पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जी 7 शिखर परिषदेच्या आऊटरीच सत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण

Posted On: 14 JUN 2024 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जून 2024

 

प्रधानमंत्री मेलोनी,

महामहिम,

आदरणीय मान्यवर,

नमस्कार.

सर्वप्रथम या शिखर परिषदेच्या निमंत्रणाबद्दल आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल मी प्रधानमंत्री मेलोनी यांचे हार्दिक आभार मानतो. चॅन्सेलर शोल्झ यांना त्यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ खूप खूप शुभेच्छा देतो. जी 7 शिखर परिषदेचे हे आयोजन खास आहे आणि ऐतिहासिकही आहे. जी 7 च्या सर्व सदस्य मित्रांना या समूहाच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 

मित्रांनो,

गेल्या आठवड्यात तुमच्यापैकी अनेक मित्रजन युरोपियन संसद निवडणुकांमध्ये व्यग्र होते. काही मित्र येत्या काळात निवडणुकीच्या रणधुमाळीला सामोरे जाणार आहेत. भारतातही गेले काही महिने निवडणुका सुरू होत्या. भारतातील निवडणुकांची वैशिष्ट्ये व व्याप्ती समजून घेण्यासाठी मी काही आकडेवारी देतो : 2,600 हुन जास्त राजकीय पक्ष, 10 लाखांहून जास्त मतदानकेंद्रे , 50 लाखांहून जास्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, 1 कोटी 50 लाख निवडणूक कर्मचारी व सुमारे 97 कोटी मतदार, ज्यातील 64 कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापी वापराद्वारे पूर्ण निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक करण्यात आली. इतक्या मोठ्या निवडणुकीनंतर केवळ काही तासांमध्ये निकाल घोषित करण्यात आले. लोकशाहीचा हा उत्सव जगातीलच नव्हे तर मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठा उत्सव होता. लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या प्राचीन मूल्यव्यवस्थेचा हा जिताजागता वस्तुपाठ आहे. आणि भारताच्या जनतेने मला त्यांची सेवा करण्याची सातत्याने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. भारतात गेल्या सहा दशकांमध्ये असे प्रथमच घडले आहे. भारताच्या जनतेने या ऐतिहासिक विजयाच्या रूपाने मला जो आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे लोकशाहीचा विजय झाला आहे. संपूर्ण लोकशाहीवादी जगताचा विजय झाला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर थोड्याच दिवसात आपण सर्व मित्रांच्या सहवासात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद होत आहे. 

महामहिम,

एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावापासून वंचित असा मानवी जीवनाचा एकही पैलू अस्तित्वात नसावा. एका बाजूला तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानव चंद्रावर पोचला आहे, आणि दुसऱ्या बाजूला सायबर सुरक्षेचे नवे आव्हान तयार झाले आहे. तंत्रज्ञानाचा लाभ सर्व वर्गांपर्यंत पोचावा, समाजातील प्रत्येक व्यक्तीला सामर्थ्य मिळावे, सामाजिक भेदाभेद नष्ट व्हावेत व मानवी शक्तीवर मर्यादा येण्याऐवजी त्यांच्या क्षमतेत वाढ व्हावी यासाठी, आपण सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही केवळ आपली इच्छा नव्हे तर जबाबदारी झाली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण एकाधिकाराकडून सर्वाधिकाराकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तंत्रज्ञानाला आपण संहारक नव्हे तर सृजनात्मक रूप दिले पाहिजे. तरच आपण एका सर्वसमावेशक समाजाचा पाया मजबूत करू शकू. भारत आपल्या मानव केंद्रित दृष्टिकोनातून एका अधिक चांगल्या भविष्यकाळासाठी प्रयत्नशील आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयात ठाम राष्ट्रीय धोरण आखणाऱ्या काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश आहे. याच धोरणावर आधारित ए आय मिशनची सुरुवात भारताने यावर्षी केली आहे. या मिशनचे बोधवाक्य होते, ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’. Global Partnership for AI अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक भागीदारी’ चा संस्थापक सदस्य आणि प्रमुख सदस्यांच्या भूमिकेतून आम्ही सर्व देशांचे सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. भारताच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी झालेल्या जी 20 शिखर परिषदे दरम्यान आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सुशासनाच्या महत्वाच्या भूमिकेला अधोरेखित केले होते. यापुढील काळातही कृत्रिम बुद्धिमत्तेला पारदर्शक, सुरक्षित, न्याय्य, सर्वांच्या आवाक्यातील, आणि जबाबदार बनवण्यासाठी आम्ही सर्व देशांच्या बरोबरीने काम करत राहू. 

महामहिम,

ऊर्जाक्षेत्रातील भारताचा दृष्टिकोन चार तत्वांवर आधारित आहे - उपलब्धता,सुलभता, परवडण्याची क्षमता आणि स्वीकार्यता. कॉप (COP) च्या अंतर्गत घेतलेल्या जबाबदाऱ्यांना दिलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करणारा भारत हा पहिला देश आहे. आणि आम्ही 2070 पर्यंत नेट झिरो या निर्धारित उद्दिष्टाप्रत पोचण्याची  आमची जबाबदारी पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. भावी काळाला हरित पर्व बनवण्यासाठी आपण सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी भारताने ‘मिशन लाइफ’ म्हणजे ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ या मोहिमेला सुरुवात केली आहे. या मिशन अंतर्गत ५ जून या पर्यावरण दिनी मी एक मोहीम सुरु केली आहे - ‘एक पेड माँ के नाम’. स्वतःच्या आईवर सर्वच जण प्रेम करत असतात. याच भावनेने आम्ही वृक्षारोपणाला ही वैयक्तिक स्पर्श असलेली आणि जागतिक जबाबदारी असलेली एक व्यापक लोकचळवळ बनवू इच्छितो. आपण सर्वांनीच यात सहभागी व्हावे असे आवाहन मी करत आहे. याची अधिक माहिती माझी टीम आपणा सर्वांपर्यंत पोचवेल. 

महामहिम,

‘2047 सालापर्यंत विकसित भारतीची निर्मिती’ हा आमचा संकल्प आहे. समाजातील कोणताही घटक या विकास यात्रेच्या बाहेर राहू नये यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या बाबतीत देखील हे महत्वाचे आहे. जागतिक अनिश्चितता आणि ताणतणावात ग्लोबल साऊथ देशांना सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागत आहे. ग्लोबल साऊथ देशांच्या प्राथमिकता आणि समस्या जगासमोर आणणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. या प्रयत्नांमध्ये आम्ही आफ्रिकेला प्राथमिकता दिली आहे. भारताच्या अध्यक्षता काळात जी-20 ने आफ्रिकन युनियनला स्थायी सदस्य बनवले, याचा आम्हाला अभिमान आहे. आफ्रिकेतील सर्व देशांच्या आर्थिक, सामाजिक विकास, स्थैर्य व सुरक्षिततेच्या बाबतीत भारत नेहमीच योगदान देत आला आहे आणि यापुढेही देत राहील. 

महामहिम,

आजच्या बैठकीतून सर्व देशांच्या प्राथमिकतांच्या बाबतीत वाढते एकमत दृगोचर होत आहे. या सर्व विषयांवर आम्ही जी-7 शी संवाद आणि सहकार्य सुरु ठेवू . खूप खूप धन्यवाद . 

 

* * *

नेहा कुलकर्णी/उमा रायकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175938) Visitor Counter : 7