कृषी मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ आणि ‘डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता अभियाना’चा केला प्रारंभ
42,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अभूतपूर्व उपक्रमांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधानांचे मानले आभार
“‘डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता अभियान’ आणि ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’ हे शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कृषी परिवर्तनासाठी ऐतिहासिक उपक्रम”: शिवराज सिंह
Posted On:
11 OCT 2025 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
दिल्लीतील पुसा येथे झालेल्या एका ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणाऱ्या अनेक योजनांचा प्रारंभ केला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्यमंत्री भागीरथ चौधरी हे देखील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी डाळींची लागवड करणारे शेतकरी, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF), पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या गटांशी थेट संवाद साधला, सोबतच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नवोन्मेषावर चर्चा केली.

‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ आणि ‘डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता अभियान’ या दोन योजनांचा प्रारंभ हा भारताच्या कृषी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
यासोबतच, पंतप्रधानांनी कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF), पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 1,100 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. या उपक्रमामुळे ग्रामीण भारतात आधुनिक शीतगृह सुविधा, प्रक्रिया केंद्र आणि गोदामांची निर्मिती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संघटनांचा गौरव
या कार्यक्रमात पंतप्रधानांनी नवोन्मेष करणाऱ्या शेतकऱ्यांचा, शेतकरी उत्पादक संघटनांचा (एफपीओ), सहकारी संस्थांचा आणि कृषी विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला.

खत अनुदान तसेच वस्तू आणि सेवा करात सवलत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जागतिक स्तरावर खतांच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर होणार नाही याची खात्री केल्याचे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधानांचे आभार मानताना सांगितले.

आत्मनिर्भरता आणि ‘विकसित भारत’ यासंदर्भातली वचनबद्धता
भारतीय शेतीला जागतिक दर्जावर नेण्यासाठी तसेच देशाला ‘आत्मनिर्भरता’ आणि ‘विकसित भारत’ संकल्प पूर्तीकडे नेण्यासाठी सरकार सातत्याने कार्यरत आहे याचा केंद्रीय मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. नागरिकांना स्वदेशीचा स्वीकार करावा आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन चौहान यांनी केले.
“पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही शेतकऱ्यांची समृद्धी, स्वदेशी उद्योग आणि नवोन्मेषावर आधारित विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे कौतुक करताना चौहान म्हणाले.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177944)
Visitor Counter : 5