उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभेतील सर्व राजकीय पक्षांच्या सभागृह नेत्यांची बैठक

Posted On: 07 OCT 2025 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2025

राज्यसभेतील सर्व राजकीय पक्षांच्या सभागृह नेत्यांची उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील पहिली बैठक आज झाली.

मंत्र्यांसह 29 सभागृह नेत्यांचे स्वागत करत अध्यक्षांनी त्या सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तसेच उपराष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या सभागृह नेत्यांनी पाठवलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले.

बैठकीची सुरुवात करताना अध्यक्षांनी राज्यसभेचे कामकाज योग्य त्या सन्मान, शिस्त आणि शिष्टाचारासह चालावे याची सुनिश्चिती करून घेण्याच्या महत्त्वावर अधिक भर दिला. परस्पर संवाद, विचारमंथन, वादविवाद तसेच चर्चा ही संसदीय लोकशाहीची मुलभूत तत्वे आहेत हे त्यांनी अधोरेखित केले.

सार्वजनिक चिंतेचे मुद्दे मांडण्यासाठी सदस्यांना उपलब्ध असलेल्या संधींवर अधिक प्रकाश टाकत अध्यक्षांनी शून्य प्रहर, विशेष उल्लेख आणि प्रश्नोत्तराचा तास ही साधने तातडीचे सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचे विषय मांडण्यासाठी सदस्यांना अनुमती देतात असे सांगितले.

या सभागृहातील प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक सेकंद लोकशाही प्रकिया बळकट करण्यासाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी सर्व सदस्यांना केले.

राज्यसभेचे कामकाज चालवण्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत राजकीय पक्षांच्या सभागृह नेत्यांनी, विरोधी पक्षांना सभागृहात शून्य प्रहर, प्रश्नोत्तराचा तास, खासगी सदस्यांचे विषय (पीएमबी), अल्पकालीन चर्चा (एसडीडी), लक्षवेधी सूचना (सीएएन), इत्यादी विविध संसदीय सुविधांच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधी देण्याची विनंती अध्यक्षांना केली. प्रत्येक पक्षाला वाजवी कालावधी नेमून देण्यासाठी प्रयत्न केले जावेत जेणेकरून लहान पक्ष त्यांच्या मर्यादित संख्याबळामुळे मागे पडू नयेत अशी सूचना यावेळी मांडण्यात आली. या बाबतीत लक्ष घालण्याचे आश्वासन अध्यक्षांनी सर्व नेत्यांना दिले.

सर्व नेत्यांच्या सहभागासह अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात सदर बैठक पार पडली. सदस्यांनी केलेल्या मौल्यवान सूचनांचा योग्य विचार केला जाईल याची ग्वाही देत उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2176065) Visitor Counter : 4