पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या पंतप्रधानांच्या भूतान दौऱ्यानिमित्त संयुक्त निवेदन


भारत-भूतान : प्रगती आणि विकासासाठीची एकत्रित वाटचाल

Posted On: 22 MAR 2024 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मार्च 2024

 

शतकानुशतके भारत आणि भूतान यांनी परस्पर विश्वास, सद्भावना आणि सामंजस्यावर आधारलेले मैत्रीचे आणि सहकार्याचे दृढ संबंध जोपासले आहेत. आपली सांस्कृतिक नाळ आणि भौगोलिक समानता आपल्याला एकमेकांशी जवळचे बनवते. भक्कम आर्थिक आणि वित्तीय संबंध आपल्यामध्ये घट्ट बंध निर्माण करतात. भारत आणि भूतानच्या जनतेतील जिव्हाळ्याची मैत्री ही आपल्या परस्पर संबंधांच्या केंद्रस्थानी आहे. आपल्या दोन राष्ट्रांतील नातेसंबंध हे आदर्श शेजाराचे उत्तम उदाहरण आहे.

आपल्या दोन राष्ट्रांमधील शाश्वत भागीदारी ही आपल्यातील समान मूल्ये तसेच सामायिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशावर आधारलेली आहे. “भारतासाठी भूतान आणि भूतानसाठी भारत” हे या प्रदेशाचे शाश्वत वास्तव आहे. हे वास्तव, भूतानचे वंशपरंपरागत चालत आलेले ड्रुक ग्यालपो या राजांच्या द्रष्ट्या नेतृत्वाने तसेच भारत आणि भूतानच्या राजकीय नेतृत्वाने जोपासले  आहे.

आपल्या दोन देशांमधील सुरक्षा विषयक परस्पर सहकार्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्यांवर परस्पर निकट समन्वय आणि सहकार्य सुरू ठेवण्यास आम्ही सहमत आहोत.

आपण एकत्रितपणे असे परिवर्तनकारक सहकार्य पुढे नेत राहू जे आपल्या अनोख्या आणि विशेष नात्यांना अधिक प्रगत करेल. यामध्ये, रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग, जलमार्ग, वस्तू आणि सेवांच्या अखंड सीमापार हालचालीसाठी व्यापारी पायाभूत सुविधा तसेच आर्थिक आणि डिजिटल संपर्क-संवाद, यांच्या माध्यमातून विस्तृत अर्थाने संपर्क व्यवस्था वाढवणे समाविष्ट आहे.

भूतानच्या 1961 सालच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून भारताची भूतानसोबतची विकासात्मक भागीदारी लोकांचे सबलीकरण करत आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये तसेच प्रदेशांमध्ये विकास सुनिश्चित करत आहे. आपली विकासात्मक भागीदारी, भारताच्या “सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास" या दृष्टिकोनाचा आणि भूतानमधील ग्रॉस नॅशनल हॅप्पिनेस तत्त्वज्ञानाचा मिलाफ आहे. आपण भूतानची जनता आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांनुसार तसेच भूतानच्या माननीय नेतृत्वाच्या ध्येयानुसार आपले विकासात्मक सहकार्य पुढे वाढवत राहू.

आपले ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य हे भरीव आर्थिक गुंतवणुकीचे एक स्पष्ट उदाहरण आहे, जे परस्पर फायदेशीर परिणाम देते. आपण जलविद्युत, सौरऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन (कार्बन उत्सर्जन न होता निर्माण होणारा हायड्रोजन हा उर्जा स्रोत) या क्षेत्रांतील स्वच्छ ऊर्जा सहकार्य वाढवत राहू आणि नवीन प्रकल्प एकत्र विकसित करू. जे आपल्या तांत्रिक कौशल्य, व्यवसाय क्षेत्रातील गतीमान सक्रियता आणि दोन्ही देशांतील कुशल गुणवत्ता वापरून प्रदेशातील ऊर्जा सुरक्षा वाढवतील. या संदर्भात आम्ही, भारत-भूतान ऊर्जा सहकार्यावरील संयुक्त दृष्टीकोन निवेदनाचे स्वागत करतो. 

जसे आपल्या राष्ट्रांमध्ये सखोल डिजिटल आणि तांत्रिक परिवर्तन होत आहे, तसे आपल्या संयुक्त प्रयत्नांचा उद्देश जलद आर्थिक वाढ साधण्यासाठी आणि दोन्ही जनतेच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे राहील. आपण अंतराळ तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, स्टार्ट-अप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा, STEM (Science, Technology, Engineering, Mathematics अर्थात  विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) संशोधन आणि शिक्षण तसेच डिजिटल कौशल्य विकास या विशेष क्षेत्रांतील आपले सहकार्य अधिक बळकट करू.

आपण परस्पर व्यापार आणि गुंतवणूक संबंध... विशेषतः खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून अधिक बळकट करू. यात भूतानच्या माननीय नेतृत्वाच्या संकल्पानुसार गेलिफू विशेष प्रशासकीय प्रदेश विकसित करण्याच्या कल्पनेचा समावेश आहे. यामुळे, या प्रदेशातील आर्थिक संपर्क-संवाद व्यवस्था शाश्वत पद्धतीने वाढेल, आर्थिक भागीदारीला चालना मिळेल, तसेच भारत आणि भूतानची जनता अधिक जवळ येईल.

जनतेमधील उत्तम परस्पर संबंध हे आपल्या असाधारण द्विपक्षीय नात्यांचा पाया आहेत. आपण बुद्धिवंत, शैक्षणिक बाबी, पर्यटक, विद्यार्थी, युवक आणि क्रीडापटू यांची एकमेकांच्या देशांमध्ये आवक जावक वाढवून आपल्या जनतेमधील परस्पर संबंध जोपासणार आहोत. तसेच आपण परस्पर देशातील प्रतिष्ठित सांस्कृतिक वारसा स्थळांच्या भेटींच्या माध्यमातून आपली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाळही जोपासणार आहोत.

शिक्षण, कौशल्यविकास, उद्यमशीलता, तंत्रज्ञान, क्रीडा तसेच सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग, अशा तरुणाईच्या विकासाला चालना देणाऱ्या क्षेत्रांमध्ये आपली भागीदारी गतीमान होणे आवश्यक आहे, याची आपल्याला जाणीव आहे. भारत–भूतान भागीदारी आपापल्या तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या स्वप्नांना आणि अपेक्षांना प्रतिसाद देईल.

भारताच्या इतिहासाचा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. झपाट्याने होणारी सामाजिक-आर्थिक प्रगती, तांत्रिक प्रगती आणि अमृतकाळात 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचा ध्यास, ही या अध्यायाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. भूतानने 2034 पर्यंत उच्च-उत्पन्न देश होण्याचे ध्येय ठेवले असून आपल्या आर्थिक विकासाच्या नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. प्रगती आणि समृद्धीच्या या सामायिक ध्यासात भारत आणि भूतान हे सदैव एकमेकांचे निकटचे मित्र आणि भागीदार राहतील.

 

* * *

नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175880) Visitor Counter : 15