमध्ये वडोदरा येथे आमच्या हवाई दलासाठी 'मेड इन इंडिया' विमाने तयार करेल. आमचे अमरेली गायकवाडांचे आहे आणि वडोदरा देखील गायकवाडांचे आहे. हा अभिमानाचा क्षण आहे! आणि आज येथे मला भारतमाता सरोवराचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आणि या व्यासपीठावरून आम्ही पाणी, रस्ते आणि रेल्वे यांच्याशी संबंधित अनेक दीर्घकालीन प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले आहे.हे सर्व प्रकल्प सौराष्ट्र आणि कच्छमधील लोकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आहेत आणि हे प्रकल्प विकासाला गती देतील. आज आपण ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली ते आपल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, शेती क्षेत्रातील लोकांच्या समृद्धीसाठी आणि आपल्या तरुणांना रोजगाराच्या संधींसाठी आहेत. या अनेक प्रकल्पांसाठी कच्छ, सौराष्ट्र आणि गुजरातमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या शुभेच्छा !
मित्रांनो,
सौराष्ट्र आणि अमरेलीच्या भूमीने अनेक रत्नांना जन्म दिला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, साहित्यात किंवा राजकारणात, अमरेलीचा भूतकाळ गौरवशाली राहिला आहे. ही ती भूमी आहे जिने आपल्याला योगीजी महाराज दिले, तीच भूमी जिने आपल्याला भोजा भगत दिले आणि गुजरातमध्ये दुला भाया कागचा उल्लेख न करता एकही संध्याकाळ जाण्याची शक्यता दुर्मिळ आहे. प्रत्येक लोककथा आणि कविता कागबापूंशी संबंधित आहे आज येथील माती, जी कवी कलापी आणि त्यांच्या प्रसिद्ध ओळी "रे पंखीडा सुखथी चणजो" (मुक्तपणे उड रे, लहान पक्षी) यांच्या आठवणी जपते, तिला पाण्याच्या आगमनाने समाधान मिळाले आहे. ही अमरेली आहे, एक जादुई भूमी जिने के. लाल, कवी रमेशभाई पारेख आणि गुजरातचे पहिले मुख्यमंत्री जीवराजभाई मेहता यांना जन्म दिला आहे. येथील मुलांनी आव्हानांचा सामना केला आहे आणि प्रतिकूल परिस्थितींना तोंड देत खंबीरपणे उभे राहिले आहेत.
नैसर्गिक आपत्तींपुढे झुकण्याऐवजी शक्तीचा मार्ग निवडणारे लोक या भूमीचे पुत्र आहेत. त्यापैकी काही उद्योजक म्हणून उदयास आले आहेत, त्यांनी केवळ त्यांच्या जिल्ह्यालाच नव्हे तर गुजरात आणि भारतालाही अभिमानास्पद कामगिरी बहाल केली आहे. त्यांनी समाजासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आमचे ढोलकिया कुटुंब हा वारसा पुढे नेत आहे.
सरकारच्या 80/20 पाणी योजनेच्या माध्यमातून गुजरातमधील भाजप सरकारने सुरुवातीपासूनच पाण्याला प्राधान्य दिले आहे. या प्रयत्नांमध्ये 80/20 योजना आणि लोकसहभाग, चेक डॅम बांधणे, शेततळे बांधणे, तलाव खोल करणे, जलमंदिर बांधणे, तलाव खोदणे इत्यादींचा समावेश आहे. मला आठवते की जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत बैठकांना उपस्थित राहण्यासाठी जात असे आणि आपल्या अर्थसंकल्पाचा एक महत्त्वाचा भाग जलसंपत्तीसाठी कसा खर्च होतो हे सांगत असे तेव्हा इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि नेते माझ्याकडे आश्चर्याने पाहात. मी त्यांना सांगत असे की गुजरातमध्ये अनेक लोक प्रतिभेने भरलेले आहेत आणि जर आपल्याला एकदा पाणी मिळाले तर गुजरात आणखी भरभराटीला येईल.
ही परंपरा आपल्या गुजरातची आहे. 80/20 योजनेत अनेक लोक सामील झाले आहेत. समुदाय आणि गावांसह सर्वांनी भाग घेतला आहे; माझ्या ढोलकिया कुटुंबाने याचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला, ज्यामुळे नद्यांना जीवन मिळाले. आणि नद्या जिवंत ठेवण्याचा हाच मार्ग आहे. आम्ही नर्मदा नदीपासून 20 नद्यांशी जोडले गेलो होतो. आणि नद्यांमध्ये लहान तलाव तयार करण्याचा विचार आमच्या मनात आला, जेणेकरून आम्ही काही मैलांपर्यंत पाणी साठवू शकू. आणि एकदा का, पाणी जमिनीत झिरपले की ते अमृतात रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही, बंधूंनो, गुजरात, सौराष्ट्र किंवा कच्छच्या लोकांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी पुस्तकांची गरज नाही; त्यांनी स्वतःच्या कष्टांचा अनुभव घेतला आहे. त्यांना त्यांच्या समस्या नेमक्या माहीत आहेत; त्यांना माहीत आहे की कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत. आम्ही सौराष्ट्र आणि कच्छमधील लोकांना पाण्याअभावी स्थलांतर करताना पाहिले आहे. आम्ही असे दिवस पाहिले आहेत जेव्हा आठ-आठ लोकांना शहरात एकाच खोलीत राहावे लागत असे. आणि आता, आम्ही देशातील पहिले जलशक्ती मंत्रालय तयार केले आहे कारण आम्हाला त्याचे महत्त्व माहीत आहे. आज नर्मदेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचल्याने आपल्याला वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नांचे फळ दिसत आहे.
मला आठवते की नर्मदा परिक्रमेद्वारे 'पुण्य' मिळवले जायचे. युग बदलले आहे आणि आई नर्मदा स्वतः गावोगावी जाऊन 'पुण्य' आणि पाणी वाटत आहे. मी सुरू केलेल्या 'सौनी' योजनेसारख्या जलसंधारण योजनांवर अविश्वास आणि संशय व्यक्त केला जात होता. कोणीही हे शक्य आहे यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. काही कुटिल लोकांनी तर निवडणुकीपूर्वी मोदींनी केलेला प्रसिद्धी स्टंट म्हणून टीका केली. परंतु या सर्व योजनांनी कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये नवीन जीवन फुंकले आहे, ज्यामुळे लोकांना हिरव्यागार शेतांचे स्वप्न साकार होताना पाहता आले आहे. पवित्र भावनेने केलेला संकल्प कसा पूर्ण होतो याचे हे एक उदाहरण आहे. मला आठवते जेव्हा मी मारुती मोटार जाऊ शकेल इतके मोठे पाईप टाकण्याबद्दल बोललो होतो; लोक आश्चर्यचकित झाले होते. आज ते पाईप संपूर्ण गुजरातमध्ये पाणी पोहोचवण्याचे काम करतात.
हे गुजरातने साध्य केले आहे. आपल्याला नदीची खोली वाढवायची आहे, म्हणून आपल्याला चेक डॅम बांधावे लागतील, किंवा किमान बॅरेज बांधावे लागतील. पाणी वाचवण्यासाठी आपल्याला जे शक्य ते सर्व करावे लागेल. गुजरातच्या लोकांनी जलसंवर्धनाचा मनापासून स्वीकार केला आहे आणि यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, आरोग्य आणि प्रत्येक घर तसेच शेताला पाणी पुरवण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय सुधारले आहे. ही वस्तुस्थिती खूप समाधानकारक आहे. आजच्या 18-20 वयोगटातील मुलांना पाण्याशिवाय जीवन किती कठीण होते हे कदाचित कळणार नाही. अंघोळीसाठी नळ चालू करणे त्यांच्यासाठी नेहमीचे आहे, पूर्वी मातांना पाणी आणण्यासाठी भांडी घेऊन अनेक किलोमीटर चालावे लागत असे.
गुजरातने केलेले काम आता संपूर्ण देशासाठी एक उदाहरण ठरले आहे. गुजरातमधील प्रत्येक घरात आणि प्रत्येक शेतात पाणी पोहोचवण्याची मोहीम अजूनही अशाच समर्पणाने आणि शुद्धतेने राबविली जात आहे. आज लाखो लोकांना फायदा होईल या आशेने प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जात आहे.
नवदा-चावंड बल्क पाईपलाईन प्रकल्पामुळे सुमारे 1,300 गावे आणि 35 हून अधिक शहरांमध्ये पाणी पोहोचेल. अमरेली, बोटाड, राजकोट, जुनागड आणि पोरबंदर येथील लोकांना दररोज अतिरिक्त 30 कोटी लिटर पाण्याचा फायदा होईल. आज पासवी ऑग्मेंटेशन पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही करण्यात आली. महुवा, तळाजा आणि पालिताणा या तीन तालुक्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. पालिताणा हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आधार देणारे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. 100 हून अधिक गावांना या प्रकल्पांचा थेट फायदा होईल.
मित्रांनो,
आज, जल प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी म्हणजे सरकार आणि समाज यांच्यातील भागीदारीचे प्रतीक आहे. हे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. आम्ही सार्वजनिक सहभागावर भर देतो कारण जल उपक्रम केवळ सामूहिक प्रयत्नांनीच यशस्वी होतात. जेव्हा आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली, तेव्हा सरकार अनेक कार्यक्रम आयोजित करू शकले असते, त्यावर मोदींचे नाव असलेले फलक लावू शकले असते, परंतु आम्ही तसे केले नाही. त्याऐवजी, आम्ही गावांमध्ये "अमृत सरोवर" (तलाव) तयार करण्याची योजना सुरू केली, ज्याचे उद्दिष्ट आहे प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव बांधण्याचे.
ताज्या माहितीनुसार, अशा जवळपास 75,000 तलावांवर काम सुरू आहे, ज्यामध्ये 60,000 हून अधिक तलाव आधीच जीवसृष्टीने भरलेले आहेत. भावी पिढ्यांना अशा प्रकारे सेवा दिल्याने शेजारच्या भागात पाण्याची पातळी वाढण्यास लक्षणीय मदत झाली आहे. आम्ही "कॅच द रेन" मोहीम राबवली. मी दिल्लीला गेलो तेव्हा हा अनुभव खूप उपयुक्त ठरला. आज ते एक यशस्वी प्रारूप बनले आहे. कुटुंब, गाव किंवा वसाहती पातळीवर जलसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी, लोकांना पाणी वाचवण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. गुजरातमधून पाणी व्यवस्थापनातील आपली तज्ज्ञता घेऊन येणाऱ्या सी.आर. पाटील यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाचे भाग्य आम्हाला लाभले आहे. आता संपूर्ण देशात याचे अनुकरण केले जात आहे. त्यांनी "कॅच द रेन" या उपक्रमाला आपल्या प्रमुख उपक्रमांपैकी एक बनवले आहे आणि गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमधील सार्वजनिक सहभागाने हजारो रिचार्ज विहिरी आधीच बांधल्या गेल्या आहेत.
अलिकडेच, दक्षिण गुजरातमधील सुरत येथे एका व्हिडिओ कॉन्फरन्स कार्यक्रमादरम्यान आम्ही लोकांना त्यांच्या वडिलोपार्जित गावांमध्ये रिचार्ज विहिरी बांधताना पाहिले, ज्यामुळे गावाला काही कौटुंबिक संपत्ती परत मिळते. हा एक नवीन रोमांचकारी उपक्रम आहे: गावाचे पाणी गावाच्या आत आणि सीमेचे पाणी सीमेच्या आत ठेवणे. या मोहिमा म्हणजे महत्त्वपूर्ण पुरोगामी पावले आहेत. स्थानिक पाणी टिकवून ठेवण्याचे हे प्रयत्न एका व्यापक मोहिमेचा भाग आहेत, जसे की कमीत कमी पाऊस असलेल्या इतर देशांमध्ये दिसून येते, जिथे ते पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवतात. जर तुम्ही पोरबंदरमधील महात्मा गांधींच्या घराला भेट दिलीत तर तुम्हाला 200 वर्षे जुनी भूमिगत पाणी साठवण टाकी दिसेल, जी शतकानुशतके आपल्या पूर्वजांना पाण्याचे किती महत्त्व होते, हे दर्शवते.
मित्रांनो,
पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती सोपी झाली आहे. आमचे ब्रीदवाक्य "पर ड्रॉप मोर क्रॉप" असे आहे. गुजरातमध्ये आम्ही सूक्ष्म सिंचन, विशेषतः स्प्रिंकलरद्वारे सिंचनाला प्रोत्साहन दिले, ज्याचे गुजरातच्या शेतकऱ्यांनी स्वागत केले. आज जिथे जिथे नर्मदेचे पाणी पोहोचले आहे, तेथील शेतकरी तीन पिके घेऊ शकतात जिथे एकेकाळी एक पीक घेणे कठीण होते. यामुळे घरांमध्ये आनंद आणि समृद्धी आली आहे. अमरेली जिल्हा शेतीत प्रगती करत आहे, जाफराबादमध्ये कापूस, शेंगदाणे, तीळ, बाजरी आणि मोती बाजरी यासारखी पिके घेतली जात आहेत. दिल्लीतील माझ्या बैठकींदरम्यान मी या उपक्रमाचे कौतुक करतो. अमरेलीच्या केसरी आंब्याला आता जीआय टॅग मिळाल्याने त्याला जगभरात एक वेगळी ओळख मिळाली आहे. अमरेलीला आपल्या नैसर्गिक शेतीसाठी देखील मान्यता मिळत आहे आणि आमचे राज्यपाल या मिशन मोडवर काम करत आहेत.
अमरेलीतील शेतकरी या प्रयोगासाठी समर्पित आहेत, जलद आणि व्यवहार्य पिके घेण्यासाठी वचनबद्ध आहेत. आमच्या हलोलमध्ये नैसर्गिक शेतीसाठी वेगवेगळी विद्यापीठे विकसित करण्यात आली आहेत. या विद्यापीठाच्या अंतर्गत नैसर्गिक शेतीसाठीचे पहिले महाविद्यालय अमरेलीमध्ये स्थापन करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे येथील शेतकरी या नवीन प्रयोगासाठी वचनबद्ध आहेत. म्हणूनच, जर त्यांनी येथे प्रयोग केले तर त्यांची पिके त्वरित तयार होतील. आमचे ध्येय आहे की शेतकरी पशुपालनात, विशेषतः गाई म्हशी पालनात अधिक गुंतून राहावेत, नैसर्गिक शेतीचा फायदा घ्यावा. आमच्या अमरेलीमध्ये दुग्ध उद्योगाबाबत, मला आठवते की पूर्वी असे कायदे होते जे दुग्धव्यवसाय स्थापन करणे हा गुन्हा मानत होते. आम्ही दुग्धव्यवसायावरील प्रतिबंधात्मक कायदे काढून टाकले, अमरेलीमध्ये दुग्धव्यवसायाची स्थापना सुलभ केली, सहकारी प्रयत्नांद्वारे यात जलद वाढ झाली.
मला आठवते की 2007 मध्ये जेव्हा अमर डेअरीची स्थापना झाली तेव्हा फक्त 25 सहकारी संस्था त्यात सहभागी होत्या. आज 700 हून अधिक गावे सामील झाली आहेत, दररोज सुमारे 1.25 लाख लिटर दूध गोळा होते, ही खरी क्रांती आणि विविध विकास मार्गांचा अवलंब दर्शवते.
मित्रांनो,
मला आणखी एक आनंद वाटतो; मी हे अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते, सर्वांसमोर सांगितले होते आणि मी श्वेत क्रांती, हरित क्रांतीचे आवाहन केले होते, पण आता आपल्याला गोड क्रांतीची गरज आहे. आपल्याला मध उत्पादन करण्याची गरज आहे; बंधूंनो, मध हा फक्त घरी बोलण्याचा विषय नसावा. आपल्याला शेतात मध उत्पादन करण्याची गरज आहे जेणेकरून शेतकरी अधिक कमाई करू शकतील. आमचे दिलीप भाई आणि रुपालाजी यांनी अमरेली जिल्ह्यात हा मुद्दा उपस्थित केला आणि आता शेतात मधमाशीपालन सुरू झाले आहे आणि लोकांना त्याबद्दल माहिती झाली आहे. आता येथील मध स्वतःची ओळख निर्माण करत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. 'एक पेड माँ के नाम' मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण यासारख्या पर्यावरणीय प्रयत्नांना देशभरात आणि अगदी जागतिक स्तरावरही स्वीकारण्यात आले आहे, या अनोख्या दृष्टिकोनाचे कौतुक होत आहे.
या मोहिमेत सर्वजण सहभागी होत आहेत. पर्यावरणाच्या बाबतीत हा एक उत्तम प्रयत्न आहे. आणि पर्यावरणाशी संबंधित दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे आम्ही पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना राबवून वीज बिलातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करत आहोत, ही मोफत सौर वीज योजना दरवर्षी कुटुंबांचे 25,000 ते 30,000 रुपये वाचवू शकते. एवढेच नाही तर ते बचत करत असलेली वीज विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. जवळपास 1.5 कोटी कुटुंबांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली आहे आणि गुजरातमधील 200,000 हून अधिक घरांमध्ये आता छतावरील सौर पॅनेल आहेत, ही घरे वीज उत्पादन करतात आणि अतिरिक्त वीज विकतात.
अमरेली जिल्ह्याने ऊर्जेच्या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती केली आहे, गोविंदभाईंच्या नेतृत्वाखालील दुधडा गाव सौरऊर्जेवर चालणारे गाव बनण्याच्या जवळ आहे. सहा महिन्यांपूर्वी गोविंदभाईंनी मला सांगितले की त्यांना त्यांचे गाव 'सूर्यघर' (सौरऊर्जेवर चालणारे गाव) बनवायचे आहे आणि आता हे काम पूर्णत्वाकडे येत आहे. या उपक्रमामुळे गावाला वीज बिलात दरमहा 75,000 रुपये वाचतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 4,000 रुपयांची बचत होईल. दुधडा हे सौरऊर्जेवर चालणारे जिल्ह्यातील पहिले गाव बनल्याबद्दल गोविंदभाई आणि अमरेली यांचे अभिनंदन.
मित्रांनो,
पाणी आणि पर्यटन यांचा जवळचा संबंध आहे; जिथे पाणी आहे तिथे पर्यटन स्वाभाविकपणे येते. आत्ताच, भारत माता सरोवर पाहताना मला वाटले की डिसेंबरमध्ये कच्छला भेट देणारे स्थलांतरित पक्षी येथे एक नवीन पत्ता शोधू शकतात. जेव्हा फ्लेमिंगो येथे येऊ लागतील तेव्हा ते अधिक पर्यटकांना आकर्षित करेल. अमरेली जिल्ह्यात अनेक तीर्थस्थळे आहेत जिथे लोक भक्तीने भेट देतात. सुरुवातीला पाणी साठवण्याच्या उद्देशाने बांधलेल्या सरदार सरोवर धरण परिसरात आम्हाला आणखी क्षमता दिसली. इथे सरदार पटेलांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याची भर घालून आम्ही गेल्या वर्षी सुमारे पाच दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करणारे एक स्मारक तयार केले, आता या ठिकाणी केवळ धरणासाठीच नाही तर पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी भेट देता येते. 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती जवळ येत असल्याने मी आदरांजली वाहण्यासाठी लवकरच गुजरातला परतणार आहे.
मी आज दिल्लीला परत जाईन, पण परवा पुन्हा येईन आणि सरदार साहेबांच्या चरणी आदरांजली अर्पण करेन. नेहमीप्रमाणे आम्ही त्यांची जयंती युनिटी रनने साजरी करतो. परंतु यावर्षी दिवाळी 31 ऑक्टोबर रोजी असल्याने आम्ही ती 29 ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे. मला आशा आहे की युनिटी रनचे कार्यक्रम गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातील. केवडिया येथे होणाऱ्या राष्ट्रीय युनिटी परेडमध्ये मी सहभागी होणार आहे.
मित्रांनो,
येत्या काही दिवसांत नव्याने स्थापन झालेला केर्ली रिचार्ज जलाशय हे पर्यावरणीय पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे, असे मी आज भाकीत करतो. मला तेथे साहसी पर्यटनाची मोठी क्षमता दिसते. केर्ली पक्षी अभयारण्य आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवेल, इथे जगभरातील पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमी आकर्षित होतील. पक्षी निरीक्षक बहुतेकदा कॅमेरे हातात घेऊन जंगलात बुडून दिवस घालवतात आणि पर्यटनाद्वारे उत्पन्नाचा स्रोत निर्माण करतात. एकेकाळी खाऱ्या पाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि आव्हान म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गुजरातच्या किनारपट्टीचे रूपांतर समृद्धीच्या प्रवेशद्वारात होत आहे. गुजरातच्या किनारपट्टीला केवळ प्रादेशिक संपत्तीच नाही तर संपत्ती आणि विकासाचे राष्ट्रीय केंद्र बनवण्याच्या कामाला आम्ही प्राधान्य देत आहोत. याचा आमच्या मासेमार समुदायांना मोठा फायदा होईल, तसेच शतकानुशतकांचा प्राचीन वारसा बाळगलेल्या आमच्या बंदरांनाही फायदा होईल, ज्याचे आम्ही पुनरुज्जीवन करत आहोत.
5,000 वर्षांहून अधिक प्राचीन असलेले लोथल हे प्राचीन शहर मोदी सत्तेत येईपर्यंत फारसे प्रसिद्ध झालेले नव्हते. मी गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या हृदयात या शहराचे नेहमीच विशेष स्थान राहिले आहे आणि मला ते पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणायचे होते. आणि आता आपण तिथे जगातील सर्वात मोठे सागरी संग्रहालय स्थापन करत आहोत. जेव्हा आपण अमरेलीहून अहमदाबादला जातो तेव्हा ते रस्त्यात येते, ते फार दूर नाही, आपल्याला थोडेसेच पुढे जावे लागते.
भारताचा सागरी वारसा जगासमोर सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, आपल्या प्राचीन खलाशांचा वारसा अधोरेखित करण्याचा आहे. सागरी संसाधन विकास वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न नील क्रांतीशी देखील जोडलेले आहेत आणि बंदर-नेतृत्वाखालील विकास या विकसित भारताच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जाफराबाद आणि शियाल बेट सारख्या ठिकाणी पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत, ज्यामुळे अमरेली एक प्रमुख प्रादेशिक केंद्र बनले आहे. पिपावाव बंदराच्या आधुनिकीकरणामुळे हजारो नोकऱ्यांसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत आणि दहा लाखांहून अधिक कंटेनर आणि हजारो वाहने हाताळण्याची क्षमता वाढली आहे. गुजरातच्या सर्व बंदरांना देशाच्या उर्वरित भागाशी जोडण्याचे आमचे ध्येय आहे, ज्यामुळे देशभरातील अर्थव्यवस्थेला फायदा होईल असे एक अखंड जाळे निर्माण होईल.
दुसरीकडे, सामान्य माणसाच्या जीवनाबद्दलही तितकीच चिंता आहे. आमचे पायाभूत सुविधांचे उपक्रम परवडणारी घरे, वीज, रेल्वे, रस्ते, गॅस पाइपलाइन, दूरसंचार, ऑप्टिकल फायबर आणि रुग्णालये प्रदान करण्यापर्यंत विस्तारलेले आहेत. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात, कारण 60 वर्षांनंतर देशाने एका पंतप्रधानाला तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. यामध्ये गुजरातला दिलेल्या सहकार्याबद्दल मी पुरेसे आभार मानू शकत नाही. संचार संपर्काच्या या समग्र दृष्टिकोनामुळे सौराष्ट्रात आधीच मोठै परिणाम दिसून आले आहेत, मोठ्या प्रमाणात उद्योग आकर्षित झाले आहेत. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होत असताना, मोठ्या प्रमाणात उद्योग येतात; आम्हाला रोरो फेरी सेवेचे फायदे दिसले आहेत.
मी शाळेत याबद्दल ऐकायचो: 'गोगाची फेरी, गोगाची फेरी,' पण कोणीही त्याबद्दल काहीही केले नाही. आम्हाला संधी मिळाली आणि आता 700,000 हून अधिक लोकांनी या रोरो फेरी सेवेचा वापर केला आहे.100,000 हून अधिक वाहने आणि 75,000 हून अधिक ट्रक आणि बसेसना याचा फायदा झाला आहे. यामुळे असंख्य लोकांचा वेळ आणि पैसा वाचला आहे आणि पेट्रोलचा धूरही टळला आहे. जर तुम्ही ते मोजले तर, इतके महत्त्वाचे काम आधी का केले गेले नाही याचे आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल. मला वाटते की अशी चांगली कामे माझ्या नशिबात होती.
आज जामनगरपासून अमृतसर-भटिंडा आर्थिक संचार मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे अतिशय मोठे फायदे असतील. गुजरातपासून पंजाबपर्यंतच्या राज्यांनाही त्याचा फायदा होईल. त्या मार्गावर मोठी आर्थिक क्षेत्रे स्थापन होत आहेत. मोठे प्रकल्प येत आहेत आणि रस्ता प्रकल्पाच्या उद्घाटनासह जामनगर-मोरबी परिसर विकसित होत आहे. मी नेहमीच म्हटले आहे की राजकोट-मोरबी-जामनगर त्रिकोणामध्ये भारताचे उत्पादन केंद्र म्हणून ओळख मिळवण्याची क्षमता आहे. त्यात एक छोटे जपान बनण्याची शक्ती आहे.
20 वर्षांपूर्वी मी जेव्हा हे सांगितले होते तेव्हा सर्वजण त्याची थट्टा करत होते. पण आज ते घडत आहे आणि संचारसंपर्काचे काम आता त्याच्याशी जोडले गेले आहे. परिणामी, सिमेंट उत्पादन क्षेत्राची जोडणी देखील सुधारेल. या व्यतिरिक्त, सोमनाथ, द्वारका, पोरबंदर आणि गीर सिंह ही तीर्थक्षेत्रे पर्यटन स्थळे म्हणून अधिक सुलभ आणि भव्य बनणार आहेत. आज कच्छमधील रेल्वे जोडणीचा विस्तार झाला आहे; सौराष्ट्र आणि कच्छमधील या प्रकल्पामुळे कच्छ हे पर्यटनासाठी राष्ट्रीय आकर्षण बनले आहे. देशभरातील लोकांना काळजी आहे की कच्छमधील पर्यटन आणि उद्योगांना विलंब होईल आणि त्याचा वेध घेण्यासाठी घाई करत आहेत.
भारताचा विकास होत असताना जगात त्याच्याबद्दलचा अभिमान वाढत आहे. संपूर्ण जग भारताकडे नवीन आशेने पाहत आहे आणि भारताकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन उदयास येत आहे. लोक भारताची क्षमता ओळखू लागले आहेत. आज संपूर्ण जग भारताचे गांभीर्याने आणि लक्षपूर्वक ऐकत आहे. प्रत्येकजण भारताच्या अंतर्गत शक्यतांवर चर्चा करत आहे. यामध्ये गुजरातची महत्त्वपूर्ण भूमिका आहे; गुजरातने जगाला दाखवून दिले आहे की भारतातील शहरांच्या गावांमध्ये किती क्षमता आहे!
काही दिवसांपूर्वी मी रशियामध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झालो होतो, जिथे मला विविध देशांतील अनेक पंतप्रधान आणि राष्ट्रपतींशी शांततापूर्ण संवाद साधण्याची संधी मिळाली. सर्वांमध्ये एकसमान भावना होती की त्यांना भारताशी जोडले जायचे आहे आणि भारताच्या विकासाच्या प्रवासात भागीदार व्हायचे आहे. सर्व देश भारतात गुंतवणुकीच्या शक्यतांबद्दल विचारणा करीत आहेत. मी रशियाहून परतलो तेव्हा जर्मनीचे चान्सलर एका मोठ्या शिष्टमंडळासह दिल्लीला आले होते. त्यांनी आशियात गुंतवणूक करणाऱ्या जर्मनीतील उद्योगपतींना सोबत आणले होते. त्यांनी त्यांना मोदीजींचे ऐकायला सांगितले आणि भारतात काय करायचे आहे ते ठरवायला सांगितले.
याचा अर्थ असा की जर्मनी भारतात लक्षणीय गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. इतकेच नाही तर त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली जी आपल्या तरुणांना फायदेशीर ठरेल. पूर्वी जर्मनीने 20,000 व्हिसा जारी केले होते; त्यांनी घोषणा केली की ते आता 90,000 व्हिसा जारी करतील आणि त्यांना त्यांच्या कारखान्यांसाठी तरुणांची आवश्यकता आहे. भारतीय तरुणांची ताकद प्रचंड आहे आणि भारतातील लोक कायद्याचे पालन करणारे आहेत आणि शांततेने एकत्र राहतात. त्यांनी सांगितले की त्यांना लोकांची आवश्यकता आहे आणि दरवर्षी 90,000 व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे.
याचा अर्थ असा की जर्मनी भारतात लक्षणीय गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. इतकेच नाही तर त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली जी आपल्या तरुणांना फायदेशीर ठरेल. पूर्वी जर्मनीने 20,000 व्हिसा जारी केले होते; त्यांनी घोषणा केली की ते आता 90,000 व्हिसा जारी करतील आणि त्यांना त्यांच्या कारखान्यांसाठी तरुणांची आवश्यकता आहे. भारतीय तरुणांची ताकद प्रचंड आहे आणि भारतातील लोक कायद्याचे पालन करणारे आहेत आणि शांततेने एकत्र राहतात. त्यांनी सांगितले की त्यांना येथे 90,000 लोकांची आवश्यकता आहे आणि दरवर्षी 90,000 व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे. आता आपल्या तरुणांना या गरजेनुसार तयारी करण्याची संधी आहे. आज, स्पेनचे राष्ट्रपती येथे होते आणि स्पेन भारतात लक्षणीय गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे
यामुळे गुजरातमधील लघु उद्योगांना मोठा फायदा होईल, विशेषतः वडोदरा येथे वाहतूक विमान निर्मिती कारखाना स्थापन झाल्यामुळे. राजकोटमधील विविध साधने तयार करणारे छोटे कारखाने देखील या विमान उत्पादनात हातभार लावतील. गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लहान लेथ मशीनवर काम करणारे लोक लहान भाग पुरवतील, कारण विमानात हजारो घटकांची आवश्यकता असते आणि प्रत्येक कारखाना विशिष्ट भागांमध्ये विशेषज्ञ असतो. हे काम संपूर्ण सौराष्ट्र प्रदेशासाठी फायदेशीर ठरेल, जिथे लघु उद्योगांची रचना अस्तित्वात आहे. यामुळे रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील.
मित्रांनो,
मला जेव्हा गुजरातची सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हा माझे ध्येय गुजरात आणि भारत दोघांच्याही विकासाला चालना देणे हे होते. माझे मार्गदर्शक तत्व असे होते की गुजरातची प्रगती भारताच्या प्रगतीकडे घेऊन जाते. ‘विकसित गुजरात’ (समृद्ध गुजरात) उभारून आपण ‘विकसित भारत’ (विकसित भारत) साठी मार्ग मोकळा करतो.
मित्रांनो,
आज, बऱ्याच काळानंतर, मी स्वतःला अनेक परिचित चेहऱ्यांमध्ये पाहतो आणि सर्वांना हसताना आणि आनंदी पाहून मला आनंद होतो. पुन्हा एकदा, मी माझे प्रिय मित्र सावजीभाई यांना सुरतवरून स्वतःचे लक्ष दुसरीकडे वळवून गुजरातच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतो. चला 80/20 योजनांचे पूर्ण फायदे गुजरातमध्ये पोहोचवूया. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.
माझ्याबरोबर म्हणा:
भारत माता की – जय!
भारत माता की – जय!
भारत माता की – जय!
धन्यवाद, मित्रांनो
* * *
नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2178506)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam