पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी C-295 विमान कारखान्याच्या उद्घाटन समारंभात केलेले भाषण

Posted On: 28 OCT 2024 4:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2024

 

महामहिम पेड्रो सांचेझ, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, भारताचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह जी, परराष्ट्र मंत्री श्री एस. जयशंकर जी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, स्पेन आणि गुजरात सरकारमधील मंत्रीगण, एअरबस आणि टाटा परिवारातील सर्व सदस्य, बंधू आणि भगिनींनो!

नमस्कार!

बुएनोस दिआस!

माझे मित्र, श्री. पेड्रो सांचेझ, प्रथमच भारत भेटीवर आले आहेत. आजपासून, आपण भारत आणि स्पेनमधील भागीदारीला एक नवीन दिशा देत आहोत. आपण C-295 वाहतूक विमान निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करत आहोत. हा कारखाना केवळ भारत-स्पेन संबंध मजबूत करणार नाही तर आपल्या 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेला देखील बळकटी देणार आहे. एअरबस आणि टाटा यांच्या संपूर्ण टीमला माझ्या हार्दिक शुभेच्छा. नुकतेच आपण राष्ट्राचे महान सुपुत्र रतन टाटा जी यांना गमावले. जर रतन टाटा जी आज आपल्यासोबत असते तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. मला खात्री आहे की ते जिथे कुठे असतील, आज त्यांच्या आत्म्यालाही प्रचंड समाधान आणि अपार आनंद होत असेल.

मित्रांनो,

C-295 विमान कारखाना, नवीन भारताची नवीन कार्यसंस्कृती प्रतिबिंबित करतो. कल्पना ते अंमलबजावणी या प्रवासात भारताची  वेगवान कार्यपद्धती येथे स्पष्टपणे दिसून येते. या कारखान्याचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. आणि हा कारखाना ऑक्टोबरमध्येच विमान उत्पादनासाठी तयार झाला आहे. नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये अनावश्यक विलंब टाळण्यावर मी नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना, वडोदऱ्यात बॉम्बार्डियर ट्रेन कोच तयार करण्यासाठी कारखाना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो कारखाना देखील विक्रमी वेळेत उत्पादनासाठी सज्ज झाला होता. आज, आपण त्या कारखान्यात बनवलेले मेट्रो कोच इतर देशांमध्येही निर्यात करत आहोत. मला खात्री आहे की या कारखान्यात तयार होणारी विमाने भविष्यात जगभरात निर्यात केली जातील.

मित्रांनो,

प्रसिद्ध स्पॅनिश कवी अँटोनियो माचादो यांनी लिहिले होते:

"प्रवासी, मार्ग अस्तित्वात नसतो... चालू लागलो की मार्ग तयार होतो." 

याचा अर्थ असा की ज्या क्षणी आपण आपल्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकतो, त्या क्षणी नव्या वाटा तयार होऊ लागतात. आज, भारताची संरक्षण उत्पादन परिसंस्था नवीन उंची गाठत आहे. जर आपण दशकापूर्वी ठोस पावले उचलली नसती तर आज हा टप्पा गाठणे अशक्य झाले असते. त्यावेळी, भारतात मोठ्या प्रमाणात संरक्षण उत्पादनाची कल्पना कोणीही करू शकत नव्हते. तेव्हा प्राधान्य केवळ आयातीला दिले जात होते. परंतु आपण नवीन ध्येये निश्चित करून नवीन मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याचे फळ आपल्याला दिसत आहे.

मित्रांनो,

कोणत्याही शक्यतेचे समृद्धीमध्ये रूपांतर करण्यासाठी, योग्य योजना आणि योग्य भागीदारी आवश्यक आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्राचे रूपांतर हे योग्य योजनेचे आणि योग्य भागीदारीचे उदाहरण आहे. गेल्या दशकात, देशाने असे निर्णय घेतले आहेत ज्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात उत्साही उद्योग व्यवस्था निर्माण झाली. आम्ही संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवला, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सना कार्यक्षम बनवले, शस्त्रास्त्र कारखान्यांना सात मोठ्या कंपन्यांमध्ये रूपांतरित केले, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ला सक्षम केले, तसेच उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन प्रमुख संरक्षण कॉरिडॉर विकसित केले. या उपक्रमांनी संरक्षण क्षेत्राला नवीन ऊर्जा दिली आहे. आयडेक्स (इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स) सारख्या योजनांनी स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन दिले आहे, आणि गेल्या 5-6 वर्षांत भारतात जवळजवळ 1000 नवीन संरक्षण स्टार्ट-अप्स उदयास आले आहेत. गेल्या 10 वर्षांत, भारताची संरक्षण निर्यात 30 पटीने वाढली आहे. आज, आपण जगातील 100 हून अधिक देशांना संरक्षण साहित्य निर्यात करत आहोत.

मित्रांनो,

आज, आम्ही भारतात कौशल्य आणि रोजगार निर्मितीवर खूप लक्ष केंद्रित करत आहोत. एअरबस आणि टाटा यांच्या या कारखान्यामुळे भारतात हजारो नोकऱ्या निर्माण होतील. या प्रकल्पामुळे 18,000 विमानांच्या सुट्या भागांचे स्वदेशात उत्पादन सुरू होणार आहे. एक भाग देशाच्या एका भागात तयार केला जाऊ शकतो, तर दुसरा भाग इतरत्र तयार केला जाऊ शकतो आणि हे सुटे भाग कोण तयार करेल? आपले सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हे काम करणार आहेत. आज आपण जगभरातील प्रमुख विमान कंपन्यांना सुटे भाग पुरवठा करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहोत. हा नवीन विमान कारखाना भारतात नवीन कौशल्ये आणि नवीन उद्योगांना चालना देईल.

मित्रांनो,

मी या कार्यक्रमाला केवळ वाहतूक विमानांच्या निर्मितीचा नाही तर त्यापलीकडे जाताना पाहतो. गेल्या दशकात, आपण भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व वाढ आणि परिवर्तन पाहिले आहे. आपण देशभरातील शेकडो लहान शहरांमध्ये हवाई संपर्काचा विस्तार करत आहोत. भारताला विमान वाहतूक आणि एमआरओ (देखभाल आणि दुरुस्ती) चे केंद्र बनवण्यासाठी काम करत आहोत. ही परिसंस्था भविष्यात 'मेड इन इंडिया' नागरी विमाने तयार करण्याचा मार्ग मोकळा करेल. तुम्हाला माहिती असेलच की विविध भारतीय विमान कंपन्यांनी 1,200 नवीन विमानांच्या ऑर्डर दिल्या आहेत. याचा अर्थ असा की भविष्यात, भारत आणि जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरी विमानांच्या डिझाइन आणि निर्मितीमध्ये हा कारखाना महत्त्वाची भूमिका बजावेल.

मित्रांनो,

भारताच्या या प्रयत्नांमध्ये वडोदरा शहर उत्प्रेरक म्हणून काम करेल. हे शहर आधीच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) एक मोठे केंद्र आहे आणि येथे गती शक्ती विद्यापीठ देखील आहे. हे विद्यापीठ विविध क्षेत्रांसाठी व्यावसायिक तयार करत आहे. वडोदरा येथे औषधनिर्मिती क्षेत्र, अभियांत्रिकी आणि अवजड यंत्रसामग्री, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, वीज आणि ऊर्जा उपकरणांशी संबंधित असंख्य कंपन्या आहेत. आता, हा संपूर्ण प्रदेश भारतातील विमान निर्मितीे एक प्रमुख केंद्र बनण्यास सज्ज आहे. मी गुजरात सरकार, मुख्यमंत्री भूपेंद्र भाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांच्या आधुनिक औद्योगिक धोरणे आणि निर्णयांबद्दल अभिनंदन करतो.

मित्रांनो,

वडोदरा शहराचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य आहे. हे भारतातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक शहर आहे, वारशाचे शहर आहे. म्हणूनच, स्पेनमधून आलेल्या तुम्हा सर्वांचे येथे स्वागत करताना मला विशेष आनंद होत आहे. भारत आणि स्पेनमध्ये सांस्कृतिक संबंधांना विशेष महत्त्व आहे. मला फादर कार्लोस व्हॅलेस आठवतात, जे स्पेनहून आले आणि गुजरातमध्ये स्थायिक झाले, त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पन्नास वर्षे येथे समर्पित केली. त्यांनी आपल्या विचारांनी आणि लेखनातून भारतीय संस्कृती समृद्ध केली. मला त्यांना अनेक वेळा भेटण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आम्ही त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. गुजरातमध्ये आम्ही त्यांना प्रेमाने फादर व्हॅलेस म्हणत होतो आणि ते गुजराती भाषेत लेखन करत असत. त्यांच्या पुस्तकांनी गुजराती साहित्य आणि आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आहे.

मित्रांनो,

मी ऐकले आहे की स्पेनमध्ये योग खूप लोकप्रिय आहे. भारतीय चाहते देखील स्पेनच्या फुटबॉलचे कौतुक करतात. कालच्या रियल माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील सामन्याची भारतात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि बार्सिलोनाचा आश्चर्यकारक विजय येथेही चर्चेचा विषय बनला. मी हमी देतो की भारतातील दोन्ही क्लबचे चाहते स्पेनमधील चाहत्यांइतकेच उत्साहाने हास्यविनोद करतात.

मित्रांनो,

अन्न, चित्रपट आणि फुटबॉल - हे सर्व घटक आपल्या दोन्ही राष्ट्रांमधील लोकांना एकमेकांशी जोडतात. मला आनंद आहे की भारत आणि स्पेन यांनी 2026 हे वर्ष भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

भारत आणि स्पेनमधील भागीदारी एका प्रिझमसारखी आहे, जी बहुआयामी, चैतन्यशील आणि सतत विकसित होत जाणारी आहे. मला खात्री आहे की आजचा कार्यक्रम भारत आणि स्पेनमधील अनेक नवीन संयुक्त सहकार्य प्रकल्पांना प्रेरणा देईल. मी स्पॅनिश उद्योगजगताला आणि नवोन्मेषकांना भारतात येऊन आमच्या विकास प्रवासाचा भाग बनण्याचे आमंत्रण देतो. पुन्हा एकदा, या प्रकल्पासाठी एअरबस आणि टाटा यांच्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.

धन्यवाद. 

 

* * *

आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2176053) Visitor Counter : 3