पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोजगार मेळाव्याला संबोधन
रोजगार मेळाव्यात 51 हजार युवकांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करतांना आनंद होत आहे, राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या सर्व युवकांना शुभेच्छा : पंतप्रधान
देशातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे ही सरकारची वचनबद्दता : पंतप्रधान
जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे भारताची वाटचाल: पंतप्रधान
प्रत्येक नव्या तंत्रज्ञानात ‘मेक इन इंडियाला प्रोत्साहन, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने कार्य : पंतप्रधान
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत भारतातील अव्वल 500 कंपन्यांमध्ये मानधनासह इंटर्नशिपची तरतूद : पंतप्रधान
Posted On:
29 OCT 2024 11:53AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 29 ऑक्टोबर 2024 रोजी रोजगार मेळाव्यास संबोधित केले. विविध शासकीय विभाग व संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51 हजारांहून अधिक नव्या युवकांना दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे त्यांनी वितरण केले. रोजगार मेळावा हा रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचा प्रत्यय असून, या माध्यमातून युवकांना राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध होणार आहेत.
आजच्या धनत्रयोदशीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावर्षीची दिवाळी विशेष ठरणार असून, 500 वर्षांनंतर पहिल्यांदाच भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. अनेक पिढ्यांनी या दिवाळीची प्रतीक्षा केली आहे, अनेकांनी यासाठी आपले प्राण अर्पण केले, संकटांचा सामना केला, असे पंतप्रधान म्हणाले. आजची पिढी अत्यंत भाग्यवान असून, अशा उत्सवाला साक्षीदार आहे, त्याचा भाग होत आहे, असे मोदी यांनी सांगितले. या उत्सवी वातावरणात 51 हजार युवकांनाचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
लाखो युवकांना कायमस्वरूपी शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची परंपरा सातत्याने चालू आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भाजप आणि एनडीए मित्रपक्षांच्या राज्यांमध्येही लाखो युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. हरियाणामध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून 26 हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्यामुळे तेथेही उत्साही वातावरण आहे, असे मोदी म्हणाले. हरियाणातील सरकारची विशेष ओळख म्हणजे खर्च किंवा शिफारसीशिवाय नोकऱ्या देणे, असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी आजच्या रोजगार मेळाव्यात 51 हजार नोकऱ्यांव्यतिरिक्त हरियाणातील 26 हजार युवकांनाही शुभेच्छा दिल्या.
देशातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार देणे हे सरकारचे वचन आहे. सरकारच्या धोरणांचा आणि निर्णयांचा रोजगार निर्मितीवर थेट परिणाम होत असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी देशभरात वेगवेगळ्या भागांत उभारण्यात येणाऱ्या द्रुतगती मार्ग, महामार्ग, रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, फायबर केबल टाकणे, मोबाईल टॉवर उभारणे आणि नव्या उद्योगांचा विस्तार यांचा उल्लेख केला. जलवाहिन्या व गॅस पाइपलाइन टाकणे, नवी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन करणे तसेच पायाभूत सुविधांवरील खर्चातून लॉजिस्टिक खर्च कमी करणे, यामुळे केवळ नागरिकांचे हित साधले जात नाही, तर नवीन रोजगारसंधीही निर्माण होतात, असे त्यांनी नमूद केले.
गुजरातमधील वडोदऱ्यात त्यावेळी झालेल्या त्यांच्या भेटीचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रासाठी विमाननिर्मिती केंद्राचे उद्घाटन केल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, यामुळे हजारो नागरिकांना थेट रोजगार मिळणार आहे, तर सुक्ष्म आणि लघु उद्योगांना सुटे भाग आणि इतर उपकरणांच्या निर्मितीतून मोठा फायदा होणार आहे आणि पुरवठा साखळीचे व्यापक जाळे तयार होणार आहे. एका विमानात 15,000 ते 25,000 भागांचा समावेश असतो याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, हजारो लहान कारखाने या मोठ्या कारखान्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे कार्य करतील, त्यामुळे देशातील एमएसएमई क्षेत्राला मोठा लाभ होईल.
जेव्हा एखादी योजना सुरू केली जाते तेव्हा फक्त नागरिकांना होणाऱ्या फायद्यापुरता मर्यादित विचार न करता व्यापक दृष्टिकोनातून रोजगारनिर्मितीची एक परिसंस्था विकसित करण्यावर भर दिला जातो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत सुमारे 2 कोटी ग्राहकांनी या योजनेत नोंदणी केली आहे, 9,000 हून अधिक विक्रेते या योजनेशी संलग्न आहेत, 5 लाखांहून अधिक घरांमध्ये सौर पॅनेल आधीच बसवण्यात आले आहेत आणि लवकरच 800 सौरगावे आदर्श म्हणून तयार करण्याचा सरकारचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले. 30,000 लोकांना रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशनसाठी प्रशिक्षण दिले गेले आहे, अशी माहीती त्यांनी दिली. त्यामुळे केवळ ही एकच योजना उत्पादक, विक्रेते, भागधारक आणि दुरुस्ती करणारे यांच्यासाठी देशभरात रोजगारनिर्मितीचे माध्यम ठरली आहे.
भारतातील खादी उद्योगात मागील 10 वर्षांत सरकारच्या धोरणांमुळे आमूलाग्र बदल घडून आला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. खादी ग्रामोद्योगाचा व्यवसाय आज 1.5 लाख कोटींवर पोहोचल्याची माहितीही त्यांनी दिली. दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत खादीच्या विक्रीत 400 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, यामुळे कारागीर, विणकर आणि उद्योगांना फायदा झाला असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांनी ‘लखपती दीदी योजना’चा उल्लेख करताना सांगितले की, ग्रामीण महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत. मागील दशकात 10 कोटीहून अधिक महिला स्वयं-सहायता गटांशी जोडल्या गेल्या असून आता त्या आर्थिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी आहेत, असे त्यांनी सागंतिले. पंतप्रधानांनी 3 कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याचे सरकारचे वचन पुन्हा अधोरेखित केले. आतापर्यंत 1.25 कोटी महिलांनी लखपती दीदी होऊन वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांहून अधिक केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. देशाच्या प्रगतीबाबत विचार करताना त्यांनी सांगितले की, युवक वारंवार विचारतात की भारताने हा वेग याआधी का गाठला नाही. याचे उत्तर पूर्वीच्या सरकारांची अस्पष्ट धोरणे व निश्चयाच्या अभावात आहे, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रांत भारत मागे पडला होता. भारत परदेशातील नव्या तंत्रज्ञानाची वाट पाहत असे आणि पाश्चिमात्य देशांत कालबाह्य ठरलेले तंत्रज्ञान शेवटी भारतात पोहोचत असे, याची पंतप्रधानांनी आठवण करुन दिली. आधुनिक तंत्रज्ञान भारतात विकसित होऊ शकत नाही या दीर्घकालीन समजुतीमुळे केवळ वाढ थांबली नाही, तर महत्त्वपूर्ण रोजगारसंधीही गमावल्या गेल्या, असे त्यांनी नमूद केले.
या जुनाट विचारसरणीतून मुक्तता मिळवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, अंतराळ, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रांमध्ये ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देऊन हे परिवर्तन सुरू करण्यात आले आहे. तंत्रज्ञान विकास व गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, पीएलआय योजना नवी तंत्रज्ञान आणि थेट परकीय गुंतवणूक भारतात आणण्यासाठी सुरू करण्यात आली आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासोबत जोडल्याने रोजगारनिर्मितीला मोठा वेग मिळाला आहे. प्रत्येक क्षेत्राला चालना मिळत असून, युवकांसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी सांगितले. आज भारतात प्रचंड गुंतवणूक होत आहे आणि विक्रमी रोजगारसंधी निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. मागील आठ वर्षांत 1.5 लाखांहून अधिक स्टार्टअप्स सुरू झाले असून भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप परिसंस्थान म्हणून विकसित झाली आहे. या क्षेत्रांत युवकांना प्रगती आणि रोजगार मिळवण्याच्या भरपूर संधी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या युवकांची क्षमता वाढवण्यासाठी आज सरकार कौशल्यविकासावर प्रचंड भर देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सरकारने ‘स्किल इंडिया’सारखे अभियान सुरू केले आणि अनेक कौशल्यविकास केंद्रांमध्ये युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. भारताच्या युवकांना अनुभव व संधीसाठी भटकंती करावी लागू नये, याची खात्री करण्यासाठी व्यवस्था केली असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा उल्लेख करताना सांगितले की, भारतातील अव्वल 500 कंपन्यांमध्ये मानधनासह इंटर्नशिपची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक इंटर्नला दरमहा 5,000 रुपये एका वर्षासाठी दिले जाणार आहेत. पुढील पाच वर्षांत एक कोटी युवकांना इंटर्नशिप संधी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे युवकांना विविध क्षेत्रांत प्रत्यक्ष व्यावसायिक वातावरणाशी जुळण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या करिअरसाठी आवश्यक अनुभव वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय युवकांना परदेशात नोकरी मिळवणे सुलभ करण्यासाठी नवनवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. अलीकडेच जर्मनीने भारतासाठी जाहीर केलेल्या कुशल मनुष्यबळ धोरणचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जर्मनीने भारतीय युवकांना दिल्या जाणाऱ्या व्हिसांची संख्या दरवर्षी 20 हजारांवरून 90 हजारांपर्यंत वाढवली आहे. आपल्या युवकांना याचा मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, अलीकडच्या वर्षांत भारताने जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मॉरिशस, इस्राएल, युनायटेड किंगडम व इटलीसह खाडी देशांसोबत स्थलांतर व रोजगारविषयक करार केले आहेत. दरवर्षी 3 हजार भारतीयांना युनायटेड किंग्डममध्ये वर्षांसाठी काम व शिक्षणासाठी व्हिसा मिळू शकतो, तर 3 हजार भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात शिक्षणाची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले. भारताचे कौशल्य केवळ भारताच्या प्रगतीला दिशा देणार नाही तर जगाच्या प्रगतीला देखील दिशा देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
सरकारची भूमिका म्हणजे प्रत्येक युवकाला संधी मिळेल आणि त्याच्या आकांक्षा पूर्ण होतील, अशी आधुनिक व्यवस्था निर्माण करणे आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. नव्याने नियुक्त झालेल्या युवकांचे उद्दिष्ट भारतातील युवक व नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचे असावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी करदाते व नागरिकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, सरकार नागरिकांमुळे अस्तित्वात आहे आणि ते त्यांची सेवा करण्यासाठी नियुक्त झाले आहेत. पोस्टमन असो किंवा प्राध्यापक मूलभूत कर्तव्य म्हणजे राष्ट्रसेवा, असे त्यांनी सांगितले. देश विकसित होण्याचा संकल्प करत असताना नव्या भरती झालेल्या युवकांनी शासकीय यंत्रणेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेकडे वाटचाल करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. केवळ चांगले काम करून न थांबता, उत्कृष्टतेकडे झेपावले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना जगभरात मान्यता मिळेल, असे उदाहरण निर्माण करावे, असे ते म्हणाले. राष्ट्राच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपली बांधिलकी पाळली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
नव्या नियुक्त युवकांनी त्यांच्या पदांसह नव्या प्रवासाला प्रारंभ केला आहे, याचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी त्यांना नेहमी विनम्र राहण्याचा व कायम शिकत राहण्याचा सल्ला दिला. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आय गोट (आयजीओटी) कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, याचा उल्लेख करून त्यांनी या डिजिटल प्रशिक्षण साधनाचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले. पुन्हा एकदा, आज नियुक्तीपत्रे प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो, असे म्हणत पंतप्रधानांनी आपले भाषण संपवले.
पार्श्वभूमी:
हा रोजगार मेळावा देशभरातील 40 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नवनियुक्त युवक महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आदी विविध मंत्रालये व विभागांमध्ये केंद्र सरकारमध्ये सामील होत आहेत.
नव्याने नियुक्त झालेले युवक कर्मयोगी प्रारंभ या ( iGOT) कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन प्रशिक्षण मॉड्युलद्वारे मूलभूत प्रशिक्षण घेऊ शकतील. या पोर्टलवर 1,400 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ज्यामुळे नव्या भरती झालेल्यांना त्यांच्या भूमिकेत प्रभावीपणे सेवा करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त होतील आणि ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने कार्य करता येईल.
* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177421)
Visitor Counter : 3
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam